तंत्रज्ञानाचं जग जितकं अफाट बनत चाललंय तितकंच ते सर्वसामान्याच्या आवाक्यातही सहज येत चाललं आहे. झपाटय़ाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्या उत्पादनांमध्ये अंतर्भाव करून ग्राहकांना नवनवीन अनुभव देण्याची स्पर्धाच जणू कंपन्यांमध्ये लागली आहे. चष्म्यात बसवलेल्या स्क्रीनवर झळकणारे ईमेल्स आणि मेसेजेस, घडी करून ठेवता येण्यासारखा पेपर टॅब्लेट, तुम्ही भरभर जेवत असल्यास ‘अॅलर्ट’ करणारा काटा चमचा किंवा एखाद्या वस्तूची थ्रीडी प्रतिमा उभी करणारा प्रिंटर.. अशा एकाहून एक विलक्षण उत्पादनांनी तंत्रज्ञानाचं जग ‘जादुई’ बनत चाललं आहे. सरत्या वर्षांत अशाच काही उत्पादनांनी आपल्या ‘जादुई’ वैशिष्टय़ांनी ग्राहकांची मने जिंकली. त्यांची जादू बाजारात चालली किंवा फसली, पण नाविन्यपूर्ण प्रयोगांत या उत्पादनांनी बाजी मारली. अशाच काही उत्पादनांविषयी..

पेबल
एकेकाळी वेळ पाहण्यासाठी अवलंबून रहावे लागणाऱ्या घडय़ाळय़ांना मोबाइलमधील घडय़ाळय़ांनी डच्चू दिला. पण ती वेळ आता इतकी बदलली आहे की सध्याचे ‘स्मार्टफोन’ना पर्याय म्हणून ‘स्मार्टवॉच’ बाजारात झळकू लागले आहेत. स्मार्टफोन हातात बाळगण्यापासून आणि वारंवार त्याकडे लक्ष देण्यापासून सुटका करवणाऱ्या ‘स्मार्टवॉच’नी यंदाचं वर्ष चांगलंच गाजवलं आहे. पण यातही आघाडीवर आहे, ते पेबल. सॅमसंग आणि सोनीच्या स्मार्टवॉचना टक्कर देणारं हे स्मार्ट ‘घडय़ाळ’ सर्वात स्वस्त पर्याय आहे. आपला जड, मोठय़ा आकाराचा स्मार्टफोन खिशात ठेवून त्याचं सारं नियंत्रण ‘स्मार्टवॉच’वर सोडणं, यासारखं सुख सध्यातरी नसावं. येणारे कॉल्स, मेसेज, ईमेल्स आणि अन्य गोष्टींची सूचना फोन हातात नसतानाही मिळणं, हे नक्कीच उपयुक्त आहे.
किंमत: ९ हजार रुपये.

सॅमसंग कव्र्हड ओएलईडी आणि एलजीचा जी फ्लेक्स
फ्लॅट एलसीडी/एलईडी टीव्ही किंवा सपाट स्क्रीन असलेला उंची स्मार्टफोन हा सध्या तुमचा ‘स्टेटस सिम्बॉल’ असेल, तर तुम्ही थोडे मागेच आहात. कारण सॅमसंग आणि एलजीने चक्क वक्राकार टीव्ही आणि स्मार्टफोन आणून आणखी एक क्रांती घडवली आहे. शिकागोतील सीईएस प्रदर्शनात सॅमसंगने वक्राकार स्क्रीन असलेला ‘ओएलईडी’ मांडला आणि साऱ्यांचेच डोळे फिरले. सध्याच्या टीव्हीपेक्षा अधिक चांगला दृश्यानुभव देणारा आणि अधिक व्यापक दृश्य दाखवणारा ओएलईडी हे निश्चितच उद्याचे उत्पादन आहे. त्यापाठोपाठ एलजीने वक्राकार स्क्रीन असलेला स्मार्टफोन आणून या तंत्रज्ञानाला आणखी एका शिखरावर आणले. सॅमसंगचा जी फ्लेक्स म्हणजे सहा इंची एचडी डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. याच्या १३ मेगापिक्सेल कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे विलक्षण सजीव भासतात, अशी पावती तज्ज्ञांनी आधीच देऊन ठेवली आहे.

योटाफोन
‘डय़ुअल सिम’ म्हणजे दोन सिमकार्ड असलेल्या फोन्सनी बाजार ऊतू जातो आहे. पण ‘डय़ूअल स्क्रीन’च्या मोबाइलची संकल्पना म्हणजे अचाटच! अशा अचाट कल्पनेतूनच ‘योटाफोन’ने दोन स्क्रीन असलेला स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय बाजारांत आणला. रशियातील कंपनी असलेल्या योटाने ४०० युरो किमतीचा हा फोन ब्रिटन, स्पेन अशा निवडक देशांतील बाजारांत दाखल केला. स्मार्टफोनच्या पुढील बाजूस फोनची स्क्रीन आणि मागील बाजूस ‘ई-बुक्स’ वाचण्यासाठी वेगळी स्क्रीन अशी संकल्पना घेऊन आलेल्या योटाफोनला ग्राहक कमी मिळाले असले तरी या नव्या प्रयोगाने ‘डय़ूअल स्क्रीन’चे दार मोबाइल कंपन्यांना उघडले आहे. ‘ई बुक्स’ किंवा अन्य मजकूर वाचण्यासाठी लागणारी स्क्रीन स्वतंत्रपणे पुरवून स्मार्टफोनची बॅटरीक्षमता वाढवणे, हा योटाफोनच्या शोधामागील मुख्य हेतू आहे. बाहेरील देशांत पुस्तकांऐवजी ‘ई बुक्स’ना वाढत चाललेली मागणी आणि त्यातून ‘किंडल’ सारख्या ‘ई बुक रीडर’ उत्पादनांना मिळणारे यश खेचण्याचा ‘योटा’चा प्रयत्न फारसा यशस्वी नसला तरी स्तुत्य नक्कीच आहे. अँड्राइड जेली बिन ४.२.२वर चालणारा, १.७ गिगाहर्ट्झ प्रोसेसर, १३ मेगापिक्सेल कॅमेरा, २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटर्नल मेमरी असा नियमित वैशिष्टय़ांचा लवाजमा या फोनमध्ये आहेच. पण भारतात अजूनतरी या फोनचा उदय झालेला नाही.

सोनीचे लेन्स कॅमेरा
स्मार्टफोनला अधिक ‘स्मार्ट’ बनवण्यात एकीकडे कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच, त्यातील कॅमेऱ्याचा दर्जाही वाढवण्याचा अनेक कंपन्यांनी प्रयत्न केला. सॅमसंग, नोकिया यांच्या गॅलक्सी आणि लुमिया वर्गातील उच्चश्रेणीच्या स्मार्टफोन्सनी यावर्षी यात बाजी मारली. मात्र, सोनीने त्यांच्या एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांच्या हाती ‘लेन्स कॅमेरा’ सोपवला. सोनीने यावर्षी बाजारात आणलेल्या क्यूएएक्स १० आणि क्यूएक्स १०० या लेन्सनी स्मार्टफोनला उत्तम दर्जाच्या कॅमेऱ्यात रूपांतर केलं. कोणत्याही स्मार्टफोनला जोडून १८ ते २० मेगापिक्सेल कॅमेऱ्यासारखे फोटो काढण्याची सुविधा क्यूएक्स १० व क्यूएक्स १००ने उपलब्ध करून दिली. अँड्रॉइड आणि अॅपलच्या आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर चालू शकणाऱ्या या लेन्सनी नेहमीच्या कॅमेऱ्याची जागा कमी केलीच; शिवाय एलसीडी स्क्रीन आणि अन्य गोष्टींची आवश्यकता नसल्याने या क्षमतेच्या कॅमेऱ्याच्या तुलनेत ‘लेन्स कॅमेरा’ स्वस्त आहेत.
किंमत: क्यूएक्स १०- १२९९० रु., क्यूएक्स १०० – २४९९० रु.

पेपर टॅब
एकीकडे स्मार्टफोनचे वाढते आकार ग्राहकांना आकर्षित करत असताना टॅब्लेट पीसीची कमी होत चाललेली जाडी ग्राहकांच्या पसंतीचा विषय आहे. यातूनच अॅपलने यावर्षी आयपॅड एअर आणि आयपॅड मिनीची निर्मिती केली आणि त्याची धडाक्यात विक्रीही सुरू झाली. पण या टॅबनाही जड ठरवेल, असा पेपर टॅब (कागदाइतका पातळ) यावर्षी कॅनडातील क्वीन्स युनिव्हर्सिटी, इंटेल लॅब्स आणि प्लास्टिक लॉजिक यांनी एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडला. १०.७ इंची प्लास्टिक डिस्प्ले असलेल्या या पेपर टॅबमध्ये इंटेल कोअर आय५ प्रोसेसर असलेला ‘पेपर टॅब’ हा खरोखरच भविष्यातलं ‘गॅझेट’ आहे. वेगवेगळय़ा पेपर टॅबच्या साह्य़ाने हाताळता येणारा हा टॅब कसाही वाकवला, दुमडला किंवा आपटला तरी त्याला काही होत नाही. अर्थात अजून हे तंत्रज्ञान निर्मितावस्थेत आहे. पण पुढच्या वर्षी कदाचित खराखुरा पेपर टॅब ग्राहकांच्या हाती पडल्यास नवल नाही.