scorecardresearch

आहे त्यात सुस्थिती राखणे, हेच विवेकवाद्यांच्या हाती

‘‘आजच्या जगातील सगळे धर्म व त्यातील सगळे ईश्वर, जे मानवजातीने स्वत:च निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी आश्वासने व त्यांच्या सगळ्या धमक्या हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाही तर या धर्मापासून या मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.’’

शरद बेडेकर यांनी त्यांच्या ‘मानव विजय’ सदरातील लेखात (२९ जून) जगभरातील धर्माबद्दल त्यांनी काढलेला निष्कर्ष , ‘‘आजच्या जगातील सगळे धर्म व त्यातील सगळे ईश्वर, जे मानवजातीने स्वत:च निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद, स्वर्ग, मोक्षांची सगळी आश्वासने व त्यांच्या सगळ्या धमक्या हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल. नाही तर या धर्मापासून या मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे.’’- यातील नाडी परीक्षा अचूक असली तरी उपायाबद्दल मात्र ‘इलाज रोगापेक्षा भयंकर’ असा वाटतो.
जगात मानवाबरोबरच मानवधर्म उदयाला आला हे सर्वधर्म मान्य आहे. सर्व धर्म ‘जगात एकच ईश्वार आहे’ असे मानतात. त्यामुळेच सर्व धर्माची मूलतत्त्वे सारखीच आहेत असे म्हणण्यात येते. जगातले सर्व धर्म हे मानवता धर्माचे पंथ मानावे लागतील. धर्मात पंथोपपंथ कसे उगम पावतात ते आपण अनुभवतो. धर्मातील एखादी गोष्ट एखाद्या धर्ममरतडाला विशिष्ट परिस्थितीत इष्ट वाटते ती त्या वेळी आचरली जाते. ती व्यक्ती असेपर्यंत सगळे ठीकठाक असते. त्याच्यानंतर त्या विशिष्ट  गोष्टीचे अवडंबर माजवले जाऊन उपपंथ अस्तित्वात येतो. हे जे फाटे फुटतात ते त्या त्या धर्म समाजधुरीणांनी वेळोवेळी छाटले पाहिजेत. पण त्या त्या परिस्थितीत ते शक्य का झाले नाही हे संशोधनाअंती तरी कळेल की नाही हे कोडेच आहे.
सर्व धर्मात होऊन गेलेल्या संत-महंतांनी वेळोवेळी समाजातील रूढींवर आसूड ओढून समाज सुधारणेचे केलेले प्रयत्न व त्यांनी समाजाला विवेकवादी होण्याचा केलेला उपदेश आपल्या पुढे आहेच. विवेकवादाचा त्यांनी केलेला पुरस्कार कोरडा बुद्धीवाद नाही. त्यांनी स्वत: त्याप्रमाणे आचरण करून उदाहरणे घालून दिलेली असताना समाजाने त्याना नंतर डोक्यावर जरी घेतले तरी त्यांचे अनुकरण मात्र अपवादानेच केले. समाजात आज टिकून असलेली ‘सु’धारणा हे त्या संतांचे यश आहे हे मान्य करावे लागेल.
धर्म या शब्दाचा सरळ अर्थ धरून ठेवणे असा आहे. समाज हा सुटय़ा मण्यांप्रमाणे आहे तर धर्म धाग्यासारखा. माळ तुटली तर मणी इतस्तत: विखुरतात. धर्माच्या धाकामुळे का होईना आज समाज एकगठ्ठा दिसतो आहे. तो विखुरला तर त्याला एकत्र धरून ठेवायला हा विवेकवाद पुरेसा होईल का याचा विचार व्हावयास हवा. तो जर पुरेसा वाटला तर तो धर्म होऊन पुढे येईल. एक धर्म विसर्जित करून दुसरा उदय पावला तर मग तो कसा विसर्जित करायचा याचा विचार कधी करायचा?
आहे हा धर्म विसर्जित करायचा म्हटले तर त्यासाठी समाजाच्या पातळीवर उतरून, समाजात मिळून मिसळून त्यांच्यापकी एक बनून जे कष्ट उपसावे लागतील ते करून समाज आपल्या मनाप्रमाणे घडवण्याचा विवेकवाद्यांचा विचार असेल तर त्यांना अनेक शुभेच्छा.. आगे बढो!
न पेक्षा, आहे ही परिस्थिती सुस्थितीत कशी राहील याचा जमिनीवर राहून विवेकवाद्यांनी विचार करावा हे उत्तम.
 – रामचंद्र महाडिक, सातारा

शहरांतल्या मोकळ्या जागा खाल्ल्या कोणी?
टीचभर करमणुकीसाठी आपण किती हपापलेलो आहोत? भिकार दैनंदिन मालिका, ‘आयपीएल’ सामन्यांपासून ते गल्लीत आलेल्या सेलेब्रिटींपर्यंत कुठेही आपण गर्दी करतो. छटाकभर फायद्यासाठी नगरसेवकाकडून बििल्डगला रंग लावून घेताना, लाळ गाळत शाही विवाहसोहळ्यात जेवताना, आपण कोणाला आणि कशासाठी प्रोत्साहन देतोय हे आपल्याला कळायला हवं. ‘नवस’ या नावाखाली आपण देवाला ‘चार पसे घेऊन काम करून देणारा कारकून’ मानायला तयार असतो..
यातून मग ‘लोकांनाच हे सगळं हवं आहे’ या नावाखाली सार्वजनिक उत्सवांचा उच्छाद चालूच राहतो.
काळ बदलला आहे, शहरं ‘खाल्ली’ जात आहेत, हे आपल्या गावीच नाही. पूर्वी रस्त्याच्या कडेला पोटासाठी डोंबारी आपला खेळ सादर करायचे आणि पाचपन्नास लोक गर्दी करून उभे राहिले तरी फारसं बिघडायचं नाही.
आता वाहनांची आणि लोकांची संख्या इतकी वाढली आहे, की ४ फूट रस्ता पाच मिनिटे अडला तरी कोंडी होईल असे खूप रस्ते आहेत. तरीही आपण दहीहंडीच्या आणि गणेशोत्सवात ‘आरास’ ऊर्फ लायटिंगच्या आधुनिक खेळांसाठी रस्ता अडवतो. वास्तविक िहदू धर्मात तरी ‘अमुक एक सण साजरा करावा आणि तो अमुक पद्धतीने करावा’ असं कोणत्याही शास्त्रग्रंथानं सुचवल्याचं मला माहीत नाही.
हे सर्व सण निव्वळ परंपरेतून जन्माला आले आहेत असं आपण म्हणू शकतो. मग त्यातला कालबाह्य भाग निवडून बाजूला केला तर धर्माला धक्का कसा पोहोचेल? सार्वजनिक  सण साजरा करायची इतकीच हौस असेल तर सभागृह किंवा मदान भाडय़ाने घेऊन आणि येणाऱ्यांच्या  वाहतुकीची/ पाìकगची सोय करून करावा. पण हे एकदा मान्य केलं  की शहरात पुरेशी मदानं का नाहीत, मोकळ्या जागांवरची आरक्षणं कशी बदलली असे अप्रिय प्रश्न उभे राहतील.
रस्ता अडवण्याचा आणखी एक प्रकार. आजकाल कोणीही उठतो आणि धर्माच्या/ पुढाऱ्यांच्या/ लग्नाच्या/ जयंत्यांच्या नावाखाली मिरवणुका काढतो. दुचाक्यांवरून झेंडे मिरवत, ओरडत जाण्याची एक टूम गेल्या एकदीड दशकातच निघाली आहे. ‘आपल्या आनंदाचा दुसऱ्याला त्रास होऊ नये’ या एका निकषावर सर्व भोंगे, डीजे, मंडप आणि मिरवणुका यांवर बंदी घालता येऊ शकते. त्यामुळे  सर्व प्रकारच्या ‘सार्वजनिक’ उच्छादांना कसा आळा घालता येईल याचा विचार व्हायला हवा.
-ओमकार एकबोटे, चिंचवड

सरकार कुणाकडे पाहणार?
‘उत्सव, उन्माद, उच्छाद’ हा अग्रलेख  (१ जुल) आणि त्या अनुषंगाने झालेची चर्चा (लोकमानस, २ जुल) वाचली. सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यापूर्वी संबंधित अधिकारी व उत्सव मंडळांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बठक घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींना सरकारच्या कुबडय़ा घेण्याची काय आवश्यकता आहे?
‘इन्टव्‍‌र्हेन्शन अ‍ॅप्लिकेशन’द्वारे ३ जुल रोजी उत्सव मंडळे न्यायालयात तर बाजू मांडणारच आहेत. मंडळांचे प्रतिज्ञापत्रच सरकारने कॉपी करावे अशी योजना आहे काय?
मुख्य म्हणजे एकाच गटाचे म्हणणे ऐकून घेण्याचा भेदभाव का केला आहे? रस्त्यावर धर्म आणण्यास विरोध करणारे नास्तिक आणि इतर यांना म्हणणे मांडावयाची संधी दिली नसल्यामुळे अशा पक्षपाती निर्णयामुळे संविधानाच्या अनुच्छेद २५ शी संबंधित हक्कांची पायमल्ली होते.
आणखी असे की, रस्त्यावरील गोंधळामुळे ज्यांना त्रास होतो, अशा सर्वसामान्य जनतेला आणि इतर पीडितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीच दिली नसल्यामुळे सरकारकडून येथे नसíगक न्यायाचीसुद्धा पायमल्ली होत आहे.
  -राजीव जोशी, पुणे

पहिला बळी विवेकाचा!
उत्सवातील सर्रास वीजचोरीसंबंधीचे सुधीर दाणी ह्यांचे पत्र वाचून डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली. अंनिस कार्यकर्त्यांची ‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव’ उपक्रमाची आढावा बठक भरली होती, तेव्हा ते म्हणाले -‘पुणे महानगरपालिकेने आपल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विसर्जनासाठी ८० हौद बांधले. विद्यापीठातील ५० महाविद्यालयांनी संकलन केंद्रे म्हणून उत्तम काम केले. महाराष्ट्रभरातून आपल्याला ४०,००० विसर्जति मूर्तीचे दान मिळाले.’ प्रत्येक घोषणेचे कार्यकत्रे उत्साहाने स्वागत करीत होते.  ‘या वर्षीचे वैशिष्टय़ म्हणजे आपल्या ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाचे प्रायोजकत्व चक्क वीज मंडळाच्या काही अधिकाऱ्यांनी घेतले.’  या वाक्यावर टाळ्यांचा गजर झाला.. डॉ. दाभोलकरांनी त्यामागचे वीजचोरीचे गुपित उघडे केले आणि प्रचंड हंशा पिकला! वीजचोरी आटोक्यात आणण्याची ही कल्पना छान होती.
सामान्य जनतेला वेठीला धरून  रहदारीच्या रस्त्यांचा ताबा घेण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीची उचित दाखल अग्रलेखात (१ जुल ) घेतली आहे. याबाबत सरकारला  धोरण ठरविण्यास सांगून न्यायालय थांबले नाही तर त्यासंबंधी अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे कळविण्यास सांगितले आहे. पूर्वानुभवातून कोर्ट शहाणे झाले म्हणायचे. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी १९९५ मध्ये केलेल्या यचिकेवर २००३ साली सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. परंतु आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. उच्च न्यायालयाने सर्व राज्यातील प्रदूषण मंडळांना कोणत्याही प्रकारे पाणी प्रदूषित करणे दंडनीय अपराध आहे हे संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यास सांगितले. आपल्या चळवळीला जनाधार मिळावा म्हणून डॉ. दाभोलकरांनी आपले मित्र न्या.आर. ए. जहागीरदार यांच्या मदतीने गणेश मूर्ती पाíथव म्हणजे मातीची (प्लास्टर ऑफ पॅरिसची नव्हे.) असावी यासाठी संस्कृत ग्रंथातून शास्त्राधारही शोधून काढला होता. परंतु विशुद्ध पाणीस्रोतांचे प्रदूषण चालूच आहे. आता या महिन्यात तर सरकार प्रायोजित महाकुंभमेळा हजारो कोटी रुपये खर्चून नद्यांचे महाप्रदूषण करणार आहे.
‘लोकसत्ता’नेच ‘उत्सवखोरांचा उन्माद’ (सप्टें. २०१४) अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे धार्मिक उत्सवातील उत्साहाच्या उन्मादात पहिला बळी जातो तो विवेकाचा!
-प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

पूर्ण विचारांती नास्तिक बनणे, म्हणजे
धार्मिक भेदाभेदांच्या पलीकडे जाणे..
शरद बेडेकर यांचा ‘जगातील धर्म’ हा लेख (मानव विजय, २९ जून) कुणाही मोकळ्या मनाने विचार करणाऱ्याला निश्चितच तर्कशुद्ध वाटेल.
पृथ्वीवरील निसर्ग सृष्टी आणि मानवी जग यांच्यामागे खरेच कुणी असेल तर तो संपूर्ण जगाचा ‘एकच’ ईश्वर असला पाहिजे व मग त्याने इतके धर्म, संप्रदाय निर्माणच कसे केले? तसेच ‘त्याने’ धर्म संस्थापकांना/ प्रेषितांना उलटसुलट माहिती का दिली? भारताबाहेरच्या लोकांना एकच जन्म व भारतातील लोकांनाच फक्त पुनर्जन्म असतो का? सर्व समर्थ ईश्वराचा दृष्टांत उपासकांना त्यांच्या धर्मसंकल्पनांप्रमाणेच कसा होतो? या तर्कसुसंगत विचाराला प्रत्युत्तरे देणे धर्मवाद्यांना जमणारे नाही.
धर्म हा जन्माने मिळतो. व्यक्ती ज्या धर्मात जन्मते त्या धर्मातील तत्त्वे खरी गृहीत धरूनच तिची धार्मिक बठक बनते (एका धर्मात जन्मूनही, दुसऱ्या धर्माचे विचार पटले म्हणून धर्म बदलणारे अगदी विरळाच- म्हणूनच यात गणले नाहीत). कधी कधी तर ही धार्मिकता धर्माधतेचेही रूप धारण करू शकते. अशी व्यक्ती असहिष्णू बनते. याउलट नास्तिक हा कोणत्याही धर्मात जन्मला असला तरी तो पूर्ण विचारांती नास्तिक बनलेला असतो. म्हणून नास्तिकांमध्ये भेदाभेद अस्तित्वात नसतो.
सध्याचे देश अस्तित्वात येण्यापूर्वीची युद्धे ही मुख्यत: धार्मिक असहिष्णुतेमुळे झाली आणि सध्याही आíथक आणि भौगोलिक (सीमावाद) सोडल्यास इतर कारणांमुळे होणाऱ्या युद्धांत सहसा धार्मिक कारणे असतात.
बेडेकरांनी मांडलेल्या विचारांना समजा विरोध झाला, तर असा विरोध हाच धार्मिक विचारातून येणाऱ्या असहिष्णुतेचा पुरावा असेल. बेडेकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘विज्ञान व मानवतावाद’ हाच मार्ग डोळसपणे पत्करल्यास मानवजात सुखी होईल.
– दीपक गोखले, कोथरूड, पुणे

त्रास देण्यासाठीच अपिलाचा ‘मुहूर्त’
उच्च न्यायालयाने रस्त्यावरील मांडवबंदीचा आदेश देताच त्यास सत्ताधारी भाजपही विरोध करणार ही लोकसत्तामधील बातमी व ‘उत्सव, उन्माद, उच्छाद’ हा समयोचित अग्रलेख (१ जुलै) वाचला.
वास्तविक राजकीय पक्ष व राजकारण्यांकडून सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु आपल्याकडील राजकारण्यांनी हे कर्तव्य पार न पाडता आपल्या स्वत:च्या व आपल्या बगलबच्च्यांच्या फायद्याचे निर्णय राबविले ज्याची दखल कोर्टाना घ्यावी लागली ज्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
मात्र न्यायालयाच्या निर्णयाला कसा वळसा घालावा व प्रकरण कसे चिघळत ठेवावे हे या मंडळींना चांगले अवगत आहे त्यामुळे या प्रकरणात देखील ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर अपील दाखल करून, ते लोंबकळत ठेवून या वर्षीदेखील सामान्य माणसांना त्रास देण्याचाच प्रकार यंदाही सुरू राहण्याची शक्यता आहे.
– शरद फडणवीस, पुणे

हेच म्हणतील.. ‘चला धडा शिकवू’
गेली कित्येक वर्षे सर्व नागरिक पाणी, वीज, रस्ते यासाठी तडफडत आहेत. त्यावर कोणीही बोंबलत नाही.. उत्सवांसाठी रस्ते अडवण्यावर बंदी आणली म्हटल्यावर सर्वपक्षीय एकत्र येऊ लागले. यांना असे वाटते की, जर यांनी जर रस्त्यावर उत्सव साजरे केले नाहीत, तर सर्व जनता सणच साजरे करणार नाही. सर्वसामान्य नागरिकांना मनगटाच्या ताकदीवर नाचवायचे हाच एककलमी कार्यक्रम राबवला जाताना दिसतो. ‘पारंपरिक’पणे हे काय करणार तर..
डांबराचे आणि काँक्रीट रस्ते खणणार/ अडवणार, आवाजाचे प्रदूषण करणार, वीजचोरी करणार, वाहतुकीचे मार्ग बदलणार, सोसायटय़ांची प्रवेशद्वारे बंद करणार, नागरिकांना, प्रशासनाला आणि पोलिसांना वेठीला धरणार! वर हेच सांगणार, ‘लोकाग्रहास्तव केले’, ‘आम्हाला अटक करा, लोकांसाठी काहीपण करू’ आणि मग हेच पुढे राष्ट्रीय नेते बनणार.
‘तुमच्याकडे काय आहे? न्यायालय, निवडक प्रसारमाध्यमे, मूठभर ‘सोशल अ‍ॅक्टिव्हिस्ट’ आणि थोडय़ा सामाजिक संस्था. आमच्याकडे आहे माज, मनगटाची ताकद आणि मूर्ख जनता. आम्ही बोलू तेच करून दाखवू’ – हे यांच्या राजकीय शक्तीचे लक्षण.
‘चला आता बंदी घालणाऱ्या न्यायालयाला आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांना धडा शिकवू या’ असे सांगून महाराष्ट्र बंदची हाक कधीही येऊ शकते.
– नीलेश आंबेकर, ठाणे

त्यांनाही बोला, नाही तर अटकाव
खरेतर पत्रकारिता ही धर्मनिरपेक्ष असली पाहिजे आणि गरज पडल्यास अल्पसंख्याकांनासुद्धा खडसावता किंवा त्यांचे दोष दाखवून देता आले पाहिजेत. आता या संपादक आणि तत्सम मंडळींचा उन्माद, उच्छाद अधिक होत आहे आणि त्यासाठी सर्वच वाचकांनी असल्या पत्रकारितेला अटकाव कराण्याची गरज आहे.
– अनिकेत भांदककर, चंद्रपूर

विज्ञान  विरुद्ध  मानवतावाद?
‘मानव विजय’ या सदरातील ‘जगभरातील धर्म’ (२९ जून)  हा लेख वाचला. लेखाच्या शेवटी ‘विज्ञान व मानवतावाद हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल,’ असे बेडेकर म्हणतात; पण ते खरेच शक्य आहे का? कारण सर्वच धर्माचा गाभा हा मानवतावादच होता, तरीही प्रस्थापितांनी त्याचा उपयोग स्वत:चे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठीच केला. हेच विज्ञानाच्या बाबतीत होऊ शकते. कारण तराजू आणि बायबल घेऊन आलेल्या याच धार्मिक लोकांनी विज्ञानाच्या मदतीने आफ्रिका आणि आशियातील देशांवर आपला आíथक, सामाजिक वर्चस्ववाद आणि उच्च अहंगंड लादून त्यांची भयंकर लूट केली. या लुटलेल्या संपत्तीतून त्यांनी जगाला दिले काय? तर दोन महायुद्धे. या महायुद्धांची संहारकता याच विज्ञानाच्या मदतीने वाढवून कोटय़वधी मानवांचे जीव घेण्यात आले.
त्यात हल्लीचे विज्ञान हे खूपच खर्चीक आणि मोठय़ा भांडवलाची गरज असलेले असणार आहे. त्यामुळे विज्ञानाचा विकास करणे हेही नेहमीच ‘प्रस्थापित आणि धनवान’ लोकांच्या अखत्यारीत राहील. त्यामुळे धर्म आणि विज्ञान हे जरी मानवाने निर्माण केले तरी विकसित झालेले विज्ञान हे धर्माप्रमाणेच प्रस्थापितांचेच हितसंबंध जपणारे आणि त्यांचेच वर्चस्व स्थापणारे असणार आहे. म्हणूनच धर्माने जसा मानवतावादाचा पराभव केला तसाच मानवतावादाचा पराभव मानव विज्ञानाच्या आधारे करील की काय? अशी साधार भीती कुठल्याही विचारी मनाला वाटल्याशिवाय राहणार नाही.
– रमेश म. कोळी, चेंदणी (ठाणे)

वेगळ्या श्रद्धा आचरणारा मित्र होऊ शकतो..
ईश्वर वा निरीश्वरवादी धर्म हे मानवकल्पितच आहेत, हे सत्य असले तरीही मानवाचे जीवन शांत, समृद्धपणे व्यतीत व्हावे हाच त्यांच्या निर्मितीमागचा उद्देश आहे, हे नाकारून चालणार नाही. धर्मकल्पना, काही धर्मतत्त्वे वेगळी असली तरीही ज्या नसíगक ताकदींमुळे मानवी जीवन अस्तित्वात आहे, त्याची जाणीव ठेवून मानवाने विनम्र (किमान त्या ताकदीपुढे) राहावे, हाच सामायिक उद्देश आहे. या धर्मकल्पना, धर्मतत्त्वे काल्पनिकच असल्याने यांत तफावत असणे क्रमप्राप्त होते, कारण जगाच्या विविध भूभागांत आपापल्या समूहापुरतीच त्याची व्याप्ती होती. त्यापलीकडील वर्तुळात काय कल्पना वा श्रद्धा प्रमाण आहेत, हे ठाऊकच नव्हते. असे वेगवेगळे श्रद्धागट समोरासमोर आल्यावर त्यात संघर्ष उडाला, याला कारण मानवी मनातील अस्तित्वाविषयीची भीती!
आपल्यापेक्षा वेगळे आचरण, वेगळ्या श्रद्धा आचरणारा मानवगट हा आपला मित्र होऊ शकतो, हेच त्याने ध्यानात घेतले नसावे. धर्माच्या नावावर अनेक दंगे, कत्तली, अत्याचार आणि मोठी युद्धेदेखील झाली, होत आहेत त्याला धर्मच कारणीभूत आहेत, असे म्हणणे हे समग्र विचार न करण्याचेच लक्षण आहे. असे दंगे वा जे काही घडले वा घडविले जाते त्यात कोणाचा तरी विशिष्ट हेतू, खरे तर स्वार्थच असतो. आई-बहिणीवरून शिव्या देऊन एखाद्या पुरुषाचा अपमान करणे वा कोणी कोणावर धावून जाणे हे सदर श्रद्धा दुखावण्याचेच प्रकार होत. बेभान, श्रद्धा डिवचलेला समूह अत्याचार करतो, इतकेच नव्हे तर दुसऱ्यांच्या स्त्रियांवर सामूहिक बलात्कार करतो ते त्या समूहगटाची मानहानी करून, वर्चस्व गाजवावे या विवेकबाधित मानसिकतेमुळेच. नजीकच्या काळातील उदाहरणे म्हणजे, भारत-पाक ‘स्वातंत्र्य’(?), गुजरात दंगल इ. त्यामुळे मानवाला श्रद्धाविरहित अवस्थेला नेण्याआधी मानवाला स्वार्थविरहित अवस्थेकडे न्यावे लागेल. स्वार्थापायी वा अर्थकेंद्री व्यवस्थेतही दुसऱ्या माणसाचे वा मानवी गटाचे (देशाचे) शोषण होतच आहे. अगदी लोकशाही-लोकशाही म्हणत प्रतिनिधित्व करणारे राजकीय पक्षदेखील वेगवेगळ्या श्रद्धा, विचारसरणी पुढे करत एकमेकांवर कुरघोडी, दंगली, खून करतच असतात.
आज मानवी प्रगतीमुळे जगातील वैचारिक आदानप्रदान वाढल्याने या सर्व धर्माकडे आपण तटस्थपणे पाहू शकतो, ही निश्चितच चांगली बाब आहे. सर्वच धर्मातील लोकांनी कालानुरूप होणारे बदल, तंत्रज्ञान जसे स्वीकारले तसेच आपापल्या धर्मातील फोलपणाही सोडून द्यावा. तरीही मानसिक आधार म्हणून आपापला धर्म टिकवूनच ठेवावा.
– सतीश पाठक, पुणे

मराठीतील सर्व लोकमानस ( Lokmanas ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Religions in the world

ताज्या बातम्या