ठाणे : करोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. असे असले तरी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली देत बुधवारी दिव्यातील एका रस्त्याचे कामाचे गर्दी जमवून भव्य भूमिपूजन केले. शिवसेनेच्या माजी आमदारांनी या कृत्यामुळे स्वत:च्या प्रसिद्धीसाठी दिव्यातील नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा वाऱ्यावर सोडल्याची चर्चा दिव्यात रंगू लागली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला असून, गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आयोजकांना दिल्या आहेत. तसेच करोनाच्या   पार्श्वभूमीवर राज्यातील सिनेमागृहे आणि नाटय़गृहेही बंद करण्यात आली आहेत. असे असताना कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली देत बुधवारी गर्दी जमवून रस्त्याचे भव्य भूमिपूजन केले. दिवा परिसरातील दिवा उपविभाग ते नागवाडी या रस्त्याचे काम ठाणे महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याच्या कामासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यात येणार आहे. या रस्त्याच्या भूमिपूजनासाठी बुधवारी दिव्यात भव्य कार्यक्रम सुभाष भोईर यांनी आयोजित केला होता. शिवसेनेच्या माजी आमदारांचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात शिवसैनिकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तसेच या भूमिपूजनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुभाष भोईर यांच्या या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे त्यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्व वाऱ्यावर सोडला असल्याच्या चर्चा यानिमित्ताने दिवा परिसरात रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, भोईर यांनी मात्र नागरिकांच्या आग्रहास्तव कामाला उपस्थित राहिल्याची सबब पुढे केली आहे. ‘दिवा परिसरातील दिवा उपविभाग ते नागवाडी या रस्त्याचे काम व्हावे, अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या मागणीमुळे या रस्त्याचे काम होत असून हे जनहिताचे काम आहे. नागरिकांनी खूप जास्त आग्रह धरल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. तसेच करोना संसर्ग रोखण्यासाठी यावेळी उपस्थित नागरिकांना मास्कचेही वाटप केले,’ असे ते म्हणाले.