झोहरान ममदानींच्या विजयाचे परिणाम न्यूयॉर्कपलीकडील अमेरिकेतच नाही तर जगभर होऊ शकतात. आणि ते विधायक असू शकतात. या शक्यतेमागे तीन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे जगाच्या भावविश्वात अमेरिकेला आणि न्यूयॉर्कला महत्त्वाचे स्थान आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संकुचित राष्ट्रवादी धोरणांमुळे अमेरिकेचे विश्वगुरू हे स्थान धोक्यात येण्याची मोठी शक्यता आहे. पण आज अमेरिकेचे आपल्या सगळ्यांच्या भावविश्वात असलेले मोठे स्थान नाकारता येत नाही. जीवनाच्या प्रत्येक विषयासंदर्भातील नवे संशोधन अमेरिकेत घडत असते आणि ते आपल्यापर्यंत अक्षरश: रोज पोहोचत असते. हॉलीवूड आणि नेटफ्लिक्समार्फत अमेरिकेची संस्कृती पोहचत असते. आणि म्हणून न्यूयॉर्कच्या महापौरपदी येणारी व्यक्ती आणि तिची विचारसरणी जागतिक राजकारणावर आणि काही देशांच्या देशांतर्गत राजकारणावरही काही प्रभाव टाकू शकते. अमेरिकेतील राजकारणावर तर त्यांच्या निवडीचा मोठाच परिणाम असणार आहे. ममदानी यांनी ट्रम्प यांना दिलेले आव्हान किती मोठे आहे हे ट्रम्प यांच्या दोन विधानांवरून स्पष्ट दिसते. ते म्हणाले की जर झोहरान ममदानी निवडून आले तर मी त्यांना विकासनिधी देणार नाही. निकालाच्या १८ तास आधी ते म्हणाले की ममदानी ज्यूविरोधी आहेत, ज्यू लोक त्यांना मत देणार असतील त्यांना मूर्खच म्हणावे लागेल. पण न्यूयॉर्कमधील ज्यूंनी ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पॅलेस्टाईनचे कट्टर समर्थक मुस्लीम झोहरान ममदानी यांना समर्थन दिले.
झोहरान ममदानींच्या विजयाचे दुसरे विधायक कारण असे, की ते स्वत:ला लोकशाही समाजवादी (डेमोक्रॅटिक सोशालिस्ट) म्हणवतात. समाजवाद या शब्दाची रिपब्लिकन पक्षालाच नाही तर डेमोक्रॅटिक पक्षालाही मोठी अॅलर्जी आहे. समाजवादी माणूस डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार असणे आणि न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून येणे ही अभूतपूर्व घटना आहे. यातील विधायकता अशी की गेल्या १५-२० वर्षांत जगभर लोकशाहीसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्ती सत्तेवर येत आहेत. एकाच कालखंडात सर्व जगभर असे का घडले, उदारमतवादी (लिबरल) विचारसरणीवरील, लोकशाहीवरील लोकांचा विश्वास कमकुवत का झाला याची मीमांसा करताना राज्यशास्त्राचे तज्ज्ञ थकून जात आहेत. राज्यशास्त्राच्या आजवरचे सिद्धांत या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देण्यास असमर्थ ठरत आहेत. पाश्चिमात्य जगतात ही प्रक्रिया घडण्यास जागतिकीकरणामुळे वाढलेली आर्थिक विषमता हे एक प्रमुख कारण आहे, असा निष्कर्ष बहुतेक अभ्यासक काढतात. पण इथे बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की वाढत्या आर्थिक विषमतेने डाव्या विचारसरणीला पाठबळ मिळणे गरजेचे होते. पण तसे घडले नाही. मूठभर धनाढ्य लोकांच्या हातात संपत्ती एकवटत असताना त्यांच्या साहाय्याने उजव्या विचारसरणीचे हुकूमशाही प्रवृत्तीचे नेते निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर येत आहेत. श्रीमंतांवर जास्त कर लावून सर्वसामान्यांसाठी शिक्षण, आरोग्य यासारख्या क्षेत्रांत जास्त निधी देण्याचे आश्वासन देणारे डाव्या विचारांचे नेते निवडणुकीत पराभूत होत आहेत. याउलट धनाढ्य उद्याोगपतींवरील कर आणखी कमी करू असे आश्वासन देणारे नेते या उद्याोगपतींशी उघड राजकीय आघाडी करत आहेत आणि सामान्य जनता त्यांना मते देत आहे. हे एका अर्थाने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे, पण ममदानींचा विजय या जागतिक प्रक्रियेला पहिल्यांदा छेद देतो.
ममदानी यांनी ही निवडणूक शिक्षण, आरोग्य, घरभाडे किफायतशीर नसणे आणि न्यूयॉर्कमध्ये मोफत बससेवा या मुद्द्यांवर लढवली आणि आपण लोकशाही समाजवादी असल्याचे उघडपणे सांगून लढवली. आर्थिक विषमतेच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच उजव्या विचारसरणीला दमदार विरोध होतो आहे आणि ही जगभरच्या उदारमतवादी लोकशाहीच्या समर्थकांसाठी आशादायी गोष्ट आहे. उजव्या विचारसरणीमुळे लोकशाही धोक्यात येत आहे, व्यक्तिस्वातंत्र्य लोप पावते आहे असे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत, पण त्याला आर्थिक मुद्द्यांचा भरभक्कम आधार नाही मिळाला तर ते परिणामकारक ठरत नाहीत. ममदानींचा विजय जगभरच्या उदारमतवादी लोकांना आपल्या राजकीय रणनीतीची फेररचना करण्यास प्रेरक ठरेल.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानींना कम्युनिस्ट ठरवले आहे, असे म्हणणे अर्थातच हास्यास्पद आहे. आर्थिक विषमतेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या व्यक्तीला कम्युनिस्ट ठरवणे हीदेखील जगभरच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांची रणनीती असते. कारण कम्युनिस्ट म्हणजे बाजारपेठेवर आधारित अर्थव्यवस्थेला पूर्णत: नाकारणारे अव्यवहार्य लोक अशी प्रतिमा निर्माण करणे उजव्यांना सोपे असते. पण न्यूयार्कमधील जनतेने ट्रम्प यांचा हा मुद्दा फेटाळला. झोहरान ममदानी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सोडवणूक बाजारपेठेच्या नियमांचा वापर करून जास्त प्रभावीपणे करता येईल अशी मांडणी अर्थातच केली जाईल. उदाहरणार्थ, न्यूयॉर्कमधील घरांच्या भाड्यावर सीलिंग आणण्याऐवजी जास्त घरे उपलब्ध होण्यामध्ये असलेले अडथळे दूर केले जावेत असे मुद्दे मांडले जातील. त्यात तथ्यही असेल. पण ममदानींनी स्वत:ला लोकशाही समाजवादी म्हणवून घेण्याला असलेला राजकीय अर्थ जास्त मोठा आहे.
ते समाजवाद हा शब्द वापरून विषमतेविरुद्धची लढाई हक्कांच्या भाषेत मांडत आहेत. आज जगभर उदयाला आलेले उजव्या विचारसरणीचे अधिकारशाहीवादी (ऑथोरेटेरियन) नेते खुल्या अर्थव्यवस्थेचे, जागतिकीकरणाचे समर्थक नाहीत. उलट ते जागतिकीकरणाचे विरोधक आहेत. अर्थव्यवस्था खुली असावी या तत्त्वाला तिलांजली देऊन मूठभर भांडवलदारांची मक्तेदारी असलेली अर्थव्यवस्था त्यांना हवी असते. लोकांसाठी तुटपुंज्या स्वरूपाच्या कल्याणकारी योजना असायला त्यांचा विरोध नसतो. त्यांचा विरोध असतो लोकांचे प्रश्न हक्काच्या स्वरूपात मांडायला. हक्काची भाषा अंतिमत: समतेच्या मूल्याशी जोडलेली असते. या उलट समरसतावादी विचारसरणीत हक्क या शब्दाला स्थान नसते. खोल अर्थाने पाहिले तर ट्रम्पविरुद्ध ममदानी ही लढाई समरसता विरुद्ध समता अशी आहे. जगभर उदयाला आलेल्या उजव्या राजवटींमध्ये समान काय आहे तर समरसतेचे तत्त्व. त्या त्या देशातील अल्पसंख्याक समूहांनी बहुसंख्याकांकडून दिली जाणारी सापत्न वागणूक निमूटपणे स्वीकारावी. त्यांची अवहेलना, अपमान निमूटपणे मान्य करावा. कारण ते अल्पसंख्य आहेत आणि बहुसंख्याक समुदायातील व्यक्तींनीदेखील हक्काची भाषा करायची नाही. त्यांनीही आपले स्वातंत्र्य बहुसंख्याकवादी राजवटींच्या चरणी अर्पण करावे असे ही समरसतावादी विचारसरणी मानते. या विचारसरणीने पूर्णत: विजय मिळवलेला नसला तरी या तिच्या प्रभावाखाली व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणाऱ्या लोकशाहीतील जगभरच्या संस्था कोसळू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर झोहरान ममदानींचा समतावादी विजय जास्तच आश्वासक आहे.
ममदानींच्या विजयाचे दुसरे विधायक कारण असे की, ते अमेरिकेतील अल्पसंख्याक (दीड टक्क्याहून कमी) असलेल्या मुस्लीम धर्माचे आहेत. ज्या शहरावर दोन दशकापूर्वी जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मूलतत्त्ववादी इस्लामी अतिरेक्यांनी केला त्या बहुसंख्याक ख्रिाश्चन लोकसंख्या असलेल्या शहराने एका मुस्लीम व्यक्तीला आपले महापौर करावे ही अभूतपूर्व घटना आहे. न्यूयॉर्कमध्ये जगभरातून लोक वास्तव्याला आले आहेत. अशा शहरात हे घडले आहे. आपल्याकडे उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून नेहमीच जगभरातील उजव्या विचारांच्या विजयाचा संबंध मुस्लिमांशी जोडला जातो. पण हे खरे नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी हातापायांत बेड्या घालून पाठवलेल्या भारतीयांमध्ये कोणी मुस्लीम नव्हते. अमेरिकेत किंवा इतरत्र ज्यांच्यावर वंशवादी हल्ले झाले आणि होत आहेत ते मुस्लीमच आहेत असे नाही. उजव्या विचारसरणी शत्रूकेंद्री असतात, पण त्यांचा शत्रू एक नसतो. तो स्थल कालपरत्वे बदलत असतो. आणि या विचारसरणी नवनवीन शत्रू शोधत असतात. लॅटिन अमेरिकेतून अमेरिकेत आलेल्या स्थलांतरित लोकांबद्दल ट्रम्प कशी भाषा वापरत असतात हे आपल्यासमोर आहे.
न्यूयॉर्कच्या लोकांनी जगाला संदेश दिला आहे की, आपले धर्म, भाषा, वंश, जाती वेगवेगळे असतील, पण आपण सर्व जण कोठून आलो आहोत यापेक्षा, सर्वांनी मिळून कुठे जायचे आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य ही मूल्ये केंद्रस्थानी मानणाऱ्या उदारमतवादी लोकांसाठी आजचा काळ कमालीचा हताश करणारा आहे. उदारमतवादावर दाटून आलेल्या काळ्या ढगांभोवती झोहरान ममदानींचा विजय ही छोटीशी का होईना आशादायी किनार आहे.
