‘आर्थिक विषमताविरोधी लढय़ाचे प्रतीक’ ठरलेल्या न्यूयॉर्कमधल्या ‘ऑक्युपाय चळवळी’च्या सात वर्षे आधीच, २००३ मध्ये सी. के. जानु या केरळी महिलेने जमीनधारणेतील विषमता संपवण्यासाठी वायनाड जिल्ह्यातील मुथंगा येथे जमीन-ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या मुथंगा आंदोलनाहून अधिक प्रभावी, मोठय़ा प्रमाणावर आणि तरीही अहिंसक आंदोलन म्हणून पुढे पटनमथिट्टा जिल्ह्यातील २००७ सालच्या ‘चेंगारा आंदोलना’ची नोंद घ्यावी लागते. कॉपरेरेट कब्जात आमची जमीन गेलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या या आंदोलनाचे नेते लाहा गोपालन यांचे २२ सप्टेंबर रोजी कोविडमुळे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या या आंदोलनामुळे ते स्वत: मोठे नेते झाले नाहीत किंवा जमीनधारणेतील विषमतेची समस्याही संपली नाही. मात्र त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न बिनतोड होते. दु:खाची अभिव्यक्ती सडेतोड असेल, दु:ख संपवण्याच्या मार्गावरून चालावेच लागेल असा विश्वास असेल तर विद्रोह दूर नसतो, हे लाहा गोपालन यांच्या जीवनाचे सार ठरले. हॅरिसन्स मल्याळम या रबर-उत्पादक कंपनीच्या ताब्यात केरळमधील हजारो एकर जमीन होती. टायर उद्योगातील एका बडय़ा उद्योगसमूहाशी या कंपनीचा संबंध. ही जमीन त्यांच्याकडे १९०७ पासून आहे, असे सांगितले जात होते. त्या वेळी त्यांना ती जमीन कोणी विकली वा कोणी दिली, याची कागदपत्रे समाधानकारक नसल्याचा आक्षेप लाहा यांनी घेतला. ही कागदपत्रे स्पष्ट असूच शकत नाहीत, कारण मुळात आमच्या वाडवडिलांची जमीन या कंपनीने लाटली आहे, असा आरोपही केरळ वीजमंडळातून निवृत्त झालेल्या लाहा यांनी केला. तो या भागातील आदिवासी आणि वंचित समूहातील लोकांना पटल्यामुळे सुरू झाली पटनमथिट्टा जमीन चळवळ! केरळमधील अशा चळवळींना आध्यात्मास समाजसुधारणेची जोड देणारे नारायणगुरू यांच्या विचारांचा वारसा आहे. १९२४ च्या वायकोम सत्याग्रहापासून केरळमधील शोषितवर्ग जागृत झाल्याच्या खुणा शोधता येतात. मात्र तरीही, खासगी कंपनीच्या जमिनीवर लोकांनी चळवळ म्हणून अतिक्रमण करणे, हा प्रकार नवाच ठरला. चेंगारा आंदोलनातील कार्यकर्ते जरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी बांधिलकी सांगणारे असले, तरी अशा आंदोलनास उघड पाठिंबा देणे त्या पक्षानेही टाळले. चेंगारा आंदोलकांची कोंडी केरळ सरकारने पुरेपूर केली. तरीही, आजसुद्धा तीन हजार कुटुंबे या जमिनीवर वीज-पाण्याविना ठाण मांडून आहेत. लोकांचा प्रश्न सोडवण्यात नव्हे, पण तो कुणीही सोडवत नसल्याचे दाखवून देण्यात लाहा गोपालन यशस्वी झाले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2021 रोजी प्रकाशित
लाहा गोपालन
लोकांचा प्रश्न सोडवण्यात नव्हे, पण तो कुणीही सोडवत नसल्याचे दाखवून देण्यात लाहा गोपालन यशस्वी झाले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-09-2021 at 02:50 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chengara struggle leader laha gopalan profile zws