आसामातला कुणीसा कथित ‘हिंदुत्ववादी’ नेता, निघाला आंदोलन करायला.. काय तर म्हणे वाघांना गोमांस खाऊ घालू नका. तसे केल्याने यांच्या भावना दुखावतात म्हणे! सोमवारी त्याने गुवाहाटीच्या प्राणिसंग्रहालयासमोर गोमांसाची गाडीच अडवली. अरे मग वाघांनी काय कडबा कुटार खायचे काय? जंगलाच्या या राजाला तुम्ही समजता काय? तसाही तुमचा उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर विश्वास नाही. माकड हे पूर्वज होते हेही तुम्ही मान्य करायला तयार नाही. अशावेळी स्वत:ची स्वतंत्र वंशावळ जोपासणाऱ्या वाघाला धर्माच्या दावणीला बांधता. अरे कुठे वाघ व कुठे मानव? साध्या ताकदीचा अंदाज घेतला तरी वाघाच्या पासंगालाही माणूस पुरत नाही. आता त्याने त्याच्या शक्तिवर्धनासाठी आवश्यक असलेले गोमांस खायचे नाही म्हणजे अतीच झाले. तुम्ही त्याला मानववंशातले अल्पसंख्य समजता की काय? तुमच्या दांडगाईने ते घाबरतील पण वाघ नाही हे लक्षात ठेवा. आणि कुणाला घाबरवून, कुणाला दहशतीत ठेवून कधी कुठल्या संस्कृतीचा प्रसार झालाय का? हे खाऊ नका, ते खाऊ नका अशी जबरदस्ती माणसांवर करता करता आता तुमचे लक्ष प्राण्यांकडेही गेले. काय तर म्हणे गोमांसाऐवजी हरीण, सांबर मारा. त्यांचे मांस खाऊ घाला. हे तसेही जंगलातले अतिशय गरीब प्राणी. एकदा दंडुकेशाही अंगात शिरली की मारण्यासाठी गरीब प्राणीच दिसतो यांना. अरे, कायद्यानुसार त्यांनाही मारता येत नाही एवढे तरी ज्ञान बाळगा! एकतर वाघांना पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवता. कशासाठी तर म्हणे पर्यटकांना पाहण्यासाठी. एवढी हिंमत असेल तर करा त्यांना मोकळे. मग करा त्यांच्यासमोर असे आंदोलन. आहे तयारी? तसे झाले तर पाठीला पाय लावत पळ काढणारे तुम्हीच पहिले असाल. कैदेतल्या वाघाला तर मांजरही वाकुल्या दाखवू शकते. जरा त्यांना मोकळे सोडा, मग बघा ते कुणाकुणाला खातात! कुणी काय खायचे, काय प्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि वाघ तर त्याच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत कमालीचा दक्ष म्हणून ओळखला जातो. याच मुद्यावरून आधी माणसांना छळून झाले, आता प्राण्यांना छळता काय? वाचला नसेल तर एकदा सावरकर वाचून घ्या. त्यासाठी पाहिजे तर नागपूर मुख्यालयातून आसामी अनुवाद मागवून घ्या पण प्रसिद्धीसाठी वाटेल ते करू नका. ते आसामचे वनमंत्री त्या आंदोलकाच्याच विचाराचे. पण त्यांनी स्पष्टच शब्दात सुनावले. गोमांस हाच वाघांचा उत्तम आहार आहे म्हणून! आता सत्तेत असणाऱ्याने एक, तर बाहेरच्याने दुसरे बोलायचे व मुद्दा पेटवत ठेवायचा हीच तुमची नीती असेल तर त्याला काही इलाज नाही. पण वाघांच्या भोजनावर संक्रांत आणण्याचे पाप करू नका. आधीच ते जगभरात अल्पसंख्य ठरत चालले. त्यांना जपणे ही काळाची गरज. हे लक्षात न घेता त्यांचे तेवढे अल्पसंख्यपण ध्यानात ठेवून मैदानात उतरला की काय? सारेच अल्पसंख्य आपल्याला घाबरतात, या समजुतीतून आतातरी बाहेर या! बहुमत आहे म्हणून मिळाली संधी की पेटवा वात हे कुठेही कसे खपेल? वाघाची चित्रे लावून विचारप्रसाराच्या आरोळ्या ठोकणे सोपे हो! पण इथे गाठ प्रत्यक्ष वाघाशी आहे.. त्याचा एकच पंजा तुमची दादागिरी रोखायला पुरेसा आहे. संस्कृतीचा उन्माद जोपासताना माणूस आणि प्राण्यात फरक आहे हे ध्यानात असू द्या.
संग्रहित लेख, दिनांक 14th Oct 2020 रोजी प्रकाशित
‘हिंदुत्ववादा’ची गाठ वाघाशी!
आसामातला कुणीसा कथित ‘हिंदुत्ववादी’ नेता, निघाला आंदोलन करायला.. काय तर म्हणे वाघांना गोमांस खाऊ घालू नका.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-10-2020 at 00:00 IST
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chashma article abn 97