जेव्हा अवघी कायनात थर्टी फस्र्ट साजरा करण्यासारख्या भौतिक सुखामध्ये बेधुंद झाली होती तेव्हा भाजपचे खासदार गणेशसिंह त्यात कुठेही नव्हते. ते ती सर्व सुखे सोडून परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी थेट मध्य प्रदेशातून मुंबईला आले होते. मुंबई हे तसे जागृत देवस्थानांचे शहर. गणेशसिंह यांनी थेट सिद्धिविनायकाचा रस्ता धरला. या रस्त्याने ते पायी चालत आले, लोटांगण घालत आले की स्वतभोवती गिरक्या मारत हे काही समजू शकले नाही. ते आले हे मात्र खरे. पण कधी कधी देव आपल्या भक्तांची अगदी सीईटीच घेतो. कदाचित गणेशसिंह यांनी आपल्या येण्याची खबर सिद्धिविनायकाला दिली नसेल. पण ते देवाचिये द्वारी चारी मुक्ती साधण्यासाठी आले आणि नेमक्या त्याच वेळी देवाचा डोळा लागला. तेव्हा मंदिराच्या पुजाऱ्यांना वाटले, की घेऊ द्यावी विश्रांती विनायकाला. त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. पापकर्मच हो हे! त्यांना पुजारी म्हणावे की मंत्र्यांचे पीए? प्रत्यक्ष गणेशसिंह गणेशाच्या भेटीस आले होते. तरीही त्यांनी असा अडेलतट्टूपणा करावा? मान्य की विनायक ही मोठी देवता आहे. तो गणानाम् पति आहे. पण गणेशसिंह हे काय कमी आहेत? तेही जनानाम् पतिच! लोकांचे प्रतिनिधी म्हणजे लोकांचे सेवक म्हणजे राज्याचे मालक असे त्यांचे पद. पुजाऱ्यांचे ते धाष्टर्य़ पाहून अखेर गणेशसिंहांचे गणंग खवळले. त्यांनी घोषणांचे तांडव मांडले. अखेर आरक्षीदलास तेथे पाचारण करण्यात आले. यक्षाच्या दरबारात शिवशंकराचा झाला तसाच अपमान विनायकाच्या मंदिरात आधुनिक गणेशाचा झाला. याचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. पण पुढे झाले उलटेच. गणेशसिंहांवरच त्यांचे पक्षपती अमितसिंह यांनी कारवाई केली. परमेश्वराच्या भेटीपायी तळमळणाऱ्या एका जिवाला शिक्षा झाली. त्याचे प्रायश्चित्त सरकारने केलेच पाहिजे. यापुढे सर्व मंदिरांचे दरवाजे आमच्या लोकपतींसाठी अष्टौप्रहर सताड उघडे ठेवलेच पाहिजेत. त्यांना आजन्म व्हीआयपी पास दिला पाहिजे. ते फारच जनसेवेत असतील, तर त्यांच्या दर्शनासाठी देवांना नेण्याची व्यवस्था केली पाहिजे. तसाही पूर्वी पुंडलिका भेटी परब्रह्म आल्याचा दाखला आहेच. हे तर पुंडलिक नव्हे, तर साक्षात् आधुनिक गण-पती आहेत. त्यांना आमचे नमन असो!