आनंदवन आता अडीच वर्षांचं झालं होतं. जंगलजमीन साफ करून शेतीयोग्य करणं, बैलगाडीतून माती आणून शेतात पसरणं, शेतं नांगरणं, विहिरी खणणं, झोपडय़ा उभारणं ही कामं शारीरिक श्रमांच्या बळावर आनंदवनात अखंड सुरू होती. दगडधोंडय़ांच्या भूमीला शस्यश्यामल धरणीचे रूप येत होते. बाबा आमटे म्हणत, ‘‘आपण कितीही पीडित आणि विकलांग असलो तरी प्रत्येकाने स्वत:च्या क्षमता ओळखून त्या ताणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा.’’ आपलं नेमकं ध्येय काय याविषयी स्पष्टता असेल, कामाचं व्यवस्थित नियोजन असेल आणि स्वत:च्या क्षमता पूर्ण वापरण्याची जिद्द असेल तर कोणतंही आव्हान असाध्य नाही, यावर बाबांचा ठाम विश्वास. परिणामी अपंगत्वामुळे शरीरश्रम न करू शकणारी कुष्ठरुग्ण व्यक्तीही रिकामं बसून न राहता शेतामधील पिकावर बसणारी पाखरं हाकारे देऊन हाकलत असे. कुष्ठरुग्ण सतत निर्मितीत गुंतलेले राहिले तर आपण स्वत:च्या हक्कासाठी, आनंदासाठी कष्ट करतो आहोत याची जाणीव त्यांच्यामध्ये जागृत होईल याबद्दल बाबा आश्वस्त होते.

आत्मनिर्भरतेच्या या वाटचालीत आनंदवनाची आर्थिक घडी बसवण्याचं मोठं आव्हानही बाबा आणि इंदूपुढे होतं. महारोगी सेवा समितीचे कार्यकर्ते म्हणून कोल्हापूरच्या कोरगावकर ट्रस्टकडून त्यांना मिळणारं अल्प मानधन हेच काय ते उत्पन्नाचं साधन. याशिवाय हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा ज्या दानशूर व्यक्तींनी आनंदवनाच्या कार्याला सुरुवातीच्या काळात मदतीचा हात दिला, त्यात मी प्रामुख्याने उल्लेख करीन तो नागपूर रबर इंडस्ट्रीजचे मालक शंकरराव जोग यांचा. १९५२ साली महारोगी सेवा समितीस दहा हजार रुपयांची उदार देणगी देऊन आनंदवनाच्या धर्तीवर नागपूरनजीक एखादं उपचार केंद्र महारोगी सेवा समितीतर्फे सुरूकरण्यात यावं अशी इच्छा त्यांनी प्रकट केली. यातून जे काम उभं राहिलं त्याचा उल्लेख पुढील लेखांमध्ये येईलच. महारोगी सेवा समितीचे विश्वस्त, बाबांचे ज्येष्ठ सहकारी आणि तत्कालीन मध्य प्रदेश शासनात योजना आणि विकासमंत्री म्हणून कार्यरत असलेले रा. कृ. पाटील हे मध्य प्रदेश शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आनंदवनाला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. गांधी स्मारक निधी संस्थेकडून आनंदवनाला साहाय्य मिळावे यासाठी मनोहरजी दिवाण यांचीही धडपड सुरू होती. पण यश येत नव्हतं. बऱ्याच प्रयत्नांती मध्य प्रदेश शासनाकडून प्रतिरुग्ण प्रतिमाह सात-आठ रुपये अनुदान मंजूर झालं. पण तेसुद्धा दफ्तरदिरंगाई आणि लालफितीच्या कारभारात कायम अडकलेलं असे.

jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Unseasonal rain Buldhana district
बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी
Sansad Bhavan
Rajysabha Election : महाराष्ट्रात बिनविरोध, पण ‘या’ राज्यांत अटीतटीची लढत, क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी काँग्रेसकडून व्हिप जारी!

दत्तपूर कुष्ठधाम, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचं ‘तपोवन’ अशा संस्थांसोबतच मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यंमधून आणि इतर राज्यांमधूनही कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ  लागले होते. निवासी कुष्ठरुग्णांची संख्या आता सत्तरच्या घरात पोहोचली होती.

वरोऱ्यानजीक वणीच्या बैलबाजारातून बाबांनी खरेदी केलेल्या बैलजोडीच्या मदतीने आनंदवनातली शेती चांगलीच बहरू लागली होती. ज्वारी, मक्यासोबत बटाटा, बीटरूट, फुलकोबी, वांगी यांची भरपूर पैदास होत होती. बाबांनी सहिवाल, हरियाणा, गीर जातीच्या काही गायी खरेदी केल्या होत्या. गोधन वाढल्याने दूधही भरपूर निघू लागलं होतं. गायी दोहण्याच्या कामात गणपती उरकुडे वगैरे कुष्ठमुक्त व्यक्ती इंदूला मदत करत असत. धान्य, भाजीपाला, दूध आता आनंदवनाला पुरून उरू लागलं होतं. आनंदवनातील धारोष्ण दूध जेव्हा वरोऱ्यात घरोघरी, हॉटेलांमध्ये जाईल, कुष्ठरोग्यांनी निर्माण केलेल्या ताज्या टवटवीत भाज्या बाजारपेठेत जातील तेव्हा कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज हळूहळू दूर होत कुष्ठरुग्णांना समाजात स्थान मिळेल असं बाबांना वाटत होतं. पण अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे कुष्ठरोगाबद्दल समाजमानसावर भीतीचा जबरदस्त पगडा होता. उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत बोट ठेवायला जागा नसली तरी आनंदवनात तयार झालेलं दूध, भाजीपाला वापरला तर आपल्यालाही हा रोग होईल अशी लोकांची ठाम समजूत होती. त्यामुळे आनंदवनातलं हे जास्तीचं धान्य, भाजीपाला, दूध या सगळ्याचं करायचं काय, असा यक्षप्रश्न बाबांपुढे उभा ठाकला. वरोऱ्यातले काही सुजाण, समजूतदार लोक तेवढे आपल्या गरजेपुरता माल विकत घ्यायचे. आनंदवनचं दूध ‘दूषित’ म्हणून रस्त्यावर ओतून देण्याचे घृणास्पद प्रकारही त्या काळात घडले. कुष्ठरुग्ण नव्हे, तर साधनाताई दूध काढतात याची खातरजमा करून घ्यायलाही वरोऱ्यातले काही लोक आनंदवनात येत असत.

समाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातील दुराव्याची ही दरी सांधण्यास मदतगार ठरणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना १९५३ सालच्या उत्तरसंध्येला घडली. श्रमसहकारातून मैत्री जोपासणाऱ्या ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ (SCI) या युरोपस्थित आंतरराष्ट्रीय शांती संघटनेच्या स्वयंसेवकांचं एक पथक सेवाग्राम आश्रमात कार्यरत होतं. इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, डच, नॉर्वेजिअन अशा २३ वेगवेगळ्या भाषा बोलणारी चौदा देशांतली ही सारी मंडळी होती. या संघटनेचं ब्रीदवाक्य होतं- ‘Deeds NOT Words.’ आनंदवनाबद्दल माहिती कळताच या स्वयंसेवकांनी श्रमदानातून आनंदवनात पक्क्या इमारती उभारून देण्याची इच्छा बाबांकडे प्रदर्शित केली. सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनलचं ब्रीद आणि बाबांची श्रमाधारित जीवनपद्धतीची संकल्पना यांत अंतर नव्हतं. बाबांनी तत्काळ होकार कळवला आणि स्वित्र्झलडच्या पिअर ऑप्लिगर यांच्या नेतृत्वाखाली पन्नास स्वयंसेवकांचा गट १९५४ च्या जानेवारीत आनंदवनात निवासी शिबिराकरिता दाखल झाला. त्यांच्यासोबत गांधीजींचे सहकारी मृगप्पा गंगणे, प्रसिद्ध विचारवंत वसंत पळशीकर, सेवाग्राम आश्रमातले मा. म. गडकरी, पवनारचे बाबुराव चंदावार होते. गांधीजींचे अजून एक सहकारी शंकरराव वेले, सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. रानडे, दत्तपूर कुष्ठधामाचे मेडिकल ऑफिसर आणि ‘कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’मधले बाबांचे सहाध्यायी डॉ. गोविंदराव जोशी ही मंडळी येऊन-जाऊन असत.

त्यावेळी आनंदवनात एकदम एवढय़ा संख्येने आलेल्या लोकांच्या राहण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता. वीजही नव्हती. शिबिराचं नियोजन इतक्या घाईघाईत ठरलं की स्वयंसेवकांसाठी पुरेशा झोपडय़ा उभारण्यास बाबा आणि त्यांच्या कुष्ठरुग्ण सहकाऱ्यांकडे पुरेसा वेळही शिल्लक नव्हता. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस उपलब्ध झोपडय़ांमध्ये दाटीवाटीने राहिल्यानंतर या पथकाने राहण्यासाठी जास्तीच्या झोपडय़ा स्वत:च बांधून काढल्या आणि मग आनंदवनातील पहिल्या पक्क्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. पहिली कुदळ मारली जर्मनीच्या आल्फ्रेड नॉसने. इमारतीचा पाया खणण्यापासून, रेती गाळण्यापासून, डोक्यावर विटा वाहण्यापासून ते चुन्याची घाणी चालवण्यापर्यंत सर्व कामं हे स्वयंसेवक बाबा आणि त्यांच्या कुष्ठरुग्ण सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून करत होते. बांधकामासाठी लागणारे वरोऱ्यातले स्थानिक कारागीर आनंदवनात येण्यासाठी राजी नसल्याने सुतार, गवंडी ही मंडळी नागपूरहून आणावी लागली. भल्या पहाटेपासून ते थेट रात्रीपर्यंत सर्वजण हिरीरीने काम करत. शिबिरातील स्वयंपाकाचा भार पूर्णपणे इंदूवर पडला. एक छोटा चर खणून त्यावर तट्टय़ाचा मांडव घातला होता. चरात लाकडे आणि वर भुसा भरून, कंदिलातलं तेल घालून ते पेटवलं जायचं आणि त्यावर भांडी ठेवून इंदूचा स्वयंपाक, चहापाणी दिवसरात्र चालत असे. इंदूच्या हातच्या गरम पोळ्यांना अमृताची चव आहे, असं पिअर ऑप्लिगर म्हणत! इंदूच्या परिश्रमांना सीमाच नव्हती. रात्री पेट्रोमॅक्सच्या उजेडात सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, नाच होत असत. हात बांधून एका अभिनव पद्धतीने रिंगण केलं जाई. त्याला ‘Fence of Human Legs – Chain of Human Armsl असं म्हटलं जायचं.

देशोदेशीचे उच्चविद्याविभूषित स्वयंसेवक आनंदवनात येऊन राहिले आहेत, तेथील कुष्ठरोग्यांशी मोकळेपणे मिळूनमिसळून, मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता वावरत आहेत, कामाचे ढीग उपसत आहेत हे पाहून वरोरावासी थक्क झाले. कुष्ठरोग्यांबरोबर काम करूनही या गोऱ्या मंडळींना जर रोगाच्या संसर्गाची भीती वाटत नाही, मग आपल्याला का वाटते? बाबा आमटे म्हणतात की, हा रोग लागट नाही.. ते खरं असेल का? अशी चलबिचल वरोरावासीयांच्या मनात सुरू झाली होती. आणि पहिल्यांदाच वरोऱ्यातल्या लोकांचं आनंदवनाकडे खऱ्या अर्थाने लक्ष वेधलं गेलं. अर्थात् काहीही झालं तरी आनंदवनावर सतत टीकाच करायची, हे ध्येय उराशी बाळगणारी काही ‘हित’चिंतक मंडळीही होती. त्यामुळे SCI चे स्वयंसेवक आनंदवनात मुक्कामी असण्यावरून बाबांवर बोचरी टीका झाली. ‘आनंदवन म्हणजे आंतरराष्ट्रीय हेरगिरीचा अड्डा आहे.. बाबा आमटे CIA agent आहेत..’ असं म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली! पण असल्या निराधार आणि हीन आरोपांकडे बाबांनी कायमच दुर्लक्ष केलं.

अडीच-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर स्वयंपाकासाठी धान्याची निकड जाणवू लागली तशी बाबांनी यासाठी वरोऱ्याच्या नागरिकांना आवाहन करण्याची शक्कल लढवली. आणि आश्चर्य म्हणजे बाबांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी पुढाकार घेऊन या स्वयंसेवकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली. शाळांतील विद्यार्थी मूठ-मूठ तांदूळ, डाळ घेऊन येऊ  लागले. स्वयंसेवकांच्या सोबतीने श्रमदान करून त्यांनी पहिला रस्ता बांधून काढला. वरोरा रेल्वे स्टेशनवरील कर्मचारीवर्गाने आनंदवनात एक विहीर खोदून देण्याचा संकल्प केला आणि उजाडल्यापासून रात्रीपर्यंत कामाला भिडत तो पूर्णत्वासही नेला.

दवाखाना, रुग्णांसाठी वॉर्ड आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान अशा तीन पक्क्या इमारती उभ्या राहिल्या आणि साडेतीन महिन्यांच्या या शिबिराची सांगता झाली. निरोपाप्रसंगी सगळेच सद्गदित झाले होते. बाबांशी हस्तांदोलन करत घोगऱ्या आवाजात पिअर ऑप्लिगर म्हणाले, ‘‘Baba, you are doing a great work which deserves a far greater recognition and assistance. I shall see that your unique work does not suffer for want of money.ll यावर बाबा उत्तरले, ‘‘I won’t allow it to suffer, Pierre! I will strive till the last breath of my life. It will remain unique, be rest assured!’’ श्रमदाती पाहुणे मंडळी निघून गेली तरी हलणारे निरोपाचे हात काही वेळ तसेच हलत राहिले. बाबा इंदूला म्हणाले, ‘‘या इमारतींनी आनंदवनाच्या भविष्याचा पायाच घातला म्हणायचा इंदू! या मजबूत पायावर आनंदवनाचं भविष्य डौलदारपणे उभं राहील. पाहशील तू.’’ बाबांचं वाक्य होतं- ‘‘Fellowship of kPainl has no Caste-Creed- Region- Religion and International Frontiers.’’ खरोखरच, कोण कुठली ही देशोदेशीची माणसं- आनंदवनात आली आणि आनंदवनाची होऊन गेली.

आनंदवनातल्या पहिल्या पक्क्या इमारतीचं बांधकाम ही घटना आनंदवनासाठी अनेकार्थानी मैलाचा दगड तर ठरलीच; पण एका सामाजिक बदलाची नांदीही ठरली!

विकास आमटे vikasamte@gmail.com