मनोबोधाच्या या २४व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत समर्थ जे सांगतात की, ‘‘सदा सर्वदा नाम वाचें वसों दे। अहंता मनीं पापिणी ते नसों दे।। ’’ यातील अहंतेला पापिणी का म्हटलंय, याचा थोडा उलगडा आपण गेल्या वेळी केला. आता या दोन चरणांतून आणखी एक विशेष अर्थ झळकतो आणि तो साधन स्थिर झालेल्या साधकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काय आहे हा अर्थ? तर समर्थ सांगतात की, ‘‘सदा सर्वदा नाम वाचे वसो दे’’ ही स्थिती जर साध्य झाली, म्हणजेच सदोदित नामाचंच वळण वाचेला लागलं तर एक मोठा धोकाही असतोच! काय आहे हा धोका? तर, साधनेचा म्हणून एक सात्त्विक अहंकार निर्माण होऊ शकतो! सदोदित नाम होऊ लागलं, म्हणजेच मन सदोदित साधनारत झालं तर ते अधिक सूक्ष्म बनतं. मनाच्या अनेक सूक्ष्म शक्ती जाग्या होऊ लागतात. त्या शक्तींच्या ओझरत्या अनुभवानंदेखील ‘आपण कुणीतरी झालो’, हा भ्रम उत्पन्न होऊ लागतो. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, हा भ्रम जडू लागतो. त्यातून सूक्ष्म असा अहंकार निर्माण होतो. म्हणूनच समर्थ बजावतात की हे साधका, वाचेनं सदोदित नाम घे, पण पापिणी अहंतेला मनात थारा देऊ नकोस! कारण आपण गेल्या भागात पाहिलंच की एकदा का मनात अहंकार निर्माण झाला तर तो मला शाश्वतापासून दूर केल्याशिवाय राहात नाही. बरं. तर आता ‘‘सदा सर्वदा नाम वाचे वसो दे’’ या चरणाचा थोडा विचार करू. ही जी वाचा किंवा वाणी आहे ती चार प्रकारची आहे. वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा. वैखरी म्हणजे उघड बोलणं. मध्यमा म्हणजे मनात सुरू असलेलं बोलणं. पश्यंती म्हणजे निव्वळ स्फुरण आणि परा ही वाक् शक्तीचं स्फुरण जिथून होतं त्यापलीकडे आहे. तर वाणीचे हे चारही स्तर नामानं भरून जावेत, अशी नामसाधना समर्थाना अपेक्षित आहे. म्हणजेच जगात आपण वावरतो तेव्हा वैखरीचा उपयोग वारंवार होतो. लोकांशी आपल्याला बोलावंच लागतं. पण ते बोलतानाही मनात नामाचं स्मरण असलं पाहिजे. शाश्वताचं स्मरण असलं पाहिजे. आता अनेकदा आपण उघडपणे बोलत नाही, पण मनात अनंत तऱ्हेचे विचार वा प्रतिक्रिया उमटत असतात. हे विचार वा प्रतिक्रिया शब्दरूपच असतात. हे मनातल्या मनातलं ‘बोलणं’च असतं. हे ‘बोलणं’ सुरू असतानाच नामाचं स्मरण जसजसं वाढत जाईल तसतसं हे ‘बोलणं’ ओसरू लागेल. थोडक्यात मध्यमेचा स्तरही नामानं भरून जाईल. मग येते पश्यंती अर्थात निव्वळ स्फुरण. पश्यंती ते वैखरीचा अनुभव आपल्याला येत असतो. समजा आपल्या डोळ्यासमोर आपल्याला न आवडणारी घटना घडली, आपला अपमान झाला किंवा आपल्याला कुणी विरोध केला, तर प्रथम काय होतं? तर मनात क्रोध उसळतो. अर्थात क्रोधाचं हे स्फुरण असतं आणि ते शब्दरूप नसतं. मात्र त्यातून दुसऱ्याला जे बोलायचं आहे ते मनात प्रथम उमटतं. ही मध्यमेची स्थिती. त्यानंतर आपण मनातलं बरचंसं बोलून टाकतो. ही वैखरीची स्थिती. क्रोधाप्रमाणेच प्रेमाच्या प्रसंगातही स्फुरण, आंतरिक शब्दयोजना आणि प्रकट बोलणं हेच टप्पे असतात. हे सर्व इतक्या वेगानं होतं की असे तीन वेगवेगळे टप्पे आपल्या प्रतिक्रियेमागे वा अभिव्यक्त होण्यामागे असतात, हेच आपल्याला जाणवत नाही. तर अंत:करणात जिथं स्फुरण होतं तिथंही नाम पोहोचलं तर मग सभोवतालच्या घटनांमागे वाहावत जाणं आपोआप कमी होतं. ‘मी’पणा क्षीण होऊ लागल्यानं एखाद्या घटनेनं मनाला ‘मी’पणामुळे धक्का बसण्याचं प्रमाण कमी होतं. अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंगांमध्ये मनाचं समत्व बऱ्याच प्रमाणात टिकून राहातं. अशी आंतरिक स्थिती ही नामसाधनेतला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे.
–चैतन्य प्रेम