पालिकेची दुरुस्तीची परवानगी नाही. बांधकाम तज्ज्ञाचा (आरसीसी कन्सलटन्ट) सल्ला न घेता इमारतीच्या तळमजल्याच्या खांबांच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने डोंबिवली पूर्वेतील धनाजी नानाजी शाळेजवळील ओम शिव गणेश इमारत सोमवारी संध्याकाळी खचली. दुरुस्तीचे कोणतेही निकष न पाळता हे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे बांधकाम तज्ज्ञांनी सांगितले. इमारत खचल्यामुळे या इमारतीमधील २३ कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.

‘डीएनसी’ शाळेजवळ ओम शिव गणेश २५ वर्षांपूर्वी बांधलेली तीन माळ्याची इमारत आहे. या इमारतीच्या बाहेरील दुरुस्तीचे काम गेल्या महिन्यापासून सुरू आहे. इमारतीच्या तळमजल्याला वाहनतळ आहे. सिमेंटच्या खांबांवर इमारत उभी आहे. या खांबांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून सुरू होते. हे काम करण्यापूर्वी तळमजल्याच्या छताला लोखंडी टेकू देणे आवश्यक होते. ते न देताच खांबांच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले. एकाच ठिकाणचे खांब दुरुस्त करण्यात आल्याने इमारतीचा भार ते सहन करू शकले नाहीत. हादरे देत इमारत खचली. अचानक आवाज झाल्याने रहिवासी घरातून बाहेर आले. इमारतीच्या बाहेरील भागाला तडे गेले आहेत.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, सभापती राहुल दामले यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

पालिकेचे सल्लागार स्ट्रक्चरल अभियंता माधव चिकोडी यांचा सल्ला घेऊन मंगळवारी या इमारतीसंदर्भात काय करायचे याचा निर्णय प्रशासन घेईल. सध्या या इमारतीत कोणाही रहिवाशाला प्रवेश देण्यात येणार नाही.

परशुराम कुमावत, प्रभाग अधिकारी