– युवराज मोहिते

साने गुरुजींनी आंतरभारतीची संकल्पना मांडली आणि तिची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली. भाषावार प्रांतरचनेमुळे देशाला एकसंध जोडणारा हा विचार होता. नानाविविध संस्कृती समजून घेणं, समस्त मानवी जीवन समृद्ध करणं, विद्वेषारहित एकोपा वाढवणं हा यामागचा विचार होता.

Damodar theater, fast, actors,
दामोदर नाट्यगृहाचा प्रश्न मार्गी न लागल्यास कलाकारांसह उपोषणाला, प्रशांत दामले यांचा इशारा
ravindra waikar interview statement why party changed
“माझ्याकडे दोनच पर्याय होते, तुरुंग किंवा…”, शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकरांचा गौप्यस्फोट
Who is Shantigiri Maharaj Why is his candidature in Nashik becoming troublesome for Mahayutti
शांतिगिरी महाराज कोण? त्यांची नाशिकमधील उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी का ठरतेय?
What is the background of Dr Narendra Dabholkar murder case Who is the accused and What is the charge
विश्लेषण : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय? आरोपी कोण? आरोप काय?
gulabrao patil
“संजय राऊत ही गेलेली केस”, पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून गुलाबराव पाटलांची खोचक टीका; म्हणाले…
Sangli, fake news, social media,
सांगली : फेक न्यूज समाजमाध्यमात प्रसारित केल्याबद्दल अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..
vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले

भाषा वैविध्य हे भारताचं ठळक वैशिष्ट्य आहे. भारतात एकूण २२ अधिकृत भाषा आहेत आणि विविध प्रातांत एक हजार ६५२ बोली भाषा आहेत. दोन मैलांवर भाषा बदलते म्हणतात, एवढी भाषाभिन्नता अन्य कुठेच पहायला मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे भाषा आणि तिच्या लिपी यामध्येही विविधता आहे. भारतीय भाषांची लिपी ब्रह्मी लिपीपासून तयार झाल्याचं सिद्धच झालं आहे. प्रत्येक भाषेतच तिथल्या संस्कृतीचं सार सामावलेलं असतं. त्या त्या भागाची विचार आणि जीवनपद्धती यात परावर्तीत होत असते.

हेही वाचा – बहरला फळभाजीचा मळा!

आपण भारतीय म्हणवून घेतो, पण भारत नावाचा देश तरी आपल्याला कितपत कळला आहे? हा प्रश्न साने गुरुजींना पडला होता. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा शोध सुरू केला. साने गुरुजींनी याच वाटेवरून पुढे जात आंतरभारतीची संकल्पना रुजविण्यास सुरुवात केली.

याच अंमळनेरच्या प्रताप विद्यालयात साने गुरुजी शिक्षक म्हणून नोकरी करत होते. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले. सत्याग्रहात लोक सहभागी होत होते. गुरुजींनी आपला शिक्षकी पेशा सोडला आणि अंमळनेरमधूनच स्वातंत्र्य संग्रामात सक्रीय झाले. स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी म्हणून साने गुरुजींना साधारण आठ वर्षं देशातल्या विविध तुरुंगांत डांबलं गेलं. १९३० साली साने गुरुजींना त्रिचनापल्लीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

तिथे त्यांची मैत्री व्यंकटचलम या स्वातंत्र्य सैनिकाशी झाली. व्यंकटचलम यांना तामिळ, तेलगू, मल्याळम या भाषा येत होत्या. यामुळे गुरुजी फारच प्रभावित झाले. व्यंकटचलम यांची तुरुंगातून सुटका होत असताना गुरुजींनी अंमळनेरच्या शाळेला तिथून पत्र लिहिलं. त्यात त्यांनी म्हटलंय की, व्यंकटचलम यांना आपल्या शाळेत घ्या. तिथे बंगाली मित्र आहेतच. आता दक्षिणेकडील मित्र सहभागी होतील. आपली शाळा भाषिक ऐक्याचं प्रतीक होईल, असं साने गुरुजींनी या पत्रातून सांगितलं. प्रत्येक शाळा हे ऐक्याचं प्रतीक व्हावं हा गुरुजींचा मुलभूत विचार होता. मात्र नेमका हाच विचार दुर्लक्षित राहिला आणि त्याचे परिणाम काय हे आपण अनुभवतो आहोत!

तुरुंगातच गुरुजींनी दक्षिणी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला. तामिळ भाषेतील कुरल या प्राचीन काव्याचा गुरुजींनी गद्यानुवाद केला. संस्कृती आणि विचार साहित्यातूनच प्रकट होत असतात. गुरुजींनी दोन्ही हात पसरवून ते समजून घेण्याचा प्रयत्न केला.

देशात दीर्घकाळ संस्कृती संघर्षाचा तिढा कायम आहे. मुळातच हा संघर्ष आहे तो द्रविडी संस्कृती आणि आर्य संस्कृती यांच्यामधला. द्रविडी कुटुंबपद्धती आणि इंडो-युरोपीय कुटुंबपद्धती यातून भारताच्या भाषा विकसित झाल्या आहेत. द्रविड, तेलगू, तामिळ, मल्याळी या द्रविडी वर्गातील भाषा आहेत. त्यांची लिपीही त्याच वर्गातील आहे. लॅटिन-युरोपीय भाषांतून संस्कृत, हिंदी, मराठी आणि उत्तरेसहित इतर भाषांची व्युत्पती झालेली आहे. इथली ब्राह्मी आणि पाली लिपी लोप पावत त्यातून देवनागरी लिपी रूढ झाली. उत्तरेतून आर्य संस्कृती आणि दक्षिणेतली द्रविडियन संस्कृती यांच्यातला हा संघर्ष पुढे वाढत गेला. अगदी आजच्या राजकारणाच्या मुळाशीही हाच संघर्ष सुरू आहे. दक्षिणेतील लोकांनी उत्तरेतील राजकारण थोपवून धरलं आहे. भारतातला हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जागतिक दृष्टी देणारा असा हा आपला इतिहास

कला, संवाद आणि अनुवाद यांतूनच या संघर्षावर उत्तरं मिळवता येतील. मानवी समुहाचा बहुआयामी विकास हा संस्कृतीच्या आदान-प्रदानातूनच होणार आहे. नामदेवांचे अभंग शिखांच्या धर्मग्रंथात जातात, कबिरांची गाणी दोहे, मीराबाईंची उचंबळवणारी गीतं, गोपीचंदांची गाणी… सर्वदूर भारतभर गेली आहेत. दक्षिणेकडील यात्रेला, उत्तरेकडील लोक येतात आणि उत्तरेच्या यात्रेला दक्षिणेकडील. ही आपली अखिल भारतीय संस्कृती असल्याचं गुरुजी लिहितात. हा विचार सर्वच विचारवंतांनी मांडला आहे. संवादातून समजणं आणि समजावणं ही प्रक्रिया सुकर होत असते.

ज्ञानोबा माऊलीने याचाच प्रत्यय समाजाला दिला. ज्ञानेश्वरांनी वेदांचा अनुवाद केला. खरंतर बहुजन, सर्वसामान्य माणसांवर हे उपकारच म्हणायला हवेत. मुठीत बंद असलेल्या वेदांमध्ये नेमकं काय आहे, ते त्यांनी समाजापुढे मांडलं. त्यातलं गमकही सर्वसामान्य माणसाच्या ध्यानात आणून दिलं. ज्ञान ही काही ठराविक समुहाची मक्तेदारी नाही. धर्म हे शोषणाचं साधन होऊ शकत नाही. म्हणूनच ज्ञानाचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे, या विचाराने ज्ञानेश्वरांनी वेदांना लोकांपुढे आणलं आणि एक कोंडी फोडली. संस्कृत भाषेतील वेद ज्ञानेश्वरांनी प्राकृतमध्ये अर्थात लोकांच्या बोलीभाषेत अनुवादित केले. म्हणूनच भारतातील पहिले अनुवादक म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आहेत. वेद किंवा संस्कृत श्लोक ऐकणं हाही त्याकाळी गुन्हा मानला जात होता. अशा त्या कर्मठ काळात विश्वात्मके देवे हा विश्वकल्याणाचा आणि विश्वभारतीचा विचार त्यांनी मांडला. आणि तेथूनच सामाजिक क्रांतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्याआधी अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धानेही हाच संदेश दिला होता. ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु, सबे होन्तु च खेमिनो…’ सर्व प्राणीमात्र सुखी आणि सर्वांचं कल्याण होवो हा विचार बुद्धाने मांडला. रविंद्रनाथ टागोरांनी आपल्या साहित्यातून हाच धागा पकडत विश्वभारतीची संकल्पना मांडली. जागतिक दृष्टी देणारा असा हा आपला इतिहास आहे.

प्रवाशांबरोबर भाषेचाही प्रवास…

संस्कृती ही प्रवाही असते. ती थांबवता, अडवता येत नाही. दोन संस्कृतीच्या मिलाफातून भाषेचा लहेजाही प्रभावीत होत असतोच, त्यातून मानवी जीवनाला समृद्धीही येत असते. संस्कृती प्रवाहीत होते ती दोन कारणांनी. विविध कारणाने नवतेच्या शोधात बाहेर पडलेले प्रवासी आणि दुसरं कारण म्हणजे स्थलांतर. नदीच्या काठाने मुख्यत: नागरी वसाहती सुरू झालेल्या नाईल, व्होल्गा आणि गंगा या नद्यांच्या काठाने मनुष्य वस्ती बहरली आणि नदीच्या प्रवाहाप्रमाणे विविध संस्कृतींचं आदान-प्रदानही होत गेलं. अफगाणीस्तान मार्गे खैबर खिंडीतून अनेक प्रवासी भारतात आले. त्यांची प्रवास वर्णन प्रसिद्ध आहेतच. नंतर समुद्रमार्गे प्रवास सुरू झाला. भारत आणि अमेरिका हे असे दोन देश आहेत जिथे अनेक संस्कृतींचा मिलाप झालेला आहे. विलक्षण संस्कृतीला या दोन्ही देशांनी सामावून घेतलंय!

भारताइतकी विविधता कुठेच आढळत नाही. उदरनिर्वाहाच्या शोधात लोक प्रांताप्रांतात पसरू लागले. यातून संस्कृती पसरत राहिली. जात व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था हा या संस्कृतीतला अडसर आणि संघर्ष होता. विविधतेत एकता नसल्याने या देशावर अनेक आक्रमणं झाली. भारतात झालेली आक्रमणं आणि ज्यांनी भारतावर सत्ता गाजवली त्यांच्याकडूनच भारताच्या ऐतिहासिक वैविध्यतेची माहिती मिळते. इतकंच काय शिवाजी महाराजांनी आंतरजातीय सैन्य उभारत जो दैदिप्यमान पराक्रम केला त्याच्या नोंदीही पोर्तुगीज आणि इंग्रजांकडून आपल्याला शिकाव्या लागतात. या देशात तर हिंदू प्रजा आणि मुस्लीम राजे अशी व्यवस्था दीर्घकाळ होती. यातून गंगाजमनी परंपरा विकसित झाली आहे. भाषा, पेहराव आणि खाद्य संस्कृती यातून एकजीव झाली.

जगातील सर्वोच्च १० संस्कृतींत आपली संस्कृती आहे. मात्र भारतीय संस्कृती जटील आणि गुंतागुंतीची आहे. स्थलांतरित जेव्हा एका ठिकाणी स्थिरावतात तेव्हा तिथली भूमी आणि साधन संपत्तीवर ते हक्क सांगू लागतात. मग इतर कुणी तिथे आलेलं त्यांना चालत नाही. पुढे ते स्थानिक बनून जातात. भारतात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशीप (NRC) हा मुद्दा ऐरणीवर आहे. आसाम राज्य यात होरपळलं. तुम्ही इथले नागरिक आहात हे सिद्ध करा अन्यथा डिटेन्शन सेंटरमध्ये कोंडलं जाईल असा फतवा निघाला. भारताच्या सीमा भागात यामुळेच असंतोष आहे. आपल्याकडे सीमाप्रदेशाबाबत अविश्वास दाखवला जातो. तिथल्या लोकांना खुल्या दिलाने आपण भारतीय मानतो का? याच पार्श्वभूमीवर (NRC) बाबतच्या संघर्षाची जगभरात चर्चा झाली. मात्र याची साहित्य वर्तुळात किती चर्चा झाली? साहित्यात या जगण्याचं प्रतिबिंब का उमटलं नाही, हा आंतरभारतीशी जोडलेला मुद्दा आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.

आर्थिक विवंचेनेतून स्थलांतर वाढीस

एकेकाला हाकलायची गोडी वाढू लागली आहे. बंगाल्याने बिहाऱ्याला चलेजाव म्हणावं, बिहारींनी बंगालींना तसं म्हणावं, तामिळाने तेलगु भाषकाला, कानडीने मराठी माणसाला, मराठी माणसाने गुजराती माणसाला, अशी ‘चले जाव’ चळवळ सुरू झाली तर कसं होईल? हिंदूंनी मुसलमानांना हाकलावं आणि मुसलमानांनी हिंदू-शिखांना जा म्हणावं, तर या देशात काय होईल, असा प्रश्न साने गुरुजींनी विचारला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत आपण फारच भावनिक आहोत. मात्र मंगळवेढ्यातील अनेक गावांना पाणी नाही, याची चर्चा आपण करत नाही. मंगळवेढ्यातील समस्त ग्रामस्थांनी पाण्यासाठी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या माणसांना आपण पाठिंबा देणार की विरोध करणार?

रघुराम राजन आणि अनेक दिग्गज अभ्यासक, लेखकांनी स्थलांतराबाबत खूप अभ्यासपूर्ण माहिती पुढे आणली आहे. जगात सतत स्थलांतर होत असतं. युद्धामुळे स्थलांतराची प्रक्रिया वाढते. गाझापट्टीमध्ये जी परिस्थिती आहे ती आपण जाणतोच. युक्रेन युद्धाने स्थलांतर भयानक वाढलं आहे. २१व्या शतकात आर्थिक विवंचेनेतून स्थलांतर वाढीस लागलंय. संधी आणि रोजगार यासाठी निरंतर स्थलांतर होत आहे.

सार्वभौमता ही केवळ कागदावर

१९९० साली या देशाने जागतिकीकरण स्वीकारलं. इंटरनेट आणि कम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती घडत आहे. आटा ऐवजी डेटा महत्त्वाचा झाला आहे. ग्लोबलऐवजी ग्लोकल असा शब्द रूढ झाला आहे. जग हे एक खेडं झालं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे घडतंय ते म्हणजे श्रम आणि भांडवल यांच्या कक्षा मर्यादित राहिलेल्या नाहीत. अर्थशास्त्राच्या भाषेत याला ‘कॅपिटल फ्लाईट’ असं म्हटलं जातं. कोणीही कोणत्याही देशात गुंतवणूक करू शकतं. यामुळेच टाटा उद्योग समूह जग्वार खरेदी करू शकतो. आणि सध्याचे बहुचर्चित उद्योजक अदानी हे भारताच्या कुठल्या उद्योगात नाहीत आणि जगात कुठल्या देशात नाहीत असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. सार्वभौमता ही केवळ कागदावर राहिली आहे. आत्मनिर्भरता नुसती म्हणून चालत नाही. त्यासाठी विदेशी गुंतवणूक व्हावी लागते. मात्र या गुंतवणुकीतील धोका असा की हे भांडवलदार तिथल्या राजकीय व्यवस्थेवर हस्तक्षेप करतात. याचं उदाहरण म्हणजे पाकिस्तान. हा धर्मवादी देश आहे. एका रंगातला साचेबंद देश. मात्र पाकिस्तानातील सत्ता लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या हातात ठेवायची की लष्कराच्या ताब्यात द्यायची याचा निर्णय देशाबाहेरील भांडवली देश करत असतात. या पार्श्वभूमीवर भारतासारख्या देशात असा हस्तक्षेप इथली संस्कृतीच थोपवून धरू शकते. कारण या विविध संस्कृतीला जोडणारं संविधान आपल्याकडे आहे. आंतरभारतीचं प्रतीक असलेलं संविधान हीच आपली ताकद आहे. साहित्य क्षेत्रात असे राजकीय हस्तक्षेपही होत असतात. तेव्हा साहित्यिकांचा कणा ताठ असावा लागतो. तो वाकला की सारंच संपतं.

जागतिकीकरणाने सगळ्या भौगोलिक सीमा धुसर झाल्या आहेत. कुणाला कुठे आणि कसं रोखणार? भौगोलिक सीमा माणसं आणि संस्कृती यांना रोखू शकत नाहीत, हे वास्तव आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बर्लिनची भिंत लोकांनीच एकत्र येऊन पाडून टाकली. हा अलीकडचाच इतिहास आहे. संस्कृतीला रोखण्याचा प्रयत्न हे आंतरभारती आणि विश्वभारतीच्या विरोधातलं पाऊल ठरतं.

साहित्य प्रकाशनातील हाही एक राजकीय प्रवाह

प्रत्येक कालखंडात संस्कृती आणि मानवी समुहांपुढे आव्हानं उभी रहात असतात. तेव्हा त्या त्या सांस्कृतिक संदर्भाने भाषा आणि कलेच्या माध्यमातून त्याला उत्तरंही शोधली जातात. संस्कृतीचं वहन इतर भाषा आणि मानवी जीवनात होत असतं. सर्वच सर्जनशील लोकांनी मानवी मूल्यांच्या अंगाने याविषयी अथकपणे काम केलं आहे. या सगळ्या प्रक्रियेत साहित्यावरही या सगळ्यांचा प्रभाव पडत असतो. रशियन क्रांतीनंतर लोकशाही समाजवादावर साहित्य येऊ लागलं. दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्ववादावरची पुस्तकं आली. भांडवलवाद आणि चंगळवादानंतर यशस्वी कसं व्हावं, हे सांगणारी पुस्तकं बाजारात येऊ लागली. आणि सध्या, प्राचीन ज्ञान, प्राचीन विज्ञान आणि धार्मिक पुस्तकांची चलती सुरू आहे. साहित्य प्रकाशनातील हाही एक राजकीय प्रवाह आहे.

भाषा आणि कला ही संस्कृतीची महत्वाची अंग आहेत. त्या त्या मानवी समूहांची ओळख यातून होत असते. मराठी भाषा ही अनेक संस्कृतीचा समुच्चय आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीत मराठी भाषा कशी फुलतेय ते दिसतं. ही भाषेची समृद्धी आहे. ही समृद्धी स्वातंत्र्यातून येते. लेखकाच्या स्वातंत्र्याचं सर्वोच्च उदाहरण म्हणजे महाभारत. हे महाकाव्य लिहिताना व्यासांनी परिपूर्ण स्वातंत्र्य घेतलं आहे. व्यासांच्या काव्य प्रतिभेची विस्मयकारक उंची आहे. नियोग, कुमारीमाता, पाच पुरुषांसोबत बिनदिक्कत राहणारी, आणि सहाव्याचाही विचार करणारी स्री त्याकाळी व्यासांनी उभी केली आहे. दुसऱ्या बाजूला कृष्णलिलाही रंगवून सांगितल्या आहेत. व्यासांचं हे धाडस आहे आणि ते महाकाव्य संस्कृती म्हणून आपण मिरवतो.

साने गुरुजी आपल्या स्वातंत्र्याबाबत सजग होते. सभोवताली घडणाऱ्या घटनांबाबत साहित्यिक म्हणून त्यांनी कधी डोळे झाक केली नाही. शेतकरी आणि कामगारांसाठी आपली लेखणी वापरताना आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान असं म्हणण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. आजच्या भाषेत साने गुरुजी अर्बन नक्षली ठरले असते.

हेही वाचा – जमिनीची मशागत की नासधूस?

साचलेपणा हा आंतरभारतीच्या प्रवाहातील अडथळा आहे. यासाठीच लेखक, कलावंत आणि विचारवंतानी स्वातंत्र्यासाठी सजग रहायला हवं. काहीही झालं तरी हे स्वातंत्र्य गमवता कामा नये. यातूनच आंतरभारती आणि पुढे विश्वभारतीचा विचार बळावणार आहे. साहित्यिक भाषेतून आणि कलावंत कलाविष्कारातून एक व्यापक पट मांडत असतात. आंतरभारतीसाठी साने गुरुजींच्या संकल्पनेतील भाषा भगिनींचा प्रयोग रायगडातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामार्फत गेली २५ वर्षे सुरू आहे. आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रामार्फत अनुवादाच्या कामाला गती दिली जात आहे. दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या प्रेरणेने अनुवादाला चालना देण्यात येत आहे. रामदास भटकळ, दिवंगत पुष्पाताई भावे, कवयित्री नीरजा यांनी हे काम राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गिरीश कर्नाड, महाश्वेता देवी, इंदिरा गोस्वामी, गुलजार, अलेक पद्मसी, विष्णू खरे, मंगेश पाडगावकर, अशोक वाजपेयी, कमलेश्वर, मंगेश डबराल, शास्रज्ञ विजय भाटकर यासहित अनेक नामवंत या साहित्य संवादाशी जोडले गेले आहेत. अनुवादाला वाहलेलं मायमावशी हे षण्मासिक गणेश विसपुते यांच्या संपादनाखाली सुरू आहे.

भाषेपलीकडे आंतरभारती रुजते ती कलाविष्कारातून. केरळात दर दोन वर्षांनी कोची बिएनाले हा एक मोठा उत्सव होत असतो. जगभरातील कलावंत यात सहभागी होत असतात. हा एक वेगळाच कलात्मक आंतरभारतीचा मिलाफ असतो. गावंच्या गावं कॅनव्हास होऊन सजतात. रंगाच्या मेळ्यांत संस्कृती फुलते. नव्या मांडणीतून निर्भयपणे मानवी मूल्ये प्रकट केली जातात. लाखो लोक यात सहभागी होतात. याच पद्धतीचा प्रयोग रायगडातील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात कलाभवनमार्फत आम्ही करत आहोत. गिरणी कामगारांचा लढा आणि नर्मदा घाटीतील आदिवासींचा संघर्ष हे सगळं अनेक कलावंतांनी अनुभवलं आणि त्यांच्या कलेमार्फत साकारलं. ‘ॲक्टिव्हिस्टा’ या नावाने हा प्रयोग महाराष्ट्रात गाजला. कला हे भाषेपलीकडील माध्यम आहे. त्यातला कलात्मक संवाद आंतरभारतीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो. आंतरभारतीचे हे नवं रूप आहे. हे सगळं तरुणांच्या साथीने केलं जात आहे.

मित्र हो, आंतरभारती हा विचार हाच या देशाचा राष्ट्रीय विचार आहे. आंतरभारतीचा जेवढा प्रचार प्रसार होईल तेवढी संवेदनशीलता आणि सहिष्णूता वाढीस लागेल. सध्याच्या घुसमटीच्या काळात हे काम साहित्यिक वाचक आणि सजग नागरिकांना नेटाने करावं लागणार आहे. आणि म्हणूनच आंतरभारतीचा हा विचार जोपासूया. साने गुरुजींनी असं म्हटलंय की प्रत्येकाने अनुवाद करायला पाहिजे. इतर संस्कृती समजून घ्यायला पाहिजे आणि आदरही करायला पाहिजे. साने गुरुजींच्या या कर्मभूमीत हाच संकल्प आपण सर्वांनी या निमित्ताने करूया.

mohiteyuvraj1@gmail.com