शरद बेडेकर यांनी मानव विजय या सदरात (विशेषत: २० जुलैच्या लेखात) आत्मा नावाची वस्तू नाही, ही जडवादी भूमिका सुसंगतपणे मांडली आहे. जाणीव हा इंद्रिये मेंदू आणि भोवताल यांच्या संघाताचा एक उद्भुत गुण असतो हे खरेच; पण जाणीव ही एवढीच असते की तिला स्वायत्त रचना-संघात असतात यावर विज्ञानातही काम चालू आहे.
– सॅम हॅरिस हे अमेरिकेतील कट्टरतम नास्तिक तत्त्वज्ञ आहेत आणि शिवाय ते मेंदू वैज्ञानिकही आहेत. त्यांच्या अनेक लोकप्रिय नास्तिक ग्रंथांनंतर त्यांनी नुकताच एक वेगळाच विचार मांडणारे पुस्तक लिहिले आहे. ‘वेकिंग अप : अ गाइड टु स्पिरिच्युअलिटी विदाउट रिलीजन.’ या पुस्तकात त्यांनी त्यांच्यातला भूमिकाबदल मांडला आहे. जसा जाणीव हा एक उद्भुत गुण असतो तसेच जाणिवेच्या रचनांना स्वत:चे असे वेगळे उद्भुत गुण असतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
– त्यात ‘आत्मावस्था’ नावाची अवस्था शक्यच नव्हे तर इष्टही असते असे ते स्पष्ट म्हणतात. सॅम हॅरिस यांनी मेंदूवरचे प्रयोग, स्वत: काही विशिष्ट औषधे घेऊन पाहणे आणि बरीच वष्रे विपश्यना पद्धतीची स्वत: साधना करणे या मार्गानी असे दाखवून दिले आहे की आत्मावस्था नावाची अवस्था असू शकते. या अवस्थेत अहं-विलोप होतो, आपल्याला एकूण अस्तित्वापेक्षा आपण वेगळे आहोत असे न वाटता निखळ प्रेमच वाटते, असे सॅम हॅरिस यांनी सानुभव सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर आत्मावस्था जरी टिकाऊ नसली तरी ती अधूनमधून येऊन जाण्याने माणूस जास्त प्रामाणिक, प्रेमळ आणि आनंदी बनतो. म्हणून धर्माच्या कचाटय़ातून मुक्त केलेली आत्मविद्या व तिची साधना मनुष्याच्या एकूण हितासाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
– ‘मनुष्याच्या हितासाठी जडवाद पुरेसा असतो’ असे मानणाऱ्या सर्वानीच, सॅम हॅरिसचे ‘स्पिरिच्युअलिटी विदाउट रिलीजन’ वाचावे अशी माझी कळकळीची विनंती आहे.
– राजीव साने, पुणे

– ‘दिवा आणि तेल’ म्हणता,
– मग ‘तेल’ म्हणजे आत्मा?

– आत्म्याच्या अस्तित्वावर शरद बेडेकरांनी उभे केलेले प्रश्न निश्चितच विचारी माणसाला पटणारे आहेत. प्रत्येक धर्म अशा अदृश्य आत्म्याचा पुरस्कार करताना दिसतात : माणूस सदाचरणी रहावा असा हेतू त्यामागे असू शकतो किंवा ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी.
– ‘दिव्यातील तेल संपल्यावर दिवा विझतो तसा माणूस मरतो’ असा एक युक्तीवाद लेखात आलेला आहे, ते मात्र फारसे पटणारे नाही कारण दिव्यात तेल टाकून दिवा परत पेटवता येतो. तसे मर्त्य जीवाचे होत नाही. येथे ‘तेल’ म्हणजे दिव्याचा आत्मा ठरतो. पण माणूस जिवंत करायला तेल आहे का? असेलच तर ते आत्मा आहे का? माणसाच्या आत्मिक आनंदासाठी, ‘आत्मोन्नतीसाठी’ आत्म्याचे अस्तित्व मान्य करणे चांगले.
– – भिमाशंकर शेतसंदी, मुणगे (ता. देवगड, सिंधुदुर्ग)

‘आयएमए’ ची न्यायालयीन लढाई सुरूच

– ‘अनागोंदीला कायद्याचे कोंदण’ हा डॉ. अमोल अन्नदाते यांचा लेख (१६ जुलै) व त्यावरील प्रतिक्रिया यांसंदर्भात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए- महाराष्ट्र राज्य) ची भूमिका मांडण्यासाठी हा प्रपंच.
– मुंबईत सर जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना १८५७ पूर्वीच झाल्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात, (१९४७ पूर्वी) राष्ट्रीय नेत्यांनी व तेव्हाच्या सरकारने मिळून मिश्र वैद्यकाचे शिक्षण महाविद्यालयीन पातळीवर सुरू केले. (पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी). त्या काळी ‘डी. ए. एस. एफ.’ ही पदविका, ‘जी. एफ. ए. एम.’ ही पदवी, तसेच पुढे ‘बी. ए. एम.(अ‍ॅण्ड)एस.’ आदी अभ्यासक्रम (यापैकी ‘बी. ए. एम.(अ‍ॅण्ड)एस.’ मध्ये शल्यक्रियाही शिकविली जाई) उपलब्ध होते. १९७२ साली रफीक झकेरिया आरोग्यमंत्री असताना ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या निर्णयाप्रमाणे मिश्र वैद्यक शिक्षणपद्धती बंद करण्यात येऊन ‘बी. एस. ए. एम.’ (बॅचलर ऑफ शुद्ध आयुर्वेदिक मेडिसिन) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला.
– या सर्व गोंधळामुळे हितसंबंधीयांनी रुग्णहित वाऱ्यावर सोडून आयुर्वेद, होमिओपॅथी इ. महाविद्यालये खासगी क्षेत्रांत सुरू केली. मात्र मागील काही वर्षांत या महाविद्यालयांतील जागा (सीट्स) मोकळय़ा राहू लागल्या. प्रत्यक्षात आयुर्वेद, युनानी अथवा होमिओपॅथीचे स्नातक थातुरमातुर अनुभवावर (खासगी रुग्णालयातील नोकरी) आधुनिक वैद्यकाचीच प्रॅक्टिस करीत आहेत. याला सरकारी मान्यता मिळावी म्हणून राजकीय पुढाऱ्यांमार्फत प्रयत्न होत राहिले आहेत.
– मध्यंतरी महाराष्ट्रातील होमिओपॅथी डॉक्टरांना आधुनिक वैद्यकशास्त्राची औषधे लिहिण्यास परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू झाले आणि ‘एक वर्षांचा फार्माकॉलॉजी कोर्स’ असे यासाठी ठरवण्यात आले. ‘आयएमए’ने याला उच्च न्यायालयात आव्हान दिले, परंतु २४ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने आयएमएची याचिका फेटाळली. त्यावर आयएमए सर्वोच्च न्यायालयात धावली, त्याचा निर्णय पंधरवडय़ापूर्वी, ९ जुलै रोजी आला. आयएमएच्या स्थगिती याचिकेस सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही; परंतु ‘मुंबई उच्च न्यायालयात हा खटला तातडीने चालवावा’ असा निर्णय दिला.
– थोडक्यात आता हा आयएमएचा खटला, मुंबई उच्च न्यायालयात चालेल व तेथे त्याचा सोक्षमोक्ष लागेल. अशिक्षित, अर्धशिक्षित व आरोग्य शिक्षण अजिबात नसलेल्या गरीब जनतेच्या भल्यासाठी सरकारने हा ‘वैद्यकीय उपचारपद्धतींमधील ‘पक्षांतरा’चा जीवघेणा खेळ’ थांबवावा, ही मागणी कायम राहील.
डॉ. सुहास पिंगळे, सचिव, आयएमए – महाराष्ट्र राज्य.

 आत्मा-ईश्वर हे सृजनाधार!

– ‘आत्म्याचे अस्तित्व (?)’ या लेखाशी (२० जुलै) पूर्ण सहमत आहेच. ईश्वराची निर्मिती माणसाला वाटणाऱ्या भयातून झाली याबद्दल शंका नाहीच. फक्त असं मात्र वाटतं की ईश्वराचा जन्म झाला भयातून; पण माणसाच्या सृजन-शक्तीने त्याला मोठं केलं, घडवलं! अर्थात मानव अधिकाधिक सुसंस्कृत (सिव्हिलाइज्ड ) होऊ लागला तसतसं ते घडत गेलं असावं. ईश्वर ही संकल्पना माणसाच्याच बुद्धीतून निर्माण झाली हे मान्यच आहे, पण या संकल्पनेभोवती माणसाचं ‘सृजन’ फिरत राहील हे मात्र नक्की. म्हणूनच निसर्गाला देव मानून वेदांतील ऋचा रचणारे, प्रतिभावंत कवी वाटतात आणि ईश्वराच्या मूर्ती दगडातून कोरून काढणाऱ्या शिल्पकाराचा अधिक आदर वाटतो. देऊळ, चर्च, मशीद बांधणाऱ्या अनामिक वास्तुशिल्प रचनाकाराला नमस्कार करावासा वाटतो. मनात विचार येतो, आपला काळा पांडुरंग नसता तर तुकोबाचे अभंग वाचता आले नसते आणि सावळा कृष्ण नसता तर मीरेची भजनं ऐकता आली नसती, किंबहुना असेही म्हणता येईल की त्यांच्या काव्याने पांडुरंग आणि कृष्ण अधिक जिवंत झाले.
– तसेच पुढे जाऊन आत्मा या संकल्पनेविषयी मनात विचार येतो की माणसाचे आत्यंतिक तरल, संवेदनाक्षम आणि विशुद्ध मन म्हणजेच आत्मा? (अखेर हेही त्याच्याच मेंदूचा एक भाग आहे ). ही माणसांनीच निर्माण केलेली आणखी एक संकल्पना?
– फक्त एकच इच्छा, मानवांनीच घडवलेल्या सृजनाच्या मळ्यातल्या या ईश्वराचा केवळ धर्माच्या दुरभिमानाने ऱ्हास होऊ नये.
सीमा शेंडे, विलेपार्ले (मुंबई)

जाणण्यातील ‘विसंगती’मुळे आत्म्याचे ‘आश्चर्य’

– ‘मानव विजय’ ही संपूर्ण वैचारिक लेखमाला तत्त्वज्ञानाची पाश्र्वभूमी असलेली आहे. त्यामुळे आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी बेडेकरांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांच्या संदर्भात, विचार करताना, तत्त्वज्ञानाच्या अंगाने काही मुद्दे लक्षात आले, ते वाचकांसमोर मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच.
– तत्त्वज्ञानात काही ‘अंतिम समस्या’(Ultimate Doubts) किंवा न सुटणारे प्रश्न आहेत, आणि सृष्टीच्या आरंभाविषयीचा (त्यात ‘आत्म्या’चा आरंभही आलाच), प्रश्न हा त्यातील एक आहे. मानवी बुद्धी मर्यादित वा सान्त (finite) आहे, व हा प्रश्न अनन्तासंबंधीचा (infinite)- अनन्तातून सान्त कसे झाले- याचा आहे. त्यामुळे तो, जोवर मनुष्याची बुद्धी सान्त आहे, तोवर सुटण्यासारखा नाही. मानवी बुद्धीने असे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करण्यात, ४ प्रकारच्या ‘विसंगती’(absurdities/ inconsistencies) असल्याचे तत्त्वज्ञानाचे अभ्यासक सांगतात, त्या अशा :
– (अ) मी हा या सृष्टीचा एक भाग आहे. एका भागाने पूर्णाला समजून घेणे हे कधीच शक्य नाही. (A part cannot know the whole.) ही गणिताच्या दृष्टीने विसंगती आहे. (Mathematical absurdity)
– (आ) मी सृष्टीचा उगम समजून घेणे, म्हणजे हाताने त्याच हाताला किंवा चिमटय़ाने त्याच चिमटय़ाला पकडण्यासारखे आहे, जे तर्कदृष्टय़ा विसंगत आहे, शक्य नाही. (Logical absurdity)
– (इ) मी सृष्टीचा उगम समजून घेणे, म्हणजे काळाच्या मागे जाणे आहे. मी कालाधीन असल्याने, ते ‘मी’ ला कधीही शक्य नाही. काल ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. म्हणून ही मानस शास्त्रीय विसंगती आहे. (Psychological absurdity)
– (ई) माणूस, म्हणजे ‘मी’ हा ‘सृष्टीच्या पसाऱ्या’चा (phenomenon) भाग आहे. तो त्यातच आहे, तोपर्यंत त्याच्या पलीकडे असलेल्या, व त्याचे मूळ असलेल्या (noumena) ला म्हणजेच ‘सृष्टीच्या आरंभा’ला समजून घेणे त्याला कधीही शक्य नाही. ही तत्त्वज्ञानात्मक विसंगती आहे (Philosophical / Metaphysical absurdity)
– या चार विसंगतीची पूर्ण कल्पना असल्यानेच, बहुतेक सर्व तत्त्वज्ञानी / विचारवंत – ‘सृष्टीचा आरंभ जाणणे मानवी बुद्धीला अशक्य आहे,’ -अशीच भूमिका मांडतात. उदा.- लोकमान्यांनी गीतारहस्यात ‘सृष्टीचा प्रारंभ कसा झाला, ते सांगता येत नाही’ असे ‘अध्यात्म’ या प्रकरणात म्हटले आहे. डॉ. राधाकृष्णन यांनी,kShankara’s Maya represents the mystery at the heart of creation..’ असे Indian Philosophy वरील ग्रंथात म्हटले आहे.
– इथे दुसरी आठवण होते, ती भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या २९ व्या प्रसिद्ध श्लोकाची. ‘आश्चर्यवत् पश्यति कश्चिद् एनं। आश्चर्यवत् वदति तथव चान्य। आश्चर्यवत् चनमन्य शृणोति । श्रुत्वाप्येनम वेद न चव कश्चिद्’ (भगवद्गीता अ.२, श्लोक २९) आत्मविषयक तत्त्वज्ञान संक्षिप्त रूपात अध्याय २, श्लोक ११ ते २८ मध्ये सांगून झाल्यानंतर हा श्लोक आलेला आहे. याचा अर्थ, आत्मस्वरूप, हे ‘जाणायला’ अवघड आहे, याची प्रत्यक्ष गीताकारांनासुद्धा पूर्ण कल्पना असावी! याचे कारण, इतर विषयांच्या बाबतीत, ज्ञाता- ‘मी अमुक जाणले / जाणतो’ -असे विधान ठामपणे करतो. आत्मज्ञानाच्या बाबतीत, तसे होऊ शकत नाही. कारण, आत्मा जाणल्यावर जाणणारा ‘ज्ञाता’ ते सांगायला वेगळा उरतच नाही!
– आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल किंवा आरंभाबद्दलच्या बेडेकरांच्या सर्व शंकांचे मूळ वरील चार प्रकारच्या विसंगतींमध्ये आणि भगवद्गीतेच्या वरील श्लोकात वर्णन केलेल्या आत्मस्वरूपाविषयीच्या ‘आश्चर्या’मध्ये (म्हणजेच, आत्मज्ञानाच्या वैशिष्टय़ामध्ये, वेगळेपणामध्ये) असावे, असे मनापासून वाटते.
– -श्रीकांत पटवर्धन, कांदिवली पूर्व (मुंबई)

पॅथी-भेद असणारच, सुसूत्रता आणणे गरजेचे

– डॉ. अमोल अन्नदाते यांच्या ‘अनागोंदीला कायद्याचे कोंदण’ या लेखावर अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया आल्याच. मूळ चर्चाविषय शासकीय निर्णयाशी संबंधित असूनही चर्चा शेवटी पॅथीच्या वादावर घसरली. वास्तविक, वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित शासकीय निर्णय हे कोणत्याच पॅथीच्या व्यावसायिक हितसंबंधावर आधारित नसावेत. त्याच वेळी ते जनतेच्या हिताकरिता असल्याने जास्त सारासार विचार करून घेतले जावेत. उपचार कोणत्या पॅथीप्रमाणे व्हावेत असा मुद्दा नसून ‘एका पॅथीचे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांनी इतर पॅथीचे उपचार करावेत का,’ असा असल्याने शेवटी तो व्यावसायिक हितसंबंधांवरच घसरतो आणि म्हणूनच तो जास्त वादाचा बनतो. यामधूनच मग एखादी पदवी ही ‘बहुचिकित्सा पद्धती’ आहे किंवा नाही असे दावे उद्भवतात.
– आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रिया या डॉक्टरांकडून आल्याने त्याला कदाचित एखाद्या पॅथीची बाजू घेण्याचे स्वाभाविक परिमाण असेल. म्हणूनच या व्यवसायाशी (शिक्षण, उपचार, औषधनिर्मिती, विक्री, वगरे) कोणत्याच प्रकारे संबंध नसलेल्या पण डोळसपणे परिस्थिती पाहणाऱ्या लोकांना काय दिसते हे पाहणे उद्बोधक ठरेल.
– ‘आधुनिक वैद्यक म्हणजे फक्त अ‍ॅलोपॅथी नव्हे’ या पत्रात (लोकमानस, १७ जुलै) म्हटल्याप्रमाणे जरी मानवी शरीर हे एकच आहे आणि त्याची रचना, क्रिया, रोग प्रादुर्भावाची प्रक्रिया एकच असून ती ‘पॅथी’नुसार बदलत नाही, तरीही डॉ. अन्नदाते यांनी लिहिल्याप्रमाणे ‘आयुर्वेद व होमिओपॅथी या शाखा अ‍ॅलोपॅथीपेक्षा मूलत: आणि पूर्णत: वेगळ्या तत्त्वावर निदान करणाऱ्या वैद्यक शाखा आहेत’. दुसरे म्हणजे , ‘कुठलाही डॉक्टर हा त्याच्या ज्ञानावर नाही, तर रुग्णाच्या अज्ञानावर त्याच्या प्रॅक्टीसच्या कक्षा व मर्यादा ठरवतो (अशी आजची, आपल्याकडली स्थिती आहे)’. याला पूरक म्हणजे काही पॅथी बाबतीत जनताच ‘अधिकृत आणि प्रमाणित’ शिक्षणाची आणि संशोधनाची अपेक्षा करीत नाही. आपल्या पूर्वजांचा वारसा कुणीही वापरावा या धारणेने या पॅथीवर कुणीही हक्क सांगतो, उपचार सुचवतो आणि ‘सहज आणि सुलभ’ पुस्तकेही लिहिली जातात. औषधी वनस्पती व उपचारांबाबत विरोधाभासी आणि अतक्र्य गुणवर्णन करणारे (कोणत्याच पॅथीचे अधिकृत शासनमान्य शिक्षण न घेतलेले) काही भुरटे लेखकही तज्ज्ञ डॉक्टरांना न पटणारे दावे करतात. हे उपचार शेवटी तज्ज्ञांच्या हातात न राहता ‘घरगुती’ पातळीवर येतात. काही लोक ‘जितक्या जुन्या ग्रंथातले संदर्भ तितके ते अधिकृत (ऑथेन्टिक)’ या धारणेच्या आधारावर जुन्याच काळात जगतात, मात्र इतर पॅथीच्या तज्ज्ञांनी केलेली आधुनिक संशोधने ही सोयीच्या / गरसोयीच्या आधारावर स्वीकारतात किंवा नाकारतात.
– अशा परिस्थितीत त्या पॅथीमध्ये प्रमाणित संशोधन आणि त्यातून करावे लागणारे बदल होत नाहीत किंवा त्याचा आग्रहच धरला जात नाही. या बाबतीत अ‍ॅलोपॅथीमध्ये मात्र चित्र वेगळे दिसते. अ‍ॅलोपॅथीमध्ये उपचार, औषधनिर्माण, प्रमाणीकरण या बाबतीत निश्चित मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नवे संशोधन स्वीकारण्याचे काही पक्के निकष आहेत. हे संशोधन संपूर्ण जगभर चालते, जगभर उपयोगी येते आणि मुख्य म्हणजे यात जुने संशोधन कालबाह्य़ ठरणे हे मान्य असते. यातून शास्त्राची प्रगतीच होत असते.
– हा विषय पॅथीमधल्या वादांचा किंवा डॉक्टरांच्या उपलब्धतेचाही नाही. एम.बी.बी.एस. डॉक्टर जसे खेडय़ात नाहीत तसे शहरातही फारसे दिसत नाहीत. ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पनाच नष्ट पावते आहे. सर्वत्र फक्त स्पेशालिस्टच आहेत की काय असे चित्र आहे. आयुर्वेदिक डॉक्टर खेडय़ात जातीलच याची खात्री नाही. आयुर्वेदिक डॉक्टर नसतानाही ‘चिकित्सा’ आणि ‘कम्रे’ करणाऱ्यांची दुकाने शहरात जोरात चालताहेत. सर्व परिस्थिती कोणत्याही पॅथीच्या अभ्यासापेक्षा व्यावसायिक गणितांवरच ठरते आहे. वरील परिस्थितीचा साकल्याने विचार करून कदाचित संपूर्ण शिक्षण पद्धतीतच आमूलाग्र बदल करावा लागेल.
– दीपक गोखले, पुणे</strong>

सजीवांतील ऊर्जेची स्थित्यंतरे

– आपण ज्याला लौकिक अर्थाने आत्मा म्हणतो तो नसेलही आपल्या शरीरात कदाचित. पण यालाच जर शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितले तर केवळ या जगातील नव्हे तर या विश्वाच्या प्रत्येक सजीवात अथवा निर्जीवात वेगवेगळ्या प्रमाणात ऊर्जा (एनर्जी) साठलेली आहे. ही ऊर्जा विविध स्वरूपात असू शकते, जसे चुंबकीय स्वरूपात, रासायनिक स्वरूपात, विद्युत स्वरूपात, प्रकाश स्वरूपात, उष्णतेच्या स्वरूपात वगरे. निर्जीवात ती इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात असते तर सजीवांमध्ये ती पेशीमधील न्युक्लेअसमध्ये रासायनिक स्वरूपात असते. दुसरा मुद्दा असा की, आइनस्टाइनच्या नियमाप्रमाणे ऊर्जा निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. ती फक्त तिचे स्वरूप बदलते. त्यामुळे या विश्वातला तिचा साठा अबाधित राहतो.
– आता आइनस्टाइनच्या नियमाप्रमाणे जर विचार केला तर मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय होते? यासारख्या प्रश्नाची उत्तरे निश्चितच मिळू शकतील. लौकिक अर्थाने सजीवांमध्ये मृत्यूच्या वेळी एकएका पेशीचे काम करणे बंद होते. त्या पेशीतील ऊर्जा दुसऱ्या स्वरूपात परिवर्तित होते. परंतु ऊर्जेचे ते स्वरूप त्या सजीवाला लौकिक अर्थाने जिवंत म्हणण्यास पूरक ठरत नाही. लौकिक अर्थाने जिवंत असण्यासाठी जे अवयव कार्यशील असायला हवेत. त्या अवयवाच्या पेशी अकार्यक्षम झाल्या की तो सजीव (मग तो प्राणी असो की वनस्पती) मृत झाला असे लौकिक अर्थाने समजले जाते.
– वेगवेगळ्या भावना, मनाच्या अवस्थेतील स्थित्यंतरे वगरे लेखकाने दर्शवल्याप्रमाणे मेंदूतील विविध रासायनिक द्रव्यांच्या क्रिया प्रक्रियांचा परिपाक होय. प्रत्येक व्यक्तीच नव्हे तर प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे घडते. प्रत्येकात हे रसायनाचे प्रमाण कमी-जास्त असते त्यामुळे एकाच घटनेत वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळे वागतात.
लक्ष्मीकांत अंबेकर, सीवूड्स (नवी मुंबई)

– ‘कर्जमाफी अयोग्य’च्या पुढे काय?

– विरोधक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी आग्रह धरतात. मुख्यमंत्री ती नाकारतात. ती नाकारताना त्याचे समर्थन करताना मुद्देसूद भाषणही करतात. त्यासाठी ‘लोकसत्ता’च्या संपादकांसहित अनेकांना मुख्यमंत्र्यांचे अभिनंदनही करावेसे वाटते. आतापर्यंतच्या कर्जमाफीच्या परिणामांचा विचार करता, हे योग्यच असावे, असेही वाटते, पण हे सगळे एवढय़ावरच थांबते, हे दु:खद आहे. हजारो कोटी रुपये खर्च करूनही सिंचनात फारशी वाढ होत नाही. सिंचनाअभावी आधुनिक तंत्रज्ञान, सरकारी योजना निर्थक ठरत आहेत. त्यात जमिनीचे लहान लहान तुकडे होत आहेत. दुष्काळाचे संकट तर शेतकऱ्यांची पाठ सोडत नाही. शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी सदोष आहे. या सर्व बाबींवर सखोल चिंतन व चर्चा होण्याची गरज आहे. शेतीवर जवळपास ६५% लोक आपला उदरनिर्वाह करतात. या लोकांसाठी तरी विचारवंतांना शेती व तत्संबंधित प्रश्नांचा खल करण्याची गरज वाटू नये काय? शेवटी देश म्हणजे देशातील माणसेच ना!
– एक दिवस या माणसाच्या मनातील असंतोषाचा स्फोट झाला तर ते कोणालाही परवडणारे नाही. म्हणूनच कर्जमाफी कशी अयोग्य, हेच केवळ सांगण्यासाठी विचारवंत मंडळी आपली बुद्धी खर्च करतात, याचे खरोखर वाईट वाटते.
– हरिहर आ. सारंग, लातूर.

– अध्यात्म आणि विज्ञानवाद, दोहोंतील भोंदूगिरी थांबो!

– ‘आत्मा-परमात्मा’ ही आध्यात्मिक धारणा तुच्छ मानायचं ठरवलं की, स्वत: निर्माण केलेल्या निव्वळ वैज्ञानिक चक्रव्यूहात शिरल्यावर विचारवंतांचा देखील अभिमन्यू होतो. मग जीवसृष्टीतील ‘चेतनाशक्ती- वा आत्मशक्ती’ ही मूळ विश्वव्यापी ‘चिद्शक्ती’चा वा परमात्म्याचा अंश हे अमान्य करताना, ‘आत्मे अमर कसे होतात?’ असे हास्यास्पद प्रश्न निर्माण होतात! म्हणून ‘सारासारविवेकवादा’ची अपेक्षा असेल तर प्रखर विज्ञानाबरोबर शुद्ध अध्यात्माला पर्याय नाही. त्यासाठी या दोन्ही क्षेत्रांतील चमत्कार- भोंदूगिरी- अंधविश्वास यांचा निचरा होणं हे महत्त्वाचं.
प्रभाकर बोकील, चेंबूर (मुंबई )
– ६ ‘आत्म्याचे अस्तित्व(?)’ वरील सर्व प्रतिक्रिया छापणे अशक्य आहे, तरीही निवडक पत्रांनाच सोमवारी प्रसिद्धी देऊन विषय थांबविला जाईल.