‘पैचा शहाणा अन्..’ हा अग्रलेख (२३ जानेवारी) वाचला. जगभरातून रशियाला विरोध होत असला तरीही पुतिन यांच्या अहंकारामुळे वातावरण चिघळण्याचीच शक्यता अधिक आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याला दोनेत्स्क आणि लुहान्स्क या बंडखोर प्रांतांना देण्यात आलेली मान्यता हे वरवरचे कारण असले तरी ऊर्जास्रोत बळकावण्याचे रशियन धोरण लपून राहिले नाही. राष्ट्रहित जपण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की हेदेखील रशियाविरोधी भूमिका घेताना कधीही डगमगले नाहीत. युक्रेनने युरोपियन राष्ट्रांचे अनुकरण करणे हे पुतीन यांच्यासाठी असह्य होत असले तरीही युक्रेनवर दबाव आणताना रशियाला इतर युरोपियन राष्ट्रे तसेच अमेरिका यांच्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. रशियाची एकाधिकारशाही मोडीत काढणे हेच खरे आव्हान आहे. चीन, रशिया या राष्ट्रांनी स्वत:च्या स्वार्थापायी आपल्या शेजारील भूभागावर नेहमीच वर्चस्व अधोरेखित केले आहे. अमेरिका तसेच आता चीन आणि जर्मनी यांची बदलती भूमिका पुतिन यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.
श्रीकांत शंकरराव इंगळे, पुणे
चढत्या कमानीला उतार असतोच..
‘पैचा शहाणा अन्..’ हा अग्रलेख वाचला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विनासायास दीर्घकाळचे अध्यक्षपद लाभल्यापासून त्यांची यशोकमान सातत्याने चढती राहिली आहे. चढत चढत उंच डोंगरमाथ्यावर पोहोचल्यावर दुसऱ्या बाजूने खाली येण्याशिवाय त्यांच्याकडे अन्य असा पर्यायच उरला नाही. त्यांचा आता युक्रेनवर हल्ल्याचा डाव म्हणजे शुद्ध वेडाचारच होय. अमेरिकादी नाटो शत्रू राष्ट्रांचे तर सोडाच पण चीन – भारत वगैरे मित्रराष्ट्रांचा हितकारक सल्ला ऐकण्याच्या मन:स्थितीतसुद्धा ते नाहीत. पुतिन यांची ही ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ तर नाही ना !
– बेंजामिन केदारकर, नंदाखाल, विरार.
सगळ्या जगाला हे युद्ध नको आहे..
लोकशाहीच्या नावाखाली रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांची एकाधिकारशाही आणि अधोगतीकडे चाललेली वाटचाल याबद्दलचा यथायोग्य विवेचन करणारा ‘पैचा शहाणा अन्..’ हा अग्रलेख वाचला. यश मिळविण्यापेक्षाही ते पचवणे फार कठीण असते. तेव्हा हे डोक्यात गेल्यावर काय होऊ शकते याचे पुतीन हे जिवंत उदाहरण आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत त्याची घोषणा झाल्याच्या काही तासातच पूर्व युक्रेनच्या बंडखोरांनी दोनेत्स्क आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. या ताज्या तणावाच्या सुरुवातीपासूनच रशिया युक्रेनवर हल्ला करण्याचे सर्व दावे फेटाळून लावत असला तरी संभाव्य तिसऱ्या महायुद्धाची भीती जगात निर्माण झाली आहे. दोन महायुद्धांची भीषणता पाहणाऱ्या जगासाठी आता तिसरे महायुद्ध होऊ नये हेच चांगले आहे. दहशतवाद, गृहयुद्धे, फुटीरतावाद, अतिरेकवाद, तसेच वातावरणातील बदलासारख्या संकटांमुळे झालेला विध्वंस आणि आता जगाच्या विविध भागांमध्ये पसरलेली कोरोना महामारी ही युद्धापेक्षा कमी नाही.
– तुषार अशोक रहाटगावकर, डोंबिवली
रशियाची एकाधिकारशाही धोक्याची !
‘पैचा शहाणा अन्..’ हा अग्रलेख (२३ फेब्रुवारी) वाचला. युक्रेनचे संकट रशिया जगावर लादण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक एखाद्या देशाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करून आणि ज्या रशियाला स्वत:चेच अस्तित्व काही वर्षांपूर्वी महासत्ता म्हणून गमवावे लागले, त्याने स्वत:च्या मर्जीने युक्रेनच्या दोन प्रांतांना मान्यता प्राप्त करून देणे म्हणजे एकाधिकारशाही म्हणावी लागेल. आज युक्रेनच्या बाबतीत असे घडले. भविष्यात हे आपल्या बाबतीत करणार नाहीत कशावरून? त्यामुळे रशियाच्या या निर्णयाकडे डोळेझाक करून चालणार नाही.
– सुनील समडोळीकर, कोल्हापूर.
आता ‘भाकरीचा चंद्र’ जास्त महत्त्वाचा
‘लसशक्तीची (दुर्लक्षित) चर्चा’ हा अन्वयार्थ (२३ फेब्रुवारी) वाचला. लोकल रेल्वे प्रवासासाठी करोना लसीच्या दोन डोस सक्तीच्या विरोधात उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी व्यक्त केलेल्या विधानाकडे नागरिकांचे झालेले दुर्लक्ष हेतुत: होते की ते कानाआड केले गेले? कारण लोकांना करोनाच्या अनुषंगाने निर्थक तात्त्विक मुद्दय़ांमध्ये रस नाही. मधला दीड-दोन वर्षांचा करोनाकाळ कित्येकांच्या आयुष्यात आमूलाग्र उलथापालथ करणारा ठरला आहे. अशा परिस्थितीतून सावरून आयुष्यात पुढे जावे की निर्थक वादग्रस्त चर्चामध्ये वेळ घालवावा याचा वास्तव विचार नागरिकांनी केला ही वस्तुस्थिती आहे. लस करोनावर परिणामकारक असेल -नसेल पण ती उपलब्ध (बहुतांश ठिकाणी विनामूल्य) आहे आणि ती घेतल्याने आपले दैनंदिन व्यवहार सुरू करता येतात ही साधी गोष्ट सर्वानीच स्वीकारली. त्यामुळेच लससक्ती आवश्यक की अनावश्यक याबाबत हस्तीदंती मनोऱ्यात बसून केलेल्या चर्चेकडे सर्वसामान्यांपासून विचारवंतांपर्यंत लक्ष द्यावे असे वाटले नाही. भाकरीचा चंद्र शोधताना शब्दांचे बुडबुडे महत्त्वाचे नसतात तर प्रत्यक्ष धडपडावेच लागते.
– राजेश श्रीराम बुदगे, ठाणे
राज्य-केंद्राच्या वेगवेगळय़ा भूमिका का?
‘लससक्ती रद्द करण्याची तयारी, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर २५ फेब्रुवारी रोजी अंतिम निर्णय’ ही बातमी (२३ फेब्रुवारी) वाचली. महामारीच्या काळात जनतेने खूप काही हाल आणि त्रास सहन केले आहेत. आता सरकारने बऱ्याच गोष्टींवरील निर्बंध सैल केले आहेत. तरीही काही अटी आणि नियम जनतेला जाचक ठरत आहेत, त्याचे काय? लसीची एक मात्रा घेतलेली असो किंवा दोन मात्रा घेतलेल्या असोत, किंवा वरिष्ठ नागरिकांनी तिसरी बूस्टरची मात्रा घेतलेली असो. एवढे सगळे करूनही, त्यांना करोना झाल्याची उदाहरणे आहेत. करोनावरील लस हा रोग होऊ न देण्यासाठी, केलेला प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यामुळे लसीची मात्रा घेणे म्हणजे आपल्याला लसकवच लाभले, अशी कोणीही चुकीची समजूत करून घेऊ नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकीकडे राज्य सरकार सर्व नागरिकांनी लसीची मात्रा घ्या अशी सक्ती करत आहे. तर दुसऱ्या बाजूने केंद्र सरकार नागरिकांना लससक्ती न करता, ती ऐच्छिक आहे, असे सांगून सर्व जबाबदारी नागरिकांवर ढकलून मोकळे होत आहे. हे कितपत योग्य आहे?
– गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली (मुंबई)
परिस्थिती मुंबईबाहेर जायला भाग पाडते..
पत्रा चाळीच्या पुनर्विकासात, मूळ रहिवाशांना मिळालेली नवीन मालकी हक्काची घरे विकून त्यांनी मुंबईबाहेर जाऊ नये, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोटतिडकीने केलेले आवाहन मुंबईकर याचा किती गांभीर्याने घेतील, देव जाणे. २५ वर्षांपूर्वी मुंबईत असलेला ‘मराठी टक्का’ किती घसरलाय हे आपण पाहतोच. आताचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन हे मराठी लोकांपुरते मर्यादित नसून हक्काचे घर मिळवून मुंबईत राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना आहे.
मात्र म्हाडाच्या अल्पउत्पन्न गटासाठी कमीत कमी २५ लाख रु. किंमत असलेल्या घरासाठी कर्जाचे हप्ते भरणे शक्य नसल्याने सर्वसामान्यांना ही हक्काची घरे विकून मुंबई सोडण्याची वेळ येते. मुंबईतील एका खोलीचे घर ५०-६० लाखांना विकून त्या रकमेच्या निम्म्या किमतीत लगतच्या शहरात घर घेण्याची टुमच निघाली आहे. उरलेली रक्कम गुंतवणूक करून ‘सुखाने जगण्याची’ प्रवृत्तीच मुंबईतील हक्काचे घर विकायला कारणीभूत ठरते.
– जगन्नाथ पाटील, उमराळे नालासोपारा
शेवटी काय, सबसे बडा रुपय्या!
पत्रा चाळीच्या पुनर्विकासात, मूळ रहिवाशांना मिळालेली नवीन मालकी हक्काची घरे, त्यांनी विकून, मुंबई बाहेर जाऊ नये, अशी कळकळीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी, त्या प्रकल्पाच्या भूमी पूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी केले. त्यांच्या कळकळीबद्दल कुणाचेही दुमत असणार नाही. कारण एखादा गृहनिर्माण प्रकल्प मुंबईत पूर्ण होऊन, तो प्रत्यक्षात रहिवाशांना मिळणे, यात किती दिव्ये पार पाडावी लागतील, आणि त्यात किती कालापव्यय होईल, याचा कसलाही भरवसा आता उरलेला नाही. त्याच बातमीच्या वरच, अनधिकृत घरे, दंड आकारून नियमित करून देण्याचा निर्णय झाला आहे, अशा आशयाची बातमी (२३ फेब्रुवारी) प्रसिद्ध झाली आहे. कारण एकच, सबसे बडा रुपय्या.
– मोहन गद्रे, कांदिवली
आपण मराठीत जेवण करतो, ‘बनवतो’ कुठे?
‘भाषासूत्र’ या सदरातील ‘माझी मदत करा’ (२१ फेब्रुवारी) सारखा आणखी एक चुकीचा प्रयोग हल्ली सर्वत्र दिसतो, त्याला कारण हिंदी भाषेचा प्रभाव. तो असा, एक गृहिणी स्वयंपाक/ सैपाक करत आहे, तिला मैत्रिणीचा फोन येतो, ती मैत्रिणीला सांगते ‘अगं मी जेवण बनवत आहे’ जेवण नंतर होते, तयार झालेला सैपाक / स्वयंपाक ग्रहण करण्याची कृती म्हणजे ‘जेवण’, जेवण करायचे असते बनवायचे नसते. हिंदीमध्ये ‘खाना बनाना’ व ‘खाना खाना’ याची मराठीत झालेली उचलेगिरी मराठीचा आशयच नाहीसा करते! अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. हिंदीचे प्रचंड आक्रमण आपली रोजची भाषा बिघडवत आहे. शेवटी आपल्या भाषेची काळजी आपणच घेतली पाहिजे!!
– मुकुंद चिंतामणी दाते, तळेगाव दाभाडे, पुणे</strong>
