17 February 2020

News Flash

मेट्रोसाठी वृक्षतोड अटळ

४७८ झाडांच्या पुनरेपणासाठी एमएमआरडीएचा महापालिकेकडे अर्ज

४७८ झाडांच्या पुनरेपणासाठी एमएमआरडीएचा महापालिकेकडे अर्ज

मेट्रो मार्गासाठी ४७८ झाडांची कत्तल अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. झाडे तोडून पुनरेपण करण्याकरिता एमएमआरडीएने महापालिकेकडे अर्ज सादर केला आहे. पालिकेने निविदा मागविण्याची तयारी केली आहे. मात्र, अनेक वर्षांपासूनचे हे मोठे वृक्ष उखडून त्यांचे अन्यत्र पुनरेपण कितपत यशस्वी होईल, हा प्रश्न कायम आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी १४ हजार ५४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बांधकामात अडथळा ठरणाऱ्या ४७८ वृक्षांपैकी काही वृक्ष जुने आहेत. ही झाडे तोडण्यात येणार असल्याने वृक्षप्रेमींकडून नाराजीचा सूर उमटत आहे.

मुलुंड चेकनाका एलबीएस मार्ग येथून ते तीन हात नाका जंक्शनपर्यंत आणि तीन हात नाका ते कासारवडवली दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. यामधील मुलुंड चेकनाका एलबीएस मार्ग आणि पुढे तीन हात नाका ते माजिवडा (वागळे वर्तकनगर बाजूकडील) दरम्यान सुरू असणाऱ्या बांधकामावेळी या ४७८ झाडांसोबत इतर ७२ झाडांच्या फांद्या तोडण्यात येणार आहेत.

या झाडांच्या रोपणासाठी महपालिकेने काही वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च केले आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी पुलावर होणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रुंदीकरणासाठी दोन्ही मार्गिकांच्या बाजूच्या तब्बल २०० झाडांची देखील कत्तल करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या कत्तलीचा सविस्तर प्रस्ताव प्राधिकरणाने ठाणे महापालिकेकडे सादर केला होता. पुनरेपणाचा सविस्तर आराखडा सादर करा मगच परवानगी देऊ , अशी भूमिका महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने सहा महिन्यांपूर्वी घेतली होती. मात्र आता तब्बल ४७८ झाडांच्या कत्तलीचा आणि पुनरेपणाचा अर्ज मेट्रो बांधकाम विभागाने महापालिकेकडे सादर केल्यानंतर महापालिकेनेही त्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पुनरेपण कसे करावे, तसेच वृक्ष तोडीची पद्धत कशी असेल, याविषयीची बैठक घेण्यात येत आहे. योग्य तो निर्णय घेतला जाईल.   – अनुराधा बाबर, वृक्ष प्राधिकरण अधिकारी, ठाणे महापालिका

हरकती, सूचनांसाठी आवाहन

महापालिकेने या वृक्षांच्या कत्तलीसंबंधी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली असून त्यावर हरकती सूचना सादर करण्याचे आवाहन ठाणेकरांना केले आहे. दुसरीकडे वृक्षांच्या पुनरेपणासाठी निविदा मागविण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

First Published on February 12, 2019 3:10 am

Web Title: metro project in thane
Next Stories
1 जुन्या-नव्या गीतांची रंगतदार मैफल
2 ‘मासुंदा’ काठावर मस्ती बँडची धमाल
3 कल्याण ग्रामीणमध्ये पाण्यासाठी वणवण
Just Now!
X