भारतीय सैन्यामध्ये महिलांचा समावेश १९९२ मध्ये सुरू झाला. महिलांची सैन्यातील निवड ही अधिकारी पदासाठी होती. पात्र ठरलेल्या महिला छात्रांचे ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकेडमीच्या (ओटीए) माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करून १२०० हून अधिक महिला विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यापूर्वी लष्करातील वैद्यकीय सेवेसारख्या क्षेत्रांतही महिला कार्यरत आहेत. त्यातील काही उच्चपदस्थही आहेत. मात्र, देशाला अनेक सन्मानित अधिकारी, लष्करप्रमुख, नौदल प्रमुख, हवाई दल प्रमुख दिलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील (एनडीए) २०२२ मध्ये प्रवेश घेतलेल्या महिलांची पहिली तुकडी शुक्रवारी उत्तीर्ण झाली. ही एनडीच्या आणि भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे या घटनेकडे सखोलपणे पाहणे महत्त्वाचे ठरते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५४ मध्ये पुण्याजवळील खडकवासला येथे एनडीए सुरू झाली. लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा तीनही दलांचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. २०२२ पर्यंत या संस्थेत केवळ पुरुषांनाच प्रवेश देण्यात येत होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये एनडीए आणि नौदल अकादमीमध्ये महिलांना प्रवेश देण्याचा अंतरिम आदेश दिला. एनडीए, नौदल अकादमीची प्रवेश परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेतली जाते. त्यामुळे यूपीएससीतर्फे जुलै २०२२ मध्ये प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या परीक्षेसाठी देशभरातील एक लाख ७७ हजारांहून अधिक महिलांनी अर्ज केला होता. त्यातून १९ महिला छात्रांची निवड करण्यात आली. एनडीएची निवड प्रक्रिया वर्षातून दोनवेळा केली जाते. संरक्षण मंत्रालयाने मार्चमध्ये दिलेल्या माहितीनुसार, १४८ ते १५३ व्या तुकडीपर्यंत एनडीएमध्ये १७ राज्यांतील १२६ महिला छात्रांना प्रवेश देण्यात आला. त्यात सर्वाधिक हरयाणामधील ३५ छात्रा होत्या. त्या खालोखाल उत्तर प्रदेशातील २८, राजस्थानंमधील १३, तर चौथ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रातील ११ छात्रांचा समावेश होता. मध्य प्रवेशातील ६, पंजाब, दिल्ली येथील प्रत्येकी ५ छात्रा होत्या. तसेच प्रवेशित छात्रांपैकी पाच छात्रांनी प्रवेश सोडण्याचा निर्णय घेतला. महिलांची पहिली तुकडी दाखल होण्यापूर्वी एनडीएकडून आवश्यक तयारी करण्यात आली. त्यात वसतिगृहापासून आवश्यक विविध सुविधांचा समावेश होता.

एनडीए प्रशासनाने मुलींच्या तुकडीसाठी निर्माण केलेल्या वातावरणाबाबत एनडीएचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला यांनी नुकत्याच झालेल्या पदवीप्रदान कार्यक्रमात माहिती दिली होती. ‘एनडीएच्या १४८ व्या तुकडीतील महिलांच्या पहिल्या तुकडीच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षणाच्या काळात त्यांच्यातून ‘स्कॉलर वॉरियर’ घडण्यासाठी ‘लिंगनिरपेक्ष’ शैक्षणिक वातावरण तयार करण्यात आले. महिला छात्रांनी अतिशय उत्तम कामगिरी करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे,’ असे त्यांनी सांगितले.

एनडीए, नौदल अकादमीमध्ये मुलींना प्रवेश देण्याच्या निर्णयापूर्वीही गेल्या काही वर्षांत महिलांचा सैन्यदलांतील सहभाग वाढवण्याबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यात २०१५ मध्ये हवाई दलाने महिलांचा फायटर पायलट म्हणून समावेश करण्याची घोषणा केली. २०२१-२२ पासून मुलींना सैनिकी शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला. लष्करात स्थायी नियुक्ती (परमनंट कमिशन) आणि नेतृत्त्व पद (कमांड पोझिशन) देण्यासाठी महिला पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये दिला. त्याशिवाय शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक्निकल आणि नॉन टेक्निकल), जज ॲडव्होकेट जनरल (जीएजी), राष्ट्रीय छात्रसेना विशेष प्रवेश, प्रादेशिक सेना (टेरिटोरियल आर्मी), तसेच अग्निवीर योजनेअंतर्गतही मुलींची सैन्यदलात निवड करण्यात येते.

एनडीए प्रवेशासाठी मुली इच्छुक असण्याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शक कर्नल (नि.) प्रदीप ब्राह्मणकर म्हणाले, एनडीए प्रवेशाकडे मुलींचा ओढा आहे. तसेच एनडीएसाठी प्रयत्न करणाऱ्या मुलांचीही संख्या स्थिर आहे. म्हणजे, मुलांच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के मुली एनडीए प्रवेशासाठी इच्छुक दिसतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, एनडीएमध्ये मुलींची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक अवघड आहे. मात्र, महिलांची सैन्यातील स्वीकारार्हता वाढते आहे. महिलांनी त्यांच्या कामातून स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे महिला नेतृत्त्वाच्या पदावर काम करू शकतात.

एनडीएतील महिलांच्या पहिल्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाच्या (पासिंग आऊट परेड) अनुषंगाने सध्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू असलेल्या लेफ्टनंट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर यांनी एक रंजक आठवण सांगितली. १९८२ मध्ये सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी पुणे) त्यांच्या तुकडीला पहिल्यांदा दीक्षांत संचलनाची संधी मिळाली होती. त्यावेळी त्या तुकडीतील महिलांनी साडी परिधान करून दीक्षांत संचलन संचलन केले होते. सैन्य दलातील महिलांच्या सहभागाविषयी डॉ. कानिटकर म्हणाल्या, सैन्यात स्त्री-पुरुष असे लिंगभावाने पाहिले जात नाही. महिलांची सक्षमता, नेतृत्त्व गुण अधिक महत्त्वाचे आहेत. अलीकडे झालेले ऑपरेशन सिंदूर पाहिल्यास ते पारंपरिक युद्धापेक्षा वेगळे असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता काळानुरूप युद्धशैली बदलत असताना, तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना त्यात महिला पुरुषांइतकेच योगदान देऊ शकतात. सैन्यामध्ये आता महिलांसाठी वेगवेगळ्या स्तरांवर नवनव्या संधी निर्माण होत आहेत. सैन्यातील सेवा ही सुरक्षित, आदर, प्रतिष्ठा असलेली आहे. त्यामुळे सैन्यदलातील संधींचा अधिकाधिक उपयोग महिलांनी केला पाहिजे. जवानांमध्येही वेगवेगळ्या स्तरावर महिला काम करू लागतील, तेव्हा खऱ्या अर्थाने समानता आली, असे म्हणता येईल.

मिझोरामचे राज्यपाल आणि माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) व्ही. के. सिंह यांनीही दीक्षान्त संचलनाच्या कार्यक्रमावेळी महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण होणे ही महत्त्वाची घटना, परिवर्तनाची सुरुवात असल्याचे नमूद केले. महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण होणे हा सैन्याची सर्वसमावेशकता आणि सक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. या युवती ‘नारीशक्ती’चे प्रतीक आहेत. ही शक्ती केवळ महिला विकासासाठी नाही, तर महिलांच्या नेतृत्त्वाखालील विकासासाठीही महत्त्वाची आहे. भविष्यात या छात्रांपैकी कोणीतरी त्यांच्या सेवेतील सर्वोच्च पदी पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दीक्षान्त संचलनावेळी महिला छात्रा स्वतंत्रपणे ओळखता येत नव्हते इतक्या त्या एकरूप झाल्या होत्या. त्यांना मिसळून जाण्यासाठी एनडीए आणि सैन्याने किती बारकाईने काम केले, ही ही अतिशय नोंद घेण्यासारखी बाब आहे. , असेही त्यांनी सांगितले.

सैन्यदलात महिलांचा सहभाग पूर्वीपासून असला, तरी येत्या काळात सैन्यदलांतील महिलांची संख्या निश्चितपणे आणखी वाढत जाणार आहे. युद्धस्थिती हाताळण्यापासून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यापर्यंत वेगवेगळ्या स्तरांवर, वेगवेगळ्या परिस्थितीत महिलांना काम करता येणार आहे. एनडीएच्या महिलांच्या पहिल्या तुकडीतील १७ छात्रा या नव्या पिढीसाठीचा प्रेरणास्रोत ठरणार आहेत. म्हणूनच एनडीएतून महिला छात्रांची पहिली तुकडी उत्तीर्ण होणे ही निश्चितच एक ऐतिहासिक घटना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एनडीए’मध्ये महिला छात्रांना कसे सामावून घेण्यात आले?

एनडीएचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल गुरचरण सिंग यांनीही महिला छात्रांना एनडीएमध्ये सामावून घेण्याच्या प्रक्रियेबाबत दीक्षान्त संचलनावेळी भाष्य केले होते. ‘महिला छात्रांना सामावून घेणे ही अत्यंत प्रगतीशील प्रक्रिया होती. उदाहरणार्थ, सुरुवातीला पुरुष आणि महिला छात्र वेगळे राहात होते. मात्र, नंतर त्यांना स्क्वाड्रन आणि बटालियनमध्ये पुरुष छात्रांसमवेत एकत्रित आणण्यात आले. त्यामुळे पुरुष छात्र आणि महिला छात्र एकत्र धावतात, एकत्र खेळतात, त्यांची शिबिरे एकत्र होतात. एनडीएतील प्रत्येक उपक्रम लिंगनिरपेक्ष आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चितच थोडा वेळ लागला. एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्या नेतृत्त्वाखालील चमूने पूर्वीपासून महिला छात्र असलेल्या नौदल अकादमी, हवाई दल अकादमीला भेट दिली. त्यांच्या प्रारुपाचा अभ्यास केला. त्यानंतर एनडीएमध्ये अंमलबजावणी केली,’ असे त्यांनी सांगितले होते.
chinmay.patankar@gmail.com