जयदेव रानडे

चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग यांनी अमेरिकेचे वा पाश्चिमात्त्य देशांचे नाव न घेता शेलकी टीका करणारा एक लेख अलीकडेच लिहून त्यात चीनच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे स्पष्ट केली. पाठोपाठ चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी २४ मे रोजी, ‘युरेशियन इकॉनॅामिक युनियन’च्या दुसऱ्या आर्थिक परिषदेच्या खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना, ‘(चीनप्रणीत) जागतिक विकास पुढाकार, जागतिक सुरक्षा पुढाकार आणि जागतिक सभ्यता (सिव्हिलायझेशन) पुढाकार’ हेच शब्द वापरले. जगात स्थायी शांतता नांदावी, वैश्विक सुरक्षेतून सामायिक समृद्धी आणि सामूहिक भवितव्याकडे मानवी समाजाने जोमाने वाटचाल करावी, यासाठी या तीन पुढाकारांना जगाने साथ दिली पाहिजे, असे आवाहन क्षी यांच्या भाषणात होते.

pimpri chinchwad marathi news, ncp both factions aggressive in pimpri chinchwad marathi news, rohit pawar sunil tatkare marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक
Narendra Modi opinion that textile industry is important in developed India
‘विकसित भारता’त वस्त्रोद्योग महत्त्वाचा – मोदी
Democrats Germany
जर्मनीत लोकशाहीवादी विरुद्ध फासिस्ट शक्ती!
jayant chaudhary
दहा दिवसांनंतरही रखडतोय RLD चा NDA प्रवेश; भाजपाच्या मनात नेमके काय?

चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग यांच्या लेखात हेच मुद्दे कसे होते हे पुढे पाहूच, पण त्याआधी हे लक्षात ठेवले पाहिजे की, चिन गांग हे चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या खास मर्जीतले, त्यांचे पट्टशिष्य म्हणावेत असे आहेत. यापूर्वी कैक वर्षे ते क्षी यांचे परराष्ट्र-व्यवहार वेळापत्रक सांभाळत. अवघ्या ५७ वर्षांचे चिन गांग हे सध्या चिनी प्रतिनिधीगृहाचे सदस्य असले, तरी २०२७ साली चिनी कम्युनिस्ट पक्षाची पुढली महापरिषद होईल तेव्हा त्यांची वर्णी पॉलिटब्यूरोत लागणारच, असे मानले जाते.

या चिन गांग यांच्या लेखाचे शीर्षक ‘चिनी शैलीच्या आधुनिकीकरणाद्वारे जगासाठी नव्या संधी उपलब्ध करताना…’ असे आहे. क्षी जिनपिंग यांचा उल्लेख या लेखात पाच वेळा आहे. लेखातून चिन गांग यांचा प्रयत्न चीन ही कशी सहृदय आर्थिक सत्ता आहे आणि याचा जागतिक प्रगतीलाच कसा फायदाच होऊ शकतो, असे दाखवण्याचा आहे.

सध्या चर्चेत असणाऱ्या मुद्द्यांचा उल्लेख करायचा आणि क्षी जिनपिंग यांच्या व्यापक धोरणांमध्ये या साऱ्याचा विचार कसा आहे याकडे लक्ष वेधायचे, असे या चिन गांग यांच्या लेखाचे साधारण स्वरूप. यापैकी क्षी यांचे मुद्दे म्हणजे ‘चिनी शैलीचे आधुनिकीकरण’ तसेच चीनचा जागतिक विकास पुढाकार, जागतिक सुरक्षा पुढाकार आणि जागतिक सभ्यता पुढाकार.

ही चीनने जगाच्या भल्यासाठी उचललेली पावले आहेत, असा प्रचार चिनी अधिकृत प्रसारमाध्यमांतून वेळोवेळी होतच असतो, पण साधारणत: अशी सरकारी बाजू मांडणारे अधिकारी वा मंत्री आदी लेखक यापैकी एखाद्या मुद्द्याच्या स्पष्टीकरणावर भर देताना दिसतात. चिन गांग यांनी हे सारेच मुद्दे मांडले आणि वर क्षी जिनपिंग यांना अतिप्रिय असलेल्या ‘सामायिक समृद्धी’चा तसेच ‘बेल्ट ॲण्ड रोड इनिशिएटिव्ह’चाही उल्लेख ताज्या लेखात केला. वास्तविक हे अखेरचे दोन मुद्दे नवे नाहीत, ते ‘चिनी शैलीच्या आधुनिकीकरणा’चा भाग मानले जातात. पण ‘सामायिक समृद्धी’चा उल्लेख साम्यवादी चीनमध्ये गेल्या काही दशकांतच थोडेफार स्वातंत्र्य मिळालेल्या खासगी उद्योजकांना काहीसा संशयास्पद वाटू शकतो, म्हणून चीनमध्ये देशांतर्गत माध्यमांतील लेखांमध्ये तेवढा एक उल्लेख गेल्या वर्षभरापासून जरा कमी होऊ लागला आहे. पण या साऱ्याचे श्रेय क्षी जिनपिंग यांचेच असल्याचा वारंवार उद्घोष करत चिन गांग यांनी हे मुद्दे चीनच्या परराष्ट्र धोरणासाठी निरतिशय महत्त्वाचे असल्याचे नमूद केले आहे. वर, ‘क्षी जिनपिंग हेच (चिनी कम्युनिस्ट) पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचा गाभा आहेत, पर्यायाने पक्षाचाही गाभा आहेत आणि तेच या ध्येयाचे सुकाणूदेखील त्यांच्याच हाती आहे’ असे लिहिण्यास चिन गांग विसरलेले नाहीत.

‘चिनी शैलीचे आधुनिकीकरण’ हा तुलनेने सर्वांत नवा, पण सर्वांत प्रभावी असा चीनचा पुढाकार मानला जात असल्याचे एकंदर चिनी माध्यमांचा गेल्या वर्षभरातील आढावा घेतल्यास सहजच दिसते. त्याबद्दल लिहिताना चिन गांग म्हणतात की, क्षी जिनपिंग हेच या चिनी शैलीच्या आधुनिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार आणि नेतेही आहेत. या पुढाकारातली ‘चिनी शैली’ हा महत्त्वाचा भाग आहे, तोच चीनचे महान राष्ट्रीय पुनरुत्थान करणारा आहे, हे सांगताना कोणाही भूतपूर्व चिनी नेत्याचा थेट उल्लेख न करता, ‘जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था’ आणि सर्वाधिक उत्पादित वस्तूंचा व्यापारच नव्हे तर उत्पादनही करणारा देश ही चीनची वैशिष्ट्ये या आधुनिकीकरणाच्या चिनी शैलीचीच आहेत, हेही चिन गांग नमूद करतात.

चीन हा(च) अन्य देशांसाठी आदर्श ठरू शकतो, हा मुद्दा ठसवण्यासाठी चिन गांग यांनी पाश्चात्त्य देशांवर टीका केली आहे. ‘‘चिनी शैलीच्या आधुनिकीकरणाने दाखवलेले चित्र हे पाश्चात्त्य आधुनिकीकरणाच्या परिणामांपेक्षा निश्चितच निराळे आहे, कारण चिनी शैलीमुळे एक नवी, अभिनव अशी मानवी सभ्यता उदयाला येते आहे’’ असे त्यांचे म्हणणे. विकासाची प्रतिरूपे तर अनेक असतात, पण आमचे चिनी प्रतिरूप आगळेवेगळेच, असे ठासून सांगण्याच्या भरात, ‘‘पाश्चात्त्य प्रतिरूपांची नक्कल जर केली, तर केवळ अधोगतीच नव्हे- संकटेच साेसावी लागतील’’ असाही इशारा चीनचे हे परराष्ट्रमंत्री देतात आणि चीनने नेहमीच सुसंवादी जगाचे स्वप्न पाहिले असल्याचा दावाही त्याच परिच्छेदात करतात.

केवळ अन्न- वस्त्र या गरजा महत्त्वाच्या नसून सर्वव्यापी लोककल्याणातून साकार होणारी सभ्यता हे जागतिक ध्येय चीनने- म्हणजेच क्षी जिनपिंग यांनी ठेवले असल्याचे सांगून झाल्यावर आणखी एक संकल्पना जिनपिंग यांचीच आहे आणि तीही महत्त्वाची आहे, असे चिन गांग म्हणतात. ही संकल्पना ‘सभ्यतेच्या वारशा’ची. म्हणजे चिन गांग यांच्या मते जगातील सभ्यतांच्या वैविध्याचा आदर राखण्याची. ‘आधुनिकीकरणामुळे दरवेळी सभ्यतांचा ऱ्हासच झाला पाहिजे असे काही नाही- उलट पारंपरिक सभ्यतेचा पुनर्जन्मही होऊ शकतो’ अशा अर्थाचे विधानही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या लेखात केलेले आहे.

‘जागतिक विकास पुढाकार’ घेण्यामागील चीनची योग्यता म्हणजे ‘लोककेंद्री मूल्यांच्या स्वीकारा’तून तब्बल ४० कोटी लोकांची मध्यम उत्पन्न गटापर्यंत आर्थिक उन्नती चीनने केलेली आहे, शिवाय ‘गेल्या दहा वर्षांत जगाच्या आर्थिक वाढीमध्ये चीनचे योगदान हे ‘जी-सेव्हन’ देशांच्या एकत्रित योगदानापेक्षाही अधिक आहे’ आणि जगात याचे स्वागतही झालेलेच आहे, याची आठवण चिन गांग देतात. ‘सामायिक समृद्धी’ आणि तिचा मार्ग ठरलेला ‘बेल्ट ॲण्ड रोड’ प्रकल्प, हे ‘जागतिक विकास पुढाकारा’चा भागच तर आहेत, असे ठसवण्यावर न थांबता ‘आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चीनने पुरवलेली ही सार्वजनिक वस्तू आहे’ असेही शब्द चिन गांग वापरतात.

जागतिक वस्तुमाल-विनिमयासाठी ‘विश्वासार्ह’ पुरवठा साखळ्या उभारण्याचे काम अमेरिका वा पाश्चिमात्त्य देशांनी केलेलेच नाही, अशी टीका चिन गांग करतात आणि चीनला या साखळीपासून तोडण्याचे, वगळण्याचे जे प्रयत्न ‘डीकपलिंग’ या नावाखाली चालू आहेत, त्यांना बहुतेक लोकांचा विरोधच असल्याचे विधानही करतात. ‘‘आधुनिकीकरण हा प्रत्येक देशाचा अविभाज्य हक्क आहे” – आणि कोणत्याही देशाने यात अडचणी अथवा अडथळे आणू नयेत, असे चिन गांग म्हणतात. ‘‘चीन कोणत्याही मोठ्या सत्तेशी स्पर्धा करू इच्छित नाही’’, विचारधारांवर आधारलेले शत्रुत्वही आम्हाला नकोच आहे, कारण त्याने “नवे शीतयुद्ध” सुरू होऊन अन्य देशांच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप होत राहील, अशी भाषा याच लेखात चिन गांग वापरतात.

मग चीनचा ‘जागतिक सुरक्षा पुढाकार’ काय आहे? याचा खुलासा करण्यासाठी क्षी जिनपिंग यांचे ‘सामायिक सुरक्षा’ आणि ‘वैश्विक सुरक्षा’ असे दोन्ही शब्दप्रयोग चिन गांग यांनीही या लेखात आणले आहेत. सौदी अरेबिया आणि इराण यांचे राजनैतिक संबंध चीनने त्या देशांच्या विसंवादात लक्ष घातल्यानंतरच सुरळित होणार आहेत, तसेच युक्रेन व रशिया यांच्यामध्ये दीर्घकाळ चाललेला संघर्ष कमी करण्यासाठी चीन प्रयत्न करतो आहे, अशी उदाहरणे चिन गांग देतात.

चीनच्या कम्युनिस्ट पक्षासाठी तैवान हा मुद्दा महत्त्वाचा. चिन गांग यांच्या लेखातही एक उपविभाग तैवानविषयी आहे. ‘‘तैवान चीनला परत मिळणे, हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अंगभूत घटकच होता”, असे सांगणाऱ्या चिन गांग यांनी, ‘तैवानच्या स्वातंत्र्या’साठी प्रयत्न करणारे काही फुटीरतावादी आणि अगदी मोजके देश हे तथाकथित ‘स्वातंत्र्या’च्या नावाखाली आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करून तैवानच्या सामुद्रधुनीतील स्थैर्य धोक्यात आणत आहेत, ‘‘ हे प्रयत्न ‘एक-चीन’ तत्त्वाकडे दुर्लक्ष करणारे, महायुद्धोत्तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेशी विसंगत आणि चीनचे सार्वभौमत्व पायदळी तुडवणारे’ असल्याचे मत चिनी परराष्ट्रमंत्र्यांनी लेखात मांडलेले आहे.

चीन हा ‘सहृदय महासत्ता’ असल्याचे भासवतानाच चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षा जाहीर करणारा हा लेख आहे. या अशा प्रयत्नांतून चीन स्वत:ला पाश्चिमात्त्य जगासाठी पर्याय म्हणून उभा करू पाहातो, त्यासाठी नियमांचे, संस्कृतीचे आणि तत्त्वांचे निराळेपण चीनकडेच असल्याचे सांगतो. हे सारे प्रयत्न क्षी जिनपिंग यांच्या अध्यक्षपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात चिनी राजकीय अथवा राजनैतिक अधिकाऱ्यांमार्फत ज्या पद्धतीने सुरू ठेवले जाताहेत, ते पाहाता जिनपिंग हे चीनच्या सध्याच्या स्थानावर समाधानी राहणार नाहीत- म्हणजेच कदाचित अमेरिका आणि चीन यांती स्पर्धा पुढल्या काळात अधिकच वाढू शकते, असे दिसून येते.

लेखक भारताच्या ‘राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळा’चे सदस्य आणि ‘सेंंटर फॉर चायना ॲनालिसिस ॲण्ड स्ट्रॅटेजी’चे अध्यक्ष आहेत.