हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार होऊन गेले, जे त्यांच्या नावापेक्षा चेहऱ्याने अधिक ओळखले जातात. अलीकडेच दिवंगत झालेली मीनू मुमताज हे याचे एक उदाहरण. प्रसिद्ध हास्य अभिनेता महमूद यांची ती बहीण. नायिका म्हणून तिची ओळख नसली, तरीही ज्यांनी तिला अनेक चित्रपटांमध्ये नृत्य करत गाताना पाहिले आहे, ते तिला विसरू शकत नाहीत एवढी ओळख तिने नक्कीच मिळवली होती. मीनूचे खरे नाव मलिकुन्निसा अली. १९४०च्या दशकातील चरित्र अभिनेते मुमताज अलींची ती मुलगी. तिला चार भाऊ व चार बहिणी. वडिलांचा ‘मुमताज अली नाइट्स’ नावाचा डान्स ग्रूप होता. पुढे त्यांचे दारूचे व्यसन विकोपास गेल्याने कुटुंबावर हलाखीचे दिवस आले. मीनूला आधी त्यांच्या स्टेज शोमध्ये व नंतर चित्रपटांमध्ये काम करावे लागले. तिला ‘मीनू’ हे नाव मेहमूदची मेहुणी मीना कुमारी हिने दिले. मीनू सुंदर नव्हती, पण नृत्यकलेच्या शिदोरीवर तिने चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले. १९५५ सालचा ‘सखी हातिम’ हा मीनूचा पहिला चित्रपट. मात्र पुढच्याच वर्षी आलेल्या गुरुदत्तचा ‘सीआयडी’, त्यातील मीनूवर चित्रित झालेल्या ‘बूझ मेरा क्या नाम रे’ या गाण्यासह सुपरहिट ठरला. यानंतर अनेक चित्रपटांतील भूमिका मीनूकडे चालून आल्या. ‘दिल की कहानी रंग लायी है’ (चौदहवी का चाँद) आणि ‘साकिया आज मुझे नींद नहीं आएगी’ (साहिब बीबी और गुलाम) ही गाणी तिनेच गाजवली. ‘ब्लॅक कॅट’ चित्रपटात ती बलराज साहनीची नायिका होती. विनोदी अभिनेते जॉनी वॉकर यांच्यासह मीनूची पडद्यावर जोडी जमली व या दोघांनी अनेक चित्रपटांत काम केले. १९५८ सालच्या ‘हावडा ब्रिज’ चित्रपटात मीनूचे प्रणयदृश्य मेहमूदसह होते.. सख्ख्या भावंडांचे हे प्रकार पडद्यावर पाहून लोक भडकले. ‘इन्सान जाग उठा’मधील ‘जानू जानू रे काहे छलके है तोरा कंगना’ हे गाणे मीनू व मधुबालामुळे आणि ‘नया दौर’मधले ‘रेशमी सलवार कुडता जाली का’ मीनू व कुमकुम या नर्तकींच्या जोडीमुळे लक्षात राहिले. १९६३ साली निर्माते- दिग्दर्शक सय्यद अली अकबर यांच्याशी मीनूचा धडाक्यात विवाह झाला. चित्रपटसृष्टीला अलविदा करून ती कॅनडात स्थायिक झाली. तिथे ब्रेन टय़ूमरमुळे तिची दृष्टी व स्मृती यांवर परिणाम झाला, पण शस्त्रक्रियेनंतर ती बरी झाली आणि ८९ वर्षे सुखाने जगली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाची साक्षीदार असलेली ही तारका २३ ऑक्टोबर रोजी कॅनडात काळाच्या पडद्याआड गेली.

dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
pm modi targets india alliance during his tamil nadu and kerala visit
‘इंडिया’ला पराभवाची खात्री! पंतप्रधान मोदींची केरळ, तमिळनाडू दौऱ्यात विरोधकांवर टीका