डॉ. प्रसाद कर्णिक

आज ठाणे, नवी मुंबई परिसरातल्या रहिवाशांचा ठाणे खाडीशी संबंध येतो तो केवळ प्रवासादरम्यान पूल ओलांडण्यापुरता. अगदीच हौशी असतील, रोहितपक्ष्यांचे (फ्लेमिंगो) थवे पाहणं, गणेशविसर्जन किंवा नारळी पौर्णिमेपुरता. एरवी सर्वसामान्यांच्या लेखी ठाणे खाडी म्हणजे साचलेला गाळ, अधेमधे पाण्याची डबकी आणि विरळ तिवरं… पण ४०-५० वर्षांपूर्वी ही खाडी म्हणजे केवळ जिवंतच नव्हे, तर अतिशय गजबजलेली परिसंस्था होती…

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…

तुडतुडी, निवटी, चिंबोऱ्या…

ठाणे खाडीचं ५० वर्षांपूर्वीचं रूप आणि वाढत्या शहराबरोबर आक्रसत गेलेलं वैभव मी प्रत्यक्ष पाहिलं, अनुभवलं आणि अभ्यासलंही आहे. आमच्या लहानपणी खाडीवर अनेकांची उपजीविका अवलंबून होती. परिसरातील कोळणी ठाणे खाडीतले ताजे, चविष्ट मासे विकायला घेऊन येत. तेव्हा खाडीत बोयरी, निवटी, खरबी, चिमणे हे मासे मुबलक प्रमाणात मिळत. ‘काळ्या पाठीच्या चिंबोऱ्या’ही मिळत. खाडीतली कोळंबी- जिला आम्ही ‘तुडतुडी’ म्हणत असू- ती चार आणे वाटा मिळत असे. तीसुद्धा दारावर येणाऱ्या कोळीण मावशीकडे, म्हणजे बाजारात आणखी स्वस्त! आज त्याच्या निम्मा वाटा १०० रुपयांत मिळतो. दारावर येणारी आमची ‘सखू मावशी’ काल-परवाच नाहीशी झाली आणि उद्या-परवा कदाचित ही कोळंबी फक्त महागड्या ‘रेस्टॉरंट’मध्येच दिसेल.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा

१९७० नंतर या भागात कारखाने उभे राहू लागले. ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा विकसित झाला. यापैकी बहुतेक कारखाने हे रासायनिक उत्पादनांचे होते आणि त्यातलं सांडपाणी खाडीत सोडलं जात होतं. असं असूनही १९८० पर्यंत या भागात सुमारे ३० ते ३५ प्रकारचे मासे आढळत. पण त्यापुढच्या १० वर्षांत खाडीची परिसंस्था वेगाने बिघडत गेली आणि त्यातल्या अनेक प्रजाती नष्ट होऊ लागल्या. साधारण १९९० नंतर ठाणे खाडीतल्या बोयरीला तेलाचा वास येऊ लागला. हा पहिला दृश्य बदल होता. ऱ्हासाचा हा वेग एवढा प्रचंड होता की, अवघ्या १० वर्षांत माशांच्या प्रकारांचं प्रमाण ३०-३५ वरून दोन-तीनवर आलं.

पुढे २००० सालाच्या सुमारास कारखाने बंद होऊ लागले. त्यानंतर रिलायन्सने या पट्ट्यातली जागा खरेदी केली आणि तिथे प्रदूषक कारखान्यांऐवजी माहिती-तंत्रज्ञान आणि लाइफ सायन्सेसशी संबंधित कंपन्या सुरू झाल्या. त्यानंतर तेलाचा वास येणारी मासळी मिळणं बंद झालं; कारण तोवर खाडीत मासळीच उरली नाही. फक्त काही प्रमाणात निवटी आणि एकदोन प्रकारचे खेकडे उरले. ठाणे खाडीची कोळंबी म्हणून ओळखली जाणारी ‘तुडतुडी’ तर नावापुरतीही उरली नाही. माशांतली विविधता कमी झाली आणि ‘तेलाच्या वासाची मच्छी’ मिळते म्हणून बहुतेकांनी या खाडीच्या खाद्यसंपदेला नाकारलं.

खाडीतल्या पाण्यात एवढ्या प्रचंड प्रमाणात प्रदूषकं मिसळली गेली की त्याची क्षारता प्रमाणाबाहेर वाढली आहे. पाण्यात जीवसृष्टी टिकून राहण्यासाठी त्यातल्या प्राणवायूचं प्रमाण किमान चार मिलीग्रॅम प्रति लिटर असायला हवं. ते ठाणे खाडीत जवळपास शून्यावर आलं.

राडारोडा, कचरा…

शहरांमध्ये निर्माण होणारा राडारोडा, कचरा सारं काही या किनाऱ्यांवर टाकण्यात येत होतं. दरम्यानच्या काळात ठाण्याची लोकसंख्या वेगाने वाढत गेली. वाढत्या लोकसंख्येबरोबर कचरा, सांडपाणी सगळंच वाढलं आणि साहजिकच खाडीप्रदूषणात प्रचंड भर पडली. खाडीपट्ट्यातल्या निमखाऱ्या पाण्यात जलचरांचं खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं. पण प्रदूषणामुळे या खाद्याचं प्रमाण रोडावलं. याव्यतिरिक्त मोठी समस्या म्हणजे भराव! वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी कोणतीही योजना हाती नसल्यामुळे खारफुटीची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. भराव घालून इमले उभारले गेले. मुंब्रा- दिवा- विटावा पट्ट्यातली खारफुटी तोडून टाकली गेली. २६ जुलैला निर्माण झालेली पूरसदृश स्थिती हा या खारफुटींच्या अपरिमित कत्तलीचा परिणाम म्हणता येईल.

आशेचा किरण…

औद्योगिक पट्ट्यातील कारखाने बंद पडले, तशी खाडीची स्थिती अगदी कमी प्रमाणात का असेना सुधारू लागली. गेल्या तीन-चार वर्षांत पुन्हा काही प्रमाणात, मासे मिळू लागले आहेत. १९९०च्या सुमारास खाडीत आढळणाऱ्या माशांच्या प्रजातींचं प्रमाण दोन-तीनवर आलं होतं, ते वाढून आज चार-पाचपर्यंत पोहोचलं आहे. आता निवटी आढळू लागली आहे, कोळंबी, खेकडे मिळत आहेत, पण चिंबोरी म्हणजे काळ्या पाठीचा खेकडा मात्र अद्याप दिसलेला नाही.

नद्यांकडेही लक्ष द्यावं लागेल

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातल्या सांडपाण्याची समस्या कमी झाली असली, तरी या खाडीला येऊन मिळणाऱ्या नद्यांच्या काठांवर वसलेल्या कारखान्यांतून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न आजही गंभीर आहे. यातील सर्वाधिक प्रदूषित नदी आहे उल्हास. त्यातील पाणी ठाणे खाडीला मिळत असल्यामुळे खाडीचे प्रदूषण कायम राहत आहे.

कांदळवनं, खारफुटी हा खाडी परिसंस्थेत आढळणारा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण जैविक घटक. यावर लिहायचं म्हटलं तर एक पुस्तक होईल. या बहुगुणी, बहुपयोगी वनस्पतींचे दोन मुख्य प्रकार आहेत. तिवर आणि कांदळ. पैकी ठाणे खाडीत कांदळ संख्येने कमी असले तरी मुबलक होते आणि खरंतर ठाणे खाडीची ओळख होते. आज, एखाद दुसरं चुकार कांदळ जेमतेम एखाद्या ठिकाणी दिसतं. भविष्यात मात्र यावर योग्य उपाययोजना केल्यास (त्या केल्या जातील ही आशा) कांदळ पुन्हा खाडीची शान ठरेल हे निश्चित.

शिवकालीन इतिहास

शिवाजी महाराजांच्या काळात ठाणे खाडीतील जलमार्ग वापरात होते. हरिभाऊ शेजवळ यांच्या ‘श्रीस्थानक ठाणे’ या मौल्यवान ग्रंथात त्याचा तपशीलवार उल्लेख आहे. कालौघात ही बांधकामं नष्ट झाली. जलवाहतूक बंद झाली. आज खाडीकिनाऱ्यांना चौपाट्यांचं रूप दिलं जाऊ लागलं आहे. सिमेंटचे धक्के बांधले जात आहेत. भविष्यात जलवाहतूक सुरू होईल. विकासाला आक्षेप नाही मात्र जबाबदारीचंही भान तेवढंच महत्त्वाचं आहे. जलवाहतूक किंवा चौपाटीमुळे प्रदूषणात भर पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

ठाणे शहर आणि परिसरातील स्थित्यंतराचं प्रतिबिंब या खाडीत उमटताना मी पाहिलं आहे. १९७९ साली या खाडीच्या किनाऱ्यावरच असलेल्या ठाणे महाविद्यालयात (बांदोडकर महाविद्यालय) प्रवेश घेतला आणि खाडीशी असलेला संबंध अधिकाधिक वाढत गेला. सुरुवातीला विरंगुळा म्हणून तिच्याकाठी आणि आत जाणं झालं. त्याचं रूपांतर अभ्यासात कधी व कसं झालं हे कळलं नाही. आमच्या महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील अध्यापिका प्रा. डॉ. कुसुम गोखले यांनी १९८०च्या सुमारास ठाणे खाडीवर शास्त्रशुद्ध संशोधन सुरू केलं. पुढे विज्ञान शाखेचे अनेक प्राध्यापक या संशोधनाशी जोडले गेले. त्यांनी इथलं प्रदूषण, त्याचा पाण्याच्या दर्जावर होणारा परिणाम, येथील विविध प्रजातींच्या सजीवांचं प्रमाण याच्या सातत्याने नोंदी घेतल्या, त्यांचं विश्लेषण केलं. खाडीला रामसर दर्जा प्राप्त होण्यात या अभ्यासाचा हातभार लागला. हा दर्जा मिळवून देण्यात महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याचा भाग असलेल्या खारफुटी विभागानेही अतिशय उल्लेखनीय कार्य केलं. गेली २० वर्षं पर्यावरण दक्षता मंडळ या आमच्या सामाजिक संस्थेने जास्तीतजास्त नागरिकांना खाडीची ओळख करून देण्याचा, काळजी घेण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचा ध्यास घेतला आहे.

आता रामसर दर्जा प्राप्त झाल्यामुळे ठाणे खाडीची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल. सुयोग्य व्यवस्थापनातून खारफुटी वर्गीय वनस्पतींचं जतन आणि संवर्धन होईल. परिणामी जलचरांच्या पुनरुत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती पुन्हा निर्माण होईल. पक्ष्यांनाही त्यांचं खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल आणि गेल्या काही वर्षांत सुनी झालेली ही परिसंस्था पुन्हा एकदा गजबजेल, अशी आशा आहे.

(लेखक ठाणे खाडीच्या पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

pckarnik@gmail.com