तांत्रिक प्रगतीमधून ग्राहकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यामध्ये भारत गेल्या काही दशकांपासून अग्रस्थानी राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया / मेक इन इंडिया’ मोहिमेमुळे व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यापक आमूलाग्र बदल होत आहेत. आयटी बाजारपेठेमध्ये मोठय़ा प्रमाणात प्रगती होताना दिसत आहे.

सर्व नागरिकांना तंत्रज्ञान उपलब्ध करून देऊन भारताला तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सक्षम करण्याची हमी ‘डिजिटल इंडिया’मुळे मिळाली आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल चलनाच्या अवलंबतेने स्मार्टफोनसंदर्भात नवीन बदल घडवून आणले. बाजारपेठेमध्ये मागणी वाढू लागली, ४जी ला अधिकाधिक पसंती मिळू लागली आणि डिजिटल चलनाच्या वाढीसह स्मार्टफोन्ससाठी मागणी मोठय़ा प्रमाणात वाढू लागली. यंदाच्या वर्षांतसुद्धा ईकॉमर्स क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याचे निदर्शनास आले आहे. वापरकर्ते इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि स्मार्टफोनना अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत. बाजारपेठेमधील फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन यांसारख्या प्रसिद्ध ब्रॅण्डसह अन्य उत्पादनांचा शोध घेण्यासाठी, सेवासुविधा, व्यवहार करण्यासाठी स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर होऊ लागला आहे. बँकांशी संबंधित व्यवहारही आता ऑनलाइन व स्मार्टफोनवरून होऊ लागले आहेत. २०१७ मध्ये ६० टक्के ग्राहक त्यांच्या बँक खात्यामधील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी, नुकतेच केलेले व्यवहार पाहण्यासाठी, देयके भरण्यासाठी किंवा निधी हस्तांतरित करण्यासाठी मोबाइलचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. हा ट्रेण्ड आगामी काळात आणखी वाढणार आहे.

‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ हादेखील आगामी काळातील महत्त्वाचा घटक आहे. गेल्या काही वर्षांत मोबाइलच्या तंत्रज्ञानात प्रचंड बदल होत गेले आहेत आणि हा कल आता स्मार्टफोनच्या पुढे ‘आयओटी’ अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्जपर्यंत पोहोचला आहे. ‘आयओटी’वर आधारित सुविधा शहरी भारतापुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. तर, ग्रामीण भागातही यांचा प्रभाव जाणवू लागला आहे. सरकारने देशभरात स्मार्ट शहरे निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याचा साधासरळ अर्थ हा की शहरांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यात व नागरिकांना सेवा देण्यात आयटी कंपन्यांची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळे ‘आयओटी’चा विस्तार येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

वाढत्या विकासासह डिजिटल युगामध्ये सुरक्षिततेलाही महत्त्व दिले जात आहे. गोपनीय सरकारी माहितीपासून तुमचा वैयक्तिक युजरनेम व पासवर्ड सर्वकाही महत्त्वाचे आहेत आणि हॅकर्स व ऑनलाइन फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण झाले पाहिजे. अशा विश्वसनीय डिजिटल सिक्युरिटीसाठी बायो-मेटिंग सिस्टम्स व इतर युनिक तंत्रज्ञाने विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानांमुळे नवीन व्यवसाय मॉडेल्सबाबत विचार करणे शक्य झाले आहे आणि अनेक नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच यासोबत अनेक धोकेसुद्धा निर्माण झाले आहेत. स्मार्टफोनचा वाढता वापर, ४जी तंत्रज्ञानाचा अवलंब, व्यापक वितरण, नावीन्यतेच्या वापराला चालना यांसह मोबाइल व्हिडीओचासुद्धा विकास होत आहे. सर्व मोबाइल ट्रॅफिकच्या दोनतृतीयांश भाग मोबाइल व्हिडीओशी संबंधित आहे. जाहिरातदार अर्ध्याहून अधिक जाहिराती ऑनलाइन दाखवीत आहेत.

भारत ही गतिशील बाजारपेठ आहे. चीननंतर ही दुसरी सर्वात मोठी मोबाइल फोन बाजारपेठ आहे, जी सर्वाधिक संधी देते. विकसित देशांमध्ये स्मार्टफोनसंदर्भात अधिक सुरक्षितता दिसण्यात येत असताना आता विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या विकसित देशांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

– दीपक काबू

लेखक झिऑक्स मोबाइल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.