ठाण्यात दुपारनंतर वर्दळ कमी; ‘टीएमटी’त इतर प्रवाशांचाही प्रवास

ठाणे, कल्याण, बदलापूर : करोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधानंतरही ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात शुक्रवारी सकाळी नागरिकांचा संचार सुरूच असल्याचे चित्र होते. ठाणे महापालिकेच्या टीएमटी बसगाड्यांमध्येही अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांचाही प्रवास सुरूच होता. अनेकजण त्यांची खासगी वाहने घेऊन खरेदीसाठी बाहेर पडले होते. दुपारी १२ नंतर नागरिकांची वर्दळ कमी झाली होती, तर कल्याण डोंबिवली शहरात पोलिसांकडून कठोर तपासणी केली जात होती. रेल्वे स्थानकांत ओळखपत्राशिवाय प्रवाशांना तिकिटे दिली जात नव्हती. त्यामुळे या निर्बंधांना नागरिकांकडून संमिश्र प्रतिसाद दिसून आला.

करोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असून जिल्ह्यातही दिवसाला ५ ते ६ हजार करोनाबाधित आढळून येत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे मृतांची संख्याही वाढली आहे. राज्य सरकारने गुरुवार रात्री ८ वाजेपासून संपूर्ण राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना येण्यास मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही ठाणे शहरातील यशोधन नगर, लुईसवाडी, घोडबंदर परिसर, वागळे इस्टेट भागात नागरिक रस्त्यावर नेहमी प्रमाणात फिरताना दिसले. पोलिसांकडून मुख्य महामार्गांवरील कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी या ठिकाणी पोलिसांनी अडथळे उभारले होते. येथील नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन या सारख्या मुख्य भागातच वाहन तपासणी केली जात होती. आनंदनगर येथेही पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे होते. त्यामुळे अनेक वाहने ही मुंबईच्या हद्दीत प्रवेश करताना दिसत होती, तर परिवहन सेवेच्या बसगाड्यांमध्येही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असताना सॅटिस पुलावर मात्र, टीएमटीच्या बसगाड्या प्रवाशांनी भरल्याचे चित्र होते. मात्र, दुपारी १२ नंतर शहरांतील रस्त्यावर काहीसा शुकशुकाट पाहायला मिळाला. तर ठाणे रेल्वे स्थानकात तिकीट घराकडील एकच प्रवेशद्वार सुरू होता. उर्वरित प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती.

रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची चौकशी केली जात असल्याचे चित्र होते. भिवंडी शहरातील भंडारी मार्केट परिसरात काही व्यापाऱ्यांनी दुकानाचे अर्धे शटर उघडून वस्तू विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या ठिकाणीही गर्दी झाली होती. बदलापूर स्थानक परिसरातील बाजारपेठेत ग्राहकांची सकाळ ७ ते ११ या वेळेते मोठी गर्दी होते आहे. अंबरनाथ स्थानक परिसरातही भाजी विक्री केंद्रांवर अशाच प्रकारे गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सकाळच्या चार तासातही गर्दी वाढल्याचेच चित्र आहे.

कल्याण डोंबिवली शहरात पालिका पथक, पोलीस, वाहतूक पोलीस तैनात होते, तर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात होते. तिकीट तपासनीस बहुतांशी प्रवाशांना तिकीट, ओळखपत्र विचारून मगच फलाटावर जाण्यास मुभा होती. सामान्य प्रवाशाने तिकीट मागण्याचा प्रयत्न केला तर त्याने ओळखपत्र दाखविल्याशिवाय त्याला रेल्वे तिकीट दिले जात नव्हते. सामान्य प्रवाशी, व्यापाऱ्यांनी तिकीट काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना परतून लावण्यात आले.

अनावश्यक फिरणाऱ्यांना घरचा रस्ता

अनावश्यक फिरणाऱ्यांना पोलीस घरचा रस्ता दाखवित होते. दुचाकी, चारचाकी घेऊन फिरणाऱ्यांना त्या भागात रोखून त्याचे प्रवासाचे कारण पाहून मगच त्याला पुढे प्रवासाला मुभा दिली जात होती. अन्यथा त्याला घरी परत पाठविले जात होते. बाजारात सकाळच्या वेळेत दिसणारी गर्दी १२ नंतर कमी होती. रेल्वे प्रवासात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना मुभा दिली आहे. सामान्य प्रवाशी रस्त्यावर नाहीत. त्यामुळे रिक्षेत बसण्यासाठी प्रवाशी नसल्याने वाहनतळांवर एक ते दीड किमीच्या रिक्षांच्या रांगा लागल्या होत्या.