‘स्त्रीवादी पुरुष’ या संपादकीयात (१३ डिसेंबर) जर्मनीतील मंत्रिमंडळात सर्वाधिक महिला मंत्री असल्याचे नमूद केले आहे. यावरून जर्मन सरकारचा महिलाशक्तीवर सार्थ विश्वास आहे असे वाटते. तसे पाहू गेल्यास भारतात आजमितीस एक हजार पुरुषांमागे १०२० स्त्रिया असे प्रमाण आहे (संदर्भ – नॅशनल फॅमिली हेल्थ सव्र्हे – डेटा – २७ नोव्हेंबर २०२१) असे असताना स्त्रियांसाठी केवळ ३० टक्के आरक्षण (तेसुद्धा धड मिळत नाही) हे अन्यायकारक वाटते. मुळात स्त्री आपले कुटुंब बांधून ठेवण्यात पुरुषांपेक्षा अधिक पटीने सरस ठरते. तर देशविकास व देशास एकसंध राखण्यास तिचा तेवढाच सहभाग असावा असे वाटते. भारतीय स्त्रिया आणि त्यांचा कणखरपणा आपल्याला इतिहासातून परिचित आहेच. आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या आस्थापनांत (शासकीय व खासगी) स्त्रीचा ५० टक्के म्हणजे निम्मा सहभाग असावा असे मनापासून वाटते. भारतीय पुरुषही ‘स्त्रीवादी’ झाला तर देशात अनेक बाबतीत चांगला बदल होण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही.. – विद्या पवार, मुंबई
भारतातही संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व वाढावे!
‘स्त्रीवादी पुरुष!’ हा अग्रलेख वाचताना शोल्झ यांच्या सरकारमधील महिलांच्या समावेशाने आणि संख्येने लक्ष वेधून घेतले. या सरकारमध्ये ५९८ जागांपैकी एकतृतीयांशपेक्षा जास्त महिला (३५ टक्के) आहेत. ही बाब त्या देशातील महिलांविषयी कायदेनिर्मिती व इतर सर्वच बाबींसाठी आनंदाची आहे. भारतीय संसदेचा विचार करता १७ व्या लोकसभेत भारतीय संसदेत ५४३ पैकी ८१ महिला (१५ टक्के)आहेत. त्यामुळे भारतीय संसदेत कायदानिर्मिती करताना महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज आहे व या गरजेच्या पूर्ततेसाठी स्त्रीवादी पुरुषाचीदेखील आवश्यकता भासते. – शुभम निवृत्तीनाथ दराडे, चापडगांव (ता. निफाड, जि. नाशिक)
…वर्णस्वातंत्र्य होतेच, ते हिरावून घेतले गेले
‘शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष रिझनी हिंदू धर्मात धर्मांतरित झाले’ ही बातमी आल्यानंतर त्यावर ‘लोकमानस’मध्ये आलेल्या ‘आता त्यांना कुठल्या जातीत घालणार’ (७ डिसेंबर) व ‘वैदिक काळात जाती नव्हत्या’ (११ डिसेंबर) या प्रतिक्रिया वाचल्या. एका पत्रात या प्रश्नाचे फारच सोपे उत्तर दिले आहे, जे होऊ शकणारे नाही. हिंदू धर्म/जीवनपद्धती ही वर्णांनी व जातींनी ओळखली जाते. हिंदू असलेली/झालेली व्यक्ती जोपर्यंत तिचा वर्ण व जात सांगत नाही, तोपर्यंत इतर हिंदू त्या व्यक्तीस ऊठबस, रोटीबेटी व्यवहारासाठी स्वीकारत नाहीत हे कटू वास्तव आहे.
आक्रमक धर्मप्रसार नसल्याने हिंदू धर्म दुरून सहिष्णू वाटत असला, तरी प्रत्यक्षात तो अत्यंत बंदिस्त, अपरिवर्तनीय व जाचक व्यवस्था असलेला धर्म आहे. डॉ. आंबेडकरांनी या धर्माचे वर्णन ‘जिने नसलेली बहुमजली इमारत’ असा म्हणूनच केला आहे. हिंदूंमधली जाचकता जन्माधारित वर्ण व जातींमुळे येते. व्यक्तीचा वर्ण व जात तिच्या या जन्मातल्या गुण-कर्मांवरून ठरत नसून मागील जन्मातल्या गुण-कर्मांमुळे या जन्मात मिळालेल्या आई-वडिलांच्या वर्ण-जातीवरून ठरते व ती या जन्मात आयुष्यभर कायम राहाते, असे हिंदू धर्मपंडित मानतात. हा हिंदू व्यक्तींवरील शतकानुशतके झालेला सर्वात मोठा सामाजिक अन्याय आहे.
‘चातुर्वण्र्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:….’ हा गीतेतील चवथ्या अध्यायात १३ वा श्लोक वस्तुत: व्यक्तीच्या या जन्मातील गुण-कर्माप्रमाणे त्याचा वर्ण दर्शवतो. तसेच तो व्यक्तीच्या जीवनकालातील विविध टप्प्यांवरील बदलत्या गुण-कर्मांप्रमाणे व्यक्तीचे बदलते वर्णही दर्शवतो. अर्थात, हा श्लोक हिंदू व्यक्तीला तिच्या चालू जन्मात पूर्ण व बदलते वर्णस्वातंत्र्य देतो. जातींची विभागणी वर्णांमध्येच असल्याने हे जातींनाही लागू होते. मात्र, मनुष्यस्वभाव स्वार्थी असल्याने धर्मपंडितांनी शतकानुशतके या श्लोकाचा अर्थ व्यक्तीच्या मागील जन्मातील गुण-कर्माशी जोडून व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, हे आता २१ व्या शतकात तरी मान्य व्हावे. हे झाले तरच, हिंदू धर्मात होणारी धर्मांतरे सुकर होऊन व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करतील. – सुधन्वा घारपुरे, पुणे</strong>
‘हिंदू’ आणि ‘हिंदुत्व’ या शब्दांचे गारूड
‘आपण हिंदुत्ववादी नसून हिंदू असल्याचे राहुल गांधी यांनी पक्षाच्या महारॅलीत ठणकावून सांगितले. वास्तविक ‘हिंदू’ या शब्दाइतका माणसाला गोंधळवून टाकणारा दुसरा शब्द नाही. हिंदू हा धर्म नसून ती संस्कृती असल्याचे काही राजकीय, धार्मिक आणि काही संघटनांचे नेते अनेक वेळा अधिकारवाणीने सांगत असतानाच, वेळप्रसंगी, धार्मिक भावना दुखावल्यामुळे आंदोलनेही उभी करताना दिसतात. विशेष म्हणजे धार्मिक भावना दुखावण्याला कारणीभूत ठरवून एखाद्या व्यक्तीविरोधात न्यायालयात खटलाही उभा राहू शकतो. न्यायव्यवस्था जर हिंदूंच्या ‘सांस्कृतिक भावनां’ऐवजी ‘धार्मिक भावना’ दुखावणे या सदराखाली दावा दाखल करून घेत असेल तर हिंदू हे एका संस्कृतीचे नाव म्हणून कसे संमत होईल? सर्वसाधारणपणे रोजचे जीवन सुलभरीत्या जगण्यासाठी, त्या त्या प्रादेशिक भागातील भूरचना आणि हवामानाशी जुळवून घेण्याच्या रीतिरिवाजाला संस्कृती असे म्हणता येईल. काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत नांदत असलेल्या विविध संस्कृतींत कालानुरूप होत गेलेल्या बदलांमुळे कोणत्याही संस्कृतीचे मूळ रूप आज अस्तित्वात नाही. तरीसुद्धा हिंदू ही आमची संस्कृती म्हणून मिरवायचे असेल तर आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचे कारणच उरत नाही. आणि मग ‘आम्ही हिंदू आहोत’ याचा सोपा अर्थ असा होतो की आम्ही हिंदुस्तान या देशाचे रहिवासी आहोत. म्हणजेच आम्ही भारतीय आहोत. याचाच दुसरा अर्थ असा होतो की जो जो भारतात राहतो तो तो सर्वप्रथम भारतीय आहे. भारताशी एकनिष्ठ राहणे आणि भारताबद्दलच्या भावना तीव्र असणे ही त्यासाठी एकमेव अट असावी. आमचा देश सुरक्षित राखायचा असेल तर ज्याने त्याने आपापला धर्म आणि धर्मकांडे आपापल्या घरापुरतीच मर्यादित ठेवायला हवीत. घराबाहेर प्रत्येक व्यक्ती भारतीय असल्याच्या अंतर्भावनेने वावरली तर भारताइतका सुरक्षित दुसरा देश नसेल. – शरद बापट, पुणे
या प्रकारात कुंपणच शेत खात नाहीये ना?
‘म्हाडा भरती परीक्षेत गैरप्रकार’ व ‘पेपरफुटीचे राज्य’ हे (१३ डिसेंबर) वृत्त तसेच स्फुट वाचले. अलीकडेच पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत झालेला गैरप्रकार उघडकीस येत असताना, म्हाडाच्या पेपरफुटीचा नवा वाद समोर आला आहे. आरोग्य भरतीचा पेपरही विद्यार्थी परीक्षा केंद्रस्थानी पोहोचल्यावर रद्द केला होता. आणि आता म्हाडाच्या पेपरमध्येही तीच पुनरावृत्ती झाली आहे. गृहनिर्माणमंत्री म्हणतात की, नव्याने होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, पण विद्यार्थ्यांना होणारा प्रवास खर्च व मानसिक त्रास कसा भरून निघेल? एखाद्या खासगी कंपनीला परीक्षेचे कंत्राट देण्याअगोदर त्या कंपनीची कार्यक्षमता व तिचा इतिहास काय आहे याबाबत चौकशी न करताच कंत्राट का दिले जात असेल? इथे कुंपणच शेत खात नाहीये ना? – रवींद्र भोसले, सिद्धटेक, जिल्हा- अहमदनगर</strong>
सर्वंकष सक्षमतेसाठी १० लाखांची मर्यादा हवी!
केंद्र सरकारने बँकांतील ठेवविमा आणि पतहमी मंडळ कायद्यात केलेल्या दुरुस्तीसंबंधात संबोधित करताना पंतप्रधानांनी ठेवीदारांना बँकेत पाच लाखांपर्यंत सुरक्षितता मिळेल असे सांगितले. त्याबरोबरच बँकांनाही तेवढे आश्वासक भांडवल उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक स्थिती बळकट होणार असल्याचे प्रतिपादन केले. पण आता सुधारलेले आर्थिक राहणीमान (करोनाकाळातील धक्का वगळता) पाहू जाता पाच लाख ही ठेवविमा मर्यादा कालबाह्य झाल्याने ती दहा लाखांपर्यंत वाढविल्यास ठेव गुंतवणूकदार, विशेषत: निवृत्तोत्तर पुंजीधारक ज्येष्ठ भविष्यातील वैद्यकीय खर्चाच्या दृष्टीने अधिक सुरक्षिततेस्तव निर्भयपणे, योग्य बँक निवडत दहा लाखांपर्यंत रक्कम ठेवीत गुंतवतील; ओघाने त्यांचे पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम अन्य बँकांत गुंतवण्याचे सव्यापसव्यय टळतील. शिवाय बँकांनाही प्रत्येक ठेव गुंतवणूकदारांकडून दहा लाखांपर्यंतचे आश्वासक आर्थिक भांडवल उपलब्ध होऊन त्या अधिकाधिक सक्षम होतील. – किरण प्र. चौधरी, वसई
‘प्रतिमांकना’नंतर आता या शब्दांनाही द्या प्रतिशब्द
‘पंतप्रधान मोदी यांचे ट्विटर खाते हॅक’ या वृत्तात (१३ डिसेंबर) ‘स्क्रीनशॉट’ या इंग्रजी शब्दाला ‘प्रतिमांकन’ असा अतिशय सुरेख मराठी प्रतिशब्द ‘लोकसत्ता’ने योजला आहे. तसाच मराठी प्रतिशब्द ‘हॅक’ या शब्दाला वापरला असता तर आणखीनच समाधान वाटले असते. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मौखिक वा लिखित मराठी भाषेत इंग्रजी शब्दांचा भडिमार केला जात आहे. हे थांबले नाही तर आणखी काही वर्षांनी ‘मिंग्लिश’ (मराठी + इंग्लिश) भाषा सर्व मराठीजनांना ऐकावयास व वाचावयास मिळेल. इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देण्यात दैनिक ‘लोकसत्ता’ची भूमिका सातत्याने आग्रही व सकारात्मक राहिली आहे. खरे तर याकामी दरवर्षी भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चर्चा होऊन त्या त्या वर्षांत आलेल्या इंग्रजी वा इतर भाषांतील शब्दांना मराठी प्रतिशब्द देण्याबाबत पुढाकार घेतला जायला हवा होता. काही जण या शब्दांमुळे आपली मराठी भाषा अधिक समृद्ध होत आहे असे कोडगे समर्थनही करत आहेत.
सध्या संभाषणात वा लेखनात क्लिक, हॅक, सायबर, डिजिटल, सेल्फी, ऑनलाइन, ऑफलाइन, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, ई-मेल आयडी, हँग, अॅप, सर्व्हर, डाऊनलोड, अपलोड, वेबसीरिज यांसारखे इंग्रजी शब्द वापरले जात आहेत. या शब्दांचे मराठी प्रतिशब्द फारसे प्रचलित नाहीत. मराठी अभ्यासकांनी व सारस्वतांनी या शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषा शुद्धीकरणाची मोहीम हाती घ्यावी. सुमारे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनीही फार्सी, अरबी या भाषांचे मराठीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी मराठी (प्राकृत) भाषेच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली होती. – टिळक उमाजी खाडे, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड</strong>
loksatta@expressindia.com