ॲड. सचिन गोडांबे

पांघरुणात गुरफटून घेऊन गाढ झोपलेली चिमुकली मुले आणि त्यांना हळुवारपणे झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करणारी पालकमंडळी हे शैक्षणिक वर्षाच्या काळात घरोघरी दिसणारे चित्र असते. इतक्या लहान मुलांना झोपेतून उठवून, आवरून, खायलाप्यायला घालून शाळेत पाठवणे हे आईवडिलांसाठी केवळ दिव्यच ठरत नाही, तर काळजावर दगड ठेवणारेही ठरते. झोप पूर्ण झाली नसेल तर आपलं हे बाळ तिथे जाऊन पेंगणार तर नाही ना, त्याचे शाळेत चाललेल्या गोष्टींकडे लक्ष लागेल ना, ही चिंता आईवडिलांना सतत भेडसावत राहते. शाळेत किंवा दुपारी घरी आल्यानंतर ही छोटी मुले आपला झोपेचा कोटा पूर्ण करतात, ही गोष्ट वेगळी, पण मुळात प्रश्न असा आहे की इतक्या छोट्या मुलांची शाळा सकाळी सकाळी असावीच कशाला?

खरेतर साताठ वर्षांच्या मुलांचे झोपेचे चक्र त्या वयात अजून पूर्णपणे स्थिर झालेले नसते. पण अनेक ठिकाणी असे दिसते की छोट्या मुलांची शाळा सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान आणि पाचवीनंतरच्या मुलांची शाळा दुपारी साडेअकरानंतर असते. असंख्य पालकांचे म्हणणे आहे की सकाळी साडेसात वाजता, इतक्या लवकर लहान मुलांची शाळेची वेळ असणे ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. लहान मुलांसाठी सकाळचे नऊ ही योग्य वेळ आहे म्हणजे त्याच्या थोडा वेळ आधी मुलांना शाळेत सोडता येईल. बसने किंवा लांबून येणारी मुले सकाळी आठच्या दरम्यान सर्व आवरून, नाश्ता करून घरातून बाहेर पडू शकतील. पावसाळ्यात व थंडीत तर छोटी मुले इतक्या लवकर उठूही शकत नाहीत. कारण हवामानाचा परिणाम असा की त्यांची झोप पूर्ण झालेली नसते. त्यामुळे ती लौकर उठून शाळेत जायला तयार होत नाहीत.

अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे छोट्या मुलांना उठायला उशीर होतो. काही पालक झोप पूर्ण झाली नसली तरी आपल्या मुलांना बळजबरीने उठवतात. त्यासाठी चेहऱ्यावर पाणी मारा वगैरेसारखे प्रयत्नही केले जातात. अनेक मुले झोप पूर्ण झालेली नसल्यामुळे लवकर उठायला आणि शाळेला दांडी मारतात. सकाळी लौकर उठायला उशीर झाल्यामुळे अनेकदा मुलांना उपाशीपोटी किंवा प्रात:विधी न उरकताच शाळेत पाठविले जाते. सकाळी लौकर उठून आवरायचा त्रास नको म्हणून काही घरांमध्ये तर रात्रीच मुलांना आंघोळ वगैरे घालून झोपवले जाते. सकाळी ती उठली की हात, पाय, तोंड धुऊन, शाळेचा गणवेश चढवला की झाले. सकाळी शाळा का नको याची अशी अनेक कारणे बहुतेक घरांत सापडतील.

पण मग प्रश्न असा पडतो की लहान मुलांना त्यांची झोप पूर्ण झालेली नसताना एवढ्या सकाळी उठवून शाळेत पाठवायचा अट्टहास कशासाठी करायचा? त्यापेक्षा त्यांची शाळाच उशिरा का असू नये?

दुसरीकडे आजकाल टीव्हीमुळे, पालक उशिरापर्यंत जागे राहात असल्यामुळे बहुतेक घरांत मुलांची झोपेची वेळ ही रात्री ११ च्या दरम्यान झाली आहे. त्यामुळे सकाळी सहा-सातच्या दरम्यान मुलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध, त्यांच्या झोपेच्या नैसर्गिक अधिकाराविरुद्ध उठवून शाळेत पाठविणे हा मुलांवर अन्यायच फक्त नाही तर त्यांचा एकप्रकारे छळच आहे.

देशातील कोणतेही सरकारी वा खासगी ऑफिस सकाळी सात किंवा साडेसातला सुरू होत नाही. देशातील कोणतेही न्यायालय सकाळी सात किंवा साडेसातला सुरू होत नाही. मग देशातील लहान मुलांच्या शाळा का सकाळी सात किंवा साडेसातला का सुरू करतात ?

सकाळी सात किंवा साडेसातला शाळा सुरू केल्यामुळे जवळ राहणाऱ्या मुलांना त्याच्या किमान ३०-४० मिनिटे आधी व लांबून किंवा बसने येणाऱ्या मुलांना त्याच्या किमान एक तास आधी उठावे लागते. या मुलांना डबा करून देण्यासाठी त्यांच्या आईला आणखी लवकर उठावे लागते. नोकरी करणाऱ्या अनेक महिलांना स्वतःचा, मुलांचा आणि इतरांचा डबा तयार करण्यासाठी आणखी लवकर उठावे लागते. अनेकदा उशीर झाल्यामुळे मुलांना डब्यामध्ये मॅगी, बिस्किटे असे मैदायुक्त पदार्थ दिले जातात.

खरेतर लहान मुलांच्या शाळेच्या वेळेचा पुनर्विचार सगळ्याच पातळ्यांवरून होणे गरजेचे आहे. यात शाळा व्यवस्थापनाची सोय बघण्यापेक्षा लहान मुलांची झोप हा मुद्दा जास्त प्रकर्षाने लक्षात घेतला जायला हवा. ज्या शाळांना दोन शिफ्टमध्ये वर्ग घेणे शक्य आहे त्यांनी सकाळी साडेआठनंतर पाचवीच्या पुढील मुलांची व दुपारच्या शिफ्टमध्ये लहान मुलांची शाळा घेतल्यास आणखी चांगले राहील.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने झोपेचा अधिकार (राइट टू स्लीप) हा जगण्याच्या मूलभूत अधिकारामध्ये (राइट टू लिव्ह) समाविष्ट केला आहे. झोप नीट पूर्ण होणे हे एकूणच आरोग्यासाठी किती महत्त्वाचे असते हे वेगळे सांगायला नको. असे असेल तर वाढीच्या वयातील लहान मुलांच्या झोपेचा आणि शाळेच्या वेळेचा धोरणात्मक पातळीवर नीट विचार व्हायला हवा.

त्यामुळे शिक्षण खात्याला विनंती आहे की त्यांनी लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून देशभरातील या मुलांच्या शाळेची वेळ उशिरा असेल या मुद्द्याचा विचार करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

yuvasachin@gmail.com