भाजीपाल्यावरील मासिक खर्चात दुपटीने वाढ; कांदे, पालेभाज्यांऐवजी कडधान्ये, बटाटय़ाचा आधार

किशोर कोकणे/ पूर्वा साडविलकर

मुंबई/ठाणे : शंभरीपार पोहोचलेला कांदा, पालेभाज्यांचे चढे दर, डाळीच्या दरांचा उच्चांक आणि हिवाळ्याच्या तोंडावर महागलेली अंडी, मांसाहार यांमुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे गणित पुरते कोलमडले असून स्वयंपाकघराचे बजेट मांडताना गृहिणींची मोठी कसरत होत आहे. रोजच्या जेवणातील भाजीसाठीचा सरासरी खर्च १०० रुपयांवरून २०० रुपयांवर गेला असल्याने स्वयंपाकघराचे मासिक बजेट दुपटीवर गेले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये कडधान्याच्या उसळी, बटाटय़ाचा रस्सा अशा पदार्थावर भर दिला जात आहे.

सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नवी मुंबई आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारी भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात घटली आहे.

एकीकडे कांद्याचे दर दीडशे रुपये किलोवर पोहोचले असताना भाज्या आणि डाळीही महाग झाल्याने स्वयंपाकाचे काय, असा प्रश्न रोज सतावू लागल्याची प्रतिक्रिया गृहिणींमधून व्यक्त होत आहे. महागाईतून सावरण्यासाठी आता महिलांनी स्वयंपाकात नव-नव्या शक्कल लढविल्या आहेत.

कळवा भागात राहणाऱ्या नूतन म्हस्के यांच्या कुटुंबात पाच सदस्य असून त्यांचे पती हे एकटे कमविते आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईवर मात करण्यासाठी त्यांना खर्चावर मर्यादा घालाव्या लागत आहेत. भाज्यांचे दर वाढल्यामुळे त्यांनी भाजी खरेदीत काटकसर सुरू केली आहे. तसेच त्या भाजीपाल्याऐवजी कडधान्यांचा जेवणामध्ये जास्त वापर करीत आहेत. याशिवाय, बटाटा भाजीचे वेगवेगळे प्रकार तयार

करीत असून त्यामध्ये कांद्याचा कमी वापर होईल, याकडे त्या लक्ष देतात. ठाण्यातील लोकमान्यनगर भागात राहणाऱ्या मनीषा दुबे यांनीही अशीच व्यथा मांडली. कांदा महागल्याने त्यांनी आता जैन पद्धतीचा स्वयंपाक बनविण्यास सुरुवात केली आहे. पालेभाज्या घेणे परवडणारे नसले तरी, कमी प्रमाणात पालेभाजी घेऊन त्यात बटाटय़ाचा वापर करून त्या रोजच्या जेवणाचा प्रश्न मिटवत आहेत.

महागाईची व्यथा

’ गेल्या दोन महिन्यांत भाज्या आणि फळांचे भाव दुप्पटीने वाढले.

’ जेवणासाठी लागणारे प्रमुख पदार्थ कांदा आणि लसूण महागल्याने काटकसरीने वापर.

’ कोथिंबीर आणि पालेभाज्या महागल्याने कडधान्याचे पर्याय

’ फळे महागल्याने मोजक्या फळांनाच पसंती.

कांद्याचा दर प्रतिकिलो १२० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. या दरवाढीमुळे वाटण तयार करणे शक्य होत नाही. या वाटणाला पर्याय म्हणून आता टोमॅटो आणि शेंगदाण्याच्या कुटाच्या मिश्रणाचा पर्याय निवडला जात आहे. या मिश्रणामुळेही स्वयंपाक रुचकर तयार होत आहे.

– चारुशीला खातू, गृहिणी, शास्त्रीनगर, ठाणे.

 

भाज्यांचे दर (रु. प्रतिकिलो)

  भाजी           घाऊक         किरकोळ

भेंडी                     ४४           ८०

गवार                 ६५           १००

घेवडा                  ४०           ८०

फ्लॉवर                 २८           ६०

कोबी                   २८           ५०

शि. मिरची           ३५           ६०

फरसबी                ४५           ६०

कारले                   ३५          ६०

वाटाणा               ४०           ६०

तोंडली                ३५           ६०

वांगी                   ४४           ८०

पालक                 १२           २०

मुळा                   २५           ३०

शेपू                     २५           ३०

मेथी                   २५           ३०