‘तरुणही न इतुके..’ या अग्रलेखाने (लोकसत्ता, ५ मार्च) सामाजिक वर्तुळात वावरणाऱ्या वयस्कर नेत्यांचा आदर राखून एक महत्त्वाचा विषय ऐरणीवर आणला आहे. हा विषय काही परिवर्तनवादी आणि विवेकी चळवळीतल्या लोकांनासुद्धा पचायला जरा अवघडच आहे. म्हणून त्यावर चर्चा होणे आवश्यक. यात उल्लेख केलेल्या आदरणीय नेत्यांच्या पंक्तीत आणखी एका समकालीन नेत्यांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो तो त्यांच्या वेगळय़ा आणि अग्रलेखात मांडलेल्या भूमिकेशी सुसंगत अशा विवेकी विचारांमुळे. ते आदरणीय नेते आहेत शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या १९८९ साली स्थापन झालेल्या संघटनेला योग्य वेळी नवीन, तरुण नेतृत्व मिळावे म्हणून ते २०१० साली संघटनेच्या कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाले आणि संघटनेच्या, त्यांनी स्थापित केलेल्या लोकशाही निवडप्रणालीनुसार निवडल्या गेलेल्या अविनाश पाटील या तरुण नेत्याच्या हाती संघटनेची धुरा दिली. संघटनेचे अध्यक्षपद सोडताना डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी एक लेख लिहून (महा. अंनिसच्या तत्कालीन मुखपत्राचा जुलै २०१०चा अंक) एकच व्यक्ती – हयात असेपर्यंत- संघटनेच्या प्रमुख पदावर राहण्याच्या बाबतीत आपले जे विचार व्यक्त केले आहेत ते हा अग्रलेख वाचून आठवले. त्यात ते लिहितात, ‘..आपल्या समाजाला अशी सवय आहे की, त्यांना संघटनेपेक्षा व्यक्ती लवकर भावते. व्यक्तीच्या नावाने तो संघटना ओळखू लागतो. संघटनेच्या संस्थापकात कर्तृत्व असेल तर त्यांना याचा फायदा मिळतो. कारण संघटनेची पाटी कोरी असते. मग संघटना आणि ती व्यक्ती यांचे एक द्वैत तयार होते. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू,’ अशा मानसिकतेला ‘सरंजामशाही मानसिकता’ असे संबोधून ते पुढे लिहितात, ‘हे योग्य नव्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या चळवळीने ओळखले पाहिजे. या व्यवस्थेतील फायदे संघटनेला मिळत राहातील, असे पाहात त्यातील दोषांवर मात करण्याचे कौशल्य दाखवले पाहिजे. कार्याध्यक्ष बदलून संघटना म्हणून ते आपण दाखविले आहे.’
असे विवेकी विचार आचरणातदेखील आणणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे वेगळेपण अगदी खुलून दिसते. असाच बदल संघटनेच्या ट्रस्टमध्ये करण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. तो ट्रस्ट त्यांच्या कुटुंबीयांच्या नियंत्रणात कसा गेला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. – उत्तम जोगदंड, कल्याण
ग्रामपंचायतीपासून तेच ते..
‘तरुणही न इतुके..’ हा संपादकीय लेख वाचला. पूर्वापारपासूनच राजकारण, विविध संस्था, संघटना आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये मुख्यपदांवर वयोवृद्ध व्यक्तींचीच फेरनेमणूक झालेली आढळते. त्यामुळे तरुणांच्या वैचारिकतेला वा कल्पकतेला हवा तितका वाव मिळताना दिसत नाही. या समस्येपासून सर्वात जास्त प्रभावित झालेले महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे राजकारण. गावाच्या ग्रामपंचायतीपासून ते देशाच्या संसदेपर्यंत महत्त्वाच्या राजकीय पदांवर तरुण व्यक्तिमत्त्व आरूढ झालेले अभावानेच आढळते, हीच जगात सर्वात युवा ठरलेल्या भारतातली रुखरुख आहे. शैक्षणिकदृष्टय़ा प्रगल्भ असलेल्या व आधुनिकतेची जाण असणाऱ्या तरुण नेतृत्वास विविध क्षेत्रांत छाप पाडण्यासाठी संधी मिळणे गरजेचे आहे. – विजय मीराबाई तेजराव नप्ते, चौथा ( जि. बुलढाणा)
नेतृत्व सोडणे अवघडच, ते का?
‘तरुणही न इतुके..’ हा अग्रलेख वाचला. बहुतेक सर्वच – डाव्या, उजव्या विचारांच्या- संघटनांमध्ये हीच समस्या दिसून येते. नेतृत्व सहज वानप्रस्थ स्वीकारत नाही, याची काही प्रमुख कारणे मला खालीलप्रमाणे वाटतात :
(१) सामाजिक काम बंद करावे अशी स्थिती समाजात कधीच निर्माण होत नाही, क्रांती आणि प्रतिक्रांतीचे चक्र सुरूच राहते. अशा वेळी चळवळीत भाग घेताना स्वत: स्वत:ला दिलेल्या वचनापासून मुक्त होता येत नाही.
(२) आयुष्यभर पूर्ण वेळ सामाजिक काम केल्यानंतर अचानक आज ते बंद केले तर उद्या काय करावे याची मानसिक तयारी नसते, भावनिक बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतो. अर्थात या दोन्ही मुद्दय़ांत व्यक्ती नेतृत्व सोडून सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करू शकते.
(३) बहुतेक संघटना विस्तारित दिसत असल्या तरी प्रत्यक्षात एकखांबी तंबू असतात. नेतृत्वाकडे पाहून मदत मिळत असते, अशा वेळी अचानक केलेला नेतृत्वबदल हा संघटनेच्या हिताला मारक ठरेल अशी सार्थ भीती त्यामागे असते.
(४) दुसऱ्या पिढीवर पुरेसा विश्वास नसतो, ती जर सक्षम नसेल तर त्यांच्या क्षमताबांधणीत आपणच कमी पडलेले आहोत, हे स्वीकारता येत नाही.
(५) सामाजिक कामात पैसा मिळत नसला तरी एक ओळख निर्माण झालेली असते. आणि ही ओळख अतिशय सुखावह असते. त्यासाठीच संघटनेत आपले स्थान अबाधित राहील याची काळजी घेऊन त्यासाठी आपल्याला सोईस्कर मंडळींचा कंपू महत्त्वाच्या पदांवर नेमला जातो. असे झाल्यास, समाजकारण करता करता व्यक्ती एखाद्या राजकारण्याप्रमाणे वागू लागतात.
यातून सकारात्मक, विधायक विचारमंथन व्हावे ही अपेक्षा. – डॉ. नितीन हांडे, पुणे</strong>
पुढील पिढीचे नेतृत्व घडविणे महत्त्वाचे
‘तरुणही न इतुके..’ या अग्रलेखातील विचार तात्त्विकदृष्टय़ा योग्य वाटले तरी या विषयाला अनेक कंगोरे आहेत. मुळात एखादी संस्था स्थापन होते ती काही निश्चित अशी ध्येयधोरणे घेऊन. या ध्येयधोरणांना सुसंगत अशी मार्गक्रमणा संस्थेच्या प्रस्थापित नेतृत्वाकडून होत असते. पुढील पिढीकडे नेतृत्व सोपवताना ही पिढी त्या ध्येयधोरणांशी बांधील आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. आज नवीन मंडळींना कार्यकर्ता बनून संस्था समजावून घेण्यापेक्षा पदांवर आरूढ होण्याची घाई असते. प्रसिद्धी हव्यासाच्या या मानसिकतेमुळे आपण कित्येक नामांकित संस्था कालांतराने बंद पडलेल्या पाहातो. ज्येष्ठांचे सतत पदांवर चिकटून राहाणे हे अयोग्यच, परंतु परिवर्तन करताना पुढील पिढीला जाणीवपूर्वक घडवून मग त्यांच्या हाती संस्था देणे हे केव्हाही सयुक्तिक. अशी पिढी मग संस्थेच्या ध्येयांशी प्रामाणिक राहून कालसुसंगत असे बदल ही संस्थेमध्ये घडविते. नेतृत्व घडविणे ही एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण केल्याशिवाय पुढील पिढीकडे संस्था सोपविणे यातून काहीही साध्य होणार नाही. – शैलेंद्र राणे, कळवा (ठाणे)
तीन संदर्भाच्या उजेडात ‘एक राष्ट्र, एक संस्कृती’
‘भारत : एक राष्ट्र, एक संस्कृती’ हा रवींद्र माधव साठे यांचा लेख (‘राष्ट्रभाव’- ४ मार्च) वाचला. त्याला पूर्णपणे छेद देणारे तीन संदर्भ तरी आपण लक्षात घ्यावयास हवेत. लंडन येथे विवेकानंदांनी दिलेली मुलाखत विवेकानंद ग्रंथावलीच्या सातव्या खंडात येते. त्यात त्यांनी सांगितले आहे, ‘‘भारतात विविध मानववंशांचे एक राष्ट्र निर्माण होत आहे. मला कधी कधी असे वाटते की, लोकशाही स्वीकारली जाईल. मूठभर लोकांचे विशेषाधिकार संपतील.’’ याला छेद देत संघ परिवार उभा आहे. संघाचे सर्वात उदारमतवादी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे म्हणणे ‘स्मरणशिल्पे’ या परिवाराने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात आहे त्यांनी सांगितले आहे की, संघाचा फक्त एककलमी कार्यक्रम आहे ‘हिंदूूंचाच हिंदूुस्तान. म्हणजे हे हिंदूुराष्ट्र आहे. म्हणजे भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज आहे आणि एकचालकानुवर्तित्व या गोष्टी आपोआप यात येतात. बाकीच्या सर्व गोष्टी ही आमची चाणक्यनीती आहे, ते आमचे मुखवटे आहेत हे परिवारातील गोविंदाचार्यापासून अनेकांनी सांगितले आहे. तिसरा संदर्भ बलराज मधोकांच्या विधानाचा – ‘‘जनसंघ, भाजप या फक्त संघाच्या शाखा आहेत.’’ – दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा
संमिश्र संस्कृती हीच भारताची ताकद
‘भारत : एक जन, एक राष्ट्र, एक संस्कृती’ (४ मार्च) हा रवींद्र माधव साठे यांचा लेख वाचला. त्यांनी स्पष्टपणे ‘‘संमिश्र संस्कृती आणि संयुक्त राष्ट्रीयता या कल्पनांनी आपले राष्ट्र उभे राहू शकणार नाही’’ तसेच ‘‘येथे अतिप्राचीन संस्कृती व सभ्यता आहे’’ असे प्रतिपादन केले आहे. खरे तर त्यांना हिंदूू संस्कृती असेच म्हणायचे आहे, पण ते का म्हटले नाही, याचे आश्चर्य वाटते. (किंवा ही रणनीती असावी)
‘‘संमिश्र संस्कृतीमुळे कोणतेही राष्ट्र उभे राहू शकले नाही,’’ असे त्यांनी लेखात अन्यत्र म्हटले आहे. जर्मन, फ्रेंच, डॅनिश, स्वीडिश, ब्रिटिश हे अमेरिकेत, तर इंग्रज, फ्रेंच हे कॅनडात आणि झेकोस्लाव्हियात स्लाव्ह व झेक यांना संमिश्र संस्कृतीने राष्ट्र निर्माण करता आली नाही हेही सांगितले आहे. याउलट आपल्याकडे अनेक आक्रमणे होऊनसुद्धा आपण कशी एक संस्कृती निर्माण केली, त्यामुळेच आपण एक राष्ट्र म्हणून आजही टिकून आहोत, असे त्यांचे प्रतिपादन आहे. येथे हे लक्षात घेणे जरुरीचे आहे की, अमेरिकेत आलेले जर्मन, फ्रेंच, डॅनिश, स्वीडिश, ब्रिटिश; कॅनडात असलेले इंग्रज व फ्रेंच तर पूर्वाश्रमीच्या झेकोस्लोव्हाकियात असलेले स्लाव्ह व झेक यांची संस्कृती वेगळी असली तरी धर्म ख्रिश्चन हा एकच होता व आहे. त्यामुळे एकधर्मीय असले तरी त्यांचे राष्ट्र एक नाही. सध्या सुरू असलेल्या रशियन व युक्रेन युद्धातसुद्धा राष्ट्रे वेगळी आहेत, पण धर्म एकच आहे. अरब जगतात व सर्व इस्लामी राष्ट्रांत हेच दिसते, राष्ट्रे वेगळी, पण धर्म एकच आहे.
यावरून आपल्या संपन्न संस्कृतीत हिंदू, बौद्ध, जैन, शीख, लिंगायत व द्रविड संस्कृतीसह अन्य राष्ट्रातून आलेल्या ख्रिश्चन व मुस्लिमांनी येथील संस्कृतीत भरच घातली. (हेही खरे की त्यांनी राज्य केले, अत्याचारही केले.) वास्तविक सर्वच जेत्यांनी युद्ध जिंकल्यावर अत्याचार केले, अपवाद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.
यातूनच एक संपन्न संमिश्र भारतीय संस्कृती विकसित झाली म्हणून हे राष्ट्र अधिक मजबूत आहे व टिकून आहे. याच्याशी धर्माचा काही संबंध नाही. तेव्हा एक धर्माचे राष्ट्र निर्माण करण्याचा अजेंडा ही राष्ट्रीय एकात्मतेला छेद देणारी बाब असेल. त्या अर्थाने साठे यांचे प्रतिपादन गैर व चुकीचे आहे. – संजीव साने, ठाणे</strong>
loksatta@expressindia.com
