व्हॉट्सअ‍ॅप, लाइन, बीबीएम, स्काइप, फेसबुक, वुई चॅट अशा मोबाइल मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन्सनी ‘एसएमएस’ सेवेची अवस्था असून नसल्यासारखी केली आहे. मोफत, जलद आणि व्यापक अशी सेवा पुरवणाऱ्या या अ‍ॅप्लिकेशन्सनी ‘सोशल मेसेजिंग’ला तडका दिला आहेच पण त्याचबरोबर मोबाइल जगतात नवी स्पर्धाही सुरू केली आहे.
स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे २४ तास मोबाइलवर ‘ऑनलाइन’ असणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. याचे सर्वाधिक श्रेय कुणाला जात असेल तर ते, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यांसारख्या चॅट किंवा मेसेजिंग सव्‍‌र्हिसेसना. एकही दमडी न मोजता एक-दोन नव्हे तर पन्नासेक मित्रांशी एकाच वेळी गप्पा मारायला मिळत असल्याने पाहावं तेव्हा प्रत्येकाच्या स्मार्टफोनवर ‘चॅट नोटिफिकेशन’ डोकावत असतं. एरवी वेळ मिळेल तेव्हा कट्टय़ावर जमून रंगवले जाणारे गप्पांचे फड आता या मोबाइल चॅट सव्‍‌र्हिसेसवर रंगताहेत. दिवसातल्या कोणत्याही वेळी, आपली कामं करता करता होणाऱ्या या गप्पाटप्पांना भलतीच पसंती मिळत असल्याने अशी सुविधा पुरविणाऱ्या ‘मेसेजिंग सव्‍‌र्हिसेस’ना सुकाळ आला आहे. आतापर्यंत ‘व्हॉट्सअ‍ॅप’पुरतेच मर्यादित असलेले हे क्षेत्र आता ‘लाइन, वुई चॅट, चॅट ऑन, हाइक’ या अ‍ॅप्लिकेशन्समुळे चांगलेच विस्तारले आहे. तर ‘ब्लॅकबेरी’च्या ‘बीबीएम’ने या बाजारात नव्या दमाने उतरून काही दिवसांतच आपला दबदबा निर्माण केला आहे आणि आता फेसबुकनेही खास मोबाइल वापरकर्त्यांसाठी ‘फेसबुक मेसेंजर’ नव्या रूपात दाखल केल्याने ही स्पर्धा आता आणखी कट्टर बनली आहे.
मोबाइल मेसेजिंग क्षेत्रातला सर्वात मोठा भिडू म्हणून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची ओळख आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या आधीही मोबाइलवरील इन्स्टंट मेसेजिंगसाठी अनेक अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध होते. गुगल चॅट आणि फेसबुक मेसेंजर या दोन अ‍ॅप्लिकेशनच्या साह्य़ाने अनुक्रमे जीमेल आणि फेसबुकवरील मित्रमंडळींशी चॅटिंग करणे शक्य होते, तर स्काइप, ई बडी, स्नुप्टू असे अ‍ॅप्लिकेशनही उपलब्ध होते. या अ‍ॅप्लिकेशनचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत होता, मात्र मोबाइलमधील ‘एसएमएस’ सुविधेला पर्याय म्हणून त्याकडे कधी पाहिले गेले नाही.  २००९मध्ये लाँच झालेल्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने हे चित्र बदलले. मोबाइल नंबरच्या आधारे अकाऊंट बनवून (हे अ‍ॅप्लिकेशन वापरणाऱ्या) मोबाइलमधील कॉन्टॅक्टसशी केवळ मजकूरच नव्हे तर ईमेज, व्हिडीओ, ऑडिओ पद्धतीने संवाद साधण्याची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपने दिली. व्हॉट्सअ‍ॅपची ‘महती’ सांगत बसण्याची गरज नाही, कारण एव्हाना ते प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या मोबाइलमध्ये दिसते. ताज्या आकडेवारीनुसार ऑगस्ट २०१३पर्यंत जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे ३५ कोटी मासिक सक्रिय वापरकत्रे (मंथली अ‍ॅक्टिव्ह यूजर्स) होते. म्हणजे, जवळपास ३५ कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा नियमित वापर करतात. तर भारतात हाच आकडा जवळपास ३ कोटींच्या आसपास आहे. सोशल नेटवìकग आणि मोबाइल मेसेजिंग क्षेत्रात ही आकडेवारी लक्षणीय आहे. अन्य एका आकडेवारीनुसार व्हॉट्सअ‍ॅपवरून दररोज ४० कोटी फोटो आणि १० अब्ज मॅसेजेसची देवाणघेवाण होते.
व्हॉट्सअ‍ॅपची ही भरभराट लक्षात आल्यानंतर आता बाजारात मोबाइल मेसेजिंग अ‍ॅप्सची रांगच लागली आहे. लाइन, वायबर, वुई चॅट, चॅट ऑन, ग्रुप मी, हाइक अशा असंख्य अ‍ॅप्सची बाजारात सध्या चलती आहे. व्हॉट्सअ‍ॅपची भरभराट सुरू असतानाच या अ‍ॅप्लिकेशन्सनीही आपली जागा बनवण्यास सुरुवात केली आहे. लाइन (४ कोटी), वायबर (५ कोटी) ही यात आघाडीवर असलेली नावे आहेत. लाइनने तर भारतातही दणक्यात सुरुवात केली असून अभिनेत्री कॅटरिना कैफला ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसेडर नेमून तरुणवर्गाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आता या स्पध्रेत नव्या दमाने उतरलेल्या दोन जुन्या भिडूंची भर पडली आहे. आतापर्यंत केवळ ‘ब्लॅकबेरी’च्या हॅण्डसेटवरच उपलब्ध असलेल्या ‘बीबीएम’ने अलीकडेच अ‍ॅण्ड्रॉइड आणि आयफोनवरही आपली मेसेजिंग सेवा सुरू केली आहे. मात्र, अल्पावधीतच हे अ‍ॅप्लिकेशन अन्य अ‍ॅप्सना मागे टाकत पुढे निघाले आहे. बीबीएम सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवडय़ात अ‍ॅण्ड्राइड व आयओएस प्लॅटफॉर्मवर आधारित बीबीएमच्या वापरकर्त्यांची संख्या दोन कोटींवर गेली. त्यामुळे अल्पावधीतच बीबीएम वापरणाऱ्यांची संख्या आठ कोटींवर पोहोचली आहे. एवढेच नव्हे तर २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि ब्रिटनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपपेक्षाही ‘बीबीएम’ अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचे दिसून आले.
व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनची चलती पाहून सोशल नेटवìकग क्षेत्रातील ‘बाप’ असलेल्या फेसबुकनेही आपल्या ‘मेसेंजर’ अ‍ॅप्लिकेशनचे रंगरूप बदलून ते या स्पध्रेत उतरवले आहे. फेसबुकचे भारतात सध्या ८ कोटी २० लाख वापरकत्रे आहेत. मात्र, ही आकडेवारी मोबाइल आणि कॉम्प्युटर या दोन्हींवरून फेसबुक वापरणाऱ्यांची आहे. आता फेसबुकने केवळ मोबाइल वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी मेसेंजर सुविधा आणली आहे. या सुविधेनुसार, फेसबुकच्या वापरकर्त्यांबरोबरच मोबाइलमधील अन्य कॉन्टॅक्टसनाही मेसेंजरवरून संवाद साधता येणार आहे. बाकीच्या मोबाइल मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनमध्ये असलेल्या सर्व सुविधा फेसबुकने या अ‍ॅप्लिकेशनमध्ये पुरवल्या आहेत. मात्र, त्याला कितपत यश मिळेल, हे येत्या काळातच दिसून येईल.