रहिवाशांचे स्थलांतर, जीवितहानी नाही; मुंब्य्रात चार वृक्ष सहा घरांवर पडले

ठाणे : महापालिका क्षेत्रात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर गुरुवारी दुपापर्यंत कायम होता. शहराच्या विविध सखल भागांमध्ये पाणी साचले, तर दिवा परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने येथील नागरिकांना बोटीतून इतरत्र स्थलांतरित करण्यात आले. दुपारी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर या सर्वच भागांमधील पाणी ओसरून जनजीवन पूर्वपदावर आले. मुंब्रा परिसरात चार वृक्ष पडून सहा घरांचे नुकसान झाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

ठाणे शहरात बुधवार रात्रीपासून जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. गुरुवार दुपापर्यंत पाऊस सुरूच होता. या पावसामुळे शहरातील यशस्वीनगर, मुलुंड चेकनाका, गावदेवी, कोलशेत, दिवा, मुंब्रा, शिळफाटा आणि पारसिक नगर परिसरांतील काही गृहसंकुले तसेच चाळींमध्ये पाणी साचले होते. दिवा येथील साबेगाव भागात गुडघाभर पाणी साचले होते. पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे काही स्थानिक रहिवाशांनी येथील नागरिकांना बोटीच्या साहय्याने इतरत्र स्थलांतरित केले.

ठाणे शहरातील मासुंदा तलाव परिसरात साचले होते. या पाण्यातून वाहने पुढे नेताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. जांभळीनाका भाजी मंडईतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. शहरात सात ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. यामध्ये मुंब्रा येथील दत्तावाडी परिसरातील सहा घरांवर चार वृक्ष पडले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे नुकसान झाले. येथील कुटुंबीयांनी त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आसरा घेतला. ठाण्यातील महागिरी कोळीवाडा येथे २५ वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीतील १६ कुटुंबियांना बाहेर काढून इतरत्र स्थलांतरित करण्यात आले आहे, तसेच लुईसवाडी परिसरात वृक्ष कोसळून एका कारचे नुकसान झाले आहे.

नाल्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

खोपट येथील आंबेडकर रोडजवळील नाल्यात वाहून गेलेल्या जीवन ओव्हळ (३६) याचा मृतदेह पाच दिवसानंतर विटावा येथील खाडीकिनारी आढळून आला. आंबेडकर रोड येथे राहणारा जीवन ओव्हळ हा १७ जुलैला पहाटेच्या सुमारास नाल्याच्या कठडय़ावर उभा होता. त्यावेळेस तोल जाऊन तो नाल्यात पडला. याबाबत त्याच्या मित्राने माहिती दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन त्याचा शोध सुरू केला होता. परंतु त्याचा शोध लागला नव्हता. गुरुवारी सकाळी १२ वाजता त्याचा मृतदेह विटावा खाडीमध्ये आढळून आला.