पी. चिदम्बरम

देशातील नागरिकांनी दुसऱ्याचा स्वीकार करणे आणि सन्मान करणे या गोष्टींनीच कोणताही देश बांधला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये भारत या बाबतीत अपयशी ठरला आहे. इथे सहनशीलतेची जागा हिंसाचाराने घेतली आहे..

सीमारेषा त्या त्या देशाचा भूभाग निश्चित करतात, पण त्या लोकांना त्यात अडकवू शकत नाहीत. लोक मोठय़ा संख्येने एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाल्याची जगाच्या इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. २०व्या शतकात लोकांनी खूप मोठय़ा प्रमाणात स्थलांतर केले आणि आता २१व्या शतकातही लक्षणीय प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. 

१९५१ मध्ये स्थापन झालेली आयओएम म्हणजेच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मायग्रेशन ही संस्था संयुक्त राष्ट्रांचाच एक भाग आहे. आर्थिक- सामाजिक- सांस्कृतिक विकास, संचार स्वातंत्र्याचा हक्क आणि स्थलांतर यांचा परस्परसंबंध आहे, असे आयओएमचे म्हणणे आहे. देशांतर्गत तसेच देशाबाहेर होणारे स्थलांतर रोखता येत नाही. (भारतात ६५ दशलक्ष लोकांनी देशांतर्गत स्थलांतर केले आहे.) आयओएम करते त्याप्रमाणे आपणही फक्त या स्थलांतरितांची नीट व्यवस्था लागावी यासाठी मदत करण्याचे काम करू शकतो.

लाखोंचे स्थलांतर

फाळणी होणे हे स्थलांतराचे एक कारण असते. दुसरे असते युद्ध. भारताने दोन्हींचा अनुभव घेतला आहे. १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली आणि भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून भारतात एकूण एक कोटी ८० लाख लोकांनी स्थलांतर केले. मानवी इतिहासामधले ते आजवरचे सगळ्यात मोठे सक्तीचे स्थलांतर मानले जाते. हे फाळणीमुळे घडलेले स्थलांतर. बांगलादेशनिर्मितीला कारणीभूत ठरलेल्या बांगलादेशमुक्तीच्या लढय़ाच्या आधी आणि नंतर आठ ते नऊ दशलक्ष निर्वासित भारतात आले. त्यांच्यामधले बरेच जण पश्चिम बंगालमध्ये स्थिरावले तर बऱ्याच जणांनी आसाममध्ये आसरा घेतला. त्यांच्यामध्ये हिंदू धर्मीय आणि मुस्लीम धर्मीय असे दोघेही होते. त्याच वेळी म्हणजे फाळणी, बांगलादेशाचे युद्ध या सगळ्या दरम्यान लाखो मुस्लीम पाकिस्तानात न जाता भारतातच राहिले. हजारो हिंदू आणि शीख भारतात न येता पाकिस्तानातच राहिले. आणि कित्येक हिंदूू बांगलादेशमध्येच राहिले. या तिन्ही देशांपैकी भारत आणि बांगलादेश या स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाऱ्या देशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. अजूनही ते कठीण प्रसंगांना तोंड देत आहेत.

हिंदू, मुस्लीम आणि शिखांसह लाखो भारतीय गेल्या अनेक वर्षांच्या काळात अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत. आपण त्यांना अभिमानाने देशोदेशीचे मूळ भारतीय असे म्हणतो. पण ते ख्रिश्चन बहुसंख्या असलेल्या एका धर्मनिरपेक्ष देशामधले अल्पसंख्य आहेत. तीच परिस्थिती न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा तसेच अनेक युरोपीय देशांमध्ये स्थिरस्थावर झालेल्या स्थलांतरित भारतीयांची आहे. परदेशात स्थायिक झालेल्या या भारतीयांपैकी कुणीही धार्मिक किंवा वांशिक पूर्वग्रहाचा बळी ठरला तर भारत सरकार त्याची तातडीने कायदेशीर पातळीवर दखल घेते.

बहुसंख्याकवादी अजेंडा

२१ कोटी ३० लाख मुस्लीम भारतात राहतात. त्यांचे वाडवडीलही इथेच राहिले आहेत. त्याचप्रमाणे बांगलादेशच्या १६ कोटी लोकसंख्येपैकी दीड कोटी हिंदू असे आहेत, ज्यांचे वाडवडील बांगलादेशमध्येच राहात होते आणि ते फाळणी किंवा बांगलादेश मुक्ती युद्धाच्या दरम्यानच्या काळात भारतात निघून आले नाहीत.

भारतात राहणाऱ्या मुस्लिमांमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ज्यांचे वाडवडील पूर्वापारपासून भारतातच राहिले आहेत आणि दुसरे म्हणजे जे स्थलांतरित होऊन भारतात आले आहेत. हे दोन्ही समूह वेळोवेळी धार्मिक पूर्वग्रहांना बळी पडत आले आहेत. मोदी सरकार मात्र त्यांना संरक्षण देणे तसेच त्यांच्या विरुद्ध झालेल्या हिंसाचाराबाबत कडक भूमिका घेणे नाकारते. एखाद्या देशाने त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला की त्याला भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ न करण्याची तंबी दिली जाते. पण विरोधाभास म्हणजे बांगलादेशामध्ये हिंदूवर तसेच त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले झाल्यावर भारताने त्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्याच वेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी मात्र या हिंसाचाराविरोधात सडेतोड भूमिका घेतली आणि बांगलादेशच्या गृहमंत्र्यांना त्यासंदर्भात सख्त कारवाईच्या सूचना दिल्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या एम. एस. गोळवलकर यांच्या ‘वुई ऑर अवर नेशनहूड’ या पुस्तकात ‘हिंदू धर्म आणि हिंदू संस्कृतीच्या गौरवाखेरीज अन्य कोणतीही कल्पना मुस्लिमांनी मनात आणू नये. इथे राहायचे असेल तर त्यांना नागरिकत्वाचेच नाही तर कसलेच हक्क मिळणार नाहीत. ते हिंदूंच्या या देशात दुय्यम नागरिक म्हणून राहू शकतात.’ या आशयाचे वाक्य आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तसेच भाजपच्या सध्याच्या नेत्यांनी या तत्त्वज्ञानापासून फारकत घेतली आहे का? त्यांनी ती तशी घेतली आहे असे गृहीत धरले तर त्यांचे शब्द आणि त्यांची कृती हे गृहीतक उघडे पाडते. 

– मुस्लीम वगळता बाकी सगळ्यांना सामावून घेणाऱ्या सीएए (सिटिझनशिप अमेंडमेंट अ‍ॅक्ट) सारख्या धडधडीतपणे भेदभाव करणाऱ्या कायद्याचे कोणताही धर्मनिरपेक्ष देश समर्थन करू शकतो का? सीएए तसेच हजारो तथाकथित ‘परकीयां’ना डांबून ठेवण्याची धमकी याचा बांगलादेश आणि इतरत्र परिणाम होणार नाही असे कुणी म्हणू शकेल का?

-आपल्या लहानशा गोठय़ासाठी गायी घेऊन निघालेल्या राजस्थानमधील पेहलू खानला किंवा घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशमधील मोहम्मद अकलाखला झुंडीकडून, दगडांनी ठेचून मारले जाणे याचा कोणताही बहुसांस्कृतिक देश समर्थन करू शकतो का?

– वेगवेगळ्या धर्माची दोन तरुण माणसे प्रेमात पडतात आणि लग्न करू इच्छितात तेव्हा बहुधार्मिकता असलेला देश ‘लव्ह जिहाद’ची ओरड सहन करेल का?

– वेगवेगळे धर्म असलेले एक जोडपे नवऱ्याच्या कुटुंबासोबत आनंदाने राहाते आहे अशी तनिष्क या लोकप्रिय ब्रॅण्डची जाहिरात होती. ती मागे घेण्यासाठी कोणत्याही आधुनिक देशात त्या ब्रॅण्डवर दबाव आणला जाईल का?

– दोन आठवडय़ांपूर्वी फॅब इंडिया या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डने दिवाळीनिमित्त आपल्या वस्त्रमालिकेची उर्दू नावाने जाहिरात केली. हिंदूंच्या सणानिमित्ताने काढलेल्या वस्त्रमालिकेला इस्लामिक नाव देणे चुकीचे असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. कोणताही बहुभाषिक देश अशा पद्धतीने उर्दू नाव देणे चुकीचे कसे ठरवेल?

इथे अनेकतत्त्ववाद आहे.

सगळे नाही, पण काही भारतीय लोक भारतीय मुस्लिमांना वेडेवाकडे बोलणे, इजा करणे, दहशत निर्माण करणे, ठार मारणे यासाठी सबबी शोधत असतील, तर त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की इतर देशांमध्ये राहणारे हिंदूू किंवा शीख यांच्या वाटय़ालाही टोमणे, गैरवर्तन, दुखापत, दहशत, हत्या हेच येणार नाही का? कायमच अतिशय धगधगत्या असणाऱ्या भारतीय उपखंडात क्रिया आणि प्रतिक्रिया एकमेकांपासून वेगळ्या करता येत नाहीत. 

अनेकतत्त्ववाद हे आपले वास्तव आहे. वेगवेगळ्या संस्कृती असणारे, वेगवेगळ्या श्रद्धा असणारे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि अनेक गोष्टींमध्ये अशा पद्धतीची विविधता असणारे लोक एकत्र राहतील हे प्रत्येक देशाने शिकले पाहिजे. देशातील नागरिकांनी दुसऱ्याचा स्वीकार करणे आणि सन्मान करणे या गोष्टींनीच कोणताही देश बांधला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये भारत या बाबतीत अपयशी ठरला आहे.

इथे सहनशीलतेची जागा हिंसाचाराने घेतली आहे. हे कुठेही, कधीही घृणास्पद आहे. हिंसेमधून हिंसाच निर्माण होते. ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा फोडण्याची वृत्ती सगळ्या जगालाच आंधळे करेल’ असे कोण म्हणाले होते, ते तुम्हाला माहीतच आहे.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in  ट्विटर : @Pchidambaram_IN