फारूख जफर

१९६३ साली त्या लखनऊत विविधभारतीवर उद्घोषक म्हणून रुजू झाल्या.

आयुष्य समरसून जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात एखादी संधी अशी येते जिचा ते आनंदाने स्वीकार करतात. त्यांचा हा आंतरिक आनंद मग त्यांच्यापुरता राहत नाही, तो त्यांना अनुभवणाऱ्या सगळ्यांनाच आनंदून टाकतो. लखनऊमध्ये आपल्या घरात नातेवाईकांच्या मैफिलीत बसून घरातल्या सगळ्यात जुन्या नोकराची देहाती बोली उलगडून सांगणाऱ्या गोष्टीवेल्हाळ फारूख जफर यांच्या गोष्टी त्या गर्दीत बसलेल्या दिग्दर्शकीय कानाने ऐकल्या. त्याच दिवशी दिग्दर्शक मुजफ्फर अली यांनी त्यांच्यासमोर ‘उमराव जान’ चित्रपटात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. ‘आमच्या घरावर बॉम्बच पडला होता,’ असे या प्रसंगाचे वर्णन फारूख यांनी के ले आहे. चित्रपटाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या; पण आवाजाची पक्की जाण असलेल्या फारूख जफर यांचा अभिनेत्री म्हणून कायापालट झाला तो असा! गेल्या शुक्रवारी, वयाच्या ८८ व्या वर्षी या अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला. अभिनयाचे कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण त्यांच्याजवळ नव्हते की अनुभवही नव्हता; मात्र आवाजावर आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होते.

जौनपूर शहरातला त्यांचा जन्म. लग्नानंतर त्या लखनऊत आल्या. १९६३ साली त्या लखनऊत विविधभारतीवर उद्घोषक म्हणून रुजू झाल्या. १९६६ नंतर दिल्लीत उर्दू आकाशवाणीवर उद्घोषक म्हणून काम पाहायला सुरुवात के ली. दिल्लीतला हा अनुभव काही फारसा आनंददायी नव्हता, असे त्या म्हणत. मात्र याच काळात एनएसडीमध्ये इब्राहीम अल्काझींच्या हाताखाली अभिनयाचे धडे गिरवण्याची संधी त्यांना मिळाली होती! घरगुती कारणामुळे १९७० मध्ये त्या लखनऊस परतल्या आणि कु टुंबात रमल्या ते त्यांच्यावर ‘उमराव जान’चा बॉम्ब पडेपर्यंत… मग १९८०च्या दशकात त्यांनी काही निवडक मालिका आणि चित्रपटही के ले; पण खऱ्या अर्थाने त्यांचा चेहरा घरोघरी ओळखीचा झाला तो त्यांच्या दुसऱ्या पर्वात- २००४ पासून. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘स्वदेस’मधून त्यांनी पुन्हा रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. मग ‘पीपली लाइव्ह’, ‘अम्मा की बोली’, ‘सुलतान’, ‘सिक्रे ट सुपरस्टार’सारख्या चित्रपटांतून त्यांचा चेहरा घरोघरी ओळखीचा झाला. अगदी हल्ली शूजित सिरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिताबो’मध्ये अमिताभ यांना जेरीला आणणाऱ्या त्यांच्या बेगम म्हणून त्या दिसल्या. सळसळता उत्साह ही त्यांची ताकद होती, संवाद म्हणजे शब्दांचा खेळ आणि अभिनय करताना त्यात आपल्या अनुभवाचा अर्क ओतण्याची खुबी त्यांच्याकडे होती. त्यामुळेच ऐंशीव्या वर्षीही दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षकांना आपलेसे करण्याची किमया त्यांना साधली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Profile farooq zafar akp

Next Story
अनलजित सिंग