ठाणे महापालिकेचा निर्णय
रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरविण्यावर भर
गावापासून शहरीकरणापर्यंत फोफावत गेल्यानंतरही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेले दिवावासीय अनधिकृत मार्गाने नळजोडण्या घेऊन आपली तहान भागवत आहेत. याचा परिणाम ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा नियोजनावर होऊ लागल्यानंतर अखेर महापालिकेला जाग आली आहे. दिवा भागातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन योग्य प्रकारे व्हावे आणि अधिकृत नळजोडणीधारकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिव्यातील अनधिकृत नळजोडण्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक रहिवाशी यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दिव्यातील नागरी समस्यांसंबंधी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी एक बैठक घेतली. या बैठकीला आमदार सुभाष भोईर, स्थानिक रहिवाशी, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रतन अवसरमोल, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, धनंजय गोसावी, साहाय्यक आयुक्त दयानंद गोरे आदी उपस्थित होते. ही बैठक जवळपास तीन तास सुरू होती. गेल्या काही वर्षांत दिवा परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिल्याने या भागात लोकवस्ती वाढली आहे. यामुळे महापालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांवर त्याचा ताण पडू लागला आहे. महापालिकेमार्फत पूर्वी पाच दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत तो अपुरा पडू लागला होता. त्यामुळे या पाणीपुरवठय़ामध्ये वाढ करून तो १२ दशलक्ष लिटर इतका करण्यात आला. असे असले तरी या भागात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत नळजोडण्या असल्याने तेथील पाणीपुरवठय़ावर परिणाम होत आहे. या पाश्र्वभूमीवर अनधिकृत नळजोडण्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांमधून पुढे येताच आयुक्त जयस्वाल यांनी त्याविरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला. या निर्णयामुळे अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत नळजोडणीधारकांना पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे, असा महापालिकेचा दावा आहे.
नागरी सुविधांना प्राधान्य
खर्डी-आगासन परिसरामध्ये उद्यान आणि खुली व्यायामशाळा बांधणे, शीळफाटा परिसरात आरोग्य केंद्र उभे करणे, शीळफाटा आणि दिवा परिसरामध्ये अग्निशमन केंद्र उभे करणे, चुहा ब्रिज ते साबे, आगासन रस्ता बांधणे आदी कामांना प्राधान्य देण्याबाबतचा निर्णयही आयुक्त जयस्वाल यांनी या बैठकीत घेतला. तसेच शीळफाटा जंक्शन, कल्याण जंक्शन येथे मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामध्ये बाधित लोकांच्या पुनर्वसनाबाबत महापालिका जबाबदारी घेण्याचा निर्णय या बैठकीत झाला.