|| किशोर कोकणे

महापालिकेकडून वाहतूक नियोजनाचा अभ्यास:- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता गृहीत धरून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाची जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाणे महापालिकेचे बाळकूम अग्निशमन दलाचे कार्यालय ते बाळकूम येथील सिग्नलपर्यंत या कामासाठी अडथळे बसविण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून यापूर्वी याठिकाणच्या वाहतूक नियोजनाचा अभ्यास केला जात आहे.

सद्य:स्थितीत घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने दररोज मोठय़ा वाहनकोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या नव्या प्रकल्पाच्या कामामुळे ही कोंडी आणखी वाढेल अशीच चिन्हे आहेत. वाहतूक पोलिसांनी याची पाहणी केल्यानंतर या मार्गावर माती परीक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पातील ठाणे बाजूकडील काम हाती घेतले जाणार आहे. भिवंडीतील मेट्रो काम सुरू होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कापूरबावडी मार्गावरील ठाणे महापालिकेचे बाळकूम अग्निशमन दलाचे कार्यालय ते बाळकूम नाका येथपर्यंत माती परीक्षण करण्यात येणार आहे. येथे रस्ता खोदून अडथळे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावर दोन दिवसांपासून ठाणे वाहतूक पोलिसांकडून या ठिकाणी वाहतूक कोंडी होईल की नाही याची चाचपणी करण्याचे काम सुरू केले आहे. लवकरच वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या मार्गाची पाहणी करणार आहेत. वाहतूक पोलिसांनी हिरवा कंदील दिल्यानंतर या कामाला सुरुवात होईल.

कोंडीची भीती

या मार्गावरून सकाळी आणि रात्रीच्या वेळेत भिवंडी तसेच काल्हेर भागात ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांची या मार्गावरून वाहतूक सुरू असते. तसेच काल्हेर आणि कशेळी भागात नागरी वसाहतीही वाढल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सारखी असते. या मार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर गॅरेजनी अतिक्रमणे केली आहेत. सेवा रस्त्याची खड्डय़ांमुळे दुर्दशा झाली आहे. अशा परिस्थितीत येथे वाहतुकीस अडथळे उभे केल्यास मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.