दिप्ती वसंत भिसे जगताप
संजू घरी आला. ‘आई मला परवा बाईंनी शाळेत मिसाईल मनची माहिती पुस्तकात बघून वाचायला सांगितली आहे.’ आईने ‘ठीक आहे. बाबांना सांग’ म्हणताच बाबांनी उतर दिलं, ‘आईलाच सांग’. संजू आश्चर्याने तुम्हाला दोघांना माहित नाही का? दोघेही एकसुरात म्हणाले, ‘अरे, गुगल सर्च कर ना.’ पण संजूच्या म्हणण्याप्रमाणे ‘पुस्तकच हवं आहे वाचन दिनादिवशी वाचून दाखवायला. पण आईबाबा पुन्हा एकत्र म्हणाले, ‘वाचन दिन आहे ना? इतक्या छोट्या दिवसासाठी काय त्रास देतो आम्हाला. घे प्रिंट आणि दाखव वाचून.’
ही परिस्थिती खरेच चिंताजनक आहे. पहिली गोष्ट म्हणजे पाल्य पुस्तक वाचन करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. दुसरी अशी की पालक नीरसता दाखवून पळवाट काढत आहेत. स्वतःला त्यांनी परावलंबी बनवलेले आहे.
खरे तर आजचा तरुण हा नेतृत्व हरवलेला तरुण आहे. तो सामाजिक व व्यावहारिक अडचणीत दिसून येतो. ही बाब स्पष्ट करणारी अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अगदी लहान मुलापासून ते पन्नाशीत पोहोचलेल्या व्यक्तीपर्यंत पाहिले तर ही गोष्ट मान्य करावी लागेल. शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयातील तरुण किंवा नोकरी व्यवसाय करणारी व्यक्तीसुद्धा या परिस्थितीला अपवाद नाही.
मग या सर्व गोष्टींचा आणि नेतृत्वाचा काय संबंध?
संबंध असा आहे की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी आपल्याला इतर पळवाटांची गरज भासते. तंत्रज्ञानाचा वापर आणि तयार झालेली संसाधने एका बटणावर तुम्हाला माहिती पुरवतात. याचाच अर्थ असा की आज तंत्रज्ञान, त्याची संसाधने तुमचे नेतृत्व करत आहेत. हे असे का घडले, तर तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापरामुळे वाचनाची सवय लुप्त होत चालली आहे. वाचनाची सवय अबाधित राहिली तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचे नेतृत्व करण्यास समर्थ ठरते.
मग याला वाचन प्रेरणा दिन हा एकच पर्याय आहे का?
आपल्या देशात घडलेली अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहिली, अभ्यासली तर असे लक्षात येते की वाचन ही माणसाची गरज आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता. हीच वाचन संस्कृती रुजवण्याची प्रेरणा आपल्याला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून मिळाली.
असे म्हणतात डॉक्टर एपीजे कलाम हे शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानसाधनेत मग्न होते. यांनी केलेले संघर्ष, पेललेली आव्हाने, प्राप्त केलेले यश सर्वांनी पाहिले आहे. समाजासाठीचे त्यांचे योगदान, तसेच राष्ट्रपती म्हणून त्यांनी केलेले कार्य या सर्व गोष्टींमुळे १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो.
अभ्यासूवृत्ती आणि वैज्ञानिक संशोधन वृत्ती ही त्यांना वाचन सवयीतून मिळाली. एक शिक्षक, शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती म्हणून त्यांचे विचार लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान झाले. म्हणजेच वाचन सवयीने एक सामान्य व्यक्ती स्वतःला वैचारिक रित्या बदलू शकते. ज्ञानार्जन करू शकते. कोणाच्याही आधाराशिवाय स्वतःचे नेतृत्व करून समाज आणि देश घडवून प्रगतीपथावर नेऊ शकते. नेतृत्व करायचे असेल तर वाचनाची सवय रुजवावी लागेल.
वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. आत्मजागृती होते आणि इतरांना समजून घेण्यास मदत होते. आपण स्वतःला चांगले ओळखू शकलो तरच नक्कीच स्वतःचे नेतृत्व करू शकतो. हे साध्य करण्यासाठी व्यक्तीला मानसशास्त्र, तत्त्वज्ञान यावर आधारित पुस्तके वाचून पहावी लागतील. प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचे वाचन करावे लागेल. ज्यामुळे आपण प्रेरित होऊन ध्येयकेंद्राकडे प्रवास करू शकतो. यशस्वी माणसांची चरित्रे वाचणेही खूप उपयोगी ठरते. वाचनामुळे आपली निर्णय क्षमता वाढते. अर्थशास्त्र, इतिहास या विषयांवरील पुस्तकांचे वाचन करणे हे कधीही उपयुक्त ठरते. विविध संस्कृतींवरील पुस्तके, कथा कादंबऱ्या, प्रवासवर्णन या पुस्तकांचे वाचन सामाजिक ओळख घडवून देते. कठीण परिस्थितीत आव्हानांवर मात करणाऱ्या व्यक्तिमत्वांचे वाचन करावे. अशा वाचनाने विचारांना सुपीकता मिळते. वैचारिक स्तर व बौद्धिक स्तर उंचावतो.
पालकांनी आपल्या मुलांना विद्यार्थी वयातच वाचनाची सवय ही लावली पाहिजे. लहान लहान गोष्टींची पुस्तके किंवा आवडीची विषय त्यांना वाचायला द्यावीत. आठवड्यातून दोन वेळा त्यांना ग्रंथालयांमध्ये घेऊन जावे. दिवसभरात एखादे वृत्तपत्र वाचण्यासाठी द्यावे. घरातच छोटीशी लायब्ररी तयार करून मुलांसमोर तिथे बसून पुस्तके वाचावीत. यामुळे मुले आपसूकच वाचनाकडे वळतात आणि मुलांचा इतर संसाधनांप्रती असलेला कल दुर्लक्षित होतो. वाचन कौशल्य वाढते. स्वतःच्या वाचनासाठी वेळ देण्याची सवय लागते. आणि मुलांमध्ये वेगवेगळ्या विषयांबद्दलची उत्सुकता, संशोधन वृत्ती वाढते.
म्हणूनच विद्यार्थी वयातच वाचनाची सवय लावणे फार गरजेचे आहे. कारण हीच पिढी भविष्यात देशाचे नेतृत्व करणार असते. यासाठी या पिढीतील प्रत्येक व्यक्तीने आधी स्वतः च नेतृत्व करणे गरजेचे आहे. देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक आणि राष्ट्रीय जडणघडणीसाठी प्रत्येक पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजवणे फार महत्त्वाचे आहे.
आज वाचन संस्कार घडवणं ही फक्त शाळा, ग्रंथालय किंवा फक्त शासनाची जबाबदारी नाही. ती आपली सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे. यासाठी आपण आपल्या सोसायटीमध्ये वाचन कट्टे तयार करावेत. वाचनाचे कार्यक्रम भरवावेत. महिला मंडळानी भिशी किंवा किटी पार्टी ग्रुपमध्ये वाचक गटाच्या माध्यमातून पुस्तकांची देवाण घेवाण करावी. मॉल्स, कार्यालये, संस्था किंवा कामाच्या ठिकाणी छोटीशी वाचनालये तयार करून घ्यावीत. गरजेनुसार उपयुक्त किंवा करमणूक करणारी, मनाचा थकवा घालवण्यासाठी अशी पुस्तके वाचनासाठी ठेवावीत. ज्यामुळे वाचनाचा आनंद मिळेल, कामाचा तणाव कमी होईल. ज्ञानात भर पडेल. नेतृत्व शैलीत फरक पडेल.
आणि म्हणून वाचन प्रेरणा दिवस हा फक्त डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या योगदानाचे सन्मान करण्यासाठी साजरा करण्याचा दिवस नव्हे. तर हा दिवस राष्ट्राचे योग्य नेतृत्व करणारी पिढी तयार करण्यासाठी तसेच वाचन संस्कृती रुजवण्यासाठी म्हणून साजरा केला पाहिजे. वाचन सवयी राष्ट्र घडवणारे व्यक्तिमत्व नेतृत्व तयार करते. त्यामुळे वाचन प्रेरणा दिवस उपक्रम सर्वत्र साजरा करणे गरजेचेआहे. म्हणूनच ‘वाचन प्रेरणा दिना’ला छोटासा उपक्रम संबोधू नका, तर प्रत्येक व्यक्तीची एक राष्ट्रीय जबाबदारी या दृष्टीकोनातून त्याकडे पहा.
ग्रंथपाल, गोखले एज्युकेशन सोसायटी, विधी महाविद्यालय, खारघर