‘हिजाब बंदी वैधच’ या बातमीनुसार (१६ मार्च) हिजाब घालणे हा इस्लामिक धर्मात आवश्यक असलेल्या धार्मिक प्रथेचा भाग नाही आणि त्यामुळे ते घटनेच्या अनुच्छेद २५ अंतर्गत संरक्षित नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितले. उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने पुढे असे निरीक्षण नोंदवले की, राज्याने शालेय गणवेश निश्चित करणे हे कलम २५ नुसार विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे आणि त्यामुळे कर्नाटक सरकारने ५ फेब्रुवारी रोजी जारी केलेला सरकारी आदेश त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करत नाही. मुलांमध्ये लहानपणापासूनच गरीब-श्रीमंत हा भेद मिटावा तसेच समानता आणि एकात्मता त्यांच्यात वाढीस लागावी यासाठी शाळेत गणवेश घालणे आवश्यक असते, हे तर खरेच.

आता प्रश्न असा आहे की, जर हिजाब हा धर्मिक प्रथेचा भाग नाही म्हणून त्याला बंदी घालणे योग्य असेल तर धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक प्रथेचा भाग असलेल्या अनेक गोष्टींवरही बंदी घालणे आवश्यक नाही का? न्यायालयाच्या आवारातच सत्यनारायणाच्या पूजा होत असतात. अशा प्रकारे धर्माचे उत्सवीकरण हे संविधानाच्या कोणत्या कलमात बसते?

तसेच भगवा घालून योगी महाशयांनी फिरणे आणि सांविधानिक पदावर असूनही भाजपेई मंत्र्यांनी बहुसंख्याकांचे लांगूलचालन करत कट्टरता दाखविणे हे कोणत्या कायद्यात बसते? 

शाळा-कॉलेजमध्ये हिजाब घालणे आयोग्य असेल तर मुलांनी शाळेत कपाळावर आडवे-उभे गंध लावून येणे हे कितपत योग्य ठरते? बहुसंख्य शाळांमधून गणपती उत्सव, नवरात्र उत्सव आणि इतर अनेक धार्मिक सण साजरे केले जातात ते संविधानाच्या कोणत्या कलमात बसते? अनेक शाळांमधून धार्मिक प्रार्थना का म्हटल्या जातात? एवढेच नव्हे तर शाळेच्या प्रवेशद्वारावर सरस्वतीच्या मूर्तीसारखी अनेक धार्मिक प्रतीके का ठेवली जातात?

जगदीश काबरे, सीबीडी, नवी मुंबई</strong>

वैचारिक मागासलेपणाचा कहर

‘हिजाबचा हिशेब’ हा अग्रलेख वाचला. एकविसाव्या शतकातसुद्धा अशा प्रकारे आपल्या मागासलेपणाची लक्तरे जगजाहीर करावी लागतात, हे वाचताना मन विषण्ण होते. खरे तर मुळातच चुकीच्या गोष्टीमुळे हिंदूत्ववाद्यांची व/वा पैगंबरवाद्यांची ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ अशी अवस्था झाली आहे. वास्तविक जे लोक गजाआड असायला हवेत ते लोकच सर्व सत्तास्थाने बळकावून बसले आहेत. धर्मवस्त्राबद्दलचे त्यांचे धर्मचाळे धार्मिक विद्वेषाकडे नेणारे आहेत. धर्मप्रेम आताचे हे चलनी नाणे असले तरी ते केव्हा कालबाह्य होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर कमीत कमी करणे हे शहाणपणाचे ठरेल.

प्रभाकर नानावटी, पाषाण, पुणे

महत्त्वाच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून!

‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट भाजपचा स्टार प्रचारक म्हणून बनविला आहे काय अशी शंका येऊ लागली आहे. महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी यांपासून लक्ष दूर व्हावे हाच यामागचा उद्देश दिसतो आहे. काश्मीरबाबत काही कठोर निर्णय लवकरच अमलात आणण्यासाठी कदाचित ही पार्श्वभूमी तयार होत असावी.

सुरेश चांदवणकर, मुंबई

काश्मिरात पुन्हा नीट पुनर्वसन व्हावे..

‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाविषयी धर्म, राजकारण, या दोन्ही पातळय़ांवर बरीच चर्चा, वाद सुरू आहेत. हा चित्रपट थोडय़ाच दिवसात १०० कोटी उत्पन्न गटात सामील होणार असल्याचे वाचले. काश्मिरी पंडितांच्या छळावर नुसते भावनावश होणे, किंवा त्या सिनेमावरचा कर माफ करणे, यापेक्षा सिनेमा मालकांचा व निर्मात्यांच्या उत्पन्नाचा वाटा कमी करायला लावून, कर वाढवणे व अधिक पीएम फंडातील रक्कम, असा कोटींनी पैसा (फंड) जमा करावा. त्यातून, काश्मिरी पंडितांच्या मालमत्ता त्यांना पुन्हा मिळवून देणे व काश्मिरात त्यांचे पूर्ण संरक्षणात पुनर्वसन करून देणे, यासाठी खर्च करावा, हे खरे यथोचित ठरेल.

श्रीनिवास  स.  डोंगरे, दादर, मुंबई  

ज्येष्ठ नागरिकांबाबत सरकारी कृतघ्नता

ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य गुंतवणूकदाराच्या जिव्हाळय़ाच्या असणाऱ्या ईपीएफसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरात अभूतपूर्व कपात केल्याचे वृत्त वाचले. वाढत्या महागाईमुळे बचतीच्या रकमेवरचे व्याज कमी होत आहे. एकदा प्राप्तीकर आकारणीच्या कसोटीला उतरून बँकेत असलेली शिल्लक रक्कम पुन्हा त्याच कसोटीस तोंड देण्याच्या सक्तीस कशी  पात्र ठरू शकते? ही दुहेरी कर आकारणी ठरते. वाढत्या महागाईनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीवरील व्याजदर वाढणे आवश्यक असताना तो उलट कमी करणे ही सरकारी कृतघ्नता आहे. 

प्रमोद तावडे, डोंबिवली

पेपरफुटीमुळे अभ्यास करणाऱ्यांवर अन्याय

‘दहावी, बारावीच्या  परीक्षा केंद्रावर गैरप्रकार’, हे वृत्त (लोकसत्ता १६ मार्च) वाचले.  परीक्षा केंद्रावरील असले  गैरप्रकार पाहून, हे विद्येचे पवित्र मंदिर नसून, भ्रष्टाचाराची कुरणेच बनली  आहेत असे वाटते. मी १९७४ साली एसएससी (जुनी) अकरावी पास झालो. त्याकाळी  पेपर फुटीची  प्रकरणे ऐकिवात नव्हती. अभ्यासात यथातथा मुले हातावर, मांडीवर किंवा खिशात प्रश्नाचे उत्तर लिहिलेला कागद ठेवून, कॉपी करत. पण त्याचे प्रमाण नगण्य होते. पुढे काळ बदलला, तसतशी माणसाची नियत बदलली. पण कॉपीद्वारे चांगल्या मार्कानी उत्तीर्ण होऊन, चारचौघात मिरवणे हे कर्तृत्व नसून अधोगती आहे, हे ध्यानात ठेवावे. दिवसरात्र मेहनत करून, मेरिटमध्ये येणाऱ्या मुलांना, या गैरप्रकाराच्या परिणामी आयत्या वेळेस  प्रश्नपत्रिका बदलल्यामुळे खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो.  मुळात कितीही  गोपनीय पद्धतीने प्रश्नपत्रिका केंद्रावर पोचवण्याचा प्रयत्न केला तरी, कोणत्या ना कोणत्या मार्गाने  पेपर फुटी होतच आहेत.  त्यामुळे यापुढे भविष्यात  कोणी, कसा  आणि कोणावर भरवसा  ठेवायचा हा मंडळापुढे यक्षप्रश्न आहे.

गुरुनाथ वसंत मराठे, बोरिवली, मुंबई

काँग्रेसच्या टायटॅनिकवर पराभव मंथन

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते पराभव मंथन करू लागले.  पण काँग्रेस पक्षात सोनिया गांधी यांची एकाधिकारशाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी वड्रा फारशा यशस्वी ठरल्या नाहीत. एकटय़ा दुकटय़ाने ते राज्य सांभाळणे शक्य नाही.  तेथे सोनिया गांधी एक सभाही घेऊ शकलेल्या नाहीत. काँग्रेसच्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनीही तिथे प्रचार धुरा सांभाळलेली दिसली नाही. काँग्रेसची संघटना कोण बांधणार हाच प्रश्न आहे. नेतृत्वशून्य राहुल-प्रियंका गांधी यांनी पराभव करून घेण्याची फटाक्यांची माळ लावलेली आहे.  काँग्रेस पक्ष हे टायटॅनिक  झाले आहे. या जहाजावर काँग्रेस शोकांतिकेच्या बैठका होत राहतील! 

सुबोध पारगावकरपुणे

सिनेमा आणि मालिकांमुळे हिंदीचा प्रभाव

‘भाषासूत्र’ या सदरातील  ‘हिंदीचे अतिक्रमण’ या लेखात हिंदीच्या मराठीवरील वाढत्या प्रभावाचा विषय पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

दैनंदिन संभाषणातच नव्हे तर प्रतिष्ठित वर्तमानपत्रांमध्ये फायदा ‘उठवणे’(उचलणे अशा अर्थाने. हिंदीत उचलणे आणि बसलेल्याला उठवणे यासाठी उठाना हा एकच शब्द वापरला जातो),  हल्लाबोल करणे (हल्ला करणे/चढवणे), स्वप्न आलं (पडलं),  माझी मदत (मला मदत), माझ्यावर हसला (मला हसला), मात देणे (मात करणे),  पाणी फेरणे  (पाणी ओतणे, पडणे, टाकणे – फार तर फिरवणे), फसणे (अडकणे), नामचीन (प्रसिद्ध, नामांकित), उभरता (होतकरू) असे कितीतरी शब्दप्रयोग सर्रास आढळतात. काही शब्द संस्कृतोद्भव असल्याने चुकीचे नसले तरी त्यांनी मराठीत प्रचलित असलेल्या पर्यायी शब्दांची जागा पूर्णपणे बळकावली आहे. उदा. रणनीती (व्यूहरचना), षड्य़ंत्र (कट, कारस्थान) आणि अलाकडे लोकप्रिय असलेला आत्मनिर्भरता, ज्याला मराठीत स्वावलंबन असा शब्द आहे याची तर आठवणच करून द्यावी लागेल! आकाशवाणीवरील बातम्यांमधे ‘पंतप्रधान’चे ‘प्रधानमंत्री’ का आणि कधी झाले हे  कळलेच नाही.

अलीकडे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे नाव वारंवार ‘रितु’ राज अवस्थी असे लिहिल्याचे पाहून खेद वाटला. मराठीत अलीकडे इंग्रजी स्पेिलग वाचून ऋकारयुक्त नावे अम्रिता, रिचा, क्रिती, रिशी, रीटा अशी लिहिली जातात.  हिंदी व इतरही अन्य भाषिक तसा उच्चार करत असल्यामुळे ते इंग्रजी स्पेिलग त्याप्रमाणे करतात. पण त्यांच्या लिपीत असे शब्द ऋषी, अमृता, कृती, ऋता, ऋचा असेच लिहिले जातात (अपवाद आहेतच!).

समान देवनागरी लिपीमुळे बरेचदा हिंदी अक्षरे आणि शब्द मराठी म्हणून दडपून दिले जातात. कित्येक रेल्वे स्टेशन्सची ‘मराठी’ नावे आपल्यासमोर आहेतच. हे पत्र लिहिताना देखील ‘ल’ हे अक्षर हिंदी वळणाचेच टंकलिखित होत आहे!

हिंदी सिनेमा तसेच दूरदर्शन मालिका यांच्या प्रसाराने असे होणे काही प्रमाणात अपरिहार्य आणि साहजिक असले व भाषाशुद्धीचा अवास्तव आग्रह अयोग्य असला तरी मराठी पद्धतीची  वाक्यरचना आणि या दोन भाषांमध्ये भिन्न अर्थाने वापरले जाणारे शब्द याबाबत काटेकोरपणा बाळगणे आवश्यक आहे. अर्थात हे सारे प्रमाण भाषेलाच लागू आहे असे वाटते. सीमाप्रदेशांतील बोलीभाषांमधे आढळणारे सीमेपल्याड बोलल्या जाणाऱ्या भाषेचे मिश्रण कानांना गोडच का लागते यावर भाषातज्ज्ञ प्रकाश टाकू शकतील. – अरिवद डेगवेकर, विलेपार्ले, मुंबई