चाणाक्ष मोदीनीती आणि गाफील विरोधक

तेलंगणा असो वा महाराष्ट्र, लाखोंच्या संप्रदायाला धार्मिक व्यासपीठावरून राजकीय साद घालण्याचे आणि आपल्याकडे वळवून घेण्याचे काम सध्या मोदीप्रणित भाजपकडून सुरू आहे.

PM Modi Maharashtra Visit Live, PM Modi Pune & Mumbai Visit Today
संग्रहित छायाचित्र

सौरभ कुलश्रेष्ठ

तेलंगणा असो वा महाराष्ट्र, लाखोंच्या संप्रदायाला धार्मिक व्यासपीठावरून राजकीय साद घालण्याचे आणि आपल्याकडे वळवून घेण्याचे काम सध्या मोदीप्रणित भाजपकडून सुरू आहे. त्यासाठी अगदी वेशभूषेसह वातावरणनिर्मिती केली जात आहे. ही पुढील अनेक वर्षांसाठीची गुंतवणूक आहे. गाफील विरोधक हे सगळे टिपण्यात व त्यास राजकीय उत्तर देण्यास कितपत तयार आहेत हा प्रश्न आहे.

 प्रसंग एक –  स्थळ: हैदराबाद, दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ – संत रामानुजाचार्य यांनी समाजात सुधारणा घडवण्यासाठी जाती आणि सर्व प्रकारचे भेद दूर सारून समतेचा संदेश दिला. केंद्र सरकारचे ‘सब का साथ, सब का विकास, सब का प्रयास’ हे धोरणही याच समतेच्या तत्त्वावर आधारित असून त्यामुळे दलितांना-वंचितांना घरे, शौचालये, मोफत गॅस, जनधन खात्यासारखे लाभ कोणत्याही भेदभावाशिवाय मिळाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. संत आणि क्रांतिकारी समाजसुधारक रामानुजाचार्य यांच्या एक हजाराव्या जयंतीनिमित्त हैदराबादजवळील शमशाबाद येथील त्यांच्या २१६ फूट उंच बैठय़ा मुद्रेतील पुतळय़ाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. 

प्रसंग दोन – स्थळ: देहू, दिनांक १४ जून २०२२ – ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग हे केंद्र सरकारच्या दलित, आदिवासी, मजूर यांचे कल्याण करणाऱ्या अंत्योदय योजनेचे मूर्त रूप, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच या दोन भिन्न कार्यक्रमांमधील आणि तेथील भाषणातील साम्य लक्षवेधी आहे. दोन्ही संप्रदाय हे वैष्णव संप्रदाय हेही एक साम्य. पण तो केवळ योगायोग नाही हे सर्वात महत्त्वाचे. या दोन्ही कार्यक्रमांतील भाषणे एकाच वेळी ऐकली-वाचली तर केंद्र सरकार नेमके रामानुजाचार्य यांच्या समतेच्या तत्त्वावर आधारित आहे हे खरे; की संत तुकारामांच्या ‘जे का रंजले गांजले’ या अभंगाचे मूर्त रूप म्हणजे केंद्र सरकारच्या दलित, आदिवासी, मजूर यांच्यासाठीच्या कल्याणकारी अंत्योदय योजना हे खरे, असा प्रश्न पडू शकतो. त्यातील गमतीचा भाग सोडला तर मध्ययुगीन कालखंडात भारतात भक्ती चळवळीतील सर्वच प्रदेशांतील संतांनी आपल्या रचनेतून समतेचा, दलित-वंचितांना न्याय्य वागणूक देण्याचा संदेश दिला. त्या त्या भागातील कार्यक्रमात तेथील स्थानिक संतांच्या वचनाचा दाखला देणे हेही केवळ स्वाभाविकच नव्हे तर त्यास औचित्यही असते.  कोणत्याही पक्षाचा राजकारणीच काय त्या आध्यात्मिक विषयावरील वक्ताही तीच मांडणी करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाणाक्षपणे ही मांडणी आपल्या राजकीय कारभाराचे मूलतत्त्व म्हणून अधोरेखित केली आणि उपस्थित लाखोंच्या गर्दीला आणि तेथे नसलेल्या पण त्या संप्रदायाशी निगडित भाविकांना आपलेसे करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले.

राजकीय विरोधकांना भलत्याच वादात गुंतवून आपल्या ध्येयाकडे वेगाने पण निश्चित दिशेने वाटचाल करायची ही मोदीनीती. भारतातील विविध सूत्रांत गुंफलेले लाखोंचे धार्मिक-आध्यात्मिक संप्रदाय हे राजकीय पातळीवर विखुरलेले असल्याचे लक्षात घेऊन या संप्रदायांना हिंदुत्वाच्या राजकीय सूत्रात गुंफण्याचे समीकरण संघ परिवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतले आहे. फेब्रुवारीत हैदराबादमध्ये रामानुजाचार्य यांच्या लाखो भाविकांना साद घालणारा ‘समतेचा पुतळा’ उद्घाटनाचा कार्यक्रम आणि लाखो वारकऱ्यांसाठी आस्थेचा असलेला देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण कार्यक्रम या दोन्हींची आखणी, त्यातील मोदींची वेशभूषा- भाषणांतील मांडणी ही याच नियोजनबद्ध वाटचालीची उदाहरणे. या मोदीनीतीबाबत विरोधक गाफील आहेत हे वेळोवेळी दिसत आहे. देहूमध्येही भाजपचे विरोधक भलत्याच राजकीय वादात अडकले आणि मोदी वारकरी संप्रदायाला आपल्याकडे वळवण्याची एक बेरीज करून गेले.

या दोन्ही कार्यक्रमांतून मोदी-भाजपचे लक्ष्य स्पष्ट व स्वच्छ होते. लाखोंच्या संप्रदायाला धार्मिक-राजकीय साद घालणे. त्यासाठी दृश्य पातळीवर काय प्रतिमा मनात ठसावी आणि मनात संदेश काय घेऊन जावा या दोन्ही पातळय़ांवर काम करण्यात आले. दृश्य पातळीवर त्या संप्रदायाला भावनिकदृष्टय़ा जवळची प्रतिमा मनावर कोरण्यासाठी मोदींनी वेशभूषेचा आधार घेतला होता. रामानुजाचार्य पुतळा अनावरण आणि हवन विधी सोहळय़ात सहभागी होताना सोनेरी रंगाचे रेशमी धोतर व त्याच रंगाची शाल पांघरून आणि कपाळावर वैष्णव परंपरेतील उभा दाक्षिणात्य टिळा अशा वैष्णव पंथीय वेशभूषेतून मोदींनी दाक्षिणात्य हिंदु अस्मितेला अप्रत्यक्ष साद घातली होती. त्या कार्यक्रमाची तीच छायाचित्रे माध्यमांमध्ये झळकली. देहूमध्ये मोदींनी एका हातामध्ये वीणा, दुसऱ्या हातात चिपळय़ा आणि गळय़ामध्ये तुळशीहार व डोक्यावर पगडी अशी थेट संत तुकारामांसारखी वेशभूषा करून वारकरी पंथाच्या धार्मिक मनाला राजकीय साद घातली आहे. मोदी यांचे याच वेशभूषेतील छायाचित्र सर्व माध्यमांमधून प्रसिद्ध झाले आहे. हैदराबादमध्ये रामानुजाचार्य यांच्या समतेचा संदेश आणि देहूमध्ये संत तुकारामांचा ‘जे का रंजले गांजले’ हा अभंग व आपल्या सरकारच्या अंत्योदयाच्या योजना यांची सांगड मोदी यांनी घातली.

हैदराबादमधील श्री रामानुजाचार्य यांच्या पुतळय़ाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असताना त्यांनी दोन तास धार्मिक विधींसाठी वेळ दिला. त्याचे थेट प्रक्षेपण लोकांना दिसेल अशी व्यवस्था केली गेली.  भाजपची ओळख ही हिंदुत्ववादी पक्ष असल्याने दक्षिण भारतात त्यांच्याकडे ब्राह्मण व उच्चवर्णीयांचा पक्ष या दृष्टिकोनातून पाहिले जाते. दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यांमध्ये भाजप चाचपडत आहे. भाजपसमोर द्रविड राजकारणात प्रभावी असलेल्या ब्राह्मणेतर चळवळीशी जोडलेल्या समाजघटकांमध्ये आपला राजकीय आधार तयार करण्याचे आव्हान आहे. सामाजिक सुधारणा आणि समतेच्या संदेशामुळे ब्राह्मण व इतर उच्चवर्णीय आणि ब्राह्मणेतर चळवळ अशा दोन्ही समाजघटकांमध्ये सन्मानाचे स्थान असलेले रामानुजाचार्य हे भाजपला आपल्या राजकारणाचे प्रतीक म्हणून अधोरेखित करायचे आहेत. त्यातून उच्चवर्णीय व इतर समाजघटक असे सोशल इंजिनीयिरग करून हळूहळू द्रविड राजकारणातील आपले उपरेपण संपेल आणि दक्षिण भारतात आपल्याला जनाधार तयार होईल असे भाजपचे समीकरण आहे. तर रामानुजाचार्य यांना मानणाऱ्यांच्या निमित्ताने दक्षिण भारतातील वैष्णव हिंदु पंथाच्या रूपाने एक मोठा समाजगट-आर्थिक ताकद संघ परिवाराच्या हिंदुत्वाच्या कामासाठी उपलब्ध होऊ शकतो. दक्षिण भारतातील पुढील निवडणुकांपर्यंत त्यातून पक्षाला आजच्या अवस्थेतून वर नेत सत्तेचे दावेदार म्हणून उभे करण्याच्या एका दीर्घकालीन नियोजनाचा हा भाग आहे.

देहूमधील कार्यक्रमातूनही असाच लाखोंचा असलेला वारकरी संप्रदाय मोदींना भाजपशी राजकीय पातळीवर जोडायचा आहे. लाखोंच्या संख्येत असलेला वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक-आध्यात्मिक पातळीवर एकत्र येऊन पंढरीची वाट चालतो. राजकीय पातळीवर आपापल्या भागात तो तेथील राजकीय समीकरणांनुसार विखुरलेला आहे. वारकरी संप्रदाय हा मुळात काही कोणत्याही जातीचा वरचष्मा वगैरे असलेला संप्रदाय नाही. तो कायमच अठरापगड जाती-जमातींचा मिळून तयार झालेला बहुजन समाज आहे. त्यातही तुकाराम हे तत्कालीन कट्टर सनातन्यांनी छळ केलेले आणि त्या व्यवस्थेविरोधात विद्रोह केलेले संत होते. या सनातन्यांनीच संत तुकारामांचा खून केला आणि नंतर ते सदेह वैकुंठाला गेले असा प्रचार केला याचा वारंवार उच्चार गेल्या २० वर्षांत झाला. तसेच त्याच सनातनी धार्मिक परंपरेचा आजचा राजकीय वाहक भाजप हा संघ परिवारप्रणीत राजकीय पक्ष असल्याची मांडणीही भाजपविरोधकांनी आक्रमकपणे केली होती. हीच समीकरणे बदलण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमातून झाला आहे. वारकरी संप्रदायाला जवळच्या वाटणाऱ्या संत तुकारामांची तत्त्वे आणि मोदी सरकारचा कारभार यांची सांगड घालून संपूर्ण महाराष्ट्रातील व त्यातही पश्चिम महाराष्ट्रातील लाखोंचा हा संप्रदाय राजकीय पातळीवर जवळ यावा यासाठी गोळाबेरीज करण्यात आली आहे.

आता या विखुरलेल्या लाखो लोकांना हिंदुत्वाच्या एकाच राजकीय सूत्रात गुंफण्याचा प्रयत्न मोदी-भाजप करत आहेत. जे जे धार्मिक-आध्यात्मिक संप्रदाय आहेत ते राजकीय पातळीवर एकाच छत्राखाली आणण्याचा हा राष्ट्रीय पातळीवरील प्रयत्नांचा महाराष्ट्रातील प्रयोग आहे. समतेचा मंत्र सांगणाऱ्या भागवत धर्माची, त्यागाचे प्रतीक असलेली भगवी पताका वारकऱ्यांनी आतापर्यंत खांद्यावर घेतली होती. आता तिचे रूपांतर आक्रमक हिंदुत्वाच्या भगव्या झेंडय़ात होण्याची प्रक्रिया सुरू करण्याची ही नीती आहे. हे केवळ २०२४ च्या निवडणुकांसाठी नाही तर हिंदु संघटनांच्या दीर्घकालीन प्रक्रि येचा भाग आहे. या मोदी-भाजपनीतीबाबत गाफील विरोधक त्यास राजकीय उत्तर कसे देणार? मुळात त्यांच्याकडे ती इच्छाशक्ती आणि क्षमता आहे का ? ते ती कशी दाखवणार आणि त्यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-राजकीय वातावरणात कोणते नवे बदल होणार, हा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

swapnasaurabha.kulshreshtha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clever modi policy careless opposition political from the platform ysh

Next Story
समोरच्या बाकावरून : दोन कोटींवरून दहा लाखांवर!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी