ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात महाडजवळील सावित्री नदीवरचा दगडी पूल पडला. मुंबई-गोवा महामार्गावरचा हा महत्त्वाचा पूल होता. या दुर्घटनेनंतर सर्व प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांवर जी चर्चा सुरू होती, ती म्हणजे ब्रिटिशकालीन जुने पूल आणि त्यांच्या अवस्थेस जबाबदार कोण. महाराष्ट्रात असे शेकडोंनी पूल पाहायला मिळतात. ठाणे जिल्ह्य़ातही गेल्या शतकात अशाप्रकारचे तब्बल ३८ पूल बांधण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे..

राणीची सत्ता येण्याआधी जो १८५७ चा उठाव झाला, त्यामुळे ब्रिटिश हादरले होते. भारतासारख्या खंडप्राय भूभागावर सत्ता टिकवावी तर वाहतूक व्यवस्था मजबूत असणे गरजेचे होते. त्यात वाफेचे इंजिन आणि रेल्वेमुळे दळणवळणात क्रांतीच झाली होती. सुरुवातीला मुंबई, कोलकत्ता, दिल्ली आणि चेन्नई या चारही दिशांना जोडणाऱ्या मार्गाची आखणी झाली. साधारणत: १८०० ते १८५० पर्यंत उपलब्ध असलेले रस्ते फारसे चांगले नव्हते. विशेषत: सैन्याच्या हालचाली करताना त्यामुळे अडचणी यायच्या. कारण वाटेत नद्या, नाले, ओहळ, डोंगर-दऱ्या होत्या. परिणामी प्रवास टप्प्याटप्प्याने करावा लागे. त्यामुळे सुरक्षितता धोक्यात येई. सुदैवाने टेलिग्राफ, टेलिफोन आणि रेल्वे हे तिन्ही तंत्रज्ञान एकाचवेळी उपलब्ध झाले. त्यामुळे रस्ते वाहतुकीत मोठी क्रांती झाली. संरक्षण, व्यापार, सुरक्षा आणि प्रशासन या चतु:सूत्रीवर ब्रिटिशांनी रस्त्यांवर मोठे लक्ष केंद्रित केले होते. अर्थात हे सर्व त्यांच्या गरजेतून, अडचणीतून त्यांना जेथे आणि जेव्हा योग्य वाटेल, तिथेच रस्ते व पूल उभारण्यात आले.
साधारण १९०० पूर्वीच्या ठाणे जिल्ह्य़ाचा विचार करता मुंबई-आग्रा रोड आणि मुंबईहून कल्याण मार्गे जाणाऱ्या दक्षिण उत्तर रेल्वेलाच प्राधान्य दिलेले आढळते. ठाणे जिल्ह्य़ातील गेल्या एक हजार वर्षांचा रस्ते इतिहास उपलब्ध आहे. घाट, खिंडी, मेटे, पायवाटा, घळी या अंगाने तो सह्य़ाद्रीमधून होताना दिसतो. त्र्यंबक ते पाली (सुधागड) दरम्यानच्या डोंगरात ३२ घाट होते. जे पेशवाईच्या अस्तानंतर १८१८ ते १८५० च्या दरम्यान ब्रिटिशांनी एकतर मोडले किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पुढे रेल्वेसाठी मुंबई ते कसारा तसेच कर्जत दरम्यान रूळ टाकण्यासाठी जो रस्ता केला, त्यासाठी पूल बांधण्यात आले. त्या काळातील सर्व पूल हे दगडीच आहेत. रेल्वेचा ठाणे खाडी पूल, जो दोन भागात आहे, तो १८५४ च्या प्रारंभी पडला होता. कल्याण-कसारा मार्गावर किमान ३० फूट लांबीचे ४४ पूल आणि ११७ मोऱ्या बांधलेल्या होत्या, त्या आताही उपयोगात आहेत. पुढे घाटात एक १२४ यार्ड लांब आणि १२२ फूट उंचीचे मोठे पूल उभारलेले दिसतात. त्या मानाने कल्याण-कर्जत मार्गावर पूल कमी पण मोऱ्या जास्त बांधल्या गेल्या. कारण उल्हास नदी कुठेच ओलांडावी लागली नाही. अंतर्गत रस्ते म्हणावेत तर त्याचीही निर्मिती फार मोठी केली नाही. जेथे नदी, नाले वा खाडी पार करायची तिथे फेरी होडय़ांची व्यवस्था होती. अशा पाच मोठय़ा तर ४२ लहान मार्गावर फेरीसेवा उपलब्ध होत्या. ठाणे-कळवा, कोलशेत-काल्हेर, ठाणे-वसई, कल्याण-भिवंडी (कोनगांव) आणि गांधारी-सोनाळे-वडवली अशा मुख्य फेऱ्या होत्या. १८७०-८०च्या दरम्यान ठाणे-कळवा दरम्यान लोखंडी पूल टाकण्यात आला. तिथे आता दगडी पूल आहे.
या सर्व मोठय़ा व काही छोटय़ा फेरी सेवांच्या ऐवजी सरकारने पूल बांधावेत, अशी मागणी हळूहळू जोर धरत होती. मात्र सुरुवातीच्या काळात ब्रिटिश सरकारने त्यात फारसे लक्ष घातले नाही. १९०६-०७ मध्ये भिवंडीतील घवटकर यांच्या घरी एक बैठक झाली. तिथे जमलेल्या सर्वानी स्वाक्षरी करून एक निवेदन ब्रिटिश सरकारला दिले. त्यात त्यांनी रेल्वेचा आम्हाला उपयोग होण्यासाठी कल्याण खाडीवर एक पूल आवश्यक असल्याचे नमूद केले होते. अर्थात मुंबई सरकारने त्या पत्राला केराची टोपली दाखवली. पहिले महायुद्ध प्रत्यक्षात ४ ऑगस्ट १९१४ रोजी सुरू झाले असले तरी त्याचे पडघम मात्र १९०८-०९ मध्ये युरोपमध्ये वाजू लागले होते. युद्धाची चाहूल लागल्याने ब्रिटिशांना जाग आली. नव्या तंत्र, मंत्र आणि यंत्राने हे युद्ध खेळले जाणार होते. त्यामुळे जमीन, पाणी आणि आकाश सर्व सुसज्ज करणे आवश्यक होते. पेट्रोल/ऑइल इंजिनच्या गाडय़ा, मोटारी आल्या. कल्याण गावात १९०४ मध्ये पहिला ट्रक धावला. १९०६ लोकमान्य टांग्यातून गावात फिरले. मात्र १९१६ मध्ये पुन्हा कल्याणात होमरूलसाठी लोकमान्य मोटारीने आले. कारण या दहा वर्षांच्या काळात वाहतुकीच्या साधनांमध्ये आणि सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाले. मुंबई-ठाणे-कल्याण-पुणे-नाशिक हा मार्ग सैन्य हालचाली व दारूगोळा वाहतुकीसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे लंडन पार्लमेंटने ठराव करून सर्वदूर साम्राज्यात रस्ते दुरुस्ती आणि बांधणीचा फतवा काढला.
कल्याण येथील खाडी पुलाचा मी २० वर्षे शोध घेत होतो. १९१४ मध्ये तो रिचर्डसन-क्रुडासने बांधला. पन्नास वर्षांची हमी होती. मात्र मूळ कागदपत्रे कुठेही उपलब्ध नव्हती. २०१४ साल उजाडले. पुलाची शताब्दी होती. परंतु ना शासनाला चिंता ना महापालिकेला. एक दिवस पुराभिलेखागारात अभ्यास करताना १९०९-१० चे घबाड हाती आले. त्यात ठाणे जिल्ह्य़ातील एक दोन नव्हे तर तब्बल ३८ पुलांच्या बांधणीचे रेकॉर्ड हाती आले. त्यात पूल बांधणीचा ठराव, जी.आर. ते पुलाचे उद्घाटन अशी इत्यंभूत माहिती दिलेली आहे. कळवा ब्रिज, कल्याण खाडी पूल आणि मुरबाडच्या मुरबाडी नदीवरील पूल आदींची माहिती त्यात आहे. करारनामे, त्या त्या पुलांचे नकाशे, झालेले अपघात, झालेले वादविवाद, चुकलेले अंदाज याचा सारा तपशील या कागदपत्रांमध्ये आहे. १४ जानेवारी १९०९ रोजी कल्याण खाडी पुलाचे कंत्राट देण्यात आले. जून १९१२ अखेर तो पूल पूर्ण होणार होता. मूळ बजेट पाच लाख ५२ हजार रुपये होते. नंतर ते वाढत सहा लाखांवर गेले. कारण पाचवा खांब कोसळला होता. अखेर डिसेंबर १९१३ मध्ये पुलाचे काम पूर्ण झाले.
सध्या कळवा, मुरबाड आणि कल्याणचे पूल १०२ वर्षांचे झाले आहेत. कल्याण खाडी पूल हा लोखंडी आहे. हेरिटेज म्हणून त्याचे जतन करता येईल. परदेशात असे अनेक पूल फिरण्यासाठी, बसण्यासाठी सुशोभित केलेले आहेत. सध्या कल्याणच्या पुलावर खालच्या बाजूवर २६ जुलैच्या पुरात वाहून आलेले सामान लटकताना दिसते. ज्या पुलाने ८०-९० वर्षे कल्याण आणि भिवंडी दोन्ही शहरवासीयांची सेवा केली, त्या पुलाकडे लोकप्रतिनिधींनी इतक्या कृतघ्नतेने पाहावे? त्याच्या प्रवेशद्वारासमोर गोठा बांधावा? एकप्रकारे शिवरायांच्या आरमाराचा साक्षीदार असलेल्या दुर्गाडी किल्ल्याचा हा अपमानच आहे..
सदाशिव साठे

flamingo habitat navi mumbai, navi mumbai flamingo city
फ्लेमिंगो क्षेत्रातील राडारोडा दूर, अधिकाऱ्यांची पाहणी; पामबीच मार्गालगत लोखंडी कठडा उभारण्याचे आदेश
sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…