मधु मोहिते
आज विचारमूल्यांची घसरण सुरू असताना, समाजवादी विचारांविषयी कुटनीतीचे राजकारण सुरू असताना डॉ. जी. जी. पारीख आपल्या मूल्यांसाठी ठाम उभे आहेत. आपल्या तल्लख बुद्धीने व दैनंदिन सक्रिय विधायक कृतीने ते त्यांचा प्रतिवाद करतात. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, युसुफ मेहेरअली अशा थोर नेत्यांचा सहवास त्यांना मिळाला. त्यांचे विचार, संस्कार, मेहनत करण्याची वृत्ती जीजींमध्ये जणू मुरली आहे. उमेदीने काम करण्याची परंपरा जीजींच्या जीवनप्रवासात पदोपदी अनुभवास येते. समोर टीका करणारा असला तरी ते आपला मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने समजावत असतात. हा स्वातंत्र्यसैनिक आजही ताज्या दमाने संघर्ष करतो आहे, माणसे जोडतो आहे.

९ ऑगस्ट १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनामध्ये राष्ट्रीय नेत्यांना अटक झाल्यानंतर सर्वत्र संप, निदर्शने करण्यात आली. जीजी तेव्हा विद्यार्थी होते, पण त्यांनी या आंदोलनात सक्रिय भाग घेतला होता. १२ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना चर्चगेट येथे अटक करण्यात आली. आणि दहा महिन्यांचा तुरुंगवास झाला. त्यावेळी ते १८ वर्षाचे होते. त्यांच्यासोबत त्यावेळी दिनकर साक्रीकर, प्रभाकर कुंठे, दामू झवेरी, रोहित दवे, जी. डी. आंबेकर, जॉर्ज कोयलो, पीटर अल्वारिस, कृष्णा खाडिलकर, सी, व्ही. वारद, जी एल मपारा आदी जेष्ठ साथी होते. रोहित दवे विचाराने मार्क्सवादी होते. तुरुंगात मार्क्सवादाचे धडे त्यांनी दिले. तुरुंगातून बाहेर आल्यावर वैद्यकीय शिक्षण घेत असताना ते काँग्रेसअंतर्गत असलेल्या समाजवादी नेत्यांच्या संपर्कांत होते. पुढे प्रजा समाजवादी पक्ष सुरू झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणात काम करू लागले. पक्षाच्या बैठकांमध्ये त्यांची मंगला रतिलाल पारेख यांच्याशी ओळख झाली. त्यांनीसुद्धा १९४२ च्या लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांनाही अटक झाली होती. पुढे या मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले. नोंदणी पद्धतीने लग्न केल्यामुळे दोघांच्याही घरातील नातेवाईक लग्नाला हजर नव्हते.

जीजी व त्यांचे सहकारी बी. सी. दत्त, विश्वम एस., जी. रत्नम व ओ. के. जोशी यांनी २ मे १९६२ साली ‘युसुफ मेहेरअली सेंटर’ ही संस्था स्थापन केली. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी तिथे शेती आधारित रोजगार संधी निर्माण करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यांनी तारा या पनवेल तालुक्यातील गावात ग्रामोद्योगाचे प्रयोग सुरू केले. स्वयंरोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले. तेलाच्या घाण्यामधून विविध तेलांंचे उत्पादन सुरू केले. सेंद्रिय साबण बनविणे, मातीची भांडी व खेळणी बनविणे, गोशाळा व गांडूळ खत निर्मिती सुरू केली. कचऱ्यापासून बायोगॅस व बायोडिझेल हे प्रकल्प अणुशक्ती व आयआयटीसारख्या संस्थांकडून मिळालेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आले. हर्बल नर्सरी सुरू केली. तारा येथील हे उपक्रम जिथे सुरू आहेत त्याला ‘मधु प्रमिला दंडवते संकुल’ असे नाव देण्यात आले आहे.

संकुलातील या रोजगारक्षम उपक्रमांबरोबरच आरोग्य सेवा देण्यासाठी संस्था तारा आणि अंजनवेल येथे दोन रुग्णालये चालवत आहे. तारा येथे ४७ वर्षापूर्वी झोपडीवजा जागेत सुरू झालेली ही सेवा आता ऑपरेशन थिएटरपर्यंत पोहोचली आहे. जीजींच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेक डाॅक्टर्स रविवारी व अन्य दिवशी सेवा देण्यासाठी येतात. त्यामुळे या केंद्रांमध्ये मोतिबिंदू तसेच अन्य लहानसहान शस्त्रक्रिया अगदी माफक दरात केल्या जातात. प्रासंगिक आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जवळपासच्या ग्रामस्थांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध होत आहे. ३० वर्षांपूर्वी गावात बारावीपर्यंतची शाळा सुरू केली. आज पेणमधील आपटा आणि शिर्की येथे दोन शाळा गेली १५-२० वर्षे कार्यरत आहेत. तारा येथे साधारणतः १०० मुलींचे वसतीगृह मोफत सुरू आहे. जीजींचा नि:स्पृह भाव लक्षात घेऊन ग्रामस्थांनी यासाठी तीन एकर जागा विनामूल्य दिली आहे.

हेही वाचा… हूथींच्या बंदोबस्तासाठी भारतीय नौदलालाही उतरावेच लागेल…

जीजींचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आज खरा समाजवादी पक्ष अस्तित्वात नसला तरी ‘सामाजिक सलोखा’सारख्या प्रबोधनाच्या यात्रा आयोजित करणे त्यांनी थांबविले नाही. देशात कुठेही दंगली होतात किंवा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा सेंटर आपले कार्यकर्ते पाठवते. सर्व समाजात बंधुभाव, प्रेम, शांती नांदावी यासाठी तीन यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. ‘युसुफ मेहेरअली युवा बिरादरीची’ निर्मिती करून त्यांना या यात्रांमध्ये संपूर्ण देशभर फिरण्यासाठी प्रवृत्त केले. या माध्यमातून तयार झालेल्या कार्यकर्त्यांना आपापल्या राज्यात स्वयंरोजगार उपक्रम राबविण्याची जबाबदारी दिली, त्यांना कार्यरत केले. त्यामुळे सेंटरचा हा विचार जम्मू काश्मीर, मध्य व उत्तर प्रदेश, गुजरात, ओरिसा, बिहार, आसाम, झारखंड व उत्तराखंड या जवळजवळ नऊ राज्यांमध्ये सुरू आहे.

जीजी आज शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यंदाच्या ९ ऑगस्ट २०२३ रोजी सालाबादप्रमाणे गिरगांव चौपाटी येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ते ऑगस्ट क्रांती मैदानातील क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी निघणार एवढ्यात त्यांना पोलिसांनी अटकाव केला. त्यांना अलग करून अन्य कार्यकर्त्यांना अटक केली. २ डिसेंबर २०२३ रोजी ‘मुंबई प्रेस क्लब’च्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी ते रात्री ११ वाजेपर्यंत उपस्थित राहिले. तारा येथील कामाचे अवलोकन करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी ते सकाळी साडेसहा वाजता घरातून निघतात आणि संकुलात काम सुरू होण्याआधी होणाऱ्या साडेआठच्या प्रार्थनेला हजर असतात.

आजही आपले विचार मांडायची संधी मिळते तेव्हा तेव्हा हा सेनानी समाजवादी सव्यासाची म्हणून जागतिकीकरणाविषयी पोटतिडिकीने बोलतो. जागतिक तापमानवाढ रोखायची तर वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड वायू कमी करण्यासाठी उपाय योजावे लागतील. ही कुणा एका देशाची नाही तर सगळ्या जगाची समस्या असली तरी त्यासाठी जंगलाखालील जमीन तीन ते पाचपट वाढवायला हवी. तरच खनिज व निसर्गातील अमूल्य ठेव्यावर अवलंबून राहाणे कमी होईल, अशी आग्रही भूमिका ते मांडतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज रोज मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. ज्या समाजवादी पक्षापासून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली, त्याची जी वाताहात झाली, ती जगजाहीर आहे. असे असताना छोट्यामोठ्या संघटनांतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जीजी मूल्यांचा संघर्ष दुय्यम समजू नका. तीच तुमची ताकद आहे. वेळ पडली तर तुरुंगवासाला सामोरे जा, पण मूल्यविचार कमजोर करू नका, मी तुमच्याबरोबर आहे, अशी उमेद देतात. आपल्या शंभराव्या वर्षातसुद्धा हा स्वातंत्र्यसेनानी मूल्यांचा ध्यास घेऊन उभा आहे.