News Flash

वाहतूक कोंडीचा फटका विकासकामांना

हलक्या वाहनांसाठी सुरू असलेला पूल रविवारपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

 

वर्सोवा पूल बंद असल्याचा परिणाम; महापालिकेच्या विकासकामांसाठीचे बांधकाम साहित्य शहराबाहेरून येणे बंद

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुना खाडी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाल्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे, पण वाहतूक कोंडीचा परिणाम मीरा-भाईंदरच्या विकासकामांवरही झाला आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या विविध कामांसाठी आवश्यक असलेले बांधकाम साहित्य वाहतूक कोंडीमुळे शहराबाहेरून येणे थांबले असल्याने विकासकामे गेल्या तीन दिवसांपासून ठप्प पडली आहेत.

वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची वजन घेण्याची क्षमता तपासणी सध्या सुरू आहे. यासाठी हलक्या वाहनांसाठी सुरू असलेला पूल रविवारपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सर्व वाहने जुन्या पुलानजीकच असलेल्या नव्या पुलावरून वळवण्यात आल्याने या ठिकाणी सध्या प्रचंड वाहतूक कोंडी सुरू आहे. वाहने एक ते दीड तास या कोंडीत अडकत असल्याने बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडय़ा संबंधितांनी मीरा-भाईंदरला पाठवणेच बंद केले.

तीन दिवसांत बांधकाम साहित्याची एकही गाडी मीरा-भाईंदरमध्ये आलेली नाही, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. त्यामुळे केवळ साहित्याअभावी विकासकामे गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाली आहेत. वाहतूक कोंडीचा फटका केवळ महापालिकेच्या विकासकामांनाच बसला नसून शहरात सुरू असलेल्या इमारत बांधकाम क्षेत्रालाही त्याची झळ बसली आहे. १७ मेपर्यंत पूल बंद राहणार असून त्यानंतर म्हणजे गुरुवारपासून पूल पूर्ववत खुला होण्याची अपेक्षा आहे. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही बांधकाम साहित्य नियमितपणे मिळण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याने वाहतूक कोंडीचा परिणाम आठ दिवस जाणवणार असल्याची महिती सूत्रांनी दिली.

ही कामे ठप्प

मीरा-भाईंदरमध्ये सध्या जेसल पार्क येथील भुयारी मार्ग, भाईंदर पूर्व तसेच मीरा रोड येथे रस्त्यांचे काँक्रीटीकरण, भुयारी गटार योजना, रस्ते व गटार दुरुस्ती, बीएसयूपी योजना आदी अनेक विकासकामे सुरू आहेत. यातील काही कामे पावसाळ्याआधी पूर्णदेखील करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे, परंतु या विकासकामांसाठी आवश्यक असलेले साहित्य वाहतूक कोंडीमुळे येणे थांबल्याने गेल्या तीन दिवसांपासून सर्व विकासकामे ठप्प झाली.

बांधकाम साहित्य येणे बंद

विकासकामांसाठी रेडीमिक्स काँक्रीट वापरणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. हे रेडीमिक्स काँक्रीट तयार करणारे प्रकल्प मीरा-भाईंदरमध्ये असले तरी त्यासाठी लागणारे खडी, सिमेंट आणि इतर आवश्यक साहित्य बाहेरून येत असते, शिवाय रस्ते आणि गटार बांधणीसाठी लागणारे डांबर, खडी आणि रेतीदेखील बाहेरूनच मागवावी लागते.

याआधी बांधकामासाठी लागणारी खडी नवी मुंबईतल्या खाणीतून मागवण्यात येत होती, परंतु एका वर्षांपासून नवी मुंबईतल्या दगडखाणी राष्ट्रीय हरित लवादाने बंद केल्यानंतर खडी, रेती इतर सर्व बांधकाम साहित्य हे पालघर जिल्ह्य़ातील वाडा, भिवंडी, वैतरणा आदी ठिकाणांहून मागवण्यात येत आहे.

वर्सोवा पूल रविवारपासून बंद केल्यानंतर अवजड वाहनांची सर्व वाहतूक इतर मार्गे वळवण्यात आली आहे, तसेच इतर वाहनेदेखील एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकत आहेत. याचा परिणाम म्हणून बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्यांनी आपल्या गाडय़ा या मार्गावर पाठवणेच बंद केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:24 am

Web Title: development work affected due to traffic problems mira bhayandar corporation
Next Stories
1 तपासचक्र : मृत्यूशी सौदा
2 मराठीच्या ‘कल्याणा’साठी मनसे पुन्हा रस्त्यावर, दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळे फासले
3 ठाणे आयुक्तांचा कारवाईचा तगादा सुरूच
Just Now!
X