– विश्वास खोड

पुणंच काय महाराष्ट्रात किंवा आजुबाजूला नीट पाहिलं तर सारी दुनिया पुन्हा आदीम मनोवस्थेत जाते आहे की काय अशी भिती वाटू लागलीय. कुठल्याही किरकोळ कारणावरून सामान्य लोकांवर कोयते उगारून जीव घेणारी, खांडोळी करायची धमकी देणारी कार्टी शहरात जागोजागी लोकांना हैराण करताहेत. पोलिसांची जरब निर्माण होईल, असं एखादंच उदाहरण दिसून येतं. त्यामुळेच तर काही दिवसांपूर्वी, सिंहगड रस्त्यावरच्या वडगावमध्ये कोयता पाजळत सामान्य लोकांवर दहशत माजवणाऱ्याला गस्तीवरच्या पोलिसांनी बडवल्याचा व्हिडीओ पुण्यात प्रचंड व्हायरल झाला होता. 

अल्पवयीन किंवा मिसरुड फुटलेली बेदरकार दुचाकीस्वार पोरं पुणे शहरात कुठल्याही वेळी सुसाट धावताना दिसतात. बहुधा संध्याकाळी मुलींच्या शाळा सुटल्यावर त्यांच्या स्टंटबाजीला ऊत येतो. गाडीच्या नंबर प्लेटवरून आपण सापडू नये याची काळजी घेत कधी कधी नंबर प्लेट्स नसलेल्या गाड्या ही मुले पळवत असतात. मुलींना छेडत असतात. त्यांना अडवण्याची हिंमत लोकांमध्ये कुठल्याही वयोगटात राहिलेली नाही. 

हेही वाचा – अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर सरकारी योजनांचे ओझे…

परवा पेरुगेट पोलीस चौकीजवळ भर सकाळी महाविद्यालयीन युवतीवर खुनी हल्ला झाला. तिला जीवदान मिळालं ते दोन धाडसी युवकांमुळं. ते अर्थात अचानक पुढं आलेल्या घटनेला तत्क्षणी सामोरं जाऊ शकले. त्यांच्या तारुण्याची रग आणि मनाची तगमग लोकांच्या भलेपणासाठी असावी. आजूबाजूला घडणाऱ्या हिंसक घटनांबाबत संवेदनशील असल्यानं ते हल्लेखोराला रोखू शकले. नंतर या घटनेमुळं जनमानसात दबून राहिलेल्या भीतीदायक कोंडीला वाफ मिळाली. पण हा विषय तापता राहिला पाहिजे. त्याशिवाय या अंधारलेल्या वातावरणात वाट मिळणं अवघड आहे. 

अगदी व्हीआयपी लोकांना उठता बसता सुरक्षितता असते, तशी ती दुर्बल, अबलांना मिळेल असं नाही. ती भाबडी आशा या देशात कोणाच्याही मनात नाही. पण रस्त्यावरून जाणं सुखरूप वाटत नाही असं वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत लोकांनी वृत्तमाध्यमांतून किंवा समाजमाध्यमांतून तरी, अशा घटनांविषयी जागरूक राहून लिहिलं पाहिजे. बोललं पाहिजे. हेल्मेट सक्ती आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अशा खरं तर चांगल्या योजनांविरोधात आंदोलनं करणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांनीही नागरी सुरक्षिततेसाठी रस्त्यावर येऊन बोंबाबोंब केली पाहिजे. ते अशा आवश्यकतेच्या वेळी कुठल्या बिळात तोंड लपवून बसतात कोण जाणे? 

पेरूगेट पोलीस चौकीजवळ काही अंतरावरच युवतीवर कोयत्यानं हल्ला झाला. नंतर हल्ला झालेल्या युवतीने भयभीत होऊन स्वतःला पेरूगेट पोलीस चौकीत कोंडून घेतलं त्यावेळी तिन्हीही पोलीस कर्मचारी गैरहजर. कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं. हवालदारासह तीनजणांचा समावेश त्यात आहे. नावापुरत्या उघड्या असलेल्या पोलीस चौक्यांमध्ये नियुक्त असलेले पोलीस चौक्या सोडून काय काय उद्योग करत फिरत असतात. पेरुगेटजवळच्या हल्ला प्रकरणामुळं ते आता चौक्यांत बसायला लागलेत. किती दिवस बसतील चौकीत ते दिसेलच. पण आजवर त्यांच्या कामकाजाकडे उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त अशा लोकांचं लक्ष होतं की नाही? 

विशेषतः गेल्या दोन तीन वर्षांपासून विशिष्ट चेहरामोहरा असलेली मुलं वर्दळीच्या भागात सर्रास धूम स्टाईल बाईक पळवताना किंवा दहशत माजवत फिरताना जास्त दिसतायत. अशी मुलं शक्यतो डबल सीट किंवा ट्रीपल सीट असतात. राॅंग साईडने सुसाट येणं, समोरच्या वाहनचालकाला कट मारून जाणं, मुलींची छेडछाड करणं किंवा पादचाऱ्यांच्या अंगावर बाईक घालून त्यांना घाबरवणं, कधीकधी लोकांच्या अंगावर थुंकणं अशा त्यांच्या विचित्र उन्मादाला आवर घालण्याची हिंमत सामान्य लोकांना सहसा होत नाही. चेहऱ्यावरचे मग्रूर, मवाली भाव यामुळे त्यांना जाब विचारण्याच्या फंदात कोणी पडत नाही. 

हेही वाचा – ‘मुस्लीम व्यक्तिगत कायद्या’चा सर्वाधिक फायदा कुणी करून घेतला हे माहीत आहे का?

शालेय वयाची व नुकत्याच कॉलेजात दाखल झालेली मुले त्यात असतात. बेपर्वा आणि बेफाम असलेली ही मुले अनेकदा खुनी हल्ला किंवा मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेली असणं हा सामाजिक चिंतेचा विषय. पुण्यासारख्या शहरात छोट्या-मोठ्या उपनगरांतील अनेक मुले नशेच्या आहारी गेलीत. बहुतांश मुलांचे पालक कष्टकरी वर्गातले. यातली काही मुलं भरकटल्यामुळं गुन्हेगारी टोळ्यांशी जोडली गेलीत. अल्पवयातच गुन्हेगारी जगताशी संपर्क झाल्यानं बेदरकारपणा या मुलांमध्ये भिनलाय. भरधाव वेगानं दुचाकी चालवणं, भर रस्त्यात तलवार/ कोयत्याने केक कापणं, सामान्य लोकांवर, दुकानदार, पथारीवाले अशांवर कोयते उगारत खंडणी वसूल करण्याच्या घटना उपनगरात घडतात. कारसह दुचाकी वाहनांची नाहक तोडफोड करत दहशत निर्माण केली जाते. 

कोयता गँगकडं भाई-दादांच्या रुबाबामुळं अल्पवयीन मुलं आकर्षित होतात. गुन्हेगारीकडं वळतात. यामुळं पोलिसांनी शाळांमध्येच समुपदेशन सुरू करण्याचं ठरवलं. पण अशा जुजबी उपायांनी हा प्रश्न सुटणार आहे का? कधीकाळी गुन्हेगारांवर वचक असलेले अधिकारी पुण्यात होते. चौकाचौकात टवाळक्या करणाऱ्या आणि नंतर भीड चेपून छोटेछोटे गुन्हे करणाऱ्या पोरांना एका जागी जमूच न देण्याची दक्षता पोलीस घेत असत. त्यामुळं गॅंगवाॅरलाही चाप बसला होता. 

पुण्यात लोकसंख्या अवाढव्य वाढल्यानं गुन्हेगारीही वाढली. तिला आवर घालण्यासाठी फक्त पोलिसांचे प्रयत्न तोकडे पडतात. पोलीस नेहमीसारखेच कमी मनुष्यबळाचं कारण देणार. पोलीस कुठं कुठं पुरेसे पडणार हे त्यांचंही खरंच. त्यांचे वरिष्ठ उपाययोजना सुरू करणार. पुढं काही दिवसांनी पहिले पाढे पंचावन्न. ‘आपल्याला काय घेणं आहे’ अशा आत्मकेंद्रित पळपुटेपणातून भयभीत समाजमन निर्माण होतंय. 

(khodvishwas@gmail.com)