योगेश बोराटे
तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणाच्या सहसंबंधाचा प्रवास हा आता निव्वळ ‘गरज’ या एका अगदीच मर्यादित टप्प्यापासून कित्येक मैल पुढे निघून गेला आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी दर्जेदार शिक्षण व त्यासाठीची समज जितकी गरजेची ठरते, तितकीच दर्जेदार उच्च शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा वापर ही अपरिहार्यताही ठरते आहे, अशा एका टप्प्यापर्यंत आज आपण येऊन पोहोचलो आहोत.
माहितीच्या प्रसार आणि वापरासाठीचे महत्त्वाचे साधन म्हणून इंटरनेटचा विचार केल्यास, उच्च शिक्षणाच्या प्रचार-प्रसार आणि विस्तारातील एक महत्त्वाची बाब म्हणून अशा तंत्रज्ञानाची गरज आपल्या सहजच लक्षात येते. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अशा निव्वळ माहितीकडून तिच्या आकलनाकडे आणि त्याआधारे ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेकडे जाताना मात्र आपण पुन्हा शिक्षणाच्या पारंपरिक पद्धतींकडे येत राहतो, हा तो सहसंबंध आहे. वर्गातील शिक्षणासाठी होणारा तंत्रज्ञानाचा वापर हा सहसंबंध सातत्याने घट्ट करतो आहे. शैक्षणिक क्षेत्राचे यापुढील भविष्यही शिक्षण क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या अशाच घट्ट सहसंबंधांवर अवलंबून राहणारे असेल.
‘इंटरॅक्टिव्ह लर्निंग’चा काळ
भारतीय उच्च शिक्षण क्षेत्राविषयी बोलायचे झाल्यास, सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शैक्षणिक प्रक्रियांसाठी तंत्रज्ञानाचा होत असलेला वापर ही आता विद्यार्थ्यांसाठीची नेहमीची बाब झाली आहे. एखाद्या संस्थेचे अस्तित्व शोधण्यासाठी, उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती मिळविण्यासाठी वेबसाइट शोधण्यापासून सुरू होणारा विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणामधील प्रवास या बाबी अधोरेखित करतो. अशा शैक्षणिक संस्थांमधील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या जोडीनेच मिळणारी वाय-फायची जोडणी असो, की संबंधित संस्थेकडून त्यापूर्वी केली गेलेली डिजिटल आशयनिर्मिती असो, आपल्या उच्च शिक्षणासाठीची शैक्षणिक संस्था निवडताना विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील तपासणीमध्ये असे नवे तंत्रज्ञानाधारित मुद्दे अलीकडच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात.
विद्यार्थ्यांच्या या बदलत्या गरजा आणि त्या विषयीची त्यांची मानसिकता लक्षात घेत अनेक शैक्षणिक संस्थांकडून, शिक्षक-प्राध्यापकांकडून त्यासाठीची पावले यापूर्वीच उचलली गेली आहेत. अगदी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) असो, की नव्याने सुरू होणारे एखादे खासगी विद्यापीठ; अशा सर्व टप्प्यांवर त्यासाठीचे व्यापक प्रयत्न सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीच्या काळात अगदीच रटाळवाण्या ठरणाऱ्या तासांपासूनचा शैक्षणिक अनुभूतीचा हा प्रवास आजच्या काळातील इंटरॅक्टिव्ह लर्निंग आणि को-लर्निंगच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, तो त्यामुळेच!
वर्गांमधून नेहमीच्या तासांसाठी वापरले जाणारे स्मार्ट वा इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स, शैक्षणिक अभ्यासक्रमांना वाहिलेले यू-ट्यूब चॅनल, व्यापक चर्चांना चालना देणारे पॉडकास्ट ही अशाच तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक प्रक्रियांची उदाहरणे म्हणून आपण विचारात घेऊ शकतो. स्पर्धा परीक्षांच्या विश्वामध्ये लोकप्रिय झालेल्या, ‘इन्फ्ल्युएन्सर’ अर्थात प्रभावकांच्या मांदियाळीचा भाग होण्याची क्षमता असलेली शिक्षकांची गाजलेली उदाहरणेही अशाच तंत्रज्ञानाच्या मदतीने आता पुढे आली आहेत.
दृश्यानुभूती, श्रवण, वाचन, लेखन, स्पर्शज्ञान अशा मूळ जाणिवांमधून मिळणाऱ्या नव्या माहितीकडून ज्ञाननिर्मितीकडे जाणारी नवी पिढी सध्या आपण अनुभवू शकतो आहोत, ती अशाच तंत्रज्ञानाच्या सुरू असलेल्या वापरामुळे. प्रात्यक्षिकांसाठी होणारा सिम्युलेशन्सचा वापर, अगदी पीएचडीच्या तोंडी परीक्षा वा संशोधनासाठीच्या मुलाखतींमध्ये होणारा ‘झूम’चा वापर, ते अलीकडेच सार्वत्रिकीकरण होत चाललेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा निरनिराळ्या शैक्षणिक प्रक्रियांसाठी होत असलेला सातत्यपूर्ण वापर, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वापराची अशी अनेक उदाहरणे आपल्याला या दोन्ही क्षेत्रांचा तो सहसंबंध अधोरेखित करून दाखवितात.
वाढती उपलब्धता, वाढती जबाबदारी
तंत्रज्ञानाच्या अशा वाढत्या वापरामुळे आपल्याकडे शैक्षणिक आशयाची उपलब्धता सातत्याने वाढत चालली आहे. तंत्रज्ञानाची भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेतील आशयाची या क्षेत्रातील मक्तेदारी आता नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच मोडीत निघाली आहे. त्यामुळे आता अशा शैक्षणिक आशयामध्ये भारतीय भाषांमधील आशयाचीही भर पडत चालली आहे. पर्यायाने इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या इतर भारंभार आशयाप्रमाणेच, यापुढील काळात अशा शैक्षणिक आशयाचीही मर्यादेपलीकडची उपलब्धता ही कदाचित यापुढील काळात विद्यार्थी वर्गालाही बुचकळ्यात टाकणारी ठरू शकते.
अशा उपलब्ध आशयामधून आपली शैक्षणिक गरज भागवणारा आशय कोणता आहे, त्याचा आपल्याला नेमका काय फायदा होणार आहे, त्यातून नेमकी कोणती कौशल्ये आपण आत्मसात करू शकू, त्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी आणखी काय करणे गरजेचे असेल, हे विद्यार्थ्यांना समजून घ्यावे लागणार आहे. अशा टप्प्यावर शिक्षक-विद्यार्थी संवाद, प्रत्यक्ष वर्गातील अनुभव महत्त्वाचे ठरणार आहेत. पर्यायाने यापुढील काळातही तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्राचा हा सहसंबंध कायम ठेवावा लागणार आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांच्या जोडीनेच विद्यार्थ्यांनाही मानसिकतेमध्ये बदल करावे लागणार आहेत.
दुसरीकडे, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरातून शैक्षणिक संस्थांकडे येणारी विद्यार्थ्यांची माहिती आणि तिची सुरक्षितता ही कदाचित शैक्षणिक संस्थांसमोरचे एक आव्हान असेल. वास्तविक अशा एकत्रित माहितीच्या प्रभावी विश्लेषणातून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अगदी ‘पर्सनलाइज्ड’ गटातील सेवा-सुविधा पुरविणे शैक्षणिक संस्थांना सहजशक्य होत जाणार आहे. मात्र, सध्या अशी माहिती भलतीकडेच वापरली जात असल्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. त्यामुळे अशा महत्त्वाच्या विदेच्या सुयोग्य वापरासाठी प्रभावी धोरणे आखणे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि त्यामध्ये सातत्य ठेवणे शैक्षणिक संस्थांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
विद्यार्थ्यांमध्येही आता याबाबतीतली जागरूकता वाढत चालल्याने, अशा पद्धती या नजीकच्या भविष्यात एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या जाहिरातीचाही मुद्दा ठरू शकतात, इतके त्याचे महत्त्व आहे. शैक्षणिक संस्थांच्याच जोडीने आता विद्यार्थ्यांनाही आपण नेमके काय शोधणार आहोत, याची पुरेशी खबरदारी घेण्यापासून ते आपण कोणाला आपल्याविषयीची कोणती माहिती देत आहोत किंवा देणार आहोत, याची खबरदारी घेण्याची सवय अंगी बाणवावी लागणार आहे. त्या अनुषंगाने शैक्षणिक बाबींसाठीची अचूक निवड करण्याची क्षमता, तशी ‘इन्फॉर्म्ड चॉइस’ यापुढील काळात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
विद्यार्थ्यांसाठीची ‘इज ऑफ डुइंग’
विद्यार्थिभिमुखतेचा विचार करताना स्थानिक विद्यापीठांची एकमेकांमधील स्पर्धा, सरकारी विद्यापीठे व खासगी विद्यापीठांमधील स्पर्धा आणि आता भारतीय विद्यापीठे व परदेशी विद्यापीठांमधील नवी प्रस्तावित स्पर्धा विचारात घेता, याही क्षेत्रामध्ये यापुढील काळात विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्रिया-प्रक्रियेसाठीची ‘इज ऑफ डुइंग’ महत्त्वाची ठरणार आहे. त्या आधारे अपेक्षित व्यवहार हा शैक्षणिक संस्थांसाठी त्यांच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेकडे घेऊन जाणारी वाट ठरणार आहे. त्यासाठीही सर्व संबंधित घटकांना या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचा सातत्याने विचार करत राहावा लागणार आहे. त्यानुसार छोटे-मोठे बदल करत जाण्याची तयारीही ठेवावी लागणार आहे. त्या अनुषंगाने पारंपरिक पद्धतीची जटिलता वा बदल नाकारण्याची वा अगदीच संथपणे स्वीकारण्याची मानसिकता शैक्षणिक संस्थांना बदलावी लागणार आहे.
अन्यथा, अगदी शैक्षणिक प्रशासनाच्या दृष्टीनेही अशा बाबी येत्या काळात अधिकाधिक आव्हानात्मक ठरतील. नव्या परदेशी विद्यापीठांच्या आगमनाची वार्ता विचारात घेता, ही सुलभता आणणे ही भारतीय शैक्षणिक संस्थांच्या भविष्यकालीन वाटचालीसाठीची एक महत्त्वाची बाब ठरणार आहे. त्या अनुषंगाने केवळ शिक्षक-प्राध्यापकांनाच त्यासाठी तयार असून चालणार नाही, तर संस्थात्मक पातळीवरून संस्थाचालकांपासून ते शैक्षणिक प्रशासन व सेवा-सुविधांची पूर्तता करणाऱ्या अगदी शेवटच्या टप्प्यातील मनुष्यबळापर्यंतच्या मानसिकतेमध्ये हा बदल रुजवणे यापुढील काळाची महत्त्वाची गरज ठरतो आहे.
अगदी पुण्यासारख्या शहराच्या अर्थकारण- राजकारण- समाजकारणाच्या व्यापक संदर्भातून विचार करायचा झाल्यास, शिक्षण हे सेवा क्षेत्राचा एक महत्त्वाचा भाग बनले आहे. येथील इतर सेवापुरवठादार क्षेत्रे आणि शिक्षण क्षेत्र यामधील महत्त्वाचा फरक दूर करणारी बाब म्हणूनही या मानसिकतेमधील बदलाकडे पाहणे गरजेचे ठरणार आहे.
कदाचित अशा मानसिकतेमधील फरक, त्याआधारे विद्यार्थ्यांना मिळणारी सुलभता, विद्यार्थी संबंधित संस्थांमध्ये प्रत्यक्ष आल्यानंतर त्यांना तिथे मिळणारा शैक्षणिक व अभ्यासक्रमासाठी पूरक ठरणारा इतर क्षेत्रांमधील अनुभव, त्याआधारे उपलब्ध होणाऱ्या नव्या संधी या बाबींच्या आधारे शैक्षणिक संस्थांची निवड होणार आहे. कारण, तंत्रज्ञानाचा वापर ही एक अपरिहार्यता ठरत असतानाच, ती या क्षेत्रातील प्रगतीची दिशाही ठरणार आहे. अशा तंत्रज्ञानाधारित माहितीच्या आधारे मिळणारे ज्ञान हे आपल्याकडील शैक्षणिक क्षेत्राला शहाणपणाकडे घेऊन जातानाचा महत्त्वाचा टप्पाही ठरणार आहे, ते यामुळेच!
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)
borateys@gmail.com