पैशाची स्मृती..

या प्राचीन दगडी नाण्यात आणि अत्याधुनिक व आभासी मानल्या जाणाऱ्या बिटकॉइनमध्ये आणखी साम्ये आहे.

गौरव सोमवंशी

प्रशांत महासागरातील यॅप बेटांवरील हजारो वर्षे जुने दगडी चलन आणि निव्वळ बारा वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित बिटकॉइन या जागतिक चलनामध्ये बरीच साम्ये आहेत, ती कोणती?

तुमच्या खिशातील पशाचे नाणे हे असून-असून किती मोठे असू शकते? मूल्यानुसार त्या नाण्यांचा आकार आणि माप ठरणारच; पण ते फार काही मोठे नसणार. दैनंदिन जीवनात हे नाणे कित्येक हातांत बागडते, म्हणून ते छोटेच असलेले बरे. परंतु कधी विचार केला आहे का, की आजवरच्या इतिहासात जगातील सर्वात मोठे नाणे किती मोठे असावे? काही सेंटिमीटर? काही इंच? पण मी असे म्हणालो की, जगातील सर्वात मोठे आणि वापरात असलेले नाणे हे काही खिशात मावणारे नसून, १२-१३ फूट व्यास किंवा उंची असलेले आणि हजारो किलो वजनाचे नाणे आहे; तर?

तर या गोष्टीची सुरुवात होते ‘यॅप’ नावाच्या बेटांवरून- जी प्रशांत महासागरात स्थित आहेत. आजच्या घडीला ही बेटे मायक्रोनेशिया या संघराज्याचा भाग असून, इथे मानवी वसाहत जवळपास चार हजार वर्षांपूर्वी वसली. या बेटावर वेगळे असे कोणते धातू वा खनिजे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्राचीन काळी व्यवहारासाठी शिंपल्यांचा किंवा हळदीचा उपयोग होत असे. परंतु जवळपास दीड हजार वर्षांपूर्वी यॅप बेटांवरील काही मंडळी मासेमारी करत फार दूर गेली आणि ४६० किमी अंतरावरील पलाऊ नावाच्या बेटांवर पोहोचली. त्या बेटावर त्यांना पहिल्यांदाच चुनखडीचे मोठे दगड आणि खाणी आढळल्या. यांना कोरून सोबत घेऊन जाता येते, हे त्यांनी ओळखलेच. सुरुवातीला खाणी कोरण्यासाठी शिंपल्यांखेरीज दुसरे कोणतेच अवजार हाती नव्हते. ते वापरून आधी या दगडांना देवमाशाच्या आकारात कोरले गेले. यॅप बेटावरील भाषेमध्ये देवमाशाला ‘राई’ म्हणतात, म्हणून या नवीन वस्तूंचे नावसुद्धा पुढे राईच पडले आणि आजही त्यांना राई म्हणूनच संबोधतात. पुढे काही काळातच या मंडळींच्या ध्यानात आले की, जर या दगडांना वर्तुळाकार कोरले तर ते वाहून न्यायला सोपे जातात. मग त्यांनी या दगडांना गोल आकारात कोरून, त्याच्या मधोमध एक गोल छिद्रसुद्धा कोरले- ज्यामध्ये एक लाकूड टाकून वाहून नेणे थोडे सोयीचे ठरले.

पण पलाऊ बेटावरील ही दगडे ४६० किमी दूर असणाऱ्या यॅप बेटांवर आणायची होती. या वर्तुळाकार दगडांची उंची सहज सात ते बारा फुटांपर्यंत आणि वजन हजारो किलोंच्या घरात असायचे. यासाठी शंभराच्या वर माणसे यॅप बेटावरून यायची आणि महासागरात या दगडांना वाहून नेण्यासाठी खास नावासुद्धा बनवल्या जायच्या. मात्र, या प्रक्रियेला खरी भरभराटी पाचशे वर्षांपूर्वी आली आणि यॅप बेटावरील लोकांनी या दगडी तबकडय़ांचा पैसे किंवा चलन म्हणून वापर सुरू केला.

आता आपण या दगडी पशाबद्दल- या राई चलनाबद्दल थोडे खोलवर समजून घेऊ या. कारण हे समजून घेतले की, ‘बिटकॉइन’ हे चलन म्हणून कसे काम करते हेसुद्धा स्पष्ट होत जाईल. याचे कारण यॅप बेटांवरील हजारो वर्षे जुन्या दगडी चलनामध्ये आणि निव्वळ बारा वर्षे जुन्या ‘ब्लॉकचेन’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित बिटकॉइन या जागतिक चलनामध्ये बरेच साम्य आहे.

तर.. या गोलाकार आणि भव्य आकाराचा दगडी तबकडय़ा यॅप बेटावर येणे सुरू झाले आणि लोकांनी याचा वापर एक चलन म्हणून करायला सुरुवात केली. पण या दगडी तबकडय़ांचे वा नाण्यांचे मूल्य कसे ठरायचे? कोणी म्हणेल- जे नाणे मोठे त्याचे मूल्य जास्त; परंतु तसे नव्हते. या भव्य दगडी नाण्यांचे मूल्य ठरायचे त्या-त्या नाण्याच्या इतिहासावरून! पलाऊ बेटावरून महासागरात साध्या नावेने प्रवास करत हे नाणे घेऊन यायचे म्हणजे काही सोपे काम नव्हते. अनेकांना या प्रवासात आपला जीवसुद्धा गमवावा लागायचा. कधी पलाऊ बेटावरील लोकांशी वाद किंवा मारामाऱ्या व्हायच्या. या सगळ्या त्रासाचे किंवा कष्टाचे रूपांतर त्या-त्या नाण्याच्या मूल्यात केले जायचे. समजा, एक विशिष्ट दगडी नाणे वाहून आणायला काही जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर त्या नाण्याचे मूल्य आपोआपच वाढायचे.

यावरून हे ध्यानात येईल की, नाण्याचे मूल्य हे त्याच्या मूलभूत गुणधर्मात (म्हणजे ते कोणत्या धातूचे बनले आहे, किती मोठे आहे वगैरे) नसून ते त्याच्या प्रतीकात्मक गुणधर्मामध्ये आहे. असेच काही आपण मागील लेखातही पाहिले होते; त्यात चलन हे ‘मेटॅलिस्ट’ (धातू-आधारित) आहे की ‘चार्टालिस्ट’ (खूण किंवा चिन्ह-आधारित) आहे, याची चर्चा केली होती. जर चलनाला एक वेगळे आणि स्वतंत्र मूल्य आहे असे मानून चालले तर त्या दृष्टिकोनाला ‘मेटॅलिस्ट’ म्हटले जाते; परंतु चलनाचे मूल्य हे त्यासंबंधित प्रतीकांमधून येते असे मानले तर त्या दृष्टिकोनाला आपण ‘चार्टालिस्ट’ म्हणतो. यॅप बेटावरील राईच्या दगडी पशाचे मूल्य हे प्रतीकात्मक बाबींमुळेच आले आहे. उदाहरणार्थ, जवळपास शतकभरापूर्वी जर्मन लोकांनी या यॅप बेटावर आपले राज्य प्रस्थापित करायचे प्रयत्न केले. जर्मन अधिकाऱ्यांना जेव्हा कळले की यॅपवासीयांना शेजारील पलाऊ बेटावरील दगडी नाणे पैसे म्हणून चालतात, तेव्हा त्यांनी आधुनिक नौका आणि अवजारे वापरून फार सोप्या पद्धतीने आणि जास्त प्रमाणात या नाण्यांची आयात सुरू केली. आता ही नाणी बनवणे आणि वाहून आणणे ‘सोपे’ झाल्यामुळे या नवीन नाण्यांचे मूल्य कमीच आहे, मग त्यांचा आकार काही का असेना!

नाण्याच्या मूल्याबद्दल आपण समजून घेतले; आता आपण त्याच्या ‘चलन’ म्हणून वापराबद्दल पाहू या. समजा, एका व्यक्तीने- ज्याच्या मालकीचे एक मोठे दगडी नाणे आहे- दुसऱ्याकडून काही जमीन विकत घेतली वा काही वस्तू-सामग्री विकत घेतली, तर या व्यवहारात नाण्याची मालकी साहजिक दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार. पण या व्यवहारात नाणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे गरजेचे नाही. कारण अगडबंब आकारामुळे त्यास वाहून नेणे महाकर्मकठीण. म्हणून या मंडळींनी सोपा मार्ग शोधला. सगळे व्यवहार हे सार्वजनिक, म्हणजे अनेक लोकांसमोर करायचे ठरवले आणि नुसती नाण्यांची ‘मालकी’ बदलली. म्हणजे नाणे एकाच ठिकाणी पडीक आहे, पण त्याची ‘मालकी’ मात्र बदलली आहे आणि याची नोंद प्रत्येकाच्या स्मरणात आहेच. एकदा असे झाले की, एक मोठे दगडी नाणे पलाऊवरून वाहून आणताना मधेच महासागरात बुडाले. ते आणताना बरेच कष्ट आणि परिश्रम लागले होतेच, मग त्याला असेच वाया जाऊ द्यायचे का? मग यॅपवासीयांनी एक सोपा मार्ग काढला. ते नाणे महासागराच्या तळाशी का असेना, शाबूत होते. शिवाय ते आणताना किती त्रास झाला, हेही सर्वाना ठाऊक होतेच. त्यामुळे या बुडालेल्या दगडी नाण्यावरसुद्धा व्यवहार सुरूच आहेत (आजदेखील!), त्याची फक्त ‘मालकी’ बदलत जाते. म्हणजे ही लोकांची ‘स्मृती’ किंवा या व्यवहारांची ‘आठवण’ म्हणजेच एक नोंदवही, नाही का?

त्याचप्रमाणे बिटकॉइन हीसुद्धा नोंदवहीच आहे- जिथे सर्व व्यवहार एक प्रकारे सार्वजनिक आहेत, पण लोकांची ओळख पूर्णपणे लपवण्यात आली आहे. यॅपवासीय सगळे एकमेकांना ओळखतात; कारण त्यांची लोकसंख्या जेमतेम काही हजारांमध्ये आहे आणि म्हणून त्यांची सामूहिक स्मरणशक्ती नाण्याबद्दलच्या नोंदी ठेवण्यासाठी पुरेशी आहे. बिटकॉइनमध्ये सर्व जग सहभागी होऊ शकते आणि म्हणून इथे स्मरणशक्तीवर अवलंबून न राहता ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल नोंदवहीवर सगळे रचले आहे. १९९६ मध्ये अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ नारायण कोचर्लाकोटा यांनी एक शोधनिबंध प्रकाशित केला होता, ज्याचे शीर्षक होते- ‘मनी इज मेमरी’ (पसा म्हणजे स्मृती)! त्या निबंधातही कोचर्लाकोटा यांनीही अशीच काहीशी मांडणी केली होती.

या प्राचीन दगडी नाण्यात आणि अत्याधुनिक व आभासी मानल्या जाणाऱ्या बिटकॉइनमध्ये आणखी साम्ये आहे. जसे की, नाण्यांचे मूल्य हे त्याच्या निर्मितीमागील ‘कष्टा’वरून ठरते, तसेच बिटकॉइनचे मूल्य वा त्याची वैधतासुद्धा ‘डिजिटल कामा’वरून ठरते- ज्याला संगणक क्षेत्रात ‘प्रूफ ऑफ वर्क’ (काम केल्याचा पुरावा) म्हणून संबोधले जाते. दुसरे म्हणजे नुसता पसा छापत गेला (किंवा दगडातून कोरत गेला) म्हणजे आर्थिक भरभराट येईल असे नाही. तसेच या नाण्यांचे उत्पादन सोपे झाले म्हणून चलनवाढसुद्धा झाली. आता अनेक दशके लोटून गेली आहेत; पण यॅपवासीयांचे नवीन नाण्यांचे उत्पादन मात्र बंद आहे आणि बेटावर सध्या जवळपास १३ हजार नाणी असून त्यांद्वारेच व्यवहार सुरू आहेत. (आता अमेरिकी डॉलरसुद्धा वापरला जातोय यॅप बेटावर!). चलनवाढ होऊ नये म्हणून उत्पादनावर नियंत्रण आणणे हे बिटकॉइनसुद्धा करते. २.१ कोटींपेक्षा जास्त बिटकॉइन कधी वापरात येणार नाहीच, अशी तरतूद करून ठेवण्यात आली आहे.

म्हणून इतिहास आणि अर्थशास्त्र या गोष्टींशी बिटकॉइनचे फार घनिष्ठ संबंध आहेत. आतापर्यंत आपण पशाचा इतिहास समजून घेत फक्त दगडी नाण्यांपर्यंत आलो आहोत; पुढील लेखांत कागदी चलन आणि त्यामुळे झालेला बँकांचा उगम याविषयी जाणून घेऊ या!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व साखळीचे स्वातंत्र्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blockchain technology original bitcoin stone money of yap small island zws

ताज्या बातम्या