‘मोजमाप गंड!’ हा अग्रलेख (१८ एप्रिल) वाचला. कुठल्याही कार्याचे स्वच्छ व पारदर्शक मोजमाप हे कार्योत्तर परिणामांचे आकलन होण्यासाठी व त्यायोगे जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक असते, मात्र त्यामुळे आपल्या व्यवस्थेतील त्रुटी, मर्यादा व आपली अकार्यक्षमता उघड होण्याची आणि त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागण्याची भीती असते. परिणामी वास्तवदर्शक मोजमाप हे स्वत:हून ओढवून घेतलेले संकट ठरते. मोजमाप, मग ते लोकशाही प्रणालीचे असो, जीडीपीवृद्धीचे, बेरोजगारीचे, आरोग्य व्यवस्थेचे वा महागाईचे, त्याच्या परिणामांमुळे व त्याअंती निश्चित होणाऱ्या जबाबदारीमुळे आपल्याला त्याचे नेहमीच वावडे असते. आपले ब्रीदवाक्य जरी ‘सत्यमेव जयते’ असले, तरी आपण व्यवहारात सत्यापासून फार दूर असतो. राजकीय परिणामांच्या भीतीने दिल्या जाणाऱ्या असत्य माहितीमुळे आपल्याला सत्याचे भान लवकर येत नाही. आपली सत्य शोधण्याची क्षमताच हरवत चालली आहे. त्यामुळे लोकशाही कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो. आपण मोजमापाचा गंड सोडून देऊन जितक्या लवकर सत्याचा सामना करू तितक्या लवकर आपल्याला वास्तवाचे भान येईल व समस्यांना भिडण्यासाठी आवश्यक सामथ्र्य मिळेल. विश्वगुरू होण्यासाठी सर्वप्रथम सशक्त समाज व व्यवस्थेची निर्मिती आवश्यक आहे व त्याचा मार्ग स्वच्छ व पारदर्शक मोजमापांतूनच जातो.
– हेमंत सदानंद पाटील, नाळे (नालासोपारा)
प्रशिक्षित अतिरेक्यांना पकडू शकतात; पण..
‘उन्मादाच्या राजकारणाचे धनी कोण?’ हा लेख (१८ एप्रिल) वाचला. या प्रश्नाकडे राजकारणात स्वारस्य नसलेल्या सामान्यांच्या नजरेतूनही पाहणे अत्यावश्यक आहे. केवळ एकांगी विचार केल्यास प्रश्नाच्या इतर बाजू दुर्लक्षित राहण्याची भीती असते. हिंदू- मुस्लीम संघर्ष पेटता ठेवून त्यावर राजकीय पोळय़ा भाजून घेण्याची वृत्ती आपण नेहमीच पाहात आलो आहोत. त्यामुळे राजकीय चौकटीबाहेर जाऊन या प्रश्नाचा विचार केला पाहिजे.
समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांवर, कुरापती काढणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. धार्मिक मिरवणुकांचे चित्रीकरण करण्यात यावे, त्यासाठी ड्रोनचाही उपयोग करता येईल. महागाई, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न कसे सोडवता येतील, यावर मंथन होणे आवश्यक आहे. त्यासाठी समाज म्हणून एकमेकांना साहाय्य कसे करता येईल, यावर विचार करण्याऐवजी भलत्याच मुद्दय़ांवर वाद सुरू आहेत. धार्मिक मिरवणुकांवरील हल्ल्यांमध्ये झालेल्या जीवित आणि वित्तहानीची दृश्ये समाजमाध्यमांवरून वेगाने प्रसारित होतात. त्यातून भीषण वास्तव समोर येते. हे हल्ले होण्यापूर्वीच रोखले पाहिजेत. समाजात अशांतता निर्माण करू पाहणाऱ्यांवर पोलीस आणि कायद्याचा वचक असणे आवश्यक आहे. घातपात घडवण्याच्या तयारीत असलेल्या अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. मात्र धार्मिक मिरवणुकांवर हल्ले करण्याच्या सिद्धतेत असलेल्यांना आधीच पायबंद का घातला जात नाही? हिंसक घटना घडण्यापूर्वी त्यांचा सुगावा सुरक्षा यंत्रणांना का लागत नाही? जी यंत्रणा प्रशिक्षित अतिरेक्यांना पकडू शकते ती अशा वेळी अपयशी का ठरते, हा चिंतनाचा विषय आहे.
– जयेश राणे, भांडुप (मुंबई)
हिंदूंचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न
दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आठ जणांना अटक झाली. चौकशीअंती ते भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची जामिनावर सुटका झाली. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता महाशयांनी पक्षकार्यालयात हल्लेखोरांचा सत्कार केला. फार मोठी देशसेवा किंवा पक्षसेवा केली असावी, अशा आविर्भावात हा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीच्या घरावर हल्ला करणाऱ्यांचा सत्कार केला जातो, याचा सरळ अर्थ हल्ल्याची सुपारी भाजपने दिली होती, असा निघतो. दिल्लीची पोलीस यंत्रणा केंद्र सरकारच्या म्हणजेच भाजपच्या अखत्यारीत आहे. म्हणजे भाजप फक्त मुस्लीमधर्मीयांनाच शत्रू मानत नाही, तर इतर पक्षांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि कार्यकर्तेसुद्धा त्यांच्या लेखी शत्रू आहेत. दिल्ली पोलिसांनी गुप्ता यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
इकडे महाराष्ट्रात देशाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर जमाव चालून जातो. शरद पवार केंद्रात १२ वर्षे मंत्री होते. लोकसभेत विरोधी पक्षनेता, राज्यात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले आहे. केंद्र सरकारची सुरक्षा असताना त्यांच्यावर हल्ला झाला, मात्र केंद्र सरकारला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. राज्यातील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री अथवा राज्यपालांना निवेदन देऊन हल्ला करणाऱ्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी केली नाही. ऊठसूठ राज्यपालांना भेटणारी मंडळी मूग गिळून गप्प बसली.
देशात आणि राज्यात अतिशय किळसवाणे राजकारण होत आहे. मुस्लीमधर्मीयांचा आवाज दाबण्याच्या नावाखाली भाजपची विचारसरणी मान्य नसलेल्या इतर हिंदूंचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणीबाणीविरोधात गळा काढणारे आज काय करत आहेत?
– डॉ. हिरालाल खैरनार, खारघर (नवी मुंबई)
अहंकार आस्तिकांचा आणि नास्तिकांचा
‘नास्तिकतेच्या प्रचाराने समाजस्वास्थ्य बिघडेल’ या पत्रात (लोकमानस- १८ एप्रिल ) म्हटल्याप्रमाणे ‘ईश्वरशरण असण्याने अहंकार काबूत राहाण्यास मदत होते,’ हे विधान मान्य केल्यास नास्तिक मंडळी अहंकारी असतात असा निष्कर्ष निघतो.
पण प्रत्यक्षात याउलट चित्र आहे. अहंकाराचा उन्माद आस्तिकांच्या बाजूनेच उसळलेला दिसतो. अहंकाराला नियंत्रणात ठेवण्यासाठी एका काल्पनिक ईश्वराला वेठीस धरण्याची गरज आस्तिकांनाच भासते. स्वत:च्या विचारशक्तीवर विश्वास नसतो त्यांनी आजूबाजूला दिसणाऱ्या जिवंत जाणत्या जनांना शरण जावे. मुळात अत्यल्पसंख्य असलेले नास्तिक या मुद्दय़ावर मेळावा आयोजित करून चर्चा-विचारविनिमय या मार्गाचा अवलंब करतात, हे लक्षात घ्यावे.
– प्रमोद तावडे, डोंबिवली
नास्तिक कोण?
१० नोव्हेंबर १८९६ रोजी लंडन येथे ‘वेदान्त आणि जीवन’ या विषयावरील भाषणात विवेकानंदांनी सांगितले ‘वेदान्त माणसाला प्रथम स्वत:वर विश्वास ठेवावयास शिकवितो. जगातील काही धर्माच्या मते स्वत:हून भिन्न अशा सगुण ईश्वरावर विश्वास न ठेवणारे लोक नास्तिक होत- वेदान्ताच्या मते नास्तिक तो, ज्याचा स्वत:वर विश्वास नाही. जो स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी नवनवे आधार शोधत असतो!’
– दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा
हिंदूत्व, हिंदूवाद यांतील फरक..
रवींद्र माधव साठे यांचा ‘भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती!’ (१५ एप्रिल) हा लेख वाचला. संपूर्ण लेख वाचून झाल्यानंतरही लेखाचे प्रयोजन लक्षात येत नाही. ‘हिंदू’, ‘हिंदूत्व’ या दोन संज्ञांचा उल्लेख लेखामध्ये सातत्याने आला आहे. त्या अनुषंगाने, वाचकाला स्पष्टता यावी यासाठी ‘हिंदू’, ‘हिंदूवाद’, ‘हिंदू धर्म’, ‘हिंदूत्व’ याबाबत स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटते. या संज्ञा-संकल्पनांबाबत आणि काळानुसार या संकल्पनांचा अर्थ कसा लावायचा याबद्दलही संशोधनाधारित ऊहापोह झाला आहे. रवींद्र साठेंच्या लेखामध्ये विवेकानंद, सावरकर, महात्मा गांधी यांचे उल्लेख आले आहेत. काळाच्या विशिष्ट चौकटीत या विचारवंतांनी हिंदू, हिंदूवाद, हिंदू धर्म, हिंदूत्व या संज्ञा कशा वापरल्या हे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आणून दिले पाहिजे.
हिंदू – म्हणजे हिंदूस्थानात वास्तव्य आहे अशी व्यक्ती. ही संज्ञा सांस्कृतिक अधिक असून त्याला भौगोलिक अर्थछटा आहे.
हिंदूवाद – विवेकानंदांनी हिंदूंना ‘उठा, जागे व्हा, संघटित व्हा’ असे आवाहन करताना, हिंदू हा सुसंघटित, संरचित धर्म (रिलिजन) नसल्याने त्यासाठी ‘हिंदूवाद’ ही संज्ञा वापरली.
हिंदू धर्म – पुढे महात्मा गांधींनी एकूणच राजकारणाच्या सोयीने त्याला ‘धर्म’ असे रूप देऊ केले.
हिंदूत्व – ही संज्ञा सावरकरांनी पुढे अस्मितेच्या रूपात मांडली. आजही ‘हिंदूत्व’ या शब्दाला टोकदार अस्मितेची छटा आहे.
लेखात म्हटल्याप्रमाणे, स्टॅन्ले यांनी ‘हिंदूत्वाच्या ऑक्टोपसपासून सावध केले,’ ते याच अर्थाने. बाकी, ‘हिंदूस्थानातली प्रत्येक व्यक्ती स्वत:ला हिंदू म्हणते,’ या त्यांच्या विधानात अर्थव्याप्ती लक्षात येतेच. ‘भारतीय संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती,’ असे ठाम प्रतिपादन लेखात केले असले, तरी इतिहासातील वास्तव वेगळेच काही सांगते. भारतधर्म सोडून विवेकानंद, महात्मा गांधी, सावरकर यांनी इस्लामविरोध रुजवला. ‘हिंदू’ या शब्दाची व्याप्ती बाजूला सारून आपणच त्याकडे संकुचित अर्थाने पाहातो का, हा प्रश्न उपस्थित होतो. यावर चिंतन होणे आवश्यक ठरते. याबद्दल अधिक तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी ‘अस्मिता आणि धर्म : भारतातील इस्लामविरोधाचे मूलाधार’ हा ग्रंथ वाचता येईल.
– देवयानी देशपांडे, पुणे
भाजपने ‘बाहेरच्यां’ना आणावेच कशाला?
कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या जयश्री जाधव निवडून आल्या. सध्या सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून मोहित कंबोज यांच्यापर्यंतचे भाजप नेते हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर बोलत आहेत. भोंग्यांवरून वाद सुरू आहे. प्रत्यक्षात निवडणुकीत मात्र भाजपने काँग्रेसच्या पठडीतील व्यक्तीला उमेदवारी दिली. काँग्रेसच्या नेत्यांना हिंदूत्वाचा गंध नाही. हर्षवर्धन पाटील, नाना पटोले अशा नेत्यांनी पक्षांतरे करून, आयाराम गयाराम होऊन हिंदूत्वाचा स्वीकार केलेला नाही. कोल्हापूरच्या निवडणुकीत अशा ‘बाहेरच्या’ उमेदवाराला तिकीट देऊन भाजपने लोकांच्या भावनेशी विसंगती दाखवली आहे!
– गिरीश भागवत, दादर (मुंबई)