04 March 2021

News Flash

अस्सं कस्सं? : पॉडकास्टचं माहात्म्य!

‘ब्रॉडकास्ट’ आणि ‘आयपॉड’ या दोन शब्दांच्या सरमिसळतीतून पॉडकास्ट हा शब्द तयार झाला.

‘पॉडकास्ट’ हा शब्द तसा नेहमीच्या वापरातला नाही. स्मार्टफोन, अ‍ॅप्स, रॅम, प्रोसेसर वगैरे संज्ञा जितक्या सर्रास वापरल्या जातात तितका सर्रास पॉडकास्ट वापरला जात नाही. त्यामुळे हा नेमका प्रकार आहे तरी काय हे जाणून घेण्याच्या भानगडीत फारसं कुणी पडत नाही. अज्ञानात असणारं सुख कुणी सहजासहजी दूर लोटत नाही; पण हे जाणून मिळालेल्या ज्ञानाचा आनंद जरा हटके आहे, कारण ‘पॉडकास्ट’ ही संकल्पनाच मुळात रंजक आहे.

‘ब्रॉडकास्ट’ आणि ‘आयपॉड’ या दोन शब्दांच्या सरमिसळतीतून पॉडकास्ट हा शब्द तयार झाला. विशेष म्हणजे हा शब्द अ‍ॅपलने जन्माला घातला नाही, तर टेक्नोफ्रीक आणि टेकसॅव्ही पब्लिकनेच त्याची निर्मिती केली. रेडिओवर ज्या पद्धतीचे कार्यक्रम असतात अगदी तसेच कार्यक्रम पॉडकास्टवर असतात. रेडिओ हे बऱ्याच अंशी थेट प्रक्षेपणाचं माध्यम आहे. अर्थात काही कार्यक्रम हे प्री-रेकॉर्डेड असतात. ‘पॉडकास्ट’च्या बाबतीत म्हणजे सगळेच्या सगळे कार्यक्रम हे प्री-रेकॉर्डेड असतात.

सकाळी उठल्यावर, जीममध्ये, गाडी चालवताना किंवा ऑफिसला जाताना रेडिओ, गाणी सर्रास ऐकली जातात. त्यावरचे कार्यक्रमही लोकप्रिय असतात. स्वत:चा रेडिओ सुरू करणं ही जरा खर्चीक पद्धत आहे. त्यामुळे स्वत:च्या डोक्यात काही संकल्पना असल्या तरी त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. याउलट पॉडकास्ट हे अत्यंत सोपं माध्यम आहे. रेडिओसदृश कार्यक्रम घरच्या घरी रेकॉर्ड करून ते जगाला ऐकवता येतात. पॉडकास्टिंगसाठी आवश्यक असणाऱ्या तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कॉम्प्युटर, मायक्रोफोन आणि इंटरनेट. या मूलभूत गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही स्वत:चे शो पॉडकास्ट करू शकता. रेडिओवर लागणाऱ्या कार्यक्रमांचे प्रकार हे ठरलेले असतात. त्यामुळे कुठलंही रेडिओ स्टेशन लावलं तरी थोडय़ाफार फरकाने त्याच पद्धतीचे कार्यक्रम सुरू असतात. याउलट पॉडकास्टमध्ये विषयांचं वैविध्य फार असतं. त्याशिवाय तुमच्या-आमच्यासारखेच लोक हे कार्यक्रम बनवत असल्यामुळे अनेकदा त्याला पर्सनल टच असतो.

सिनेमा, राजकारण, सायन्स-टेक्नॉलॉजी, संगीत, स्पोर्ट्स अशा अनेक विषयांचे पॉडकास्ट नेटवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे कंटेट ब्रॉडकास्ट करण्यासाठी स्टुडिओची गरज नाही. घरच्या घरी, गाडीमध्ये, ऑफिसातून, एखाद्या इव्हेंटच्या ठिकाणाहूनही पॉडकास्टिंग सहज शक्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे रेडिओवरचे कार्यक्रम हे पुन्हा ऐकण्याची सुविधा नाही. एखादा कार्यक्रम आवडला आणि तो पुन्हा ऐकावासा वाटला तर तशी काहीही सोय नाही. पॉडकास्टचं वैशिष्टय़ हे की, आपल्या आवडीचे शो आपण डाऊनलोड करून ऐकू शकतो. कधीही कुठेही आणि कितीही वेळा.

डेव्हिड विनर आणि अ‍ॅडम करी या दोन अवलियांच्या डोक्यातून पॉडकास्टची संकल्पना निघाली. लोकांना सहजरीत्या ऑडिओ कंटेंट बनवता यावं आणि श्रोत्यांकडे असणाऱ्या डिव्हाइसेसमध्ये ते आपोआप डाऊनलोड व्हावं या कल्पनेने त्याला भुरळ घातली. डेव्हिडकडे फीडिंग (आरएसएस फीडसारखी) टेक्नॉलॉजी होती. दोघांनी एकत्र येऊन पॉडकास्टिंगला सुरुवात केली. पॉडकास्ट ही एक ऑडिओ फाइल असते जी आपल्याकडे असणाऱ्या एमपी३ किंवा स्मार्टफोन्समध्ये आपोआप डाऊनलोड होते. अर्थात त्यासाठी सबस्क्राइब करण्याची आवश्यकता असते. आरएसएस फीड ज्या पद्धतीने काम करतात तेच हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा एखादा प्रॉडकास्टर शो प्रोडय़ूस करतो तेव्हा तो एमपी३मध्ये आपोआप डाऊनलोड होतो. प्रत्येक वेळी नव्या शोसाठी इंटरनेटवर जाऊन शोधाशोध करायची नसते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण एखादं मासिक सबस्क्राइब करतो आणि मग दर महिन्याला ते मासिक आपल्याला घरपोच मिळतं. अगदी तसाच आहे हा प्रकार. ज्याप्रमाणे टीव्ही कलाकार, रेडिओ जॉकी, स्तंभलेखक प्रसिद्ध होतात तसंच पॉडकास्टरही लोकप्रिय होत असतात. स्टारडम हे या नव्या माध्यमातही आहे.

इंटरनेटवर जाऊन लोकप्रिय पॉडकास्ट कोणते याचा सर्च करायचा आणि आपल्या आवडीचे पॉडकास्ट सबस्क्राइब करायचं. प्रॉडकास्ट मिनिट, रिव्हिजनिस्ट हिस्ट्री, टेड रेडिओ अवर, स्टफ यू शूड नो, सायन्स व्हर्सेस असे एकापेक्षा एक सरस पॉडकास्ट नेटवर मोफत उपलब्ध आहेत. माझं अस्तित्व, ध्वनीसारखे काही मराठी पॉडकास्टही आहेत. त्यामुळे जर का तुम्हाला रेडिओवरच्या त्याच त्याच कार्यक्रमांचा वीट आला असेल तर पॉडकास्टच्या दुनियेची एक सैर करायला काहीच हरकत नाही.

पुष्कर सामंत – pushkar.samant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 1:07 am

Web Title: what is a podcast
Next Stories
1 अॅपची शाळा : खेळातून ज्ञानरंजन
2 भारतीयांचा भर मोबाइल गेमवर
3 झोपोचा ‘स्पीड ८’ बाजारात
Just Now!
X