‘नास्तिकांची नालस्ती’ हे ‘शनिवारचे संपादकीय’ (१६ एप्रिल) वाचले. नास्तिक मेळाव्यातील एक आयोजक या नात्याने मी एक बाब स्पष्ट करू इच्छितो की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरील गदा आणि वक्त्यांच्या भाषणाची लिखित प्रत ही अट आम्ही मान्य करत नाही. मेळावा रद्द होण्याच्या अनुषंगाने सर्व प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही हा मुद्दा अधोरेखित केला होताच. मेळाव्यासंदर्भात चर्चा करायला जेव्हा आम्हाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, त्या दिवशी आम्ही पोलिसांकडून लिखित उत्तराचा आग्रह धरला होता. हिंदूत्ववाद्यांचा विरोध हे कारण उघडपणे देणे पोलीस प्रशासनास बहुधा अडचणीचे वाटत असल्यामुळे त्यांनी हा मुद्दा पुढे केला. मात्र ‘बुडत्याचा पाय खोलात’ या उक्तीप्रमाणे या मुद्दय़ासाठी पोलिसांना मोठय़ा टीकेला सामोरे जावे लागले आहे.
मेळावा लवकरच पुन्हा घेण्यात येईल, या वेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा मुद्दा त्यात चर्चेला घेण्यात येईल.
– डॉ. नितीन हांडे, पुणे
नालस्ती व्यवस्थेचीच झाली!
‘नास्तिकांची नालस्ती’ या अग्रलेखात (१६ एप्रिल) तपशील दिला नाही म्हणून नास्तिक मेळावा पुढे ढकलला तरीही त्यातील एक मुख्य वक्त्या मुग्धा कर्णिक यांचे भाषण त्याच दिवशी ‘यूटय़ूब’वर प्रसारित झाले, ते मोठय़ा प्रमाणात फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचले. त्यावर पोलिसांनी आक्षेप किंवा काही कारवाई केल्याचे अद्याप ऐकिवात नाही. त्या भाषणात कर्णिक यांनी मुक्तपणे विचार मांडले, नास्तिक चळवळीच्या मर्यादा अधोरेखित केल्या आणि बंदी घालणाऱ्या व्यवस्थेवरही कोरडे ओढले आहेत.
बंदीवर मुत्सद्दीपणे बुद्धीचा वापर करून केलेली मात, असे याचे वर्णन करता येईल. आजच्या परिप्रेक्ष्यात अशा प्रयत्नांचे महत्त्व कमी नाही. त्यामुळे मेळावा प्रत्यक्षात झाला नाही यात नालस्ती नास्तिकांची नसून व्यवस्थेचीच झाली.
– सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)
दुखावणाऱ्या भावना ‘धार्मिक’ कशा?
नास्तिक संमेलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली, ती म्हणे कुणाच्या तरी धार्मिक भावना दुखावतील म्हणून!
धार्मिक भावना आपल्याला केवळ सशक्तच करणारी नसते, तर ती आपल्याला ‘सुखावणे – दुखावणे’ यांच्या पलीकडे नेणारी असते. जर ‘आपली धार्मिक भावना दुखावली,’ असे आपल्याला जाणवत असेल तर निखालस ती धार्मिक भावना नाही, कुठली तरी तिसरीच भावना आहे, जी आपल्या विवेकाला आणि परस्परविश्वासाला सतत दुबळे ठेवत आहे.
नास्तिक असण्यापेक्षा अश्रद्ध असणे जास्त गंभीर आहे. नास्तिकाचा देवावर विश्वास नसतो, पण माणुसकी, आनंद, एकोपा, प्रेम, शेजारधर्म इत्यादी मानवी गुणांवर त्याची श्रद्धाही असू शकते. ज्यांचा या कशावरच विश्वास नसतो, त्यांना खुशाल ‘अश्रद्ध’ समजावे. (कदाचित हे अश्रद्ध अकल्पितपणे आपले श्रद्धास्थानही निघू शकतात.)
– अभिजीत भाटलेकर, मुंबई
नास्तिकतेच्या प्रचाराने समाजस्वास्थ्य बिघडेल
कायदा सुव्यवस्था राखणे पोलिसांचे काम आहे. तेव्हा नास्तिकांचे मुद्दाम रामनवमीला सभा घेणे खिजविण्यासाठी आहे हा युक्तिवाद पाहाता त्यांनी पुढील आपत्ती टाळण्यासाठी पावले उचलणे स्वाभाविक वाटते. ‘नास्तिकांची नालस्ती’ या अग्रलेखातून यात बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्य असा गुह्यर्थ (?) काढण्याची गरज नव्हती.
ईश्वरशरण असण्याने अहंकार काबूत राहण्यास मदत होते, पण त्यासाठी पूजापाठ देऊळ वा इतर कर्मकांडांचा आग्रह कशासाठी असा तर्क सयुक्तिक ठरतो त्याचप्रमाणे ईश्वराचे अस्तित्व नाकारण्याचे स्वातंत्र्य घेणाऱ्यांनी हा मुद्दा प्रचाराचा करणे समाजस्वास्थ्य बिघडण्याची ठिणगी असू शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ‘यद्यपि शुद्धम, लोकविरुद्धम । न च करणीयम नाचरणीयम’ हा संकेत पाळला तर गोष्टी सोप्या होतील. ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे पसायदान मागतात आणि हरिपाठात ‘अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथोनी चराचर हरिसी भजे’ असेही म्हणतात. आस्तिक नास्तिक सारी ईश्वराची लेकरे, असेच म्हणावे लागेल
– श्रीकृष्ण फडणीस, दादर (मुंबई)
पुन्हा १८ व्या शतकाकडे चाललो आहोत..
‘नास्तिकांची नालस्ती’ (१६ एप्रिल) हा अग्रलेख वाचला. कुणी काय खावे, काय परिधान करावे हे स्वत:हून ठरवणाऱ्या अधिकृत टोळय़ा निर्माण झाल्या आहेत आणि त्यांना राजाश्रय मिळतो, हे अधिक धक्कादायक आहे. शासकीय शाळांच्या अवस्था आणि मंदिराचा झगमगाट या दोन गोष्टी तुलना करून पाहिल्या म्हणजे आपण कुठे चाललो आहोत हे समजते.
घटनेनुसार प्रत्येकाला त्याचं आस्तिक्य आणि नास्तिक्य जपण्याचा अधिकार आहे. असे असताना कुठली तरी एक राजकीय टोळी पोलिसांवर दबाव आणते आणि कुणाच्या फारसे नजरेत नसणारे संमेलन हाणून पाडते. आपण किती वेगाने पुन्हा अठराव्या शतकाकडे चाललो आहोत, हे पाहून मन विषण्ण होते.
व्यासपीठावर पदोपदी शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव घेण्याचं नाटक करणारे प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा खून करतात. तुमचा भोंगा, आमचा चालीसा, त्यांचे घंटानाद हे असं सतत जनतेसमोर येत राहील आणि मुळात देशाचे ज्वलंत प्रश्न एखाद्या मंदिराच्या पायरीवर प्राण सोडतील. त्याचाही तमाशा केला जाईल, इतकी ही यंत्रणा भयंकर आहे.
– संजय जाधव, देवपूर (धुळे)
उपविधि वगैरे सर्व ठीक; वस्तुस्थिती काय?
सहकारी गृहनिर्माण संस्थामधील घर/सदनिका विक्री आणि त्यासाठी संबंधित संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र या विषयावर सध्या साधकबाधक चर्चा सुरू आहे. त्याची दखल घेणारे ‘घरविक्रीसाठी एनओसी लागतेच’ हे निशांत सरवणकर लिखित ‘विश्लेषण’ (१६ एप्रिल) वाचले. सहकारी गृहनिर्माण संस्थेशी संबंधित चर्चा होते तेव्हा हमखास सहकारी संस्थांसाठी लागू असलेल्या ‘उपविधि’ (बाय-लॉज) या मुद्दय़ावर भर दिलेला पाहायला मिळतो, पण वस्तुस्थिती काय आहे? गृहनिर्माण संस्थांचे कामकाज खरोखरच या उपविधिला अनुसरूनच चालवले जाते काय? आणि ज्या ठिकाणी तसे ते चालवले जात नसेल तर त्याविरुद्ध तक्रार करणाऱ्याला शासनाकडून कितपत साहाय्य मिळते, हा मात्र संशोधनाचा विषय ठरू शकेल! लागू असलेले उपविधि वगैरे सगळे ठीक आहे, पण वास्तवात ते प्रभावीपणे राबविले जातात का? आणि जाऊ शकतात का? हा प्रश्नच आहे.
– मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)
बालहट्टाला बालिश प्रतिसाद काय कामाचा?
पी. चिदम्बरम यांचा ‘द्वेषपूर्ण भाषणे व सजग मौन’ हा लेख (समोरच्या बाकावरून – १७ एप्रिल) वाचला. सध्या हिंदू-मुसलमानांत तेढ वाढवण्याचे प्रकार हे राजकारणच आहे व ते देशाला घातक ठरणारे राजकारण आहे, हे म्हणणे पटले. पण चिथावणीखोरांना खतपाणी घालण्यास मुस्लिमांचे वर्तनही कारणीभूत ठरते. उदा.- योग्य परवानगी घेऊन सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या मिरवणुकीत वाद्ये वाजवली व रामाचा जयजयकार झाला तर यांना राग येण्यासारखे काय आहे? मशिदीत येऊन कोणी धांगडिधगा घातला तर गोष्ट वेगळी. पण हिंदूंच्या बालहट्टाला तेवढय़ाच बालिशपणे प्रतिसाद देणे हे मुस्लिमांनाही घातकच ठरणार आहे.
इस्लामी धर्म हा फक्त दीड हजार वर्षे जुना आहे. रामाच्या काळात मुसलमान नव्हते. मग सर्वच भारतीयांना राम आपला एक महान पूर्वज होता (देव मानू नका नसेल मानायचा तर) व त्याचा जयजयकार केला तर त्यात वावगे वाटायचे काय कारण आहे? मुसलमान इथलेच आहेत व त्यांना इथेच राहायचे आहे. पण विनाकारण संघर्षांचा मार्ग पत्करून ते स्वत:चेही नुकसान करून घेत आहेत. चिदम्बरम म्हणतात तशी अजान ही नवी प्रथा नाही. पण मशीद परिसरात काही फक्त मुसलमान राहात नाहीत, त्यामुळे आडवेळी तरी बिगरमुस्लीम समाजाला त्यांच्या प्रथांमुळे जाच होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, हे सांगण्यात काय गैर आहे? इतर भारतीय नागरिकांप्रमाणेच त्यांनीही शिक्षण, विकास, सामाजिक न्याय यांवर लक्ष केंद्रित करावे व निर्लज्ज राजकारण्यांच्या हातातले बाहुले बनू नये.
– डॉ. विराग गोखले, भांडुप पूर्व (मुंबई)
परिणामकारक मतप्रदर्शन योग्य वेळी घडतेच
‘दमन आणि प्रलोभन दोन्हीचा धोका’ हे पत्र (लोकमानस – १७ एप्रिल) वाचले अन् आम्ही विद्यार्थिदशेत असतानाची १९७५ ची दमनकारी शासन व्यवस्था व आणीबाणी आठवली, त्याआधीचा रेल्वेचा संपही आठवला आणि त्यामुळे व अन्य कारणाने अस्थिर झालेल्या पुणे विद्यापीठाच्या बी.कॉम.च्या परीक्षासुद्धा स्मरणात आल्या. अंमळ स्मरणरंजनाचे तरंगही उठले. पण लगेच जयप्रकाश नारायण यांची चळवळ, समग्र क्रांतीच्या घोषणा, चळवळीतील सहभाग, सत्याग्रह, आंदोलने व नंतर लोकशाहीचा खरा परिणाम दर्शविणारे निवडणूक निकालही नजरेसमोर आले. निरक्षर भारतीय जनता मतपेटीतून आपली ताकद योग्य वेळी दाखवते हे पुन्हा जाणवले. म्हणूनच पत्रलेखकाने जुन्या जाणकारांनी उद्धृत केलेली विधाने कदाचित तात्त्विक दृष्टीने योग्य असली तरी, काळजीचे कारण नाही असा ठाम विश्वास वाटला. कारण देशातील जनता मतपेटीतून सशक्तपणे आपले सामूहिक पण परिणामकारक मतप्रदर्शन योग्य वेळी करते असा इतिहास आहे आणि म्हणूनच आपले प्रजासत्ताक प्रबुद्ध आहे असेही वाटते!
– अनिल राव, जळगाव