News Flash

उदारमतवादी

विदिता वैद्य यांचा जन्म मुंबईमधल्या गुजराती कुटुंबात झाला.

‘‘माझे वडील खऱ्या अर्थाने फेमिनिस्ट होते. ते घरामध्ये आईला मदत करायचेच, पण त्यांचे विचार तेवढय़ापुरते मर्यादित नव्हते. ज्याप्रमाणे पुरुषांना एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असते, तसेच स्त्रियांनाही यश मिळवायचे असते. त्यांना ही संधी का नाकारायची, असा त्यांचा प्रश्न असायचा. त्यांच्या या विचारांच्या प्रभावाखालीच मी मोठा झालो. त्यामुळेच विदिताने तिच्या क्षेत्रात भरारी घेणे माझ्यासाठी अगदी स्वाभाविक होते. तिच्याबरोबर उभे राहताना मला काहीच विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. आपण काही वेगळं करत आहोत, असं आम्हा दोघांनाही कधी वाटलं नाही. माझ्यात ते गुण माझ्या वडिलांकडूनच आपोआप आले होते’’,  टीआयएफआरच्या जीवशास्त्र या शाखेमधील न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या, शांतीलाल भटनागर पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या विदिता वैद्य यांचे खासगी क्षेत्रात काम करणारे पती अजित महादेवन सांगतात.

अजित महादेवन हे केरळमधील तामिळी अय्यर, तर विदिता वैद्य यांचा जन्म मुंबईमधल्या गुजराती कुटुंबात झाला. दोघांच्या घरामध्ये उदारमतवादी वातावरण. विदिता त्यांच्या प्रेरणास्रोतांबद्दल सांगतात की, ‘‘मी लहानपणापासून माझ्या आजूबाजूला खंबीर स्त्रिया पाहिल्या आहेत. माझ्या आजीने स्वातंत्र्यलढय़ात सहभाग घेतला होता. आजोबाही स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी गांधीजींबरोबर काम केलं होतं. पुढे ते काँग्रेसचे खासदारही झाले. स्वातंत्र्य चळवळीचे किस्से आणि गोष्टी ऐकतच मी लहानाची मोठी झाले. त्या गोष्टींनी मी अगदी भारावून जायचे, अजूनही त्या माझ्या आवडत्या गोष्टी आहेत. आजी टिपिकल गुजराती पद्धतीची खादीची साडी नेसायची, तिचं शिक्षण फारसं झालं नव्हतं. पण ती खूप वाचायची. माझी आई शिक्षिका होती, वडील प्रयोगशाळेत असायचे. ते दोघेही पीएच.डी. झालेले होते. आई पायधुणीमधील आर्थिकदृष्टय़ा कमकुवत स्तरातील मुलांना शिकवण्यासाठी जायची.

वडिलांची प्रयोगशाळा गोरेगावातच होती. घरापासून जवळ असल्याने मी अनेकदा तिथे जायचे. वडील डॉक्टर असले तरी आमच्या घरात आईचं काम अधिक महत्त्वाचं मानलं जायचं. तिचं जास्त कौतुक व्हायचं. हा असा उदारमतवाद, स्वत:च्या देशाबद्दलचा अभिमान आणि वैज्ञानिक वातावरण यांचा वारसा मला घरातूनच मिळाला होता. प्रत्येकाने स्वत:ला हवं ते काम करावं असं वातावरण आमच्या घरामध्ये होते.’’

दोघांच्या एका मित्राच्या माध्यमातून विदिता आणि अजित यांची भेट झाली तेव्हा दोघेही महाविद्यालयामध्ये शिकत होते. ही साधारण १९९१ची गोष्ट. अजित इंजिनीयिरगला होता. १९९२मध्ये तो एमबीए करण्यासाठी अमेरिकेतील पित्झबर्गला गेला, तर विदिता पीएच.डी. करण्यासाठी येल विद्यापीठात गेली. दोघेही अमेरिकेत होते, पण वेगवेगळ्या शहरांमध्ये. १९९३मध्ये दोघांचा साखरपुडा झाला आणि १९९६ मध्ये लग्न. पहिल्या भेटीनंतर सुरुवातीचा साधारण वर्षभराचा काळ वगळला तर ही ‘लाँग डिस्टन्स रिलेशनशिप’ होती. त्या दिवसांबद्दल दोघेही सांगतात की, ‘‘तेव्हा तर आम्ही विद्यार्थिदशेत होतो. आमच्याकडे फार पैसे नसायचे. एका देशात असलो तरी दुसऱ्या शहरात असल्यामुळे एकमेकांना भेटायला जाण्यासाठी आमच्याकडे फारसे पैसे नसायचे. कारण दर महिन्याला मिळणाऱ्या स्कॉलरशिपमधून सुट्टीसाठी भारतात येण्यासाठी थोडे-थोडे पैसे साठवायचो. आतासारखं इंटरनेट नव्हतं, फोनही महाग होता. त्यामुळे आम्ही एकमेकांना भरपूर पत्रं पाठवायचो. खूप पत्रं लिहिली आम्ही एकमेकांना, ती आम्ही अजूनही एका पेटीत जपून ठेवली आहेत. आताच्या पिढीसाठी तुलनेनं संपर्क साधणं सोपं झालं आहे.’’

विदिता आणि अजितने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा घरातून विरोध होण्याचं कारणच नव्हतं. त्याबद्दल अजितकडून ऐकताना काही गमतीशीर गोष्टीही कळतात. ‘‘आम्हा दोघांच्याही घरात उदारमतवादी वातावरण होतं. मला एक प्रसंग आठवतो, मी तेव्हा शाळेत होतो. माझे वडील भावंडांमध्ये सर्वात थोरले होते. त्यामुळे त्यांनी अनेक लग्नं जमवली होती. माझी आईदेखील अर्थातच त्यांच्यासोबत असायची. मात्र, तिला मुलगी दाखवण्याची पारंपरिक पद्धत आवडत नसे. एकदा ते कोणाचं तरी लग्न जुळवायला गेले होते, तिथल्या सर्व प्रकारांनी ती इतकी उद्विग्न झाली होती, की घरी आल्यावर तिनं हातातली वस्तू जमिनीवर आदळली आणि मला सुनावलं, ‘तुझं लग्न तू स्वत:च जमवायचं, मी अजिबात तुझ्यासाठी मुलगी बघणार नाही’, मी तेव्हा शाळेतच होतो. पण हा प्रसंग माझ्या अगदी मनावर कोरला गेला.’’ लग्न झालं तेव्हा विदिताच्या पीएच.डी.चं अखेरचं वर्ष होतं. लग्नानंतरच तिने प्रबंध सादर केला. १९९७मध्ये विदिता भारतात परत आली तेव्हा अजित आधीच परत आला होता आणि त्याचा कामात जम बसत होता. मात्र, विदिताला पोस्ट डॉक्टरेटसाठी स्वीडनची प्रतिष्ठेची फेलोशिप मिळाली होती. त्यामुळे विचाराअंती दोघांनीही काही वर्षे लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. ‘‘लंडन हा सर्वोत्तम पर्याय नव्हता, पण पुरेसा चांगला होता’’, विदिता सांगतात, ‘‘लंडनमध्ये राहणं आम्हाला आवडायचं, आम्हा दोघांनाही नाटक आवडतं. त्यामुळे लंडन सर्वतोपरी आमच्यासाठी योग्य होतं. मी ऑक्सफर्डला जायचे आणि अजित त्याच्या कामासाठी. आमचं घर मोठं नव्हतं. पण अखेरीस आम्ही एकत्र राहायला लागलो होतो आणि ते महत्त्वाचं होतं. कारण सतत एकमेकांपासून दूर राहण्याचा मला कंटाळा आला होता. आमच्या अशा वेगवेगळं राहण्यात त्रास होता आणि एक प्रकारची मजा होती. मुख्य म्हणजे आमच्या आई-वडिलांनी कधीही त्यावर आक्षेप घेतला नाही. आमच्या प्रत्येक निर्णयाला दोन्ही घरांतून पाठिंबा होता.’’

लंडनमध्ये दोन वर्षे राहून २००० मध्ये भारतात परत आल्यानंतर, विदिताने टीआयएफआरमध्ये अर्ज केला आणि या महत्त्वाच्या वैज्ञानिक संशोधन संस्थेत फेलो, असिस्टंट प्रोफेसरच्या समकक्ष पद म्हणून नेमणूक झाली. त्यानंतरचा काळ विदितासाठी अतिशय महत्त्वाचा होता. ‘‘टीआयएफआरमध्ये संशोधनासाठी अतिशय उत्तम वातावरण आहे, तरुण संशोधकांना खूप प्रोत्साहन दिले जाते. इथे तुम्हाला संशोधनासाठी निधी देऊन तुमच्यावर अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी सतत दबाव ठेवला जात नाही. तुम्हाला मुक्तपणे काम करण्याची, स्वत:च्या कल्पना राबवण्याची पूर्ण मुभा असते. तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे संशोधनाचा दर्जा खरोखर उंचावतो. मला अवघ्या २९व्या वर्षी स्वत:ची लॅब सुरू करण्याची संधी मिळाली. वरिष्ठांकडून प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांच्या जोरावर आम्ही कामाला सुरुवात केली. चुका करण्याचे स्वातंत्र्य, केलेल्या चुकांमधून शिकण्याची प्रवृत्ती, सामूहिक जबाबदारी घेण्याची संस्कृती ही इथली वैशिष्टय़े आहेत. आम्ही सर्वजण एकमेकांचे यश साजरे करतो. त्यामुळे सगळ्यांची एकत्र वाढ होते. आतापर्यंत मला अनेक बक्षिसं, पुरस्कार मिळालेले आहेत, पण २०१५ मध्ये मिळालेला ‘शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार’ सर्वात महत्त्वाचा आहे. कारण तो सरकारकडून मिळालेला असतो. तुमच्यावर सरकारने केलेला खर्च योग्य होता, ही त्याची पावती असते. मला मिळालेल्या पुरस्कारामध्येही माझं एकटीचं यश नव्हतंच, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचा त्यामध्ये सहभाग होता.’’

विदिताने टीआयएफआरमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर गेल्या १७ वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये काय बदल दिसून येतात, या प्रश्नावर अजित सांगतात की, ‘‘काही फरक नक्कीच पडला आहे. आपण वयाच्या विशीमध्ये स्वत:च्या शिक्षणाकडे, प्रगतीकडे लक्ष देत असतो. एकदा आपल्याला हवं तितकं शिकून झालं की आपण स्वत:च्या प्रगतीकडून संस्थेच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला लागतो. आपली क्षितिजे रुंदावतात. विदिताच्या बाबतीतही असं म्हणता येईल. मी तिला भेटलो तेव्हा मी २२ वर्षांचा होतो. मला तर तिच्याशिवाय आयुष्य फारसे आठवत नाहीये. तिचे काही गुण जसे होते तसेच राहिले आहेत. ती अजूनही नवीन गोष्टींबाबत तितकीच उत्सुक असते. तिचं कुतूहल, उत्सुकता यामध्ये बदल झालेला नाही. तिला अजूनही सतत प्रश्न पडत असतात. टीआयएफआरला आल्यानंतर पहिली १० वर्षे तिची स्वत:ला घडवण्यात गेली. त्यानंतर तिचा ‘फोकस’ बदलला. आता तिचे सहकारी, तिची संस्था या गोष्टी तिच्यासाठी प्राधान्याने महत्त्वाच्या झाल्या आहेत. तिचे विद्यार्थी उत्तम कामगिरी करतात तेव्हा तिला खूप समाधान मिळतं. थोडक्यात, तिचा प्रवास ‘मी’कडून ‘आम्ही’कडे झालेला आहे.’’ विदिता हे बोलणं पुढे नेतात, ‘‘आपल्या एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या देशामध्ये शास्त्रज्ञांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे फक्त स्वत:चा विचार करण्यापेक्षा सामूहिक विचार करण्यात सगळ्यांचंच हित असतं.’’

व्यक्तिगत पातळीवरही हा कालावधी विदिता आणि अजित यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याबद्दल अजित यांनी सांगितलं की, ‘‘२००५मध्ये अलिनाचा जन्म झाला. त्यानंतर आमच्या आयुष्यात प्रचंड फरक पडला. अलिनाला आता आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. ती अगदी लहान असल्यापासून कधीही एकटी असणार नाही याची आम्ही काळजी घेतो. सुदैवाने आम्हा दोघांचेही पालक आमच्यापासून जवळच राहतात. त्यामुळे अलिनाजवळ आई किंवा वडील यांच्यापैकी किमान एकजण आणि दोघांनाही शक्य नसेल तर आजी-आजोबांपैकी कोणी तरी नक्की असतं. तिला कधीही शाळेतून रिकाम्या घरात परत यावं लागू नये, अशी आमची इच्छा असते. आणि आतापर्यंत एखाद-दोन प्रसंग सोडले तर तशी वेळ आलेली नाही. आता विदिताची एका संशोधकाबरोबरच एक आई म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. अलिना ७ महिन्यांची असताना विदिताला परदेशात एका महत्त्वाच्या व्याख्यानासाठी जायचे होते. त्याचवेळी माझ्या ऑफिसमध्येही खूप महत्त्वाचं काम सुरू होतं. मला माझ्या बॉसला मानावं लागेल, त्यांनी इतक्या अटीतटीच्या काळातही मला सुट्टी दिली. तेव्हा मला कामानिमित्त अनेकदा देशा-परदेशात प्रवास करायला लागायचा. पण त्या-त्या वेळी आम्ही ते जुळवून घेतलं. तेव्हा तो प्रश्न मोठा वाटायचा. पण त्यातून आम्ही वाट काढत गेलो.’’ त्याच दिवसांबद्दल विदिता त्यांना मिळालेल्या सल्ल्याबद्दल सांगतात, ‘‘अलिनाला लहानपणी घन पदार्थाची अ‍ॅलर्जी होती. अगदी भातसुद्धा सहन व्हायचा नाही. मला अनेकदा प्रवास करावा लागायचा, त्यावेळी अलिनाला एकटं कसं सोडायचं असा मला प्रश्न पडायचा. त्यावेळी मला एका अमेरिकी संशोधकांनी यातून मार्ग दाखवला, त्या वरिष्ठ सहकारी होत्या. माझी अडचण ऐकून घेतल्यानंतर त्यांनी मला अगदी सोप्या शब्दांमध्ये समजावून सांगितलं, ‘मुलं लहान असतात, त्यांना सहज आपल्यासोबत नेता येतं. त्यांना फक्त त्यांची आई त्यांच्याजवळ असायला हवी असते.’ त्यांच्या या सल्ल्यानंतर मी बिनधास्तपणे अलिनाला माझ्यासोबत न्यायला लागले. तेव्हा कधी माझी आई, कधी अजितची आई किंवा कधी अजित माझ्यासोबत यायचे. कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा होता आणि तो मला सतत मिळत राहिला, त्याबद्दल मी स्वत:ला सुदैवी समजते.’’

विदिता टीआयएफआरमध्ये एकेक पायरी चढत असताना, अजितनेही कॉर्पोरेट जगतात स्वत:ची जागा निर्माण केली. मात्र, कदाचित लहानपणापासून मिळालेल्या मूल्यांचा परिणाम म्हणून असेल, अजितने सामाजिक क्षेत्राकडे जायचा निर्णय घेतला आहे. ‘भल्यासाठी व्यवसाय’ हे त्याचं सूत्र आहे. व्यवसायातून नफा मिळवणे वाईट नाही, फक्त केलेल्या कामाचा फायदा जास्तीत जास्त लोकांना व्हावा असा त्यामागील हेतू आहे. या सूत्रावर सध्या अनेक छोटय़ा कंपन्या कार्यरत आहेत, अजित त्यांच्याबरोबर काम करत आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये असलेल्या मूल्य व्यवस्थांमुळे जात, प्रदेश असे मुद्दे कधीच आडवे आले नाहीत. अलिनाकडेही हाच वारसा जावा यासाठी दोघांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडे गणपती, नवरात्र, ओणम, दिवाळी, नाताळ, ईद असे अनेक सण उत्साहाने साजरे केले जातात. उदारमतवादी, बहुधर्मीय भारतीयत्वाचा वारसा पुढे सुरूच राहणार आहे..

– निमा पाटील

nima_patil@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2017 1:29 am

Web Title: articles in marathi on story of vidita vaidya and ajit mahadevan
Next Stories
1 सामाजिक दायित्व
2 प्रगल्भता नात्याची
3 कलेची साधना
Just Now!
X