जेम्स थर्बर या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या (सन १९३९) ‘सीक्रेट लाइव्हज ऑफ वॉल्टर मिटी’ या गोष्टींमध्ये वॉल्टर मिटी या नावाचे एक पात्र होते. ते पात्र व त्याचे सहकारी काम करीत असताना जेव्हा अडचणीत येते, तेव्हा तो प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर एक काल्पनिक प्रसंग उभा करीत असत. या अडचणीच्या -पण काल्पनिक- प्रसंगातून वॉल्टर मिटी विविध क्ऌप्त्या लढवून स्वत:ची व आपल्या सहकाऱ्यांची सहीसलामत सुटका(!) कशी करून घेत असे याचे खुमासदार तसेच चटकदार व मनोरंजक वर्णन लेखकाने कथांमध्ये केले आहे. याच कथांवर आधारित ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ही विनोदी मालिका दूरदर्शनवर ऐंशीच्या दशकात प्रदर्शित झाल्याचे वाचकांना स्मरत असेल.
याचे आता स्मरण होण्याचे निमित्त म्हणजे मुख्यमंत्री विविधप्रसंगी जनतेला दाखवीत असलेले दिवास्वप्न. ‘देवेन्द्रभाऊ, तुम्हीसुद्धा’ या अन्वयार्थ (१४ नोव्हेंबर) सदरामध्ये प्रसिद्ध झालेल्या स्फुटातही असेच एक अमूर्त स्वप्न मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दाखविल्याचा उल्लेख आहे.
– रवींद्र भागवत, सानपाडा (नवी मुंबई)

अप्रस्तुत आणि अव्यवहार्य उत्तर हवे कशाला?
‘घरचे प्रश्न, उत्तर बाहेरचे!’ (१५ डिसेंबर) हे भारत-जपान दरम्यान झालेल्या १६ विविध करारांच्या पाश्र्वभूमीवरचे संपादकीय वाचले. अच्छे दिनांच्या स्वप्नांचे गाठोडे घेऊन दीड-पावणेदोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या एका सँटाक्लॉज बाबाची स्वप्ने एका तूरडाळीने केव्हा ‘बुऱ्या दिनां’त परिवíतत केली ते त्या स्वप्नाळू सँटाक्लॉज बाबालाही समजले नसावे. अशा वेळी घरच्या त्रस्त प्रश्नांनी भारतीय समाजमनाच्या स्वप्नांचा अपेक्षाभंग झालेला असताना, समदु:खी असलेल्या जपानी पंतप्रधानांबरोबर विविध करारांवर स्वाक्षऱ्या करून ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू ‘बुलेट ट्रेन’च्या माळा’च्या भूमिकेत शिरण्याशिवाय दोघांनाही गत्यंतर नव्हते.
परंतु अशा तऱ्हेने घरच्या प्रश्नावर बाहेरच्या उत्तराचा उतारा शोधत असताना, या करारांत मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांमध्ये बुलेट ट्रेन चालविण्याचा सुमारे ९० हजार कोटींच्या खर्चाचा जो प्रस्ताव मांडण्यात आला आहे, त्याचा विचार व्हावा. हा प्रस्ताव सध्याच्या, म्हणजे मंदीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशांतर्गत आíथक परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर तसेच इतर गंभीर व तातडीच्या अनेक प्रश्नांचे प्राधान्यक्रम असताना केवळ अप्रस्तुत आणि अव्यवहार्य असा आहे.
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात जीवनसंघर्षांला कंटाळून दररोज सरासरी ४५ शेतकरी आत्महत्या करतात, अनेक प्राधान्याच्या बाबी प्रलंबित आहेत, तेथे जगभर आíथकदृष्टय़ा तोटय़ात चालणाऱ्या अत्यंत खर्चीक अशा बुलेट ट्रेनची खरोखरच आवश्यकता आहे का, हे नव्याने तपासणे गरजेचे आहे.
-प्रदीप शंकर मोरे, अंधेरी (मुंबई)

फक्त मोदीभक्तांचाच उल्लेख का?
‘साडेतीन टक्क्यांची झुंडशाही’ (१२ डिसेंबर ) हा अग्रलेख अर्धवट वाटला. मोदीप्रेमी जल्पकांचे समाजमाध्यमांतील अस्तित्व कुणीही नाकारू शकणार नाही. मात्र इतर भक्तांचा उल्लेखही न होणे खटकले. उदाहरणेच घ्यायची झाल्यास अलीकडल्या घटनांमधील काँग्रेस, आप, शाहरुख समर्थकांचा ‘अतिउत्साही मुक्त वावर’ तटस्थ नजरेतून सुटणे अशक्य आहे. आप, काँग्रेसचा व्याप तुलनेने मर्यादित असला तरीही तो दुर्लक्ष करण्याइतका कमी नाही. त्यामुळे त्यांचे अस्तित्वच नाकारण्याचा प्रयत्न पटला नाही.
– निखिल जाठे, यवतमाळ

आत्महत्या कशा रोखणार?
मराठवाडय़ात निसर्गाने दुष्काळ दाखविला आहे. शेतकरी दुबळा बनला आहे. एकटय़ा मराठवाडय़ात जानेवारीपासून ९९०हून जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मात्र सध्याच्या सत्ताधारी पक्षाने दुष्काळी भागाची पाहणी करून अद्याप निधी दिला नाही. अशाने नाराजी वाढणार नाही का?
योगेश रमेश घोडके, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर</strong>

अध्यात्माची आरोळी..
‘उतारवयात अध्यात्माकडेच..’ या पत्रात (लोकमानस, १५ डिसें.) मांडलेल्या प्रश्नाबाबत काही विचार नोंदवावेसे वाटतात. शरद जोशी किंवा प्रधानमास्तर उतारवयात अध्यात्माकडे वळले इत्यादी तपशील त्यांच्या निधनानंतरच प्रसिद्ध होतात अगर ठळकपणे अधोरेखित का केले जातात, हे जास्त चिंतन करण्याजोगे आहे. ‘करून करून भागले आणि देवपूजेला लागले’ या म्हणीचा दर्जा प्राप्त झालेल्या मिस्कील वाक्याचे स्मरण या संदर्भात होते. दुसरे असे की, एकीकडे अध्यात्माला प्रसिद्धीचे वावडे आहे असे म्हणायचे आणि त्याच वेळी कोणी ऐहिक जीवनात मोठी अगर प्रसिद्ध ठरलेली व्यक्ती अध्यात्माकडे वळली म्हणून हरखून जायचे हे काय? ‘एखादा शाकाहारी माणूस सामिष भोजन करू लागला म्हणजे मांसाहारी लोकांना ‘जितं मया’ म्हणून आरोळी ठोकाविशी वाटते तसाच हा प्रकार आहे असे कोणाला वाटले तर त्यात त्याचे काय चुकले?
 गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर (मुंबई)

सरकारी नोकरी इच्छुकांनी काय करावे?
मराठा आरक्षित जागांवर तात्पुरत्या नेमणुका (३ डिसेंबर) ही बातमी वाचून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तसेच इतर स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी म्हणून मनाला बरे वाटले. संबंधित आरक्षित जागांवर काही कालावधीसाठी का होईना, पण गुणवत्तेवर मुलांची नियुक्ती होऊ शकेल. शासनाने तशी शुद्धिपत्रिकाही जाहीर केली. पण त्यानंतर या निर्णयावर कोणत्याही विभागाने किवा आयोगाने काहीही निर्णय घेतलेला नाही. या शुद्धिपत्रिकेची प्रत ही शासनाच्या सर्व विभागांनादेखील पाठवण्यात आली. परंतु शासनाचे निर्णय हे फक्त कागदावरच राहतात याची प्रचीती यानिमित्ताने येत आहे. आयोगाशी पत्रव्यवहार करूनही काहीच उत्तर मिळालेले नाही. यामुळे सरकारी नोकरीत जाऊ इच्छिणारांचे हाल होतात. त्याला वाचा फोडणारे कोणीही नाही. एक तर आयोगाच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत. त्यावर आयोग सांगते की, ‘अद्याप मागणीपत्रक प्राप्त नाही.’ मग या उमेदवारांनी दाद मागायची कुणाकडे? शासनाचा हा निर्णय लवकरात लवकर लागू व्हावा, हीच अपेक्षा आहे.
अक्षय रवींद्र शिर्के, कोपरखैरणे (नवी मुंबई)

भविष्याविषयी मांडणी पवार करणार कशी!
शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या मुलाखतींतून देशाच्या भविष्याचे दिशादर्शन करणारे काही तरी त्यांच्याकडून समोर यायला हवे होते अशी अपेक्षा करणारे भाबडे पत्र (१५ डिसेंबर) वाचले.
आता सोहळा संपला आहे. त्यामुळे काही गोष्टी स्पष्ट बोलल्याने औचित्यभंग होणार नाही अशी आशा आहे. एक तर पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द आता संपल्यात जमा आहे (त्यामुळेच की काय त्यांनी आता राष्ट्रपती व्हावे असे राहुल बजाज म्हणाले) आणि त्यामुळे हे सगळे समारंभ एक स्मरणरंजन असेच राहणार होते.
केंद्रीय कृषिमंत्री म्हणून त्यांची कामगिरी काय? २००४ ते २०११ या त्यांच्या कारकीर्दीत देशभरातील १ लाख ३० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या (संदर्भ: विकिपीडियाhttps://en.wikipedia.org/wiki/Farmers%27_suicides_in_India )
आज महाराष्ट्रात पवारसाहेब शेतकऱ्यांचे नव्हे तर लवासाचे आणि क्रिकेटचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. गेल्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत मूलभूत, चिंतनशील आणि व्यासंगावर आधारित असे काही विचार त्यांनी केले किंवा एक सर्वसमावेशक मांडणी त्यांनी केली असे काही पाहायला मिळालेले नाही. त्यामुळे देशाच्या भविष्याविषयी काही ठोस मांडणी शरद पवार करतील अशी अपेक्षा करणेच फोल आहे.
गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई )