मार्च महिना सुरु झाल्यापासून वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये होळीच्या सणानंतर उन्हाचा प्रभाव वाढत जातो असे म्हटले जाते. यंदा उन्हाळा अधिक तीव्र असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये वातावरणामध्ये कमालीची उष्णता असणार आहे. दरवर्षी उन्हाच्या कडक झळांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. उन्हाळ्यामध्ये पंखा, कूलर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. या व्यतिरिक्त एअर कंडिशनरचाही या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये तुलनेने जास्त वापर केला जातो. घरामध्ये एसी सुरु असताना त्यातून खूप पाणी बाहेर पडत असते. हे पाणी खराब आहे असे समजून अनेकजण ते फेकून देतात. पण एसीच्या मशीनमधून निघणारे पाणी फेकून देण्याऐवजी त्याचा इतर ठिकाणी वापर करता येतो. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होत असते. त्यामुळे घरामध्ये पाण्याची कमतरता भासू शकते. अशा वेळी एअर कंडिशनमधून बाहेर येणाऱ्या पाण्याचा वापर घरातल्या कामांमध्ये केला जाऊ शकतो. आणखी वाचा - तुमचा एसी किती ‘टन’चा आहे? एअर कंडिशनर खरेदी करताना ही माहिती असणे फायदेशीर ठरते का? जर तुमच्या घरी दिवसभर एसी सुरु असेल, तर त्याच्या पाईपमधून मुबलक प्रमाणामध्ये पाणी बाहेर येईल. हे पाणी पिण्यासाठी योग्य नसेल, तरी त्याचा वापर घरातील कपडे धुण्यासाठी करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त लादी पुसणे, गाडी (दुचाकी, चारचाकी) धुणे यासाठीही ते पाणी वापरले जाऊ शकते. बाथरुममध्येही याचा वापर केला जाऊ शकतो. काहीजण घरातील झाडांना हे पाणी घालतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचे अशुद्ध घटक नसल्याने झाडांवर याचा परिणाम होत नाही. उन्हाळ्यामध्ये पाणी वाया न घालवता या ट्रिक्स फॉलो करणे फायदेशीर ठरु शकते.