विरोधक विरहित लोकशाही उभी करण्याचा प्रयोग सध्या कुठे सर्वाधिक साध्य होताना दिसत असेल तर तो महाराष्ट्रात. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेरजा वजाबाक्या होत असताना हे अधिकच स्पष्ट होत जाईल. आपल्या राजकीय पटलावरील युती, आघाड्या यांची व्याख्या वगैरे सोडाच, एकूण कल्पनाच धूसर होत जाणे ही आपल्या ‘अराजकीयकरणाची’ आणि ‘विचारसक्तीमुक्त’ राजकारणाची नांदी आहे. हे सारे भाजपच्याच पथ्यावर पडणार आहे आणि भाजपचा हा प्रयोग तूर्तास तरी यशस्वी होताना दिसतो आहे.
यापूर्वी असे प्रयोग झालेच नाहीत असे नाही. शरद पवारांनी केलेला महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रातील राजकीय विश्वाची संस्थात्मक पुनर्रचना करणारा होता. काही काळ चालत आलेले आघाडी आणि युतीचे द्वंद्व तेव्हा पूर्णत: विस्कळीत झाले. इतके की, ‘हे केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत’ असे म्हणणाऱ्या भाजपने त्याआधीच केलेला ‘पहाटेचा शपथविधी’सुद्धा यानंतर खपून गेला. पण हा प्रयोग त्या-त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून लादला गेलेला होता. त्यामुळे एकूणच पक्षांच्या श्रेणी व्यवस्थेत मोडतोड झाली. यानंतरच्या काळात स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे या नव्या राजकीय पटावर आपले मोहरे कसे फिरवायचे हा प्रश्न कधी नव्हे इतका तीव्रपणे उभा राहिला. स्थानिकांची राजकीय हयात एकमेकांच्या विरोधात गेल्यावर एकाएकी एकाच तंबूत पुढचा संसार ठरला होता. अर्थात महाराष्ट्र इथच थांबला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांचेही दोन दोन गट झाले आणि स्थानिक पातळीवर आधीच दुभंगलेले राजकारण आणखी दुभंगले. पक्षांच्या खालच्या श्रेणी व्यस्थतेची पुन्हा नव्याने मांडणी झाली. परंतु अराजक कायम राहिले.
सत्तेसाठी राजकारण आणि त्याचे शरद पवारांच्या भोवती उभे राहिलेले, बहुतांश महाराष्ट्राने स्वीकारलेले आणि साजरे केलेले वलय असो किंवा शिवसेनेचे वडिलोपार्जित वारशाचे राजकारण असो; या दोन्ही पक्षांतील समान धागा हा सरंजामशाही हाच होता. शिवसेना उजवीकडे आणि राष्ट्रवादी काहीशी डावीकडे झुकलेली असली तरीही या वैचारिक अवडंबरांच्या मागे सरंजामी आणि भांडवली प्रस्थापितता जपण्याचाच प्रयास झाला आहे. भाजपच्या लाटेत कैक पूर्वापार सरंजामदार वाहात गेल्यावर आधीच बिघडलेले सत्ता संतुलन पुढे महाविकास आघाडीच्या प्रयोगाने आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या उभ्या फुटीने इतके बिघडले की, पटावर सोंगट्या कशाही विखुरल्या गेल्या. या प्रलयात स्वतःच्या अस्तित्वाला जपण्याच्या प्रयत्नात ‘सत्ता’ एवढेच उद्दिष्ट राहिले आणि याचा परिणाम असा की ‘विचारसरणीमुक्त’ राजकारण उभे राहत गेले.
आपल्या राजकीय समाजाने या सगळ्या घडामोडी जणू एखादा मनोरंजक खेळ पाहात आहोत अशा प्रकारे, उदासीनता दाखवून स्वीकारले. अशा प्रकारे राजकीयदृष्ट्या उदासीनतेचाच आश्रय घेण्यामागे बहुतांश समाजाची प्रबळ भावना ही हतबलतेचीच होती हे खरे. पण त्या हतबलतेचा परिणाम आणखी खोलवर झाला- त्याची परिणती मराठी समाजाचे आणखीच ‘अराजकीयीकरण’ करण्यात झाली. त्यामुळेच याला विरोधक मुक्त राजकीय अवकाश ही आता निव्वळ कल्पना उरली नसून वस्तुस्थिती ठरते आहे.
हा सगळा इतिहास भाजपच्या पथ्यावरच पडताना दिसतो याचे कारण अर्थातच भाजप या सगळ्याच प्रक्रियेचा सक्रिय घटक आहे. भाजपकडे असणारी सगळी ‘साधने’ हे राजकीय अराजक उभे करण्यासाठी पणाला लागली आणि ते फक्त अराजक उभे करण्यापर्यंत थांबले नाहीत तर त्या अराजकाचा लाभार्थी देखील भाजपच झाला. सरंजामी आणि भांडवली प्रस्थापितांच्या राजकीय फटीत हात घालून भाजपने ही सरंजामी आणि भांडवली प्रस्थापितांची टोळी आपल्या तंबूत पुनर्वसित केली.
‘हिंदी पट्टा’ वगळता आपल्या देशातील अन्य राज्यांत भाजपला विविध प्रादेशिक पक्षांनी काही प्रमाणात तरी कडवे आव्हान उभे केले असताना महाराष्ट्रात विरोधी पक्षांची स्थिती आज अतिशय दयनीय आहे. उरल्या सुरल्या विरोधकांचाही एकमेकांशी मेळ नसणे किंवा राजकीय इच्छाशक्ती नसणे याला हे एकूण उभे राहिलेले आणि तितकेच उभे केलेले राजकीय ‘अराजक’ कारणीभूत आहे. विरोधकांचे हात दगडाखाली असल्याचे आणि ते सत्तेने हेरल्याचे पुरावे तर वारंवार जनसामान्यांनाही दिसतात… उदाहरणार्थ पार्थ पवारांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे खिंड लढवायला कसोशीने उभ्या राहतात. शरद पवार आपले भांडवली राजकीय संबंध जपत राहण्यासाठी प्रस्थापितांच्या समवेत लग्नात अक्षता टाकताना दिसतात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका ‘वाटून’ घेतल्या जातात.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सगळ्या पक्षांनी स्वबळाचा सूर धरणे हे सर्वच पक्षांसाठी स्थानिक पातळीवरचे अराजक कायम राहिल्याचा परिणाम आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी समाजाचे झालेले अराजकीयीकरण आणि उभा राहिलेला विचारसरणीमुक्त राजकीय अवकाश ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. मुंबईत भाजप आता मित्रपक्षांशीच स्पर्धा करणार, राज्यात अन्यत्र कुठे दोन्ही शिवसेना, तर कुठे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, ही सारी त्या अराजकीयीकरणाची लक्षणे आहेत. राजकारण विचारांसाठी करायचेच नाही- ते व्यवहारासाठी करायचे, ही खूणगाठ सर्वचजण बांधू लागले, हा खरा रोग आहे.
तो बरा होण्याचा वा करण्याचा काही मार्ग सध्या तरी दिसत नाही. निव्वळ वरवरच्या पातळीवर ‘सारे काही पूर्ववत’ दिसू लागले, तरीही मूळ रोग आणि लक्षणे सुरूच राहणार. उदाहरणार्थ, आता दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांस इशारे करत असताना अजित पवार ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असे म्हणून गेले, पण महाराष्ट्राच्या वर्तमानाची शोकांतिका गंगेला मिळाली तरी तिला मुक्ती नाही.
ketanips17@gmail.com
