News Flash

मुजोर रिक्षाचालकांची तक्रार करायची कुठे?

वसई-विरार शहरात रिक्षांना मीटरसक्ती असूनही रिक्षाचालकांनी मीटर लावलेले नाही.

वाहतूक पोलीस, आरटीओची हेल्पलाइन अस्तित्वातच नाहीत

वसई-विरार शहरात मनामनी भाडे आकारणी करून रिक्षाचालकांनी सर्वसामान्य प्रवाशांची लूट चालवली आहे. मात्र त्यांच्याविरोधात तक्रारीही करता येत नाही. कारण तक्रारींसाठी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) हेल्पलाइन अस्तित्वात नसल्याचे उघड झाले आहे. दोन्ही विभागांमधील दूरध्वनी सेवाही अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मुजोर रिक्षाचालकांची दादागिरी निमूटपणे सहन करावी लागत आहे. भाडय़ांचे दरपत्रक ठेवणे बंधनकारक असताना रिक्षाचालक ते बाळगत नाहीत आणि प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत आहेत.

वसई-विरार शहरात रिक्षांना मीटरसक्ती असूनही रिक्षाचालकांनी मीटर लावलेले नाही. त्यामुळे वसईत शेअर आणि स्पेशल रिक्षा असे दर आकारून रिक्षा चालत असते. रिक्षांसाठी मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दर निश्चित करून दिले आहेत. त्या दरानुसार दर आकारणी करायची असते, मात्र तरीही हे रिक्षाचालक मनमानी पद्धतीने दर आकारून रिक्षाचालकांची दिशाभूल करत असतात.

गुरुवारी एका प्रवाशाला रिक्षाचालकाने वसई रेल्वे स्थानक ते काली माता मंदिर हे अंतर २४ रुपयांचे असताना जास्त भाडे आकारले. दरपत्रक मागितल्यावर ते घरी राहिल्याचे कारण दिले आणि युनियनकडे जाण्याची धमकी दिली, तसेच इतर रिक्षाचालकांना बोलावून दबाव टाकला. याबाबत माणिकपूर पोलिसांकडे तक्रार केली असता वाहतूक पोलिसांकडे जा, असा सल्ला देण्यात आला. परंतु वाहतूक पोलिसांची तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाची हेल्पलाइन अस्तित्वात नसल्याने तसेच लॅण्डलाइनचे दूरध्वनी बंद असल्याने तात्काळ तक्रार करता आली नाही.

रिक्षाचालकांच्या मुजोरीविरोधात काय कराल?

  • जर जास्त भाडे आकारले तर दरपत्रकाची मागणी करा. प्रत्येक रिक्षाचालकाने दरपत्रक बाळगणे बंधनकारक आहे. ते नसले तर एक रुपयाही भाडे देऊ नका.
  • आरटीओच्या mh48drtovasai@gmail.com या ई-मेलवर तक्रारी करा. संबंधित चालकांवर काय कारवाई झाली. त्याची माहिती तक्रारदाराला कळविण्यात येते.
  • कुणी दरपत्रक दाखवले नाही किंवा जास्त भाडे आकारले तर पाच दिवस संबंधित रिक्षाचालकाचा परवाना रद्द करून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येतो.

या क्रमांकावर तक्रारी करा

  • रणजीत पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई वाहतूक विभाग : ९८७०२५७५२५
  • विजय खेतले, अध्यक्ष, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना : ९३७०१८८४६५

जास्त बिल आल्याने आमचा लॅण्डलाइन दूरध्वनी बंद आहे. मनमानी भाडे आकारले तर कारवाई करत असतो.

रणजीत पवार, वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख, वसई

प्रत्येक रिक्षाचालकांनी दरपत्रक बाळगणे बंधनकारक आहे. रिक्षाचालक ते बाळगत नाही. युनियनच्या नावाने कुणी धमकी दिल्यास आमच्याकडे तक्रार करावी.

विजय खेतले, अध्यक्ष, ऑटोरिक्षा चालकमालक संघटना.

आमच्याकडे सध्या हेल्पलाइन क्रमांक नसला तरी परिवहन खात्याचा ई-मेल आहे. प्रवाशांनी तक्रारी केल्यास तात्काळ दखल घेऊन कारवाई करू.

अभय देशपांडे, वसईविरार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:16 am

Web Title: auto rickshaw issue in vasai
Next Stories
1 चिंचणीमध्ये लाल मानेच्या फलारोपचे दर्शन
2 ठाण्यात आजपासून दूधविक्री बंदीची शक्यता
3 एकनाथ शिंदे यांच्या पुत्राच्या विवाहात चलनउधळण
Just Now!
X