साम्यवाद हा एक आसक्त विचार असल्याने त्याच्या परीक्षणाची मला कधी गरज वाटली नाही, ही विनोबांची भूमिका होती. अशा वेळी साम्यवादाच्या सभोवती दिसणाऱ्या संकल्पनांची आणि तिच्या तात्त्विक आधाराची संगती कशी लावायची? विनोबा सांगतात साम्यवादाभोवती तत्त्वज्ञानाची उभारणी दिसत असली, तरी त्यात काही सार नाही.

पोथीनिष्ठा, रशिया किंवा चीनच्या कलाने वर्तन, भारतीय विचार परंपरेबाबत अज्ञान आणि शब्द आणि कृती या दोहोंची फारकत हे विनोबांचे साम्यवादावरील मुख्य आक्षेप होते. आपल्याच तत्त्वज्ञानाने ही मंडळी इतकी भारलेली दिसतात की त्यांच्याशी वाद घालण्याऐवजी त्यांचे कौतुक करणे सोपे आहे, असे विनोबांचे प्रतिपादन आहे.

सृष्टी आणि मन या दोहोंनाही आकार देणारा आत्मा हा तिसरा आहे हे लक्षात न घेता साम्यवादी समाजरचनेच्या फेऱ्यात सापडतात. त्यामुळे सद्गुणांची मातबरीच उरत नाही. पर्यायाने आध्यात्मिक सद्गुण सहजच अर्थशास्त्राची पैदास बनतात. अशा आत्मशून्य विचारात व्यक्तीची प्रतिष्ठा राहात नाही. बाण सुटल्यानंतर त्याची दिशा बदलत नाही त्याप्रमाणे साम्यवादाची स्थिती आहे. मानवी इतिहासाचे आकलन ठरलेले असते. त्यानुसार वर्तमानातील कार्याची दिशा नक्की झालेली असते. रक्ताची नदी, दुधा मधाची नदी आणि शेवटी प्रत्येक घरासमोरून शीतल जलाची नदी असा क्रांतीचा सुनिश्चित कार्यक्रम आहे.

अशा आत्यंतिक निष्ठेवर गांधी-विचार बसू शकत नाहीत, असे विनोबांचे म्हणणे आहे. गांधी विचारांची दिशा कशी आहे हे सांगताना विनोबा लिहितात, ‘गांधी विचारांची नेमकी या उलट दशा, त्यांची पक्की खंबीर इमारत, यांचे सारे भोंगळवाणे भुयार. गांधीजींची वचने पाहावीत तर त्या वचनांचाही विकास झालेला.’

पुढच्या वचनाच्या विरुद्ध मागचे वचन निघाले तर त्याची संगती लावण्याऐवजी पुढचे वचन प्रमाण माना आणि मागचे सोडून द्या, अशी गांधीजींची भूमिका होती. पुढचे वचनसुद्धा प्रमाण मानू नका. खरेतर वचनच प्रमाण मानू नका. मी असेपर्यंत मला विचारा आणि माझ्यानंतर सर्व जण सर्व तंत्र – स्वतंत्र आहात, असे गांधीजी म्हणत. त्यामुळेच गांधीजींच्या सहकाऱ्यांमध्ये मेळ नाही, असे विनोबांचे निरीक्षण आहे. ही स्थिती टळावी म्हणून आपले विचार शास्त्रीय भाषेत मांडावेत, असे गांधीजींना सुचवण्यात आले होते. त्यावर गांधीजी उत्तरले, ‘एक तर तसे करण्याला मला फुरसत नाही आणि माझे प्रयोग अजून सुरू आहेत. त्यातून शास्त्र हळूहळू केव्हा बनायचे तेव्हा बनेल.’

विनोबांना, गांधीजींचे हे उत्तर समर्पक वाटले. त्यांच्या मते, शास्त्रीय परिभाषा सजवून काय होणार? आपल्या विरोधातील शास्त्रीय परिभाषेला फक्त प्रत्युत्तर मिळणार. शस्त्रबल वाढवल्याने अनेक समस्या निर्माण होतात आणि सुरक्षा मिळत नाहीच. हाच निकष शास्त्रीय परिभाषेला लागू आहे. दोन परिभाषांमधे झगडा झाला तर त्याने घोटाळा तेवढा वाढतो. विनोबांच्या मते, विचार मोकळा राहणे इष्ट असते. तथापि त्यात निराळा धोका असतो. अनुयायी पांगतात. ध्येय दुरावते. यावर गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे आपली बुद्धी वापरावी आणि प्रयोग करत राहावे. गांधीजींचे हे मार्गदर्शन विनोबांनी अधिकाधिक आचरणात आणले.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com