News Flash

जुनं ते सोनं

जुनं व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी त्या अ‍ॅपची एपीके फाइल डाऊनलोड करावी लागते

बहुतांश वेळा स्मार्टफोनमध्ये असलेले अ‍ॅप्स हे आपोआप अपडेट होतात.

नावीन्याची हौस साऱ्यांनाच असते. तंत्रज्ञानाच्या दुनियेत तर नावीन्यालाच किंमत आणि प्रसिद्धी. एक वर्ष जुनं हार्डवेअर असो की एक आठवडा जुनं अ‍ॅप, सगळ्यांसाठी एकच नियम आणि तो म्हणजे – जुने जाऊ  द्या मरणा लागुनि, जाळुनि अथवा पुरुनि टाका. नव्याचे नऊ  दिवस या म्हणीचा प्रत्यय तंत्रज्ञानाइतका चपखल दुसऱ्या कुठल्याच क्षेत्राला लागू होत नसावा. नित्यनव्या निर्मितीमुळे काल-परवाचं गॅजेटही भंगारात जातं. पण मुद्दा असा आहे की, जे जे नवं ते ते हवं असं काही प्रत्येक वेळी होईलच असं नाही.

म्हणजे, अनेकदा कसं होतं की नवीन अ‍ॅप किंवा फोनचं मॉडेल घेतलं जातं. नवीन फीचर्सचा मोह आवरता न आल्याने किंवा गरज म्हणून ते आत्मसातही केलं जातं. पण मग कालांतराने असं वाटू लागतं की यापेक्षा आधी जे होतं तेच बरं होतं. काही वेळेला आधीच्या व्हर्जन किंवा प्रतिमध्ये जी फीचर्स, वैशिष्टय़ं होती ती नव्या गुणवैशिष्टय़ांपेक्षा अधिक उपयुक्त असतात. अशा वेळेस मग अडचण होऊन बसते. हार्डवेअरपेक्षा अ‍ॅप्सच्या बाबतीत हा प्रकार अनेकदा होतो. बहुतांश वेळा स्मार्टफोनमध्ये असलेले अ‍ॅप्स हे आपोआप अपडेट होतात. खरं तर ते तसे अपडेट व्हावेत असं सेटिंग केलेलं असतं म्हणूनच ते होतात.

ऑटोअपडेट बंद करायचे असेल तर हे करा

१. गुगल प्ले स्टोअर उघडा

२. मेन्यूवर टॅप करा आणि सेटिंग्जमध्ये जा.

३. आणि ऑटो अपडेट अ‍ॅप्सवर क्लिक करा.

४. जर का मोबाइल डेटाची काळजी वाटत असेल तर अपडेट ऑन वायफाय ओन्ली असा पर्याय असतो. त्यावर क्लिक करा.

५. जी अ‍ॅप्स तुम्हाला ऑटोअपडेट व्हावीत असं वाटत असेल तर ती बघा

६. तिथे ‘अलाऊ ऑटोमॅटिक अपडेटिंग’वर क्लिक करा.

ऑटोअपडेट नकोच असेल तर तसाही पर्याय तिथे दिलेला असतो.

असो, तर सांगायचा मुद्दा हा की, एखादं अ‍ॅप आपल्या मर्जीनुसार अपडेट झालं तरी नंतर पूर्वीचंच बरं होतं असं वाटू शकतं. अशा वेळी काय करायचं? त्यासाठी एक मार्ग आहे. पण तो सांगण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात असू द्या की, असं करणं स्तुत्य नाही. याचं कारण म्हणजे नवीन अपडेट्स हे फक्त फीचर्सपुरतेच मर्यादित नसतात, तर त्यासोबत सुरक्षेबाबतचेही अपडेट्स इन्स्टॉल होत असतात. त्यामुळे जुनं व्हर्जन पुन्हा इन्स्टॉल करण्याआधी ही बाब लक्षात असू द्या. कारण पर्यायाने स्मार्टफोनच्या सुरक्षेशी तडजोड होण्याची शक्यता असते.

जुनं व्हर्जन डाऊनलोड करण्यासाठी त्या अ‍ॅपची एपीके फाइल डाऊनलोड करावी लागते. आणि ती फाइल अ‍ॅपस्टोअरमध्ये मिळत नाही. काही महिन्यांपूर्वी आलेला पोकेमॉन गो हा गेम अनेक देशांमध्ये लाँच झाला नाही. पण त्याची एपीके फाइल उपलब्ध असल्यामुळे अ‍ॅपस्टोअरमध्ये नसतानाही बहुतांश देशांमधली तरुणाई पोकेमॉन शोधत गावभर हिंडत होती. एक्स्टर्नल सोर्स म्हणजे इतरत्र कुठून तरी ती फाइल मिळवावी लागते.

’ सर्वप्रथम अशा प्रकारची फाइल इन्स्टॉल करण्यासाठी मोबाइलकडून परवानगी लागते. ती मिळवण्यासाठी स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये सिक्युरिटीमध्ये जा. आणि अलाऊ इस्टॉलेशन ऑफ अननोन अ‍ॅप्स हा पर्याय टिक करा किंवा निवडा.

’  पुढची पायरी म्हणजे हव्या असलेल्या अ‍ॅपची एपीके फाइल मिळवणं. यासाठीचा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासू स्रोत म्हणजे एपीकेमिरर ही वेबसाइट. ही वेबसाइट अप टू डेट असते आणि तिथे असंख्य अ‍ॅप्सच्या वेगवेगळ्या व्हर्जन्सच्या एपीके फाइल्स सहज मिळतात. तुम्हाला हवं असलेलं अ‍ॅप आणि त्याच्या व्हर्जनचा नंबर शोधायचा आणि ती फाइल डाऊनलोड करायची.

’ जर का स्मार्टफोनमधूनच ही फाइल डाऊनलोड केली असेल तर थेट इन्स्टॉल करता येऊ  शकते. अन्यथा लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधून स्मार्टफोनमध्ये ती फाइल कॉपी करा आणि मग इन्स्टॉल करा. झालं काम.

अनेकदा जुनं व्हर्जन इन्स्टॉल केल्यानंतर लगेचच ते अपडेट व्हायला लागतं. आणि हे होण्यामागचं कारण म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे ऑटोअपडेट. त्यामुळे तो पर्याय बंद केला आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासा. ज्या अ‍ॅपचं जुनं व्हर्जन इन्स्टॉल केलेलं आहे त्या विशिष्ट अ‍ॅपसाठी ऑटोअपडेटचा पर्याय बंद ठेवा.

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2017 4:25 am

Web Title: useful information about mobile app
Next Stories
1 बॅटरी वापरा जपून..
2 संरक्षण समाजमाध्यमांचे
3 ‘थर्मल’ कॅमेऱ्याचा पहिला स्मार्टफोन भारतात
Just Now!
X