सॉफ्टवेअरचा संक्षिप्त इतिहास

आज आपण सॉफ्टवेअर व हार्डवेअर हे शब्द अगदी सहजपणे वापरतो.

software
आयबीएम या तेव्हाच्या संगणक क्षेत्रातील दादा कंपनीने १९५२ साली पहिला व्यावसायिक संगणक जेव्हा बाजारात आणला तेव्हा त्याला चक्क खोलीभर जागा लागायची.

आयबीएम या तेव्हाच्या संगणक क्षेत्रातील दादा कंपनीने १९५२ साली पहिला व्यावसायिक संगणक जेव्हा बाजारात आणला तेव्हा त्याला चक्क खोलीभर जागा लागायची. आयबीएम त्याला मासिक भाडय़ावर  द्यायची. हे भाडं होतं प्रतिमहिना १५००० डॉलर! त्याकाळी मूठभर कंपन्यांनाच ते परवडत असे..

ओपन सोर्स ही डिजिटल युगातली एक चळवळ आहे. ज्ञान ही एक सार्वजनिक ठेव आहे व म्हणूनच काही मूठभर लोक वा संस्था, बौद्धिक संपदा व कॉपीराइटच्या नियमांचा वापर करून ज्ञान निर्मिती आणि प्रसारावर बंधनं लादू शकत नाहीत, या तत्त्वज्ञानाचा ओपन सोर्स चळवळ हिरिरीने पुरस्कार करते. या व्यवस्थेच्या अधिक तपशिलात जाण्यापूर्वी (जरी तो या लेखमालिकेचा मूळ उद्देश असला तरीही), ओपन सोर्स क्रांतीची सुरुवात ज्या संगणक सॉफ्टवेअर क्षेत्रात झाली, त्याचा थोडक्यात इतिहास समजून घेणं सयुक्तिक ठरेल. यामुळे एकतर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करण्यापूर्वीची एक पाश्र्वभूमी तयार होईल व दुसरं म्हणजे या इतिहासातच ‘ओपन सोर्स’ क्रांतीची बीजं दडली आहेत का, याचाही मागोवा घेता येईल.

‘In the beginning… was the command line’ नील स्टिफन्सन या सुप्रसिद्ध संगणक भाष्यकाराच्या संगणक ऑपरेटिंग प्रणालीची गोष्ट विशद करणाऱ्या या पुस्तकाचे नाव संगणकप्रेमींना परिचयाचे असेल. खरे तर हे नाव थोडे दिशाभूल करणारे आहे, कारण सगळ्यात सुरुवातीला ना कुठली कमांड लाइन (म्हणजे जेथे संगणक वापरकर्ता आपल्या संगणकाला विशिष्ट कामाची आज्ञा देतो ती जागा – आज्ञा स्थळ) होती, ना कुठला (निदान आता आपल्याला परिचित असलेल्या रूपात) संगणक होता. सगळ्याची सुरुवात झाली एका चालू / बंद होणाऱ्या स्विचने (बटणाने). स्विच बंद असलेल्या स्थितीला शून्य (०) स्तर व स्विच चालू असलेल्या स्थितीला एक (१) स्तर असं म्हणून संगणकीय द्विमान गणन पद्धतीची सुरुवात झाली. असे अनेक स्विच एकत्र ठेवून जेव्हा त्यांचे एक विद्युतमंडळ तयार केले गेले तेव्हा एक प्राथमिक स्वरूपातला द्विमान गणन पद्धतीत आकडेमोड करू शकणारा संगणक तयार झाला. त्या काळातील प्राथमिक संगणकापासून आजच्या युगातल्या सुपरकॉम्पुटरलादेखील सर्व आज्ञा द्विमान पद्धतीतच द्यायला लागतात, ज्याला यंत्र भाषा असं म्हटलं जातं.

आज आपण सॉफ्टवेअर व हार्डवेअर हे शब्द अगदी सहजपणे वापरतो. आज बहुतेक सर्वाना हे माहिती आहे की, संगणकाच्या विविध भागांना (मॉनिटर, कीबोर्ड, मदरबोर्ड वगैरे) एकत्रितपणे संगणकाचे हार्डवेअर असं संबोधलं जातं तर हे हार्डवेअर चालविण्यासाठी संगणकाला द्यायच्या सूचना अथवा आज्ञांना एकत्रितपणे सॉफ्टवेअर म्हटलं जातं. पण सुरुवातीला (म्हणजे संगणकाच्या बाल्यावस्थेत, १९४०-५०च्या दशकात) सॉफ्टवेअर व हार्डवेअर असा भेदच नव्हता. या दोन्ही संज्ञाच अस्तित्वात नव्हत्या खरं तर. तसंच आज आपण करतो तो संगणक वापरकर्ता (यूजर) व संगणक आज्ञावलीकार (प्रोग्रामर) असा भेदही नव्हता. तेव्हा होता फक्त संगणक व त्यावर काम करणारी मंडळी. आज आपल्या तळहातात मावणाऱ्या मोबाइल फोन नामक उपकरणाने आपल्याला स्वर्ग दशांगुळे आणून ठेवला आहे. त्या काळात मात्र संगणकावर (थोडीफार गणिती प्रमेयं व मोठाली आकडेमोड वगळता) फार काही करता यायचं नाही व त्यास वेळही प्रचंड लागायचा.

तेव्हाचे संगणक हे अजस्र, प्रचंड महाग, वापरण्यास किचकट, सांभाळण्यास खर्चीक व एवढं सर्व असूनदेखील क्षमताहीन असत. १९५२ साली आयबीएम  (इंटरनॅशनल बिझनस मशीन) या तेव्हाच्या संगणक क्षेत्रातील दादा कंपनीने तिचा पहिला व्यावसायिक संगणक (आयबीएम ७०१) जेव्हा बाजारात आणला तेव्हा त्याला चक्क खोलीभर जागा लागायची आणि त्याची किंमत किती होती? ती एवढी जास्त होती की आयबीएम त्याला मासिक भाडय़ावर आपल्या ग्राहकाला द्यायची. हे भाडं होतं फक्त (?) प्रतिमहिना १५००० अमेरिकन डॉलर! असा पांढरा हत्ती पोसायची ऐपत तेव्हा केवळ अमेरिकन संरक्षण खातं व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मूठभर कंपन्यांकडेच होती. आपली ग्राहकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने पुढील वर्षी म्हणजे १९५३ साली आयबीएमने याच ७०१ संगणकाची एक स्वस्त (?) आवृत्ती बाजारात आणली, जिला त्यांनी ७०५ असं म्हटलं व त्याची किंमत ठेवली केवळ १६ लाख डॉलर!

आज सहज १० ते १५ हजार रुपयांना मिळणाऱ्या मोबाइल फोनमध्ये ज्या गोष्टी गृहीत धरल्या जातात, म्हणजे त्याचा काम करण्याचा वेग, माहिती साठवण्याची अफाट क्षमता व इंटरनेटची उपलब्धता, या गोष्टी त्या काळात कोणाच्या स्वप्नात येणंदेखील शक्य नव्हतं.

१९५०चं दशक संपून १९६०चं दशक सुरू झालं तरीही संगणक क्षेत्रावर आयबीएमचीच मक्तेदारी होती. एवढी की ६०च्या दशकाला ‘आयबीएम मेनफ्रेम युग’ संबोधलं जातं. हा मेनफ्रेम म्हणजे आयबीएमचा महाकाय आणि त्या काळाच्या मानाने शक्तिमान संगणक! त्याच्या पूर्वसुरींप्रमाणेच तो जागा व ऊर्जा प्रचंड खायचा. पण कसाही असला तरी त्याचं हार्डवेअर आरेखन इतकं बळकट व सुरक्षित होतं की अनेक अमेरिकन बँका, इन्शुरन्स कंपन्या व स्टॉक एक्स्चेंजसारख्या वित्तीय संस्थांनी मेनफ्रेम घ्यायला सुरुवात केली. ऐकून आश्चर्य वाटेल, पण अगदी २१व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या महत्त्वाच्या केंद्रवर्ती प्रणालीव्यवस्था मेनफ्रेम संगणकांवरच चालवत. पुढे इंटरनेट युगात व वेब तंत्रज्ञानापुढे मेनफ्रेम संगणक कालबाह्य़ ठरले.

संगणकावरची पहिली प्रोग्रामिंग भाषा व ऑपरेटिंग प्रणाली लिहिण्याचा मान आयबीएमलाच जातो. १९५० च्या दशकाच्या मध्यावर आयबीएमनेोडफळफअठ (FORTRAN (FORmula TRANslator चं संक्षिप्त रूप) भाषा विकसित केली. यामुळे मानवसदृश भाषेत संगणकाला सूचना देता येऊ  लागल्या. सॉफ्टवेअरची ही नांदी होती. यापुढची पायरी म्हणजे ऑपरेटिंग प्रणाली. आज आपण सर्व विंडोजसारख्या ऑपरेटिंग प्रणालीशी चांगलेच परिचित आहोत. ऑपरेटिंग प्रणाली हा संगणक वापरकर्ता व संगणकाचे हार्डवेअर यातला दुवा असतो. संगणक वापरकर्त्यांला ऑपरेटिंग प्रणालीद्वारे संगणकाला विविध आज्ञा देणे सहजसोपे होऊन जाते, जसे की एखादी फाइल उघडणे, त्यात हवा तसा बदल करणे, तिला संगणकाच्या मेमरीमध्ये साठवणे किंवा तिला मेमरीमधून कायमचे काढून टाकणे वगैरे.

६०च्या दशकाच्या मध्यावर आयबीएमने आपल्या एस/३६० या मेनफ्रेम संगणकाबरोबर पहिल्यांदा ओएस/३६० ही अत्याधुनिक ऑपरेटिंग प्रणाली विकसित केली. ओएस/३६० हा आजपर्यंतचा सर्वात मोठा, किचकट व सर्वाधिक लांबलेला सॉफ्टवेअर विकसन प्रकल्प म्हणून ओळखला जातो. हजारांवर संगणकतज्ज्ञ, दशकभराची मेहनत व ५० कोटी डॉलर खर्चून आयबीएमने हा प्रकल्प पूर्ण केला. जर ओएस/३६०च्या सॉफ्टवेअर कोडचं पुस्तक छापलं असतं तर ते सहज २५००० हून अधिक पानांचं काढावं लागलं असतं. त्यावरून ओएस/३६०च्या अजस्रतेची व क्लिष्टतेची कल्पना येईल. या प्रकल्पाचा संचालक फ्रेड ब्रुक्सने याबद्दल त्याच्या ‘द मिथिकल मॅन-मंथ’ या विख्यात पुस्तकात विस्तृत विवेचन केले आहे. जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. ओएस/३६० सॉफ्टवेअरच्या स्थापत्यशैलीत आयबीएमने जो दूरगामी बदल केला तो म्हणजे त्याने संगणकाला बहुविध कार्यक्षमता बहाल केली. जसं आपण सकाळी एकाच वेळी वर्तमानपत्र वाचत असतो, चहा पीत असतो व रेडिओदेखील ऐकत असतो, तसंच संगणकसुद्धा एकाच वेळी अनेक कामं करू लागला.

मेनफ्रेम संगणक कितीही शक्तिशाली असले व त्यांची ऑपरेटिंग प्रणाली कितीही अत्याधुनिक असली तरीही अवाढव्य आकार व किमतीमुळे बहुसंख्य कंपन्यांच्या आवाक्याबाहेर होते. आयबीएमचे मेनफ्रेम संगणक एखाद्या कंपनीने घेणे ही एक प्रतिष्ठेची बाब होती आणि आयबीएम हा संगणक क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट बनला होता.

पण उद्योग क्षेत्रातील मक्तेदारी कोणाला गृहीत धरता येत नाही, विशेषकरून संगणकासारख्या उभरत्या उद्योग क्षेत्रात! आयबीएमच्या याच मक्तेदारीला ६०च्या दशकाच्या मध्यावर जबरदस्त हादरा बसणार होता. अमेरिकेतल्या एमआयटी (मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) या विश्वविख्यात संस्थेत शिकलेला एक ध्येयवादी व झपाटलेला तरुण आयबीएमसारख्या महाकाय कंपनीची झोप उडवणार होता. संगणकीय क्षेत्र आता अधिक परिपक्व होत होतं व ७०च्या दशकात या क्षेत्रातली चुरस अजून वाढणार होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाजालाचे मुक्तायन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Brief history of the software

ताज्या बातम्या